(स्वप्नील लोणकर या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्या केली आणि या विद्यार्थ्यांच्या एकंदर मानसिक स्थितीबाबत सगळ्या समाजाला खडबडून जाग आली.. समाजमाध्यमांवर त्यावर उमटलेल्या प्रतिक्रियांपैकी ही एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया..)
स्वप्नील लोणकरची आत्महत्या आणि त्याचे मृत्यूपूर्वीचे पत्र किती ही विचार केला तरी डोळ्यासमोरून जात नाही. त्याच्या आत्महत्येनंतर एमपीएससी, यूपीएससी केलेल्या प्रत्येकाला स्वतःचा प्रवास आठवला असणार हे निश्चित..
मला आजही एसआयएसीचा एक विद्यार्थी आठवतोय.. डॉक्टर होता अतिशय हुशार, तेथील सर्व विद्यार्थ्यांत तो सर्वात बुद्धिमान होता असे म्हणणं वावगं ठरणार नाही. अॅनालिसीस अप्रतिम. पहिल्या अॅटेम्टमध्ये तो यूपीएससी क्लिअर करेल असं वाटलेलं सर्वांना, पण तसं झालं नाही. अॅटेम्टमागून अॅटेम्ट गेले. त्याने ज्यांना गाईड केले ते त्याच्यामागून पास झाले. अतिशय हुशार असलेला डॉक्टर निराशेच्या गर्तेत गेला. त्यात दारूचे व्यसन जडले. मनातील गदारोळ विसरण्यासाठी दिवस न दिवस दारूच्या आहारी गेला. शेवटी आई वडिलांनी लग्न लावून दिले. गावी डॉक्टर म्हणून व्यवसाय सुरू केला. पण स्पर्धा परीक्षेतले अपयश कायम त्याच्या डोक्यात सल करून होते. ते विसरण्याकरिता दारूचा आधार.
यामध्ये वय वाढत गेले आणि नैराश्यदेखील.. वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी दारू पिऊन बाईक चालवताना ट्रकखाली आला आणि अतिशय हुशार अशा मुलाचा दुर्दैवी अंत झाला. शेवटपर्यंत यूपीएससी क्लिअर करता आले नाही या नैराश्यातून तो बाहेर आला नाही. खरे तर मेडिकलमध्ये तो टॉपर होता. त्या क्षेत्रात चांगलं करियर तो आरामात करू शकला असता, पण डॉक्टर असून त्याने मानसिक उपचार महत्वाचे मानले नाहीत.
कित्येकदा अधिकारी म्हणजे ‘ग्लॅमर’. फक्त त्यापायी या क्षेत्राचे आकर्षण असणारे देखील खूप आहेत. विशेषतः पोलीस वर्दीचे… कित्येक मुलींना मी भेटले तेव्हा मला आवर्जून सांगावेसे वाटले की केवळ आकर्षणापायी इथे येऊ नका खूप जबाबदारी असते. तुमचे घर, कुटुंब, नोकरी हे सांभाळणे ही तारेवरची कसरत असते. तुमचा कल ओळखा. कोणतेही क्षेत्र आज छोटे नाही. सर्व क्षेत्रात तुम्ही चांगलं नाव कमवू शकता. इंटरनेटमुळे जग जवळ आलंय. लाखो संधी उपलब्ध आहेत त्याचा फायदा घ्या.
स्पर्धा परीक्षांमध्ये वेळ देताना अजून एक गोष्ट आवर्जून करा, बायोडेटा अपडेट ठेवा. तुमचे जे शिक्षण आहे त्यात मास्टर्स करा. कारण बऱ्याचदा तुम्ही स्पर्धा परीक्षा पास करू शकला नाहीत, तर त्या वर्षांमध्ये तुमचे ग्रॅज्युएशनचे बॅचमेट पुढे गेलेले असतात. तुमचा त्या विषयाशी संबंध दुरावलेला असतो, त्यात परत करीयर करायला अडचणी निर्माण होतात. महेश झगडे सरांनी छान सांगितलंय, स्पर्धा परीक्षा प्लॅन-बी ठेवा.
मला त्यामध्ये मानसिक स्वास्थ्याबद्दल बोलायचं आहे. यूपीएससी अथवा एमपीएससी लाखो मुले दरवर्षी देतात. त्यातून फक्त काहीशे मुले फायनल क्लिअर करून अधिकारी बनतात. इंटरव्यूला जाऊन फेल झाल्यावर परत प्रीलिम द्यायची वेळ येते; तेव्हा, सर्वात जास्त तुमच्या मानसिक कणखरतेचा कस लागतो. उरलेल्या लाखो मुलांचे त्यांनी मानसिक स्वास्थ नीट ठेवणे आणि त्यांनी दुसरे करिअर चांगल्या रीतीने करणे हे देखील तितकेच आवश्यक आहे.
दुर्दैवाने मानसिक स्वास्थ हा भारतात अतिशय दुर्लक्षिलेला विषय आहे. अँझायटी, डिप्रेशन हे सर्दी, पडसे, तापाइतके कॉमन आहेत. प्रत्येकाला ते होऊ शकतात आणि त्यावर उपचार अथवा काऊन्सेलिंग अत्यन्त गरजेचे आहे. याकडे कोणी पुरेशा गांभीर्याने बघत नाही. डिप्रेशन किंवा नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या माणसाला वैद्यकीय मदत घे, असे सांगितले तर ‘मला काय वेड लागलंय का?’ इथपासून ते घरच्यांकडून अंगारे धुपारेपर्यंत सर्व प्रतिक्रिया अनुभवायला येतात. मानसशास्त्र हा संवेदनशील विषय खरं तर बेसिक अभ्यासक्रमात कम्पलसरी करायला हवा. बेसिक शरीरशास्त्र जसे आपण शिकतो तसे बेसिक मानसशास्त्र शिकणे काळाची गरज आहे. त्याने अपयश पचवण्यापासून ते अपयशावर यशस्वी मात करण्यापर्यंत सर्व काही शिकवण्याची क्षमता आहे आणि त्यात मानसिक आजाराकडे देखील लोक सहजतेने पाहू शकतील त्याची ट्रीटमेंट घेऊ शकतील. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अनेक चांगले मानसोपचारतज्ञ आहेत आणि तिथे उपचार मोफत आहेत. मानसोपचार महाग असतात म्हणून न घेणार्यां साठी हे आवर्जून सांगणे आहे.
कोविडसारख्या संकटामधून जाताना आपण खूप वेगवेगळ्या स्थित्यंतरातून जात आहोत. आपल्याला आपल्या नकळत अनेक प्रकारच्या स्ट्रेसला तोंड द्यावे लागत आहे. या काळात सर्वात जास्त महत्वाचे आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्य. स्पर्धा परीक्षा देणारे सर्वजण उद्याचे भविष्य आहेत. त्यामुळे या काळात त्याने स्वतःचे मानसिक आरोग्य सांभाळून मित्रमैत्रिणींना पण आधार द्यायला हवा. पालकांनी पण याकडे गांभीर्याने बघायला हवं आणि त्यासाठी गरज पडली तर मानसोपचार तज्ज्ञाचीदेखील मदत घेतली पाहिजे.