(गावात होणार्या ‘गोठा’ बैठकीच्या पार्श्वभूमीवर सरपंच गटाचे मेंबरलोक पंचायतीच्या हाफीसात जमलेले. गळक्या हाफीसात कलरच्या दहाएक बादल्या पडलेल्या, बाजूला शिड्या. कोपर्यात पताका, होर्डिंगचा गंज.)
सीताबाई : बया, आज काहून बोलावलं घाईनं?
गोगटे : लग्न काढलं सरपंचानं!
राहीबाई : (लाजत) चला, काहीतरीच काय?
विजयराव : रात्रभर फोन लावू लावू वैताग आलाय. याला बोलाव, त्याला आमंत्रण दे! त्यात सरपंचाचं तोंड बघून लोकं नाकतोंड मोडतात.
गोगटे : अहो, काही काय बोलताय? सरपंच काय गुटखा-बिटखा खाऊन लाळ गाळत असतात का?
सीताबाई : पण आमंत्रण, रंगरंगोटी हे चाल्लंय काय?
विजयराव : हाय का आता? सरपंचानं ‘गोठा’ मिटिंग बोलावलीय. काही श्रीमंत सरपंचांची!!
सीताबाई : बया, मी म्हणते कश्याला बोलवायचं कोणाला? आम्ही तर बाई कारेक्रमबी घरातल्या घरातच करतो.
गोगटे : तुमचं राहू द्या हो! आता ह्या पाहुण्यांच्या स्वागताला काय करायचं ते सांगा!
राहीबाई : मी तर बाई पैठणी नेसून येईन. (सीताबाईकडं बघत) नथ घालून येऊ काय हो?
विजयराव : कुणी कसंही या हो! पण पाहुणे आल्यावर त्यांचं स्वागत कसं करायचं ते बघा आधी! मी आमंत्रण देऊन थकलोय. मी बाकीची तयारी अजिबात बघणार नाही. सांगून ठेवतो!
गोगटे : तुम्ही चिडू नका हो! करू की तयारी. त्याला काय? चार रस्ते झाडायचे नि पाचसहा कप चहा उकळायचा. आणखी काय?
राहीबाई : बाई, माझ्या हातचा चहा सरपंचांना फार आवडतो. आणखी दहा चहा उकळायला लावला तरी आणील मी! राहिलं झाडायचं, तर ते बघून घ्या आता!
विजयराव : तुम्ही समजता काय हो? ह्या गोठा मिटिंग मग गोठ्यातच भरवू की! काय बोलताय तुम्ही?
गोगटे : मग नेमकं करायचंय काय?
विजयराव : तेच तर सांगायला बोलावलंय ना?
सीताबाई : (पदर सावरत) बाई सांगा मग लवकर! मला लभडेबाबाच्या कीर्तनाला जायचंय, तालुक्याला!
विजयराव : किमान येणार्या-जाणार्या रस्त्यावरून पाहुणे आल्यावर गाव गरीब वाटायला नको…
गोगटे : हां, आलं लक्षात माझ्या! सरपंच एकदा बोलले होते मला.
राहीबाई : बाई, तुम्हाला माह्यासारखंच सरपंचाच्या मनातलं चटकन कळतं म्हणजे!!
गोगटे : अहो, आमचं एकदा बोलणं झालेलं त्याबद्दल सांगतोय मी!
सीताबाई : आवरा बाई लवकर!
गोगटे : येताना रस्त्याच्या पलीकडं झोपड्या आहेत, त्यांचं काही करावं लागेल…
राहीबाई : आणखी?
गोगटे : रस्ते चकाचक करावे लागतील, जेवणं बनवावं लागेल.
विजयराव : सगळं असंतसं नकोय! श्रीमंती थाटाचं व्हायला पाहिजे!
सीताबाई : बाई, सफाई कामगार रस्ते झाडतील पण हे भटके कुत्रे, जनावरं, यांचं करायचं काय? एखाद्या पाव्हण्याला कुत्र्यानं धरलं तर?
गोगटे : कुत्र्यांचं नंतर बघा, आधी त्या झगडेला बैलं रस्त्यात बांधू नको म्हणून सांगा. मागल्या वर्षी त्याच्या बैलानं माझ्या व्याह्याचं धोतर फाडलं होतं.
राहीबाई : ते बी राहिलं तर चालंल, पण मंदाबाईला पोरं वावरात पाठवायला सांगा. नाहीतं सकाळच्या पाहरी रस्त्यावं डबे घेऊन बसायचे!
सीताबाई : आणि ते चौकातल्या म्हसोबाला वर्ष झालं, शेंदूर लावला नाही. ते पण बघा!
शिपाई : (दारातूनच डोकावून) ओ, एवढं करताय तर हाफिसाचे पत्रे गळताय. ते पण बघा!
विजयराव : इथं पुढं मंडप टाकायचाय, कोण कश्याला आत येतंय? बघायला?
गोगटे : झाड-झटक होईल हो! आधी गटारांवर ढापे टाकायचं बघावं लागेल.
विजयराव : तुम्ही पैशाचं बघा. मी माणसं बघतो!
सीताबाई : पैशाचं काय इचारता? आतापर्यंत मी वीसेक उतार्यावर बोजा चढवलाय, काही विकून दिलेय. आता किती पैशे लागतील ते बोला. म्हणजे कुठलं तुकडं विकायचं ते मी बघते!
राहीबाई : बाई, फक्त टेंडर द्याल तर माह्या अडाणी भावाला आधी द्या! तो पडंल ते काम करून देईल.
गोगटे : सगळ्यांच्या पोटाचा विचार होईल, कामाचं बोला आधी!
सीताबाई : ते आधी गावात घुसताना झोपड्या लागत्या, त्यांना घर बांधून द्यावा का काय?
राहीबाई : बाई ते पोरंबी उघडे नागडे रस्त्यावर बसलेले राहतात, त्यांनापण नवे कपडे घ्यायचे का?
विजयराव : त्यांनी आपल्याला मतं दिलीत, बघू काय करता येईल ते! शेवट गरिबी हटाव, घोषणाय आपली!
गोगटे : पाहुण्यांना स्वयंपाक काय करावा?
सीताबाई : आपल्याकडं लग्नात जे बर्फी-बिर्फी करत्या, तसलं काही करू!
(तोच सरपंचाचं आगमन होतं.)
सरपंच : तर उद्या पटकन पंचपक्वान्नाचं जेवण बनवणारे सैंपाकी बोलावून घ्या! जिल्ह्याच्या ठिकाणाहून भारीतले मंडप मागवा. घरपट्टी वाढवा लावा, ह्या महिन्यापासून. खर्च भागायला पाहिजे. आणि महत्वाचं ती कुत्रे पकडायची गाडी नि कचर्याची गाडी घेऊन सगळ्या झोपड्या काढून तिथल्या नागड्यांना रात्रीतून हलवा, तिथं मला कुणी गरीब नकोय कळलं?
(बाहेर बसलेला शिपाई ऐकता ऐकता बाहेरली ‘गरिबी हटाव’ घोषणेतली गरिबीची वेलांटी खोडतो, आता ती ‘गरीब हटाव’ दिसतेय.)