फक्त प्रबोधनकारांचं लग्न परतवाड्याला जमलं म्हणून किंवा त्यांचं तिथे सहकुटुंब वास्तव्य होतं म्हणून नाही, तर एका तरुणाने शंभर वर्षांपूर्वी इथेच लग्न ठरवताना मुलगी पाहायला जाणं, हुंडा, कन्यादान अशा गोष्टी नाकारल्या; त्याची आठवण आजच्या मुलामुलींना करून देण्याची गरज आहे. ते सांगण्यासाठी तरी प्रबोधनकारांचं एखादं स्मारक तिथे हवं आहे.
—-
इंटरनेटवर पनवेल आणि परतवाडा या दोन शहरांमधलं अंतर शोधलं, तर ते ६८० किलोमीटर भरतं. पनवेलमध्ये राहणार्या प्रबोधनकारांचं लग्न दूर विदर्भात परतवाड्यात जमल्याचं आज आश्चर्य वाटतं. पण तसं झालं खरं. पोटापाण्याच्या धडपडीपायी प्रबोधनकार महाराष्ट्रभर फिरतात काय, नाटकाच्या ओढीने वर्हाडाच्या दौर्यावर जातात काय, तिथे नाटक कंपनीतली मंडळीच त्यांच्या लग्नासाठी प्रयत्न करतात काय, एक मुलगी अचानक त्यांच्यासमोर उभी केली जाते आणि ते तिला हो म्हणतात काय; सारंच नवलाचं. पण त्यामुळे ठाकरे कुटुंब कायमचं विदर्भाशी जोडलं गेलं.
नागपूरच्या गोरेवाडा राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाच्या अत्याधुनिक स्वरूपाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भाशी असलेल्या नात्याचा उल्लेख केला होता. आमच्या धमन्यांत विदर्भाचं रक्त धावतंय. आम्हाला विदर्भाविषयी प्रेम शिकवण्याच्या भानगडीत कुणी पडू नये, असं ते म्हणाले होते. त्याचा संदर्भ परतवाड्याचाच होता. ते मुख्यमंत्री बनल्यानंतर विधानसभेच्या पहिल्या नागपूर अधिवेशनातही उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा उल्लेख विदर्भाचा नातू असा केला होता. त्यात त्यांनी परतवाड्याचा आवर्जून उल्लेख केला होता. तेव्हा ठाकरे कुटुंबाच्या परतवाडा कनेक्शनची चर्चा झाली होती.
नीलिमा हारोडे यांनी गेल्या वर्षी शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त `महाराष्ट्र टाइम्स`मध्ये लेख लिहून आठवणी जागवल्या आहेत. त्यात याचा नेमका संदर्भ सापडतो. त्या लिहितात, `ही घटना आहे २००४मधील. एक दिवस अगदी सकाळीच माझ्या वडिलांचा फोन आला. आज दुपारी उद्धव ठाकरे आपल्या घरी येणार आहेत, असं त्यांनी सांगितलं. माझ्यासाठी तो सुखद धक्का होता. हा निरोप देणारा फोन दस्तुरखुद बाळासाहेब ठाकरेंनी केला, हे समजल्यानंतर अत्यानंद झाला. या एका फोनने फक्त आमच्या घरचं नव्हे तर संपूर्ण परतवाडा शहराचंच वातावरण बदलून गेलं. अचानक सगळीकडे उत्साह संचारला. उत्सवी हुरूप दाटून आला. शिवसेनाप्रमुखांचा फोन येणं आणि उद्धव ठाकरे भेट देतील, हे सांगणं आमच्यासाठी निश्चितच मोठी घटना होती. अर्थात त्यांनी आमच्या घरी भेट देण्यामागे कारणही तेवढंच महत्त्वाचं होतं.`
नीलिमा हारोडे ते कारण सांगताना लिहितात, `परतवाड्यातील आमचे राहते घर म्हणजे किराड-वाडा. तेथील चाळ आम्ही भाड्याने दिली होती. त्यात एका छोटेखानी घरात प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या पत्नी रमाबाई आणि पुत्र बाळ ठाकरेंसोबत वास्तव्याला होते. बाळासाहेब आमच्या घरी राहायचे हे आता सांगितलं तरी मैत्रिणींना आश्चर्याचा धक्का बसतो. ते स्वाभाविकही आहे. मी लहान असताना माझे आजोबा आणि वडील रामेश्वरजी उघडे मला या गोष्टीची नेहमी आठवण करून द्यायचे. मलादेखील फार अप्रूप वाटायचं. मुळात आमचा वाडा एवढा विस्तीर्ण होता की तिथे क्रिकेट वा तत्सम मैदानी खेळ सहज मनसोक्त खेळता यायचं. आमचं राहतं घरही होतं अगदी प्रशस्त, ऐसपैस. सर्वांनी मोहात पडावं असं.`
पण आज या किराड वाड्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. अमरावती येथील पत्रकार जयंत सोनोने यांचं मूळ गाव अचलपूर. ते किराड वाड्याची सद्यस्थिती बघण्यासाठी मुद्दामून परतवाड्याला गेले होते. तेव्हा त्यांना दिसलेलं वास्तव भीषण होतं. त्यांनी सांगितलं की वाडा पूर्णपणे मोडकळीला आलेला आहे. तिथे राहणार्या इंदुमती हारोडे आणि त्यांची मुलं प्रबोधनकारांचं वास्तव्य मान्य करण्यास फारशी उत्सुक नाहीत. उद्या आपल्या वाड्याचं स्मारक झालं तर आपण कुठे राहणार अशी भीती ते अप्रत्यक्ष व्यक्त करतात. प्रबोधनकार भाड्याने राहायचे ती खोलीही जीर्ण अवस्थेतच आहे. सध्या या खोलीत देशपांडे नावाचे भाडोत्री राहतात. जयंत सोनोने तिथे गेले, तेव्हा ते भेटले नाहीत. पूर्वी तिथे अनेक वर्षं गणपतराव पाटील भाडोत्री म्हणून राहत. स्थानिक शिवसैनिक अनंतराव पिंपळकर यांनी मोठ्या आपुलकीने प्रबोधनकारांच्या वास्तव्याच्या स्मृती जपण्यासाठी प्रयत्न केल्याचं जयंत सोनोने यांनी सांगितलं. त्यांच्याकडे प्रबोधनकारांनी वापरलेली जुनी दौत असल्याचं अभ्यासक मनीष देशमुख यांनी त्यांच्या प्रबोधनकारांवरील पीएचडीच्या शोधप्रबंधात नोंदवलेलं आहे.
प्रबोधनकारांच्या पत्नी रमाबाईयांचं माहेरचं नाव मंजुळा गुप्ते असल्याची माहिती मनीष देशमुख याच प्रबंधात देतात. विदर्भकन्यांनी महापुरुषांबरोबर लग्न करून त्यांना साथ दिल्याची पुराणांपासूनची उदाहरणं त्यांनी प्रबंधात दिली आहेत. प्रभू रामचंद्रांचे आजोबा अज यांची पत्नी भोजकन्या इंदुमती, श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी, अभिमन्यूची पत्नी उत्तरा, नल राजाची पत्नी दमयंती, अगस्ती ऋषींची पत्नी लोपामुद्रा अशी उदाहरण देत ते सर्वात शेवटी राजमाता जिजाऊंचा विदर्भकन्या म्हणून अभिमानाने उल्लेख करतात. त्यानंतर ते लिहितात, `आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये, अस्मितेच्या प्रकटीकरणामध्ये प्रबोधनकारांना साथ देणार्या रमाबाई या वरील स्त्रियांचाच वारसा चालवणार्या विदर्भकन्या होत्या.`
प्रबोधनकारांचं जन्मगाव असलेल्या पनवेलनेच प्रबोधनकारांच्या स्मृती जपलेल्या नाहीत, तर प्रबोधनकारांची सासुरवाडी असलेल्या परतवाड्यात प्रबोधनकारांचं स्मारक नसल्याचं आश्चर्य वाटायला नको. पण आज प्रबोधनकारांचं कार्य नव्या पिढीला महत्त्वाचं वाटत असताना तिथे प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी नव्याने प्रयत्न व्हायला हवेत. फक्त प्रबोधनकारांचं लग्न परतवाड्याला जमलं म्हणून किंवा त्यांचं तिथे सहकुटुंब वास्तव्य होतं म्हणून नाही, तर एका तरुणाने शंभर वर्षांपूर्वी लग्नासाठी आजच्या काळालाही मागे टाकेल अशा अटी घातल्या होत्या. त्या त्याने याच भूमीवर पूर्ण केल्या. श्रीमंताचा घरजावई होण्याची लाचारी नाकारली. जाणीवपूर्वक गरीब घरातली मुलगी केली. मुलगी पाहायला जाणं, हुंडा, कन्यादान अशा गोष्टी नाकारल्या. त्याची आठवण आजच्या मुलामुलींनी करून देण्याची गरज आहे. ते सांगण्यासाठी तरी प्रबोधनकारांचं एखादं स्मारक तिथे हवं आहे.
परतवाड्यात लग्न ठरलं तरी ते लगेचच झालं नाही. कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे बहिणीचं लग्न ठरेपर्यंत ते थांबणार होते. त्याला पाच सहा महिने लागले. अचलपूरच्या मुक्कामानंतर लवकरच प्रबोधनकारांनी नाटक क्षेत्राला रामराम ठोकला. हे करण्याचं कारण सांगताना ते लिहितात, `पक्षीय राजकारणाचा आजकालचा धुडगूस सगळ्यांच्या परिचयाचा आहे. नाटकाच्या क्षेत्रातसुद्धा गटबाजीचे नाट्यकारण तितकेच वाह्यात नि पाचकळलेले असायचे. तशात एखादा स्वार्थसाधू चुगलखोर मालकांच्या नाकातला बाल बनला का दोस्तांचे दुस्मानांत रूपांतर व्हायला चोवीस तासही लागत नाहीत. अशाच एका चुगलखोर थापेबाजाच्या कारवायांना कंटाळून इंदोर मुक्कामी मी स्वदेशहितचिंतकांची आणि नाट्यक्षेत्राची जवळजवळ काडीमोड घेतली. पुन्हा या क्षेत्राच्या वाटेला जायचे नाही, झाले इतके जन्माचे नाटक पुरे झाले, अशा निर्धाराने जीवनाचा नवीन मार्ग शोधण्यासाठी ठाणे तेथे यशवंताकडे आलो.` ही घटना १९०९च्या जानेवारीत झाल्याचं प्रबोधनकारांनी नोंदवलं आहे.
ही प्रबोधनकारांची नाट्यव्यवसायातून एक्झिट नव्हती तर फक्त ब्रेक होता. वाटल्यास मोठा ब्रेक म्हणता येईल. कारण त्यानंतर वीस वर्षांनी प्रबोधनकारांनी पुन्हा या व्यवसायात उडी घेतली. स्वतःची नाटक कंपनी सुरू करून मराठी नाट्यसृष्टीला वळण लावणारी नाटकं सादर केली. या वीस वर्षांच्या ब्रेकमधल्या काळाने मात्र प्रबोधनकारांच्या आयुष्यालाच वेगळं वळण लावलं.