साहित्य संमेलनाचे गचाळ आयोजन
९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, भुजबळ नॉलेजसिटी, आडगाव, नाशिक येथे महामंडळाच्या बालहट्टापोटी एकदाचे दिमाखाने पार पडले.
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सर्वेसर्वा माननीय छगनजी भुजबळसाहेब यांच्या छायाछत्रेतेखाली झालेल्या या संमेलनात कोरोना महामारीनंतरचा अतिउत्सव सकारात्मक, दिलासा देणारा होता. आणि तसा तो उत्सव पार पडला.
भुजबळजी यांनी चार दिवस गावजेवण नाही तर चक्क शहरजेवण दिले. नाशिक येथे आलेल्या साहित्यिक, कलावंत, साहित्यप्रेमी, नाशिककरांना दिले याचं कौतुक वाटतं. याचं नियोजन उत्तम होते. हे मी आजपर्यंत न पाहिलेला संमेलनापेक्षा वेगळा उदारकर्णपणा येथे मला पाहायला मिळाला. कुपनचं बंधनच कुणाला नव्हतं. याचा मला आनंदच झाला. हा त्यांचा दृष्टिकोन वाखाणण्याजोगाच होताच. त्यासाठी मेट आणि त्याचे सर्वेसर्वा भुजबळजींचे मनःपूर्वक अभिनंदन..
आता आमच्या वाटणार्या महामंडळाबद्दल आमचे वसईचे आदरणीय संमेलन अध्यक्ष फादर दिब्रेटो गेली वर्षभर आजारी आहेत त्यांची ऑपरेशन वगैरे झाली आहेत. ते उपचार घेताहेत तरी त्यांचं नाव ते येताहेत म्हणून पत्रिकेत टाकलं. आताचे आदरणीय संमेलनाध्यक्ष आजारी आहेत.ते संमेलनास येऊ शकत नाहीत, हे माहीत असूनही साहित्यप्रेमींना त्याची जाणीव करू दिली नाही? पुस्तक स्टॉलबाबत महामंडळ अत्यंत बेफिकीर होते. ते नेहमीचे असते म्हणा. पण येथे प्रकाशकांच्या काय अडचणी आहेत. हे आयोजक आणि महामंडळ यांनी पूर्ण दुर्लक्षित केले. भुजबळजी चारही दिवस सर्वत्र फिरत होते. पण आमचे महामंडळ अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी कुठे फिरत होते.. १ ते १०० नंबर स्टॉलच्यापर्यंत जायला वाचक, लेखक आणि आम्हा प्रकाशकांना थकायला होत होतं. १० बाय १०चे स्टॉल सांगितले. ते ९ फुटाचे होते. ज्यांनी फ्लेक्स आधी करून आणले होते. त्यांना ते लावता आले नाही. इथे १ ते १००पर्यंत स्टॉल तीन बाजूने पूर्ण बंदिस्त होते. त्यांना रात्री पडदे झाकण्यासाठी दिले गेले. इतरांना वार्यावर सोडले. दवामुळे पुस्तके भिजू नयेत यासाठी आम्हांला काहीच मदत केली नाही. साधारण १८० ते २५० हे स्टॉल कुठेही जागा मिळेल तिथे बसविले होते. शब्द प्रकाशन, शब्दालय प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशन, ज्योत्स्ना प्रकाशन, लोकवाङ्मय प्रकाशन, डिंपल पब्लिकेशन यांना गाववस्तीबाहेर बसविले होते. या ‘सी’ विभागाकडे पूर्णपणे दुर्लक्षित आयोजक, महामंडळ आणि आमच्या वाचकांनी केले. अनेक तक्रारी करून या विभागात पुस्तक प्रदर्शन आहे.हा त्या विभागाच्या डाव्या, उजव्या प्रवेशाच्या ठिकाणी पुस्तक प्रदर्शन दिशादर्शक बोर्ड लावा हे ओरडून सांगूनही कुणीही त्याची दखल घेतली नाही. हे स्टॉल माझे अनेक मान्यवर लेखक यांना शोधूनही सापडत नव्हते. हे
स्टॉल शोधायला खुपच दमछाक सर्वांनाचं होत होती. या गावाबाहेरच्या वस्तीवर प्रवेशद्वाराच्या ठिकाणी नंबरचा दिशादर्शक बोर्ड हवा होता. तो नव्हता. बाकी व्यवस्थापन छानच होते. आनंदी, उत्साही होते. पण गावाबाहेरील आमची वस्ती आसुसलेल्याप्रमाणे स्टॉलला वाचकांनी यावे म्हणून वाट पाहात होती. आयोजक, महामंडळाचा उत्साह आनंद हा आम्ही आमचा मानत होतो आणि तीन दिवस पुस्तके लावत होतो.
– अशोक मुळ्ये
किस्सा कुर्सी का!…
‘संजय राऊत यांचे खरे राजकीय गुरू शरद पवारच’ अशा आशयाची कमेंट करून, ते पवारांना बसण्यासाठी खुर्ची देत आहेत, असा व्हिडिओ व्हायरल करणारे, स्वतःला ‘सुसंस्कृत’ समजतात हीच मोठी गंमत आहे!… कोणत्याही वयस्कर व्यक्तीला हाताला धरून आधार देणे, त्याला बसण्यासाठी खुर्ची देणे, यावरून देखील आपले कुजकट राजकारण करणे हे यापूर्वी, ‘संस्कारी’ पक्षाच्या पूर्वसुरींनी देखील केलेले नाही… हशू अडवाणी, उत्तमराव पाटील, राम नाईक, रामभाऊ म्हाळगी, राम कापसे, मधू देवळेकर प्रभृती आदरणीय नेत्यांचे राजकारण अशा प्रकारचे कधीही नव्हते. ‘खुर्ची’ प्रकरणी प्रश्न विचारला असता, संजय राऊत यांनी चिडून एक शब्द वापरला आणि त्याचे भांडवल या खळखळकर मंडळींनी केले आहे.. एखादी शिवी दिली वा अपशब्द उच्चारला आणि तो देखील केवळ प्रतिक्रिया देताना आलेल्या सात्विक संतापातून, तर तो काही गंभीर गुन्हा नाही. उलट कुठल्याही सामान्य गोष्टीतून जाणूनबुजून भलताच अर्थ काढणे आणि त्यावर छद्मीपणे शेरेबाजी करणे, हेच खरे असंस्कृतपणाचे आहे! असो. ड्रामेबाजीत या मंडळींचा कोणीही हात धरू शकणार नाही!