कोणत्याही परप्रांतीय व्यावसायिकाला प्रामाणिकपणा, स्किल्ससाठी मराठी माणूस कामाला हवा असतो. पण आपल्यातील गुण मालकांना पैसे मिळवून द्यायला नसून स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी आहेत, हे कृष्णा मराठे यांनी ओळखलं. पुढल्या पाच वर्षांत शेअर मार्केटमधे आयपीओ आणण्याचा त्यांचा इरादा आहे. परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणात बर्याच वेळा खंड पडला, त्यावर मार्ग काढताना त्यांनी स्वतःमधलं कौशल्य ओळखलं आणि एकेका पावलापुरती जागा निर्माण करत राहिले.
– – –
प्लास्टिक हा शब्द उच्चारला की मनात विचार येतो पर्यावरणाला हानीकारक असेल! पण पारंपरिक पद्धतीत वापरल्या जाणार्या लाकडाला पर्याय म्हणून जर रिसायकलेबल प्लास्टिक वापरलं तर हजारो झाडांची कत्तल थांबवली जाऊ शकते, हे मराठी उद्योजक कृष्णा मराठे यांनी दाखवून दिलं आहे. ते धान्य गोदामे तसेच औषध उद्योगांसाठी पूर्वापार चालत आलेल्या लाकडी प्लॅटफॉर्मऐवजी प्लास्टिक प्लॅटफॉर्मची निर्मिती करतात. ‘आम्ही फक्त रिसायकलेबल (पुनर्वापर करण्यायोग्य) प्रॉडक्ट्स बनवतो,’ असं ते अभिमानानं सांगतात. पहिली ऑर्डर कशी मिळाली हे उलगडून सांगताना मराठे म्हणाले, माझे पार्टनर सूर्यकांत शिंदे यांनी मला धान्य एक्स्पोर्ट करणार्या एका व्यापार्याकडे नेलं होतं. त्यांच्या गोडाऊनमध्ये धान्याच्या गोण्या लाकडी फळीवर (प्लॅटफॉर्म) ठेवण्याची व्यवस्था होती. पण लाकडी प्लॅटफॉर्मला बुरशी येणे आणि वजनाने लाकडी फळ्या तुटणे हे प्रकार वारंवार घडत असत. या कारणांमुळे धान्य व्यापारी प्लास्टिक प्लॅटफॉर्मचा पर्याय शोधत होते. त्यांनी प्लास्टिक प्रॉडक्ट्स बनविणार्या मोठ्या कंपन्यांना हे काम दिलं, पण त्यांनी पुरवलेल्या प्लास्टिक फळ्यांवर जास्त वजन आलं की त्या फळ्या वाकायच्या तसेच धान्याच्या गोण्या एकावर एक ठेवल्याने उष्णता निर्माण होऊन गोणींमधील धान्य खराब होण्याची शक्यता वाढायची. वेगवेगळ्या कंपन्यांना ऑर्डर देऊनही प्रश्न सुटत नव्हता.
‘मी तुमच्या अडचणींवर तोडगा काढून देतो मला संधी देऊन पाहा,’ असं सांगणारे कृष्णा मराठे, व्यापार्यांना भेटले. जे काम हजारो कोटींचा टर्नओव्हर असलेली कंपनी करू शकत नाही, ते काम हा नवखा व्यावसायिक कसं करणार, हा अविश्वास एक्सपोर्टरच्या डोळ्यात दिसत होता. पण धान्याचं नुकसान टाळण्यासाठी काहीतरी करणं आवश्यक होतं, त्यामुळे त्यांनी मराठे यांना एक संधी देण्याचं ठरवलं. मराठे यांची ही धंद्यातील पहिली उडी होती. धान्य गोडाऊनची ऑर्डर मिळाल्यावर त्यांची गरज समजावून घेऊन मराठेंनी रिसर्च सुरू केला. तीन महिने वेगवेगळे प्रयोग करताना, प्लास्टिक पॅलेट्समध्ये स्टील फ्रेम टाकल्याने मजबुती मिळेल हे शोधलं आणि हवा खेळती राहावी यासाठी प्लास्टिक प्लॅटफॉर्ममधे काही छिद्रे ठेवली. हे प्रॉडक्ट धान्य व्यापार्यांना खूप आवडलं आणि हातोहात मराठेंना ३०० पॅलेट्सची ऑर्डर मिळाली. ती पूर्ण करून दिल्यावर इतर धान्य व्यापार्यांनी देखील ऑर्डर्स दिल्या.
इथे यश मिळाल्यावर त्यांनी या प्रॉडक्टची गरज अजून कोणत्या इंडस्ट्रीला आहे याचा शोध घेतला. फार्मा इंडस्ट्री, फूड इंडस्ट्रीकडूनही त्यांना भरपूर ऑर्डर्स मिळाल्या. प्लास्टिक पॅलेट्सने कृष्णा मराठे यांना प्लास्टिक इंडस्ट्रीमधे स्वतःच स्थान निर्माण करायचा मार्ग दाखवला.
ते म्हणतात, ‘पहिलं यश मिळाल्यावर मला धंद्यात कधी मागे वळून पहावं लागलं नाही… मागे वळून पाहताना मला हिरव्यागार डोंगरावर वसलेलं माझं गाव दिसतं. सकाळी उठल्यावर दुधाची धार काढणारा, गुरं चरायला घेऊन जाणारा, शाळेतून घरी आल्यावर आईला अभ्यासाचे पुस्तकं वाचून दाखवणारा बालपणातील कृष्णा मराठे दिसतो. माझी आई अशिक्षित असली तरी आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं ही तिची इच्छा होती. आमच्या खेड्यात बरीच गुर्हाळं होती. त्यातून तयार झालेला गूळ बाबा कोल्हापूरला विकायला घेऊन जायचे. मलाही बैलगाडीतून शहरात जाण्याचं आकर्षण होतं. कधी कधी बाबा मलाही घेऊन जायचे. त्यावेळचं वातावरणच वेगळं होतं. सगळं गाव मिळून एकमेकांच्या शेतात कामं करायचे. ‘पावणेर’ नावाची खूप मजेशीर पद्धत होती. ज्याच्या शेतात नांगरणी, कापणी अशी जास्त माणसं लागणारी काम असतील तो शेतकरी, ओळखीच्या लोकांना पावणेरसाठी बोलावणं पाठवायचा. दुसर्या दिवशी सगळे जमायचे, मिळून काम व्हायचं. सगळ्यांसाठी चुलीवर मटण शिजायचं, मटण शिजण्याचा रटरट आवाज, मसाल्याचा दरवळ गप्पा यात काम कधी संपायचं पत्ता लागायचा नाही. मोठी सुंदर पद्धत होती ती.
शाळेत असतानाचा माझा दिनक्रम म्हणजे, सकाळी उठून गुरांना पाणी देणं, दूध घालायला जाणं, आल्यावर जेवण करून चालत पाच किमी दूर असलेल्या शाळेत जाणं. संध्याकाळी सहा वाजता आलो की जमेल तसा थोडासा अभ्यास. आई वडिलांनी अभ्यास कर असं कधीही सांगितलं नाही, तरी मी अभ्यासात चांगला होतो. गणित, इतिहास हे माझे आवडते विषय. इंग्रजी मात्र नावडता. गावात एकशिक्षकी शाळा होती. शिक्षकांना आदर देणं, त्यांनी सांगितलेलं मुकाटपणे ऐकणं, हे आम्हाला कधी सांगावं लागलं नाही. केवळ शाळेतल्या अभ्यासावर मला दहावीला ऐंशी टक्के मिळाले. पण पुढे काय करायचं हे माहीत नव्हतं, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स म्हणजे काय हेही माहिती नव्हतं. तोवर दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झाली होती, भाऊ लहान होता. म्हणजे घरात शिक्षणासाठी खर्च करावा लागेल असा फक्त मी होतो. पण गावात पुढच्या शिक्षणाची सोय नव्हती, शहरात पाठवायचं म्हणजे पैसा हवा, घरी खाण्यापिण्याला ददात नव्हती, पण पैसा बेताचा होता. काय करावं, कुठलं कॉलेज, कुठलं गाव अशी माहिती काढेपर्यंत बर्याच कॉलेजचा प्रवेश बंद झाला होता. ओळखीच्या एका वकिलांनी कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज कॉलेजबद्दल सांगितलं. तिथले प्राचार्य रमेश ठाकूर सरांना भेटलो. प्रवेश घ्यायची तारीख उलटून गेली होती. तरी सर भेटले, माहितीअभावी मी प्रवेश घ्यायला लवकर आलो नाही हे सांगितल्यावर माझी गुणपत्रिका सरांनी बघितली आणि म्हणाले, तू उद्यापासून ये. एका नातेवाईकांच्या घरी राहण्याची व्यवस्था झाली. दुसर्या दिवशी वर्गात गेलो. अभ्यासक्रम सुरू होऊन महिना उलटून गेला होता. वर्गात बसलो, वर्ग सुरू झाला, शिक्षक येऊन इंग्रजीत बोलू लागले. मला त्यांचं शिकवण समजेना, पुढचे शिक्षक आले, ते पण इंग्रजीत शिकवत होते. त्या दिवशी सगळ्याच शिक्षकांनी इंग्रजीत शिकवलं. हे असं कसं ते मला समजेना. दुसर्या दिवशी तेच. मग जाऊन सरांना भेटलो. त्यांना सांगितलं, सर, मी मराठी माध्यमाचा विद्यार्थी आहे. तुम्ही मला चुकून इंग्रजी माध्यमाच्या वर्गात बसायला सांगितलं. सर म्हणाले, ‘अरे सायन्स शाखेत प्रवेश दिला आहे तुला. करशील तू. हुशार विद्यार्थी आहेस.’ मी म्हणालो, ‘सर मला शिकवलेलं काही कळत नाहीये. पास कसा होईन मी?’ सर म्हणाले, ‘तू सध्या फक्त अभ्यासात लक्ष दे, पास होण्याचं मी बघतो.’ सरांच्या या धीराने मला बरं वाटलं, मी वर्गात मन लावून ऐकू लागलो, दहा पंधरा दिवसांत विषयानुसार शब्द ओळखीचे वाटू लागले. इंग्रजीशी मैत्री झाली, असं मी म्हणणार नाही, पण भीती कमी झाली. सहा महिन्यांनी एका आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेत कॉलेजच्या चमूमध्ये माझी निवड झाली. या सगळ्यामुळे आत्मविश्वास वाढला. माझं तोपर्यंतच राहणीमान गावाला शोभणारं होतं. बारीक कापलेले, चापून चोपून तेल लावलेले केस, तेल ओघळून चेहर्यावर यायचं, रस्त्यावरची धूळ आणि तेल याचा एक लेप चेहर्यावर बसायचा. आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना बघून मी देखील राहणीमानात झेपेल तेवढा बदल केला. अकरावीच्या वर्षाने मला खूप शिकवलं.
ज्यांच्या घरी मी राहात होतो, त्यांचीही परिस्थिती यथातथाच होती, तरी त्यांनी वर्षभर मला त्यांच्या घरी ठेवून घेतलं. बाबा त्यांना धान्य देत होते, पण दरमहा पैसे पाठवणं जिकिरीचं होतं. मार्च महिन्यात अकरावीची परीक्षा झाली, तेव्हा ते म्हटले की यापुढे तुला आम्ही इथे ठेवून घेऊ शकत नाही. नाराज होऊन घरी आलो. शेतीची कामं करू लागलो. पण मनातून शिक्षण जात नव्हतं. कोल्हापुरात राहायची व्यवस्था असल्याशिवाय पुढचं शिक्षण शक्य नव्हतं. घरच्या शेतीचा काही भाग विकून वडिलांनी मला शिक्षणासाठी पैसे द्यावे असं मला वाटतं होतं. मी रोज त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देत होतो, पण शेतजमीन विकून शिक्षण घ्यायचं, हे उभी हयात शेतीत घालवलेल्या वडिलांना पटणं अशक्य होतं. माझा कोंडमारा होत होता, शहरातलं जगणं, वागणं बघून मला शिक्षणाचं महत्त्व लक्षात आलं होतं. आपली परिस्थिती बदलवण्याचा एकमात्र हुकमी उपाय म्हणजे शिक्षण आणि त्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. अचानक सुचलं, दाखला घेण्याच्या निमित्ताने वडिलांना कोल्हापूरला घेऊन जाऊ. वडील तयार झाले. त्यांना वाटलं असावं, शेती विकण्याचं खूळ मनातून गेलं. आता दाखला घ्यायचं म्हणतोय ते करू पोराच्या मनासारखं.
कॉलेजात गेल्यावर प्राचार्य सर भेटले. मी दाखला काढतोय ऐकल्यावर ते वडिलांना म्हणाले, ‘कृष्णा हुशार आहे, त्याला पुढे शिकू द्या.’ राहण्याचा आणि पुस्तकांचा प्रश्न मी सोडवतो. कॉलेजची एक अडगळीची खोली आहे, तिथे कृष्णाला राहता येईल. पुस्तकं कॉलेज लायब्ररीतून मिळतील. राहता राहिला कॉलेज मेसचा खर्च, तो काही फार नाही. पैशासाठी पोराचं शिक्षण थांबवू नका. सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटलेले पाहून आणि प्राचार्यांनी केलेलं माझं कौतुक ऐकून वडील मेसचा खर्च करायला तयार झाले आणि माझा बारावीचा मार्ग मोकळा झाला.
जमेल तसा अभ्यास करून, पाठांतरावर भर देऊन मी पीसीएम ग्रुपमध्ये ८३ टक्के गुण मिळवले. या गुणांवर इंजिनियरिंगला प्रवेश निश्चित मिळाला असता. पुन्हा गाडी पैशावर येऊन अडते की काय अशी भीती वाटत होती. पण यावेळी वडील थोडी शेती विकून मदत करायला तयार झाले. विकलेली सगळी शेती तुम्हाला परत घेऊन देईन असं मी त्यांना सांगितलं आणि इंजिनियरिंग प्रवेशाच्या तयारीला लागलो. मला कुठलीही ब्रांच चालली असती. जयसिंगपूरला मकदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल इंजनिअरिंगला प्रवेश मिळाला. पहिल्या वर्षाची फी बारा हजार होती. शेती विकून अवघे एकोणीस हजार मिळाले होते, ते वडिलांनी माझ्याकडे सोपवले. उरलेल्या पैशातून पुस्तके, रूम भाडे, मेस, किरकोळ खर्च यात जाऊन सहा महिन्यांतच पैसे संपले. पैशाशिवाय शिक्षण कसं घेणार? पुन्हा घरी आलो, वडिलांना परिस्थिती सांगितली, चार वर्षांचा खर्चाचा आकडा भागेल एवढा पैसा जमवण्याची विनंती केली. तुमची सगळी शेती पुन्हा मिळवून देईन असं वारंवार सांगितलं. पण वडील तयार झाले नाहीत. एकदा शेती विकून फक्त सहा सात महिन्यांचा खर्च निघतो? मग नकोच ते शिक्षण. शेतात काम केलं तर काही कमी पडणार नाही. पण मीसुद्धा इरेला पेटलो, इंजिनियरिंग शिकवू शकत नाही तर मी यापुढे घरी येणार नाही, असं जाहीर केलं आणि कोल्हापूरला आलो. माझं इंजिनियरिंग तेवढ्या सहा सात महिन्यात थांबलं.
आज वाटतं, समजा वडील तयार झाले असते तरी शेती विकत घेणारा, योग्य भाव देणारा मिळालाच असता, असं नाही… पण त्यावेळी मात्र मी एकदम अँग्री यंग मॅन झालो होतो. कोल्हापूरला येऊन एका कंपनीत डोअर टू डोअर मार्केटिंगचा जॉब पकडला. त्या कंपनीत काम करणार्या मुलांसाठी राहण्याची एक लहानशी खोली होती, तिथे मी पण राहायला लागलो. सकाळी ७ ते संध्याकाळी ७पर्यंत काम करायचं, जगण्यापुरते कसेबसे पैसे मिळवत होतो. आईची आठवण आली की घरी जाऊन यायचो, वडिलांशी बोलणं सोडलंच होतं. ते मार्वेâटिंगचं काम दीड वर्ष केलं. सामान विकायला दिवसातून शंभर घरांची दारं ठोठवायचो, कुणी चिडायचं, कुणी आपुलकीने पाणी द्यायचं, कुठे चौकीदार अपमान करायचे, मनातला राग कधी अचानक उफाळून यायचा. कधी कुणी आपुलकीने वागलं तर आईची आठवण यायची. वय १८-१९, या वयात कष्ट केल्यानं, अपमान सहन केल्यानं माझी लाज, भीड चेपली, नकाराची भीती वाटेनाशी झाली. येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याची मानसिक तयारी होत होती. त्या कंपनीतल्या सिनियर मॅडम लतिका शहा यांना माझं कौतुक होतं. मी त्यांच्या मुलाच्या वयाचा होतो, मनातला राग कमी व्हायला त्यांनी खूप मदत केली. तू बाहेरून कॉलेजला प्रवेश घेऊन शिकू शकतोस, असं फक्त सांगून थांबल्या नाहीत, तर पाठपुरावा करून शिवाजी कॉलेजला आर्ट्सला प्रवेश घेण्यासाठी मार्गदर्शन केलं. माझी हुशारी बघून कंपनीत मला इतर लोकांना ट्रेनिंग देण्याची संधी मिळाली, पण पगार वाढला नव्हता. खूप दगदगीमुळे तब्येत खालावली. गावी गेलो तेव्हा माझा असा हाडांचा सापळा झालेला पाहून घरचे हेलावले. तब्येत सुधारेपर्यंत कुठेच जायचं नाही अशी ताकीद दिली. तीन महिने घरचं जेवण, गावची हवा, आणि कमी दगदग यामुळे तब्येत सुधारली. गावी माळावर एक पडीक जमीन होती, ती कसून तयार करायचं ठरवलं. त्या जमिनीत काम करताना मी वडिलांचं वागणं जास्त समजून घेऊ शकलो. शेती विकणं त्यांच्यासाठी किती कठीण असेल ते कळलं. वडिलांवरचा राग पूर्णपणे जाऊन मी त्यांच्याशी आदराने वागू लागलो. आता जे काही शिकायचं ते स्वतःच्या बळावर. गाठीशी पैसे नव्हते म्हणून, प्रवेश फी नसेल अशा कळंबा कोल्हापूर येथील शासकीय आयटीआयला प्रवेश घेतला. माझी शिकण्याची जिद्द पाहून वडील दरमहा पाचशे रुपये स्वतःहून पाठवू लागले.
सकाळी सात वाजता दिवस सुरू व्हायचा. कॉलेजला पोहोचलो की दोन मित्र अर्धा अर्धा पार्ले जीचा पुडा चहात बुडवून खायचो, तीन वाजेपर्यंत कॉलेजनंतर मेसचं जेवण, ऑटोकॅडचा कॉम्प्युटर क्लास, नंतर एका बार कम हॉटेलचा वॉचमन बनून नाईट शिफ्ट… असा भरगच्च दिनक्रम होता. कुठल्याच गोष्टीने मी आता स्वतःला विचलित होऊ देणार नव्हतो. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मी रोजचा अभ्यास करत होतो. भलेही मी आयटीआय करत असेन, पण ते उत्तम करेन, सर्वोत्तम विद्यार्थी होईन, असं मनाशी पक्कं केलं होतं. शिक्षकांचा लाडका विद्यार्थी बनत होतो. मेकॅनिकल डिझाईन करण्यात माझा हातखंडा होता, शिक्षण सुरू असताना मी कारखान्याच्या डिझाइनच्या ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. कॉलेजच्या दुसर्या वर्षाला असताना घरच्यांच्या निर्णयाने मामाची मुलगी राजश्रीसोबत २००१मध्ये माझं लग्न झालं. त्यानंतर परीक्षेसाठी पुन्हा कॉलेजला आलो. बरोबरीचे मित्र हॉटेलिंग करायचे, कधी क्लास बुडवायचे, पण मला मात्र परिस्थितीची जाणीव होती. मी खोलीत भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहून ठेवलं, नो व्हाय यू आर हिअर? व्हॉट यू डुइंग? (तू इथे का आला आहेस? येथे तू काय करत आहेस?)
तिसर्या वर्षाला इंटर्नशिप असायची. पहिल्याच राऊंडला मुंबईच्या गोदरेज कंपनीत फर्निचर डिझाईन डिपार्टमेंटमध्ये माझी नेमणूक झाली. इंटर्नला झेरॉक्स करणे, निरोप पोहोचवणे अशी कामे सांगितली जातात. पण माझ्या डिझाईन आणि
ऑटोकॅडच्या नॉलेजमुळे मला कॉम्प्युटरवर डिझाईन बनवायला संधी मिळू लागली. गोदरेजमध्ये मी वागण्या-बोलण्याच्या पद्धती नव्याने शिकलो, इथेही कामाव्यतिरिक्त इतर कारखान्यांशी डिझाईनच्या कामासाठी संपर्क करू लागलो. गोदरेजमधे एका सराईत ड्राफ्ट्समनसारखा मी काम करत होतो. इंटर्नशिप संपत आली तेव्हा तिथेच पर्मनंट नोकरीची ऑफर आली, पण एव्हाना कपाटाचं डिझाईन करून मला कंटाळा आला होता, म्हणून गोदरेजची मोठ्या पगाराची ऑफर न घेता मी ऑक्टोबर २००२ला चकाला अंधेरीला बोरोप्लास्ट कंपनीत जॉईन झालो. ही कंपनी रोड साईन बोर्ड, मोठ्या कचरापेट्या, पोर्टेबल केबिन, पोर्टेबल टॉयलेट, अशा वेगवेगळ्या वस्तू तयार करायची. या सगळ्यात मला डिझायनिंगसाठी भरपूर स्कोप होता. क्लाएंटसोबत मीटिंग घेऊन त्यांच्या गरजा जाणून घेणे आणि त्यानुसार प्रॅक्टिकल डिझाईन बनवणं हे कौशल्याचं काम मी इथे करत होतो. कागदावर सुंदर दिसणारं डिझाईन बनवताना किंवा वापर करताना किचकट असेल, तर त्याचा उपयोग नाही. त्यात वेळ, मनुष्यबळ, कच्चा माल हे सगळं वाया जाऊन प्रॉडक्ट फ्लॉप होतं. बोरोप्लास्टमध्ये दोन वर्षं उलटूनही पगारात समाधानकारक वाढ झाली नाही. त्यामुळे मार्च २००४मध्ये तो जॉब सोडला.
एकाच महिन्यात घाटकोपरच्या शार्प बॅटरीज कंपनीत असिस्टंट डिझायनर पदावर जॉईन झालो. इथे वेगवेगळ्या आकाराच्या पाण्याच्या टाक्या, घमेली बनवली जायची. तीन महिन्यांनी सिनियर डिझायनर इंजिनियर सोडून गेले. त्या जागेवर माझी नेमणूक झाली. इथला कारभार थोडा अस्ताव्यस्त होता. सहा महिन्यांत तिथल्या सगळ्या प्रोडक्ट्सचा कॅटलॉग मी तयार केला, त्यामुळे कंपनीचा डेटाबेस तयार झाला. यामुळे फक्त डिझाईनच नव्हे तर मार्केटिंगच्या प्रश्नांसाठी माझा सल्ला उपयोगी ठरू लागला. हळूहळू क्लाएंट मीटिंगसाठी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये माझं नाव रेकमेंड होऊ लागलं. २००६मध्ये मी असिस्टंट मॅनेजर, बिझिनेस डेव्हलपमेंट झालो. साडेपाच हजारांपासून सुरू केल्यावर दीड वर्षांत पगार दुप्पट झाला. याच कालावधीत बेंगळूरच्या एका संस्थेतून मी मॅनेजमेंटचा कोर्स केला. या शिक्षणाचा मला लीडरशिपसाठी वेगवेगळ्या स्कीम सुरू करण्यासाठी उपयोग झाला. २००८पर्यंत फायनान्स सोडलं तर इतर सगळ्या डिपार्टमेंटमध्ये माझा शब्द विचारात घेतला जायचा. पण जबाबदारीच्या मानाने पगार वाढत नव्हता. ज्या कंपनीत मनापासून सर्व जबाबदार्या घेतल्या, तिथे स्वतःहून पगाराची मागणी करणं योग्य वाटतं नव्हतं. पण कंपनीकडून चिन्ह दिसत नसल्याने शेवटी एक दिवस स्वतः विचारलं, तेव्हा सध्या परवडणार नाही, कंपनीचं अमुक एक टार्गेट पूर्ण झालं की देऊ असं उत्तर ऐकल्यावर ठरवलं की आता इथे थांबायचं नाही. जाऊन राजीनामा लिहिला, पुढच्या सहा महिन्यांत कंपनीचं टार्गेट पूर्ण करून कंपनी मालकांच्या दृष्टीत स्वतःला सिद्ध केलं, २५ हजार पगार घेतला आणि तो सहा महिन्यापूर्वी लिहिलेला राजीनामा सोपवून बाहेर पडलो तोच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या इराद्याने. तारीख होती २० मे २००८.
कोणताही धंदा सुरू करताना त्यातील खाचाखोचा माहिती असायला हव्यात. सहा वर्षांच्या नोकरीत मी माझ्या वाट्याच्या कामाबरोबरच स्वतःहून जबाबदार्या मागून घेऊन काम करत गेलो. एक्स्ट्रा कामाचे पैसे मिळाले नाहीत, पण अनुभव मात्र भरपूर मिळाला. मी जुन्या कंपनीत सर्व जबाबदार्या पार पाडत होतो. त्यामुळे नोकरी सोडल्यावर या धंद्यातील अनेक मालकांनी मला दुप्पट तिप्पट पगारवाढीचं आमिष दाखवलं, परंतु आता कोणाकडे चाकरी करायची नाही, असा निर्धार मी केला होता. बांधकाम मटेरियल विक्रेते सूर्यकांत शिंदे यांच्यासोबत भागीदारी करून एक लाख रुपये भांडवलावर मी २००८ साली ‘स्विफ्ट टेक्नोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची स्थापना केली.
प्लास्टिक इंडस्ट्रीत मोठे उद्योजक काम करत होते. त्यांच्यासमोर उभं राहताना त्यांच्यापेक्षा वेगळं प्रॉडक्ट माझ्याकडे असणं गरजेचं होतं. मी रिसर्च करून सामानाची ने आण करणार्या लॉजिस्टिक्स विभागावर लक्ष केंद्रित केलं. सामान एका गोडाऊनमधे ठेवताना आणि उचलताना प्लास्टिक प्लॅटफॉर्म (पॅलेट्स) लागतात. यात कॉम्पिटीशन कमी होती आणि नोकरी करताना जे शिकलो होतो, त्या ज्ञानाचा वापर करायला इथे स्कोप होता. हेच बनवायचं ठरवलं. धान्य व्यापार्यांकडून ऑर्डर मिळाली. माझ्याकडे आयडिया, डिझाईन, विक्रीकौशल्य होतं, पण उत्पादनासाठी रोटो मोल्डिंग मशिन्स विकत घ्यायला हाताशी भांडवल नव्हतं. यावर उपाय म्हणून आमच्या डिझाईननुसार माल बनवून देईल, अशी फॅक्टरी शोधत होतो. पण हवा तसा माणूस मिळत नव्हता. त्याच दरम्यान राजस्थानमधील एका फॅक्टरीबद्दल कळलं. काम नसल्याने ती फॅक्टरी आठवड्यातून फक्त एक दिवस चालत होती. दोघांनाही एकमेकांची गरज होती. मी त्यांना जाऊन भेटलो. फॅक्टरी मालक आम्ही बनवायला दिलेला माल आमच्याशिवाय इतर कुणालाही विकणार नाही, या अटीवर करार केला. त्या फॅक्टरीत पंधरा माणसं कामाला होती. मामाचा मुलगा संतोष शिंदे याला कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी राजस्थानला ठेवलं. माल बनवायची सोय झाली, आता काम मिळविण्याची तयारी सुरू केली.
इंडस्ट्रियल डिक्शनरीवरून आपला ग्राहक कोण असू शकतो, त्यांचा टर्नओव्हर किती आहे, याचा अंदाज घेऊन त्या कंपन्यांना ईमेल करणं, फोनवरून कामाची विचारणा करणं सुरू केलं. खर्च कमी ठेवण्यासाठी तेव्हा ऑफिस घरूनच चालायचं. प्लास्टिक प्रॉडक्ट बनविण्यासाठी धातूचा साचा (डाय) बनवावा लागतो. हे काम जिकीरीचं असल्याने फॅब्रिकेटर मागतील तितके पैसे देऊन डाय बनवावी लागते. एक डाय बनवायला मला दोन लाख रुपये सांगितले. भांडवल कमी असताना इतके पैसे खर्च करून चालणार नव्हते. डिझायनिंग हा माझा प्रांत होता. एका वर्कशॉपमध्ये साध्या कारागिरासोबत काम करून दोन लाखांचे पॅलेट्स डाय मी केवळ चाळीस हजारात बनवून घेतले. कामाला सुरुवात केली.
सुरुवातीला लो प्रोफाईल राहून काम करायचं ठरवलं होतं. कारण प्रस्थापित व्यापारी नवीन माणसाला धंद्यात टिकू देत नाहीत. या सर्व गोष्टी माहीत असल्याने मी मोठ्या कंपन्यांसोबत चढाओढ न करता कामं करत गेलो. ऑर्डर घेताना ग्राहक उधारी मागतात, म्हणून मी मालक असल्याचं सांगायचो नाही. आमची कंपनी कुणाला उधारी देत नाही, असं सांगून ५० टक्के अॅडव्हान्स मागायचो. कामं मिळत गेली तसा मिळणारा नफा रोलिंगमधे अडकत गेला. पुन्हा नवीन भांडवलाची आवश्यकता भासू लागली. माझी आवक जास्त नसल्याने माझ्या नावावर लोन मिळणं कठीण होतं. तेव्हा भागीदार शिंदे यांच्या नावावर १८ टक्के व्याजाने पंचवीस लाख रुपये पर्सनल लोन घेतलं. हाताशी भांडवल आल्यावर कामाला पुन्हा जोमाने सुरुवात केली.
झटपट निर्णय हे आमच्या कंपनीचं वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ, एकदा एका कंपनीकडून एनक्वायरी आली होती. मी दुसर्या दिवशी सकाळी त्या कंपनीत पोहोचलो. तिथला सर्व्हे करून, माझ्या ऑफिसला सूचना करून लगेच कोटेशन पाठवायला सांगितलं. संध्याकाळी परत निघताना माझ्या हातात त्या कंपनीची पर्चेस ऑर्डर होती. पंधरा दिवसांत माझा माल तिथे पोहचला देखील. आमचे ग्राहक नेहमी म्हणतात, गरज ओळखून झटपट निर्णय आणि योग्य प्रॉडक्ट हा तुमच्या कंपनीचा यूएसपी आहे. इतर कंपन्यांना पाठवलेला ईमेल उघडला जाईपर्यंत तुमचं कोटेशन आलेलं असतं. माझे भागीदार सूर्यकांत फायनान्स, ऑपरेशन पाहायचे, तर मी मार्केटिंग, सेल्स पाहायचो. आठवड्यातून एक दिवस चालणारी राजस्थानची फॅक्टरी आता सातही दिवस चालत होती. पण काम वाढल्याचं पाहून फॅक्टरी मालकाची हाव वाढू लागली. मला परवडत नाही, पैसे वाढवून द्या, तरच माल बनवून देतो अशी अडवणूक करून त्यांनी एका वर्षात दोनदा मालाचे दर वाढवून घेतले. त्यानंतर ते मालाच्या गुणवत्तेत तडजोड करू लागले. आता स्वतःची फॅक्टरी उघडून आपणच स्वयंपूर्ण व्हायला हवं या निर्णयाला आम्ही दोन्ही पार्टनर आलो. ‘सुपे एमआयडीसी’मध्ये तीन हजार सहाशे स्क्वेअर मीटर जागा रिसेलमधे मिळाली. ही जागा आणि नवीन मशिनरी विकत घेण्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करून बँकेतून ६८ लाख रुपये लोन घेतलं. कोणत्याही प्रोफेशनल एजन्सीची मदत न घेता फॅक्टरीचं डिझाईन करून सहा महिन्यात सेटअप पूर्ण करून घेतला. सगळं तयार होतं आता प्रतीक्षा होती ती, राजस्थानमधील फॅक्टरी मालक कधी पैसे वाढवून मागतोय याची. आमचा करार असल्याने मी स्वतःहून काम थांबवू शकत नव्हतो. एक महिन्याने त्यांचा मेल आला, पैसे वाढवून दिले नाहीत, तर काम बंद करू. आम्ही देखील त्याला, ‘ठीक आहे आपण काम बंद करू’ असा रिप्लाय दिला. तो वाचून फॅक्टरी मालकाचे धाबे दणाणले. तो त्याच पैशात काम करतो असं आर्जव करू लागला, पण आम्ही निर्णयावर ठाम होतो. आमच्या प्रॉडक्टचे डाय राजस्थानच्या फॅक्टरीत अडकले होते. कायदेशीर रीतीने आम्ही वेगळे झालो असलो तरी तो इलाखा त्यांचा होता. ते डाय परत करायला तयार नव्हते. त्यांच्या घरातील सदस्यांसाठी मुंबईहून गिफ्ट घेऊन गेलो, भावनिक साद घातली, तेव्हा कुठे ते सरळ बोलायला लागले. आमच्यासारखा माल बनवून ते विकू शकतात, या अटीवर आमच्या डाय आम्हाला परत मिळाल्या.
स्वतःची फॅक्टरी सुरू झाल्यावर कामं अधिक सुरळीत पार पडायला लागली. धंदा वाढत होता. २०१७ साली सूर्यकांत वैयक्तिक कारणांसाठी भागीदारीतून वेगळे झाले. २०१९मध्ये आमच्या जळगावच्या गोडाऊनला आग लागून मालाचे मोठं नुकसान झालं. यातून सावरत असताना कोरोना आला तेव्हा धंदा ठप्प झाला. या सर्व काळात कामगारांचं नीतीधैर्य कायम राहण्यासाठी ऑनलाईन मोटिवेशन, योगा, ट्रेनिंग याद्वारे एंगेज ठेवलं. आमचे प्रोडक्ट फार्मा आणि फूड या जीवनावश्यक वस्तूंना लागतात, त्यामुळे लॉकडाऊन काळात आम्हाला फॅक्टरी सुरू करायची परवानगी मिळाली. या काळात इतर काम कमी होतं. तो वेळ सदुपयोगी लावून फॅक्टरीमध्ये नूतनीकरण करून ती अद्ययावत करून घेतली.
आमचा कच्चा माल पेट्रोकेमिकलमधून येतो. हा व्यवसाय क्रूड ऑइलच्या दरावर अवलंबून आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे मालाच्या भावात खूप चढउतार सुरू असतो. पण धंदा म्हटला की नफा नुकसान होत राहतं. तुमचं टिकून राहणं जास्त महत्त्वाचं असतं. ज्या व्यवसायाने मला स्थैर्य दिलं त्या प्लास्टिक पॅलेट्समधे देशातील सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरर बनण्याची माझी महत्वाकांक्षा आहे. व्यवसायात कधीही एकाच प्रॉडक्टवर अवलंबून राहू नये, म्हणून आम्ही वेगवेगळ्या सेक्टरसाठी रोड सेफ्टी, केमिकल टँक, प्लास्टिक क्रेट्स अशी विविध प्रॉडक्ट्स बनवत आहोत.
कोणत्याही परप्रांतीय व्यावसायिकाला प्रामाणिकपणा, स्किल्ससाठी मराठी माणूस कामाला हवा असतो. पण आपल्यातील गुण मालकांना पैसे मिळवून द्यायला नसून स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी आहेत, हे कृष्णा मराठे यांनी ओळखलं. पुढल्या पाच वर्षांत शेअर मार्केटमधे आयपीओ आणण्याचा त्यांचा इरादा आहे. परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणात बर्याच वेळा खंड पडला, त्यावर मार्ग काढताना त्यांनी स्वतःमधलं कौशल्य ओळखलं आणि एकेका पावलापुरती जागा निर्माण करत राहिले. एकेक पाऊल टाकत आज त्यांनी बरीच मोठी मजल मारली आहे, धंद्याला पोषक दृष्टिकोन आणि मेहनत यांच्या बळावर मराठे (यांचे) पाऊल पुढे जातच राहील…