स्थळ- जम्मू आणि कश्मीरमधल्या श्रीनगरचं शेर-ए-कश्मीर स्टेडियम! कश्मीरमधला तो प्रसिद्ध चिलेकनान- कडाक्याची थंडी. गेले अनेक दिवस पांढरा टीशर्ट घालून चालणारा ‘तो’ आज कश्मीरी फिरन आणि कानटोपी घालून बोलायला उभा आहे… डोक्यावर बर्फवृष्टी सुरूच आहे… त्याचे बॉडीगार्ड त्याच्यासाठी छत्री घेऊन उभे आहेत आणि ‘इसे हटाओ.. नहीं चाहिए!’ म्हणत ते भुरभुरणारं बर्फ डोक्यावर घेत तो बोलतोय… तो- पंडित नेहरूंचा पणतू… इंदिराजींचा नातू आणि राजीव-सोनियांचा मुलगा… राहुल गांधी!
‘मी गेली अनेक वर्षं दररोज ८-१० किलोमीटर धावतो. कन्याकुमारीतून चालायला सुरुवात केली, तेव्हा वाटलं सहज जाऊ आपण कश्मीरपर्यंत… पण ५/६ दिवसातच जाणवलं, वाटतं तेवढं सोपं नाही. मी कॉलेजमध्ये असताना फुटबॉल खेळताना एकदा जोरदार आपटलो होतो. गुडघ्याला दुखापत झाली होती. मध्ये एवढी वर्षं गेली. मी ती दुखापत विसरूनही गेलो होतो… पण यात्रा सुरू झाली आणि पाचसहा दिवसातच ते जुनं दुखणं पुन्हा बोलायला लागलं… जमेल ना? झेपेल ना? मनात नुसत्या शंका… चालत होतोच. अशात एक लहान मुलगी भेटायला आली. एक चिठ्ठी तिने हातात दिली. ‘नंतर वाच!’ म्हणाली आणि मला मिठी मारून निघून गेली. नंतर तिची चिठ्ठी वाचली- तिने लिहिलं होतं- तुझा गुडघा दुखतोय ना? दिसतंय मला… तो दुखरा पाय टेकवतोस, तेव्हा चेहर्यावर दिसतं तुझ्या. खरं तर मला चालायचंय तुझ्याबरोबर, पण आई-बाबा पाठवत नाहीत. मनानी मात्र चालतेच आहे मी रोज तुझ्याबरोबर… कारण मला माहितीये, तू आमच्यासाठी चालतो आहेस… तिची चिठ्ठी वाचली आणि त्या दिवशीपुरतं तरी मी ते दुखणं विसरलो.
पुढे चालत होतो. माणसं भेटत होती. मिठी मारत होती. बोलत होती. मन मोकळं करत होती. काही बायका भेटल्या… गळ्यात पडून रडल्या, म्हणाल्या, खूप सोसलंय. बलात्कार भोगलेत. अत्याचार झालेत. तुला सांगतोय, पण पोलिसांना सांगू नकोस, नाही तर आमचे हाल होतील… हे कसलं वातावरण? चार लहान मुलं एकदा भेटायला आली. अंगावर धड कपडे नव्हते… मजुरीही करत असावीत, कारण मातीनं माखली होती. मी त्यांना भेटायला खाली गुडघ्यावर बसलो. त्यांनी मला मिठी मारली तर कुणीतरी आमचाच कार्यकर्ता मला म्हणाला, राहुलजी काय करताय? घाणेरडी आहेत ती मुलं… मी त्यांना म्हणालो, आपल्या सगळ्यांपेक्षा नक्की स्वच्छ आहेत. त्या तसल्या थंड हवेतही त्यांच्या अंगावर कपडे नव्हते, स्वेटर कुठला असायला? आणि मी अंगभर कपडे असताना स्वेटर कसा चढवावा त्यावर?
यात्रा करायची ठरवली तेव्हा सगळे म्हणाले, बाकी देशात चालशील… चाल! पण कश्मीरमध्ये कुठे चालतोस? गाडी में बैठो… हालात बरे नसतात तिथे, कुणी ग्रेनेड फेकलं तुझ्यावर तर काय करशील? त्यांना म्हटलं, काही वर्षांपूर्वी माझे पूर्वज कश्मीरमधून गंगातीरी जाऊन राहिले. मी नेहमी सरकारी घरांमध्ये राहिलो… माझ्यासाठी घर म्हणजे इमारत नाहीच. माझे पूर्वज ज्या कश्मीरमधून अलाहाबादला गेले ते कश्मीरच माझं घर, असं इथे यायला निघालो तेव्हापासून वाटतंय… घरी येतोय. पांढरा टीशर्ट लाल होणार असेल तर होऊदे, बघू काय ते असं उत्तर दिलं बोलणार्यांना आणि खरंच ग्रेनेड्स नाही, प्रेमाचा वर्षाव झाला इथे, घरी गेल्यावर होतो तसाच…
मी १४ वर्षांचा होतो. शाळेत गेलो होतो. तास सुरू होता. एक टीचर बोलवायला आल्या, म्हणाल्या- प्रिन्सिपल ने बुलाया है. मी मस्तीखोर होतो… कशावरून बोलणी खायला लागणार आहेत, असा विचार करत प्रिन्सिपल केबिनकडे चाललेलो, पण बोलवायला आलेल्या टीचरकडे बघून वाटलं, काही तरी झालंय. माझ्या घरून फोन होता… फोनवर- दादी को गोली मारी- असं मला ऐकू आलं. प्रियंकाला घेऊन कसा घरी गेलो माझं मला माहिती… नंतर अमेरिकेत होतो तेव्हाही तसाच फोन… यावेळी माझे वडील! तुमच्या आणि माझ्या आयुष्यात फोनचं स्थान हे असं वेगळं आहे. मला जे आयुष्य बदलणारे, उद्ध्वस्त करणारे फोन आले आहेत तसेच फोन इथल्या अनेकांना आले आहेत… मग ते कश्मीरी लोकं असोत, सेना, बीएसएफ की आणखी कुणी! असे फोन आले की काय काय होतं… हिंसा अनुभवणं काय असतं हे मी जाणतो. मोदीजी, अमित शहा, अजित डोवाल हे जाणत नाहीत, पण मी जाणतो आणि तुम्ही सगळे जाणता… असे फोन येणं बंद व्हायला हवं… माझं बोलणं कदाचित काँग्रेस पक्षातल्या लोकांनाही आवडणार नाही, पण ही यात्रा मी काँग्रेस पक्षासाठीही केली नाही… हे असे काळीज हलवून टाकणारे फोन बंद व्हावेत म्हणून ही यात्रा केली… नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोली, ती फक्त तेवढ्याचसाठी!’
– – –
गेले काही महिने अंगावर डार्क कलरची पँट आणि पांढरा टी शर्ट घालून चालत असलेला राहुल गांधी नामक इसम अर्धा तास सलग हे बोलतो आणि त्याच्या शांत स्थिर आवाजात ते ऐकताना डोळे वाहू लागतात… बोलताना तो वाटेत भेटलेल्या माणसांबद्दल सांगतो… महाराष्ट्रातले फुले, कर्नाटकातले बसवेश्वर, उत्तरेतली गंगा जमनी तहजीब, लदाखमधलं बुद्धीजम असं किती, काय काय सांगतो… आणि गेल्या काही वर्षात राजकीय पक्षांच्या स्वार्थांनी आणि त्यांच्या नादाला लागून मिडियानं त्याची ‘पप्पू’ म्हणून केलेली संभावना आठवते आणि आपणही त्या यंत्रणेचा एक भाग आहोत, या गिल्टमुळे आपले डोळे आणखी वाहत राहतात…
भारत जोडो यात्रेदरम्यानचा राहुलचा वावर आश्वासक आहे… पं. नेहरूंचा पणतू… इंदिराजींचा नातू आणि राजीव-सोनियांचा मुलगा! वैचारिक आणि राजकीय वारशाच्या हिशोबानं तो श्रीमंत आहे आणि तरी माझ्यासारखं सर्वसामान्य कुणीही त्याच्या या श्रीमंतीच्या दबावापुढे झुकता त्याला ‘राहुल!’ म्हणू शकतं. त्याचा हात हातात घेऊ शकतं. त्याच्याबरोबर नाचू-गाऊ-जेवू-खाऊ शकतं. इंदिरा आणि राजीव यांचे जे मृत्यू देशानं बघितलेत त्यानंतर हे करायला खरंच धैर्य हवं… नाही तर राजकीय नेत्यांच्या सभांना व्यासपीठांनाही फेन्सिंग केलेलं बघतोच आपण आणि कुणी शाई फेकली म्हणूनही अलर्ट होतात माणसं याच काळात…
राहुलचा पहिल्यांदा ‘पप्पू’ असा उल्लेख झाला तेव्हाही तो उल्लेख खटकलाच… आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षांना अडथळा ठरेल या भीतीनं आपण असं एखाद्याला नेस्तनाबूत करणं ज्यांना शोभतं त्यांना शोभो बापडं… पण आपल्या आजी आणि वडिलांचे असे मृत्यू पचवलेला माणूस इतका बावळट नक्की नाही, याची खात्री होतीच; फक्त ते कधी आणि कसं समोर येणार असं वाटायचं… स्पेशली कोविडपासून राहुलचे काही सिरियस इंटरॅक्शन्स बघितले त्यानंतर कधी आणि कसं ते माहिती नाही, पण राहुल ‘पप्पू’ नाही हे जगासमोर येईल आणि चांगलंच इफेक्टिवली येईल असं वाटायचं. अर्थात मधल्या काळात काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी त्यानं न घेणं/घेतलेली परत देणं वगैरे गोष्टी खटकल्याच… पण भारत जोडो यात्रा, या दरम्यान त्याचे रोजच्या रोज होणारे इंटरॅक्शन्स, भाषणं या सगळ्यातून समोर आलेलं राहुल गांधी हे व्यक्तिमत्व आश्वासक आहे, हे स्वीकारायलाच हवं. यात्रेदरम्यान रघुराम राजन, कमल हसन यांच्याबरोबरची त्याची इंटरॅक्शन्स ही दोन सिरियस, इंटेलेक्चुअल माणसं कशी आणि काय लेव्हलवर एकमेकांशी बोलतात याचा वस्तुपाठ आहेत. यात्रा दिल्लीत असताना राहुलनं आवर्जून अटलबिहारी वाजपेयींच्या स्मृतीस्थळाला भेट देणंही त्याच्या टेंपरामेंटच्या दृष्टीने अनपेक्षित नसलं तरी कौतुकाचंच… यात्रेत योगेंद्र यादव, मेधा पाटकर, तुषार गांधी, कन्हैय्या कुमार, आदित्य ठाकरे, संजय राऊत, उर्मिला मातोंडकर, सुप्रिया सुळे, अमोल पालेकर, संध्या गोखले, रघुराम राजन, कमल हसन, पेरुमल मुरुगन, परमवीर चक्र विजेते बाणासिंह, रब्बी शेरगीलसारखा पंजाबी गायक-संगीतकार, उत्तरेत फारुक अब्दुल्ला, मग ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, फुटबॉलपटू बायचुंग भूतिया असे एक एक जण राहुलबरोबर चालले आणि या सगळ्यांबद्दलच आदर वाटला/असलेला दुणावला म्हटलं तरी वावगं ठरायचं नाही.
यात्राकाळात राहुलने अनेक इंटरव्यूज दिलेत. त्यातले काही पाहिले आणि लक्षात राहिले. कामिया जानीच्या कर्ली टेल्स या युट्यूब चॅनलला त्यानं इंटरव्यू दिलाय. त्याचं शिक्षण, अनुभव, एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटीज आणि त्यातल्या त्याच्या अचिव्हमेंट्स ऐकल्या की थक्क व्हायला होतं. अर्थात हे सगळं ऐकलं तरी ‘चर्चा’ होते, ती फक्त त्याने त्याच्या लग्नाबद्दल बोललेल्या दोन वाक्यांचीच! ही चर्चा करणार्यांमध्ये राहुलच्याच वयाचे शून्य महत्त्वाकांक्षा असलेले पुरुष आघाडीवर असतात, तेव्हा आपल्या आजूबाजूच्या माणसांची खरी रूपं समोर येतात, याचा आनंद होतो.
ही यात्रा कुठल्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही असं राहुल पूर्वीपासून सांगतोय… विभाजन, मतभेदांपलीकडे गेलेले मनभेद, भिंती घालून बंद पाडलेले संवाद आणि आपल्या-परक्याच्या गडद व्याख्या अशा आत्ताच्या वातावरणात राहुलचा प्रयत्न आश्वासक आहेच. हे खरं असलं तरी तेवढंच पुरेसं असणार का?… यात्रेनंतर राहुल काय करणार? काँग्रेस काय करणार? यात्रा काळात सापडलेला फॉर्म राहुल कसा टिकवणार? लोकशाहीच्या हितासाठी अत्यावश्यक असलेला विरोधी पक्ष या भूमिका राहुल आणि काँग्रेस कशा निभावणार हे सगळं बघणं उत्सुकतेचं ठरणार आहेच…
राहुलनं अपेक्षा उंचावल्या आहेत हे खरंच. त्या अपेक्षांचं काय होतं हेही येणारा काळ सांगेलच… पण तोपर्यंत भय-तिरस्कार, आपलं-परकं, हिंदू-मुस्लिम, भगवा-हिरवा अशा वाटण्या करुन तेढ माजवली जाणंच ‘नॉर्मल’ समजण्याच्या सद्य:स्थितीत कुणीतरी ‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान’ वगैरे म्हणण्याचा एका अर्थानं औचित्यभंगही दिलासादायक आहे… हा दिलासा राहुलनं दिला, म्हणून त्याला थँक यू!