• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मुळ्येकाकांचा माझा पुरस्कार!

- संदेश कामेरकर

Nitin Phanse by Nitin Phanse
April 4, 2025
in घडामोडी
0

शिवाजी मंदिर नाट्यगृहात नुकताच नाट्यरसिकांच्या फुल्ल गर्दीत माझा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. रसिक प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहतात, तो हा पुरस्कार! खिशात दमडाही नसलेले ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्यव्यवस्थापक अशोक मुळ्ये यांनी या पुरस्काराला जन्म दिला. हल्ली कलाकार कमी आणि पुरस्कार खंडीभर अशी स्थिती आहे. त्यामुळे, पुरस्कार म्हटलं की धडकी भरते. दादासाहेब फाळके पुरस्कार तर इतक्या संस्था देतात की, ज्याला खरा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ मिळाला, त्यालाही ‘मीच तो’ हे ओरडून सांगावं लागतं. या पार्श्वभूमीवर पांढर्‍या शुभ्र कपड्यातील अशोक मुळ्ये आणि त्यांच्या शुभ्र ट्रॉफीची पवित्रता उठून दिसते.
तीन वर्षांपूर्वी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना अशोक सराफ यांनी दिलेली प्रतिक्रिया आठवते, ‘आजवर मोठ्या संस्थांचे, टेलिव्हिजन वाहिन्यांचे, सरकारचे पुरस्कार मिळाले. कालांतराने कित्येक पुरस्कार माळ्यावर पडले. पण नि:स्पृहपणे काम करणार्‍या एका माणसाने दिलेला हा पुरस्कार ‘इंटरेस्टिंग’ आहे.’ याची सुरुवातही तितकीच इंटरेस्टिंग! एका ज्येष्ठ रंगकर्मी अभिनेत्रीने सुंदर अभिनय करूनही पुरस्कार मिळाला नाही, हे मुळ्येंना खटकले. त्यांनी ताबडतोब ‘माझा पुरस्कार’ सुरू केला. त्यांचे आयोजक तेच, परीक्षक तेच आणि देणारेही तेच. त्यामुळे, अनेक वर्षे पुरस्कारांपासून वंचित राहिलेल्यांना ‘माझा पुरस्कार’ मिळू लागला.
वयाची ८२ वर्षे पार करूनही मुळ्ये काका तितकेच सळसळते! त्यांच्या कार्यक्रमाला ना व्यवसायिक प्रायोजक, ना तामझाम, ना दिखावा! तरीही, कलाकार, तंत्रज्ञ, रसिक यांच्या प्रेमामुळे हा सोहळा दरवर्षी अधिक भव्य आणि मोठा होत जातो. नाटक पाहताना ते ठरवतात यावर्षी कोणाला पुरस्कार द्यायचा. नाटक संपल्यावर ते त्या कलाकाराला सांगतात यावर्षीचा ‘माझा पुरस्कार’ तुला मिळाला. इतकी सोपी निवड पद्धती या पृथ्वीतलावर नसावी.
या वर्षी संदेश कुलकर्णी लिखित, अमृता सुभाष दिग्दर्शित ‘असेन मी नसेन मी’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट नाटककार हा सन्मान संदेश कुलकर्णी यांना अणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा सन्मान शुभांगी गोखले नाटकातील दुहेरी भूमिकेसाठी मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान ऋषिकेश शेलार यांनी शिकायला गेलो एक या नाटकासाठी पटकावला, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची या ट्रॉफीच्या मानकरी निहारिका राजदत्त (उर्मिलायन) ठरल्या. याच नाटकासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा मान सुनील हरिश्चंद्र यांना मिळाला. ज्याची त्याची लव्ह स्टोरी नाटकाच्या देखण्या सेटसाठी सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार म्हणून संदेश बेंद्रे यांची निवड झाली. पुनरुज्जीवित नाटक विभागात संतोष काणेकर यांचे ‘पुरुष’ नाटक सर्वोत्कृष्ट ठरलं, दिग्दर्शक – राजन ताम्हाणे, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – अविनाश नारकर यांना ‘माझा पुरस्कार’ मिळाला.
‘माझा पुरस्कार’ खर्चाचं नियोजन, कार्यक्रमाची आखणी मुळ्येकाका स्वत: करतात. ‘ज्यांच्या खिशात भरपूर पैसे आहेत, असे लोक माझ्या खिशात आहेत’ मुळ्येकाकांचे आवडते वाक्य. नामवंत कलाकार मंडळी इथे विनामूल्य येतात आणि आपल्या खिशातील पैसे सढळ हस्ते मुळ्येकाकांना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी देतात. मुळ्येकाका देखील कार्यक्रम झाल्यावर उरलेले पैसे स्वत:कडे न ठेवता परत करतात. यावर्षी उद्योगपती महेश मुद्दा यांनी पाठवलेले पैसे त्यांनी असेच परत केले.
‘माझा पुरस्कार’चा मुख्य आकर्षणबिंदू असतो तो अशोक मुळ्येंची शाब्दिक फटकेबाजी! कुठे राजकीय कोपरखळी मारायची, कुठे चिमटा घ्यायचा, कुठे स्वत:ची फजिती सांगायची, हे त्यांना बरोबर ठाऊक. मुख्यमंत्री असोत की निवृत्त न्यायाधीश… मुळ्ये काकांच्या मंचावर सर्व समान! एखादा पुरस्कार स्वीकारल्यानंतर कलाकार ‘हा पुरस्कार अमुक अमुक व्यक्तीला अर्पण करतो’ असं म्हणतो, त्यावर मुळ्ये म्हणतात, ‘अहो, फक्त पुरस्कारच नाही, सोबत रोख रक्कमही अर्पण करा ना!’ ‘बाईला माहेर एकच असतं, सासर दोन असू शकतात. त्यामुळे, ‘माहेरचा पुरस्कार’ म्हणण्याऐवजी ‘सासरचा पुरस्कार’ म्हणायला हवं!’ असं म्हणून त्यांनी यंदाही उपस्थितांना खळखळून हसवलं.
प्रशांत लळीत यांच्या संगीत संयोजनाने चित्रपटातील प्रेमगीतांची सुरेल मैफिल मस्त रंगली. जयंत पिंगुळकर, केतकी भावे जोशी, शिल्पा मालंडकर, मंदार आपटे यांनी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. नाट्यदिग्दर्शक राजन ताम्हाणे म्हणाले, ‘गेल्या ४० वर्षापासून अशोक मुळ्ये आणि मी एकमेकांना ओळखतोय. त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते अनेक वर्ष मला सहन होत नाही इतकं घालून पाडून बोलायचे. पण सांगणार कोणाला, नंतर माझ्यातही हिम्मत आली आणि मीही त्यांना त्याच पद्धतीने बोलायला लागलो. त्यांना नाटक आवडलं तर तोंड भरून कौतुक करतात आणि नाही आवडलं तर उद्या बोलतो असं सांगतात. जे वाटते तोंडावर बोलायचं या स्वभावामुळे अनेकांना मुळ्ये फटकळ वाटतात, नाट्यक्षेत्रातील अनेकजण त्यांना टाळतात. पण त्यांचा नाटकाविषयीचा अभ्यास किती आहे हे माहीत नसल्याने या मंडळींचेच नुकसान होतं. हा हवेतील माणसांना जमिनीवर आणणारा माणूस आहे अशा माणसाला उदंड आयुष्य लाभो.

Previous Post

शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

Next Post

खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

Next Post

खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.