राजकारणातल्या माणसांच्या राजकारणातल्या आणि
राजकारणापलीकडच्या सुरस आणि चमत्कारिक आठवणींचा खजिना
—-
युती सरकारचा शपथविधी सोहळा १७ मार्च १९९५ रोजी राजभवनात होता. त्याला काँग्रेसतर्फे उपस्थित राहण्याची जबाबदारी बाबुराव भारस्कर यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यावेळेस ‘सांज लोकसत्ता’चे संपादक चंद्रशेखर वाघ यांना भेटायला ते सांज लोकसत्ताच्या कार्यालयात आले, पण वाघांऐवजी त्यांना मी भेटलो आणि बाबुरावांच्या रूपाने मला ग्रामीण भागातील एक रांगडा राजकारणी भेटला. गप्पांची मैफल जमली आणि बाबुरावांनी त्यांच्या मंत्रिपदाचा आणि त्यांना मिळालेल्या बंगल्याचा किस्सा कथन केला.
बाबुराव म्हणाले, १९६० साली यशवंतराव चव्हाण यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. त्यानंतर दोन वर्षांनी, म्हणजे १९६२ साली तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांची भारताच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती केली. १९६३ साली वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आले. नव्या मुख्यमंत्र्यांना आपल्या मर्जीनुसार मंत्रिमंडळात बदल करण्याचा वा संपूर्ण मंत्रिमंडळ नव्याने बनविण्याचा अधिकार असतो. वसंतरावांनी पूर्ण मंत्रिमंडळ नव्याने गठित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. नगर जिल्ह्यातील एका राखीव मतदारसंघातून मी काँग्रेसतर्फे विधानसभेवर निवडून आलो होतो. माझा मुक्काम आमदार निवासातच होता. रात्री आठच्या सुमारास आमदार निवासातील माझ्या खोलीचा फोन खणखणला. बाबुराव आहेत का, सीएम साहेबांना बोलायचे आहे. मी पटकन फोन घेतला तर फोनवर साक्षात वसंतराव नाईक बोलू लागले. बाबुराव, मी तुम्हाला मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून घ्यायचे ठरविले आहे. तेव्हा उद्या सकाळी साडेनऊ वाजता राजभवनावर शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहा. ही बातमी राजकीय वर्तुळात पसरायला वेळ लागला नाही आणि अनेक राजकीय मंडळी पुष्पगुच्छ घेऊन आमदार निवासातील माझ्या खोलीवर येण्यास सुरुवात झाली. सकाळी लवकर उठून तयार झालो आणि साडेआठच्या सुमारास टॅक्सी करून राजभवनकडे निघालो. भव्य मंडपात शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू होती. दहाच्या सुमारास कॅबिनेट मंत्री म्हणून माझे नाव पुकारण्यात आले. शपथविधी सोहळा पार पडला आणि लाल दिव्याची अॅम्बेसिडर कार माझ्या जवळ येऊन थांबली. त्या गाडीत ड्रायव्हरशेजारी एक अधिकारी बसला होता. भारस्कर साहेब आपणच ना? ही गाडी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला निवासस्थान म्हणून सह्याद्री बंगला अलॉट झाला आहे. ड्रायव्हर तुम्हाला तिथे घेऊन जाईल. मी सह्याद्रीवर गेलो. तो आलिशान बंगला पाहून छाती दडपून गेली. यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून या बंगल्यात वास्तव्य केले होते. त्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल २३ खोल्या होत्या. प्रचंड मोठी म्हणता येईल अशी मिटिंग रूम होती, तसेच पाच वॉशरूम्स होते. माझ्या हातात एक साधी कापडी पिशवी आणि लाकडी दांड्याची लांब छत्री होती. एका खोलीत पिशवी ठेवली, दुसर्या खोलीत छत्री ठेवली. असेच दोन-तीन वेळा केले. पण खोल्याच संपेनात. एवढा मोठा बंगला आपल्याला झेपणार नाही, हे त्या वेळी लक्षात आले आणि बाहेर येऊन ड्रायव्हरला गाडी सीएम साहेबांच्या बंगल्यावर घ्यायला सांगितली. वसंतराव नाईक साहेबांची लगेच भेट झाली. साहेब, सह्याद्री बंगला खूपच मोठा आहे. गावाकडे दीड खोलीत राहणार्या माणसाला या बंगल्यात राहण्यास जमणार नाही. माझी छोट्या बंगल्यात व्यवस्था करा. नाईक साहेबांनी लगेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांना फोन केला आणि मंत्रालयासमोर छोट्या बंगल्यात माझी राहण्याची व्यवस्था करा, असा आदेश दिला. मी छोट्या बंगल्यात राहायला गेलो. बघता बघता पाच वर्ष संपून गेली. पुन्हा मंत्रीपद मिळणार नव्हते, पण मोठ्या घरात राहायची सवय झाली होती. परत नाईक साहेबांकडे गेलो. साहेब बंगल्याची सवय झाली आहे, पण मंत्रिपद गेले आहे. आता राहायचे कुठे, हा प्रश्न आहे. माझी राहण्याची सोय करा. वसंतरावांना माझी समस्या लक्षात आली. त्यावेळी दहा टक्के कोटा हा प्रकार नव्हता, पण काही इमारतींमधील फ्लॅट सरकार ताब्यात घेत असे. अशा फ्लॅटपैकीच कुलाब्यातील एक फ्लॅट वसंतरावांनी मला राहण्यास दिला. आजही माझे वास्तव्य तिथेच आहे.
मुख्यमंत्रीपद मिळाले आणि गेले त्याची कथा
१९८० सालच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे बहुमत मिळाले आणि ए. आर. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण अंतुले यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आणि अगदी अनपेक्षितपणे तत्कालीन पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष इंदिरा गांधी यांनी कुणाच्याही ध्यानीमनी ज्यांचे नाव नव्हते अशा बाबासाहेब भोसले यांची नियुक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी केली. आपली निवड मुख्यमंत्रीपदी होईल असे खुद्द बाबासाहेबांनाही वाटले नव्हते. त्यामुळे सुखद धक्का बसलेल्या बाबासाहेबांनी, ‘आभाळातून लोकांच्या डोक्यात गारा पडतात, माझ्या डोक्यात मात्र मुकुट पडला’ अशी अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री झाल्यावर सुरुवातीला बाबासाहेबांनी जे काही महत्त्वाचे निर्णय घेतले त्यातील एक निर्णय मुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या वर्षा निवासस्थानाचे नाव बदलून ते रायगड करणे असा होता. आम्ही भोसले आहोत आणि भोसले गडावर राहतात अशी मल्लीनाथी करीत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना पाचारण करून वर्षा बंगल्याचे नामकरण रायगड असे केले.
बाबासाहेबांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द फार मोठी नव्हती, पण या छोट्या कारकीर्दीत त्यांना एका स्फोटक परिस्थितीला सामोरे जावे लागले. ते मुख्यमंत्री असतानाच मुंबईत पोलिसांनी बंडाचा झेंडा उभारला. ज्यांनी लोकांचे रक्षण करायचे, ते पोलिसच रस्त्यांवर उतरले. पोलिस आपल्या हातातील काठ्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडत आहेत, गाड्यांच्या चाकातील हवा काढत आहेत, समोर येईल त्याच्या अंगावर हात उगारत आहेत, असे अनोखे दृश्य त्या वेळी पाहायला मिळाले. ही खबर बाबासाहेबांपर्यंत पोहोचताच त्यांनी तातडीने लष्कराला पाचारण करून मुंबईच्या रस्त्यांवर उतरविले आणि अत्यंत कठोरपणे पोलिसांचे बंड मोडून काढले. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो. त्यामुळे रक्षकच भक्षक झाले तर त्याची मोठी किंमत राज्याला मोजावी लागेल, हे लक्षात घेऊन बाबासाहेबांनी एका दिवसात पोलिसांचे बंड मोडून काढले.
बाबासाहेब आणि राम जेठमलानी हे दोघे अत्यंत जिवाभावाचे मित्र. बाबासाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा जेठमलानी परदेश दौर्यावर होते. एक-दोन महिन्यांनी ते परत आल्यानंतर बाबासाहेब मुख्यमंत्री झाल्याची बातमी त्यांच्या कानावर गेली आणि जेठमलानी यांनी बाबासाहेबांना फोन केला. बाबासाहेब तुम्ही मुख्यमंत्री झालात, आपल्याला भेटायला हवे, असे जेठमलानी यांनी म्हणताच, भेटायचे असेल तर आजच भेटूया. मला उद्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दिल्लीला जायचे आहे, असे बाबासाहेबांनी जेठमलानींना सांगितले. त्यानंतर रात्री उशिरा बाबासाहेब आणि जेठमलानी एका हॉटेलमध्ये भेटले. जुन्या आठवणींना उजाळा देत दोघांनीही खूप गप्पा मारल्या. दुसर्या दिवशी बाबासाहेब दिल्लीला रवाना झाले. वेगवेगळ्या केंद्रीय मंत्र्यांना भेटून त्यांनी राज्यातील अनेक प्रश्न मार्गी लावले. सगळ्यात शेवटी ते पक्षाच्या सर्वेसर्वा आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेण्यासाठी गेले. इंदिरा गांधींनी त्यांना तातडीने आत बोलावले आणि फक्त एकच प्रश्न विचारला. कल रात को जेठमलानी क्या बोल रहे थे? अनपेक्षितपणे समोर आलेल्या या प्रश्नाने बाबासाहेब हादरून गेले. इंदिरा गांधी त्यांच्याशी अत्यंत तुटकपणे बोलल्या. जेठमलानी यांच्याशी इंदिरा गांधींचा छत्तीसचा आकडा होता. त्याचा राग त्यांनी बाबासाहेबांवर काढला आणि बाबासाहेब त्यांचा निरोप घेऊन निघाले तेव्हा इंदिरा गांधी यांनी फार काही न बोलता ‘भोसलेजी आप मुंबई जाओ और मुख्यमंत्रीपद का इस्तीफा दे दो’ असा स्पष्ट आदेश दिला. बाबासाहेबांनी अत्यंत विमनस्क अवस्थेत दिल्लीहून मुंबई गाठली आणि मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. जितके अनपेक्षितपणे बाबासाहेबांना मुख्यमंत्रीपद मिळाले, तितक्याच दुर्दैवीरित्या त्यांना राज्यातील हे सर्वात मोठे पद सोडावे लागले.
हे सगळे राजकीय नाट्य घडले, तेव्हा मी ‘सांज लोकसत्ता’मध्ये उपसंपादक होतो. योगायोगाने त्याच दिवशी बाबासाहेबांना आवडेल असा मी लिहिलेला राजकीय लेख लोकसत्तामध्ये छापून आला होता. तो लेख वाचल्यानंतर बाबासाहेबांनी सांजच्या संपादकांना म्हणजे चंद्रशेखर वाघ यांना फोन केला आणि सुरेंद्र हसमनीस यांना माझ्या घरी भेटायला पाठवाल का? अशी विचारणा केली. बाबासाहेब मंत्रालयाच्या जवळपासच राहत होते. मी त्यांच्या घरी गेलो. त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या आणि गप्पांच्या ओघात आपले मुख्यमंत्रिपद गेले हे बाबासाहेबांनी किती सहजपणे सांगितल्यावर क्षणभर माझ्या डोळ्यांत पाणी आले आणि बाबासाहेबांच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या. राजकारणात कोणत्या वेळी कोणती जटील समस्या समोर उभी राहिल आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते करून टाकेल, हे सांगता येत नाही यावर माझा त्यावेळी मात्र विश्वास बसला.
– सुरेन्द्र हसमनीस
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)