आदरणीय महामहीम राज्यपाल महोदय यांस,
तुम्हाला मायना वाचून थोडं आश्चर्य वाटलं असेल. म्हणजे काय, की आम्ही काही तुमचे मोठे फ्यान नाही, हे तुम्हाला माहीत असेल. त्यात बाहेर काय सगळेच तुमच्याबद्दल बरं बोलत नाहीत. कोणी ‘भाज्यपाल’ म्हणतात, कोणी तात्या हे संबोधन वापरतात, तर कोणी तुमच्या काळ्या टोपीलाही लक्ष्य करतात. हे अर्थातच तुमच्या कानावर असेल. पण आम्हाला काही ही अशी खिल्ली उडवणं मंजूर नाही. शेवटी राज्यपाल हा आमच्या उद्धवसाहेबांचं राज्य असलेल्या राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे आणि त्या पदाचा मान राखला गेलाच पाहिजे. आमचे पुलं म्हणतात तसं, ‘खिडकीतून दिसलेल्या कळसाला नमस्कार होतो, तो त्या देवळातल्या देवाला, खिडकीला नव्हे!!’ त्याचप्रमाणे तुमच्याबद्दल आमचं मत काहीही असो, पण राज्यपालपदाची शान मोठी आहे, ती राखायलाच हवी. तेव्हा कसेही असलात तरी आमच्यासाठी तुम्ही ‘महामहीम’च…!!
पण महामहीम, तुम्ही तर एक व्यक्ती आहात, खिडकी नव्हे! तेव्हा आम्ही ज्या पदाचा सन्मान करतो, तो तुम्हीही नको का करायला? आता परवाचीच गोष्ट घेऊ. मा.मु. तुम्हाला भेटले (म्हणजे, माजी मुख्यमंत्री… पदाचा मान महत्त्वाचा!). एकतर तुमच्या पक्षाचं कोणी न कोणी सारखं तुम्हाला भेटतंच असतं. मागे तर कोण तरी एक अतिबुद्धिमान गृहस्थ म्हणे बंगालचं सरकार बरखास्त करा या मागणीसाठी तुम्हाला भेटले होते. आणखी एका गृहस्थांनी तर अमेरिकेतली ज्यो बायडेन यांची निवडणूक बेकायदा आहे, म्हणूनही तुमची भेट घेतल्याचं ऐकलं होतं! तर आमचं म्हणणं काय, तुम्ही या असल्या लोकांना भेटता, तर त्यांना काही अकलेच्या चार गोष्टी सांगता का हो? राज्यपाल हा फुटकळ कारणं घेऊन, सरकारविरोधी कामं पुढे रेटायला वापरायचा ठोकळा नाहीये, असं तुम्ही यांना खडसावत नाही का? सत्तेशिवाय जनतेत जाण्याची सवय नसल्याने खूप मोकळा वेळ आहे आणि तो जाता जात नसला की आले आपले राजभवनावर, हे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला आणि अस्मितेला शोभत नाही, असा दम द्यायला पायजेल तुम्ही. तर तुम्ही आपले अशा सगळ्यांनाच भेटता.
हां, आता कंगनाबाईंसारख्या कलाकारांची गोष्ट वेगळी. त्यांच्या कलेच्या आकलनासाठी त्यांना भेटलं तर ठिकाय. भले त्या महाराष्ट्राचा वारंवार अपमान करत असोत…! पण बाकीच्यांना भेटण्यासाठी तुम्ही काहीतरी धड नियम बनवले पायजेलायत, असं आम्हाला मनापासून वाटतं.
तर हे विषयांतर झालं, पण मूळ मुद्दा असा होता की मा.मु. तुम्हाला भेटले. आता ते चांगले पाच वर्षं मुख्यमंत्री राहिलेले… शिवाय अभ्यासू म्हणून प्रसिद्ध. पण तरी त्यांनी अधिवेशनं कधी घ्यायची आणि अध्यक्ष कसा निवडावा, यात काय राज्यपालांना आणायचं का मध्ये? पण त्यांनी आणलं. आणि तुम्हीही लगोलग त्यांच्या घोड्यावर बसून थेट उद्धवसाहेबांना पत्र धाडलंत? पण त्या पत्रातल्या मुद्द्यांवर तुमचा स्वत:चा काही विचार होता का? उदा. विधानमंडळ अधिवेशनाच्या सत्राचा वेळ… आता देशभरात कोरोनाचा फैलाव आहे. महाराष्ट्राने केलेल्या मुकाबल्याची जगभरात तारीफ होत्येय. अशा वेळेला अधिवेशनाचे दिवस वाढवण्यात आपला काय हेतू आहे? बरं, या वाढीव सत्रात गोंधळ न घालता कामकाज होऊ देऊ, असं आश्वासन तरी किमान आपण माननीय विरोधी पक्षनेत्यांकडून घेतलं का? म्हणजे लोकांचा जीव धोक्यात घालून अधिवेशन काळ वाढवायचा आणि सभागृहात गोंधळ घालून विरोधी पक्षनेत्यांनी हेडलाइन पळवायच्या, यासाठी ही मागणी होत होती का? महामहीम, तुम्ही कळत नकळत या हिणकस राजकारणाचा भाग व्हायला नको होतं.
तीच गत विधानसभा अध्यक्षपदाची. अहो, एवढया अल्पकालीन अधिवेशनात अध्यक्ष नसल्याने व्यावहारिक नुकसान काय होतं? बरं, त्यातून हे पद तुम्हाला महत्त्वाचं वाटत असेल, तर तुम्ही संख्याबळ पाहता बिनविरोध निवडणूक करू आणि प्रक्रियेतला वेळ वाचवू, असं आश्वासन मामुंकडून घ्यायला काय हरकत होती? राज्य चालवायची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असली, तरी सभागृहाचं कामकाज सुरळीत पाडण्यात विरोधी पक्षांनाही जबाबदारी घ्यावी लागते. मग तुमची पत्र फक्त सरकारी पक्षालाच का?
सगळ्यात कमाल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मुद्द्याची आहे. आता खरंतर हा मुद्दा सरळसरळ राजकीय आहे. हे आरक्षण गेली पाच वर्षं कुठे होतं, त्यात विरोधी पक्षनेत्यांनी तेव्हा काय भूमिका घेतलेली होती, केंद्र सरकार का पाय ओढतंत, असे अनेक मुद्दे आहेत. पण राज्याच्या घटनात्मक प्रमुखांनी या राजकारणात पडणं, हा सरळसरळ त्या पदाचा अवमान आहे.
बाकी एवढ्या सगळ्या मुद्द्यांवर सरकारने कृती करावी अशी अपेक्षा बाळगताना तुम्ही स्वतः मात्र तुमचं कर्तव्य पार पाडत नाही. खरंतर महाराष्ट्र सरकारने विधानपरिषदेसाठी १२ नावांची यादी देऊन कित्येक महिने उलटले. आपण ती स्वीकारतही नाही, आणि पसंत नसल्यास नाकारतही नाही. खरंतर त्या पदाचा मान आणि सन्मान असं सांगतो, की तुम्ही सरकारची शिफारस मान्य करून या लोकांची नेमणूक करायला हवी. आता तुम्ही त्यासाठी कोणाच्या परवानगीची वाट पाहताय? विरोधी पक्षनेत्यांच्या का केंद्रीय गृहमंत्र्यांच्या? विधानसभेला अध्यक्ष नसला, तर कामकाज अडत नाही. पण १२ आमदार नसताना त्यांचे जनतेच्या कल्याणाचे निधी, ते विचारू शकत असलेले प्रश्न, कामकाजात घेऊ शकत असलेला सहभाग, या गोष्टी मात्र होत नाहीत. पण आपल्याला त्याची काहीच फिकीर दिसत नाही.
दुर्दैवाने महामहीम, राजभवनात बसून तुम्ही गेला कितीतरी काळ फक्त राजकारण खेळत आहात. अहो, काँग्रेसच्या काळात राजभवनाचा गैरवापर व्हायचा, असे आरोप होत असत. पण ‘तुम्ही सेक्युलर कसे झालात?’ अश्या अर्थाचं थेट राज्यघटनाविरोधी पत्र लिहून थेट मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राजकारणाची आठवण करून देणारे राजकारणी राज्यपाल त्याही कध्धीच पाहिले नव्हते. बरं तर बरं, त्याबद्दल तुम्हाला तुमच्याच गृहमंत्र्यांकडून चार शब्द ऐकायला लागले. त्यापूर्वीही पहाटे पहाटे ताजतवानं होऊन तुम्ही दिलेला शपथेचा सोहळा उभ्या महाराष्ट्राने आश्चर्याने विस्फारलेले डोळे चोळत पाहिलेला होता. या असल्या सगळ्या प्रकारांमुळे तुम्ही राजभवनात पक्ष कार्यालय उघडलंय का काय, अशी टीकाही होते. आधीच्या कोणत्याही कालखंडापेक्षाही तुमची ही कारकीर्द अधिक वादग्रस्त म्हणून ओळखली जाते आहे, हे लक्षात ठेवा…!
राज्यपाल महोदय, आम्हाला ठाऊक आहे की गेल्या काही वर्षांत या देशात राज्यपालांची एक नवीन प्रजाती उगवलेली आहे. ते बंगालचे धनकर सरकार चालवू देत नाहीत. त्या बेदी बाई स्वतःच सरकार चालवू पाहायच्या. राजस्थानच्या राज्यपालांनी तर म्हणे आपली आत्मचरित्रं विद्यापीठांना विकत घ्यायला लावलेली आहेत. अजून बरीच उदाहरणं आहेत. पण महाराष्ट्राची ही परंपरा नाही. सुब्रह्मण्यम नाहीतर पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारख्या राज्यपालांनी या पदाला शोभेचं होऊ दिलं नाही. पण राजकारणात ढवळाढवळही केली नाही. उलट शिक्षण, स्त्री हक्क, आरोग्य, अश्या विधायक कामात हातभार लावला. आता तुम्हालाही जगद्विख्यात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी हिला खाजगी शिक्षण संस्थेचा पुरस्कार राजभवनावर द्यायचं काम विधायक वाटत असेल, तर आमचं काही म्हणणं नाही. अशी सांस्कृतिक कार्यं तुमच्या आवडी आणि अभिरुचीनुसार जरूर सुरू ठेवा, पण राजकारणात अशी सरळसरळ ढवळाढवळ करू नका. त्यापेक्षा ती बारा नाव मंजूर करून सरकारी कार्यवाही पुढे जाऊ द्या.
माणसाने पदाची शान राखली नाही, तरी ती कमी होत नाही. पण माणसाची शान मात्र पद असतानाही नाहीशी होऊन जाते, एवढं फक्त जरूर लक्षात ठेवा, महामहीम!!
जय हिंद, जय महाराष्ट्र…
आपलाच,
पत्रकार्टा