नदी ही एक जिवंत परिसंस्था असून, शास्त्रीय दृष्ट्या नदी समजून घेणे, नदीची परिसंस्था आणि जैवविविधता जाणून घेऊन त्यांच्या नोंदी ठेवणे अपरिहार्य आहे. मग त्यावर काम करणे हे आलेच! लवकरच साखरप्यात ‘नदीची शाळा’ सुरू होतेय. यातील प्रशिक्षित युवकयुवती हे नदीसाठी उपकारकच आहेत पण ११ ते १२ वर्षावरील मुलांमध्ये संस्कारक्षम वयात नदी-साक्षरता बिंबवणे गरजेचे आहे. ते काम इथे होईल.
—-
कॅलिफोर्नियाची उपमा कोकणाला दिली जात असली, तरी वास्तवात कोकणच्या सौन्दर्याची तोड कोणालाच नाही. कॅलिफोर्निया पूर्वी वाळवंटासमान होता. तिथे बाहेरून,
कोलोरॅडो नदीतून २४२ मैल लांबीच्या कालव्यांनी १२ लाख एकर फूट पाणी म्हणजेच ५२.२७ टीएमसी पाणी दर वर्षी घेतलं जात आहे १९४१ सालापासून. त्यांची समृद्धी अशा उसन्या पाण्यावर आहे. कोकणाला मात्र अशा बाहेरच्या पाण्याची आवश्यकता नाही. निसर्गाने त्याच्यावर भरभरून उधळण केली असून गर्द जंगल, डोंगर, वृक्षसंपदा, नितळ समुद्र, नद्या असं सर्व काही कोकणात बघायला मिळतं. परदेशातील समुद्रकिनार्यांपेक्षाही कदाचित अधिकच सुंदर किनारे लाभलेल्या कोकणात पाऊस देखील दमदार पडतो. अशा या दृष्ट लागण्यासारख्या कोकणाला हल्ली खरोखरच दृष्ट लागली आहे… पर्यावरणविषयक असंवेदनशीलतेची दृष्ट.
पावसाळ्यात येथील सर्वच नद्या दुथडी भरून वाहतात. गेल्या काही वर्षांपासून पावसाचा जोर वाढला की नद्यांचं पाणी थेट बाजारपेठेत अथवा गावात शिरून मोठं नुकसान होत आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या आतिवृष्टीमुळे महाड, खेड, चिपळूणसारख्या ठिकाणी मोठं नुकसान झालं. विशेषकरून नद्यांची तोंडं उथळ होऊन पुराच्या पाण्याची मगरमिठी गावांना पडलेली दिसत होती. ही शहरं व आसपासची गावं भयावह परिस्थितीतून जात असताना रत्नागिरीजवळील साखरप्यातील ग्रामस्थांनी काहीसा सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पावसाचा जोर थोडा वाढला की गेली सात दशके त्यांच्या काजळी नदीला दरवर्षी पूर येऊन परिसराचं मोठं नुकसान होतं. पण यंदा मात्र असं घडलं नाही. या नदीचा शास्त्रीय अभ्यास करून पूर येणार नाही, याची खबरदारी अगोदरच घेण्यात आली होती. नदीची तब्बल दीड किलोमीटर लांबीच्या क्षेत्रात खोली आणि रुंदी वाढवली त्याचा फायदा साखरप्यातील जनतेला झाला. अस नेमकं घडलं तरी कसं? याची माहिती घेण्यासाठी ठिकठिकाणाहून नदी अभ्यासक, तज्ज्ञ हल्ली साखरप्यात येत आहेत.
कोकणात सुमारे २५ मुख्य आणि ४८ इतर लहानमोठ्या नद्या आहेत. त्यांना मिळणारे नद्यासदृश ओढे आणि पर्हे तर अगणित आहेत. महाराष्ट्रात पडणार्या एकूण पावसापैकी साधारण ५५ टक्के पाऊस एकट्या कोकणात पडतो. उरलेला ४५ टक्के पाऊस हा उर्वरित महाराष्ट्रावर विखरून पडतो. त्यामुळे पर्जन्यदेवाचा तरी कोकण फारच लाडका म्हटला पाहिजे. कोकणाचे क्षेत्र ३०१२५ चौ. किमी तर संपूर्ण राज्याचे क्षेत्र ३०७,७१३ चौ. किमी. म्हणजे दहा टक्क्यांपेक्षाही कमी भूभागावर पंचावन्न टक्के पाणी पडते. कुणी म्हणेल, बहुत नाइन्साफी है… पण करणार काय? निसर्ग आहे, तो तसाच काम करतो. त्याचे स्वतःचे कायदे कानून आहेत. मानवी कायदे कानून आणि समानता आदी अपेक्षा निसर्गाच्या खिजगणतीतही नसतात. तो त्याच्या मोठ्या आणि मोकळ्या हातांनी देतो, हजारो, लाखो, करोडो वर्षे. त्याने कधी कुठे पूर येतात तर कुठे दुष्काळ. पण गेल्या काही वर्षांत हे पूर आणि दुष्काळ वाढत आहेत.
अतिवृष्टीच्या वेळी सह्याद्रीच्या डोंगररांगातून, समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० ते १००० मीटर उंचीवरून प्रचंड जलप्रपात येतो, त्यासोबत मोठ्या दरडी, गाळ (यात दगडगोटे मोठ्या प्रमाणावर असतात) वाहत येतो आणि नदी पात्रात जमा होतो (काही ठिकाणी केलेल्या कामाचा राडारोडा, रस्तेपुलाचे खालचे बांध इत्यादिंचा अडथळा देखील कारणीभूत ठरतो). नदी मग पात्र बदलून वस्तीत शिरते, शेतात शिरते आणि त्यामुळे खूप नुकसान होते. संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव, साखरपा येथील काजळी नदीची देखील २०२१च्या पूर्वी हीच स्थिती होतो. मागील अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थांनी यावर तोडगा काढण्याचा निश्चय केला होता. ग्रामस्थांनी एकत्र येऊन ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले, जलनायक आणि नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने केलेले काम उल्लेखनीय ठरले आहे.
दोन वर्षांपूर्वीच ग्रामस्थांच्या आमंत्रणावरून नॅचरल सोल्युशन्सने संपूर्ण नदीपात्राची पाहणी केली होती. नंतर प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या ‘नाम फाउंडेशन’ या संस्थेने गावास शक्तिशाली पोकलॅन मशीन्स पाठवून मदत केली. गावकर्यांनी आपापला वाटा स्वेच्छेने उचलून या मशीनमधे डिझेल भरले. यंत्राच्या साह्याने काजळी नदीमधील गाळ काढला. नदी पात्र थोडे अरुंद, पण भरपूर म्हणजेच सत्तर वर्षांपूर्वी होते तेवढे, खोल केले. एक किलोमीटरच्या कामासाठी सुमारे ३३ लाख रुपये खर्च आला. त्यामुळेच या वर्षी साखरप्याला पूर आला नाही.
साखरप्याच्या यशामध्ये जलसाक्षरता हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. श्रीधर कबनूरकर, मुग्धा सरदेशपांडे, जलदूत गिरीश सरदेशपांडे आणि इतर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन नियोजन केले. अनेक दिवस नदीचा अभ्यास केला, पुराची कारणे आणि त्यानंतर येणार्या पाणीटंचाईची कारणे देखील अभ्यासली आणि कामाची दिशा निश्चित केली. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील यांच्या परवानगीने नदी सुमारे चार फूट खोल केली आणि सुमारे पंचवीस मीटर रुंदी ठेवली. या वर्षीच्या फक्त जुलैमधील पाऊस चिपळूणमध्ये २८४४ मिमी आणि संगमेश्वरचा २९४४ मिमी इतका होता. हा २००५च्या पावसापेक्षाही अधिक होता तरीदेखील यावर्षी बाजारपेठ आणि गावात पाणी आले नाही.
हे सगळ्या गावांमध्ये होऊ शकते. आपल्या गावातील पाणी प्रश्न आणि नदीसाठी काम करणार्या तरूण युवक, समर्पित व्यक्तींच्या मार्फत हे अशक्य काम शक्य होऊ शकते. साखरपा येथे नदी साक्षरता प्रशिक्षणाचे नियोजन करता येईल. निवासी प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी कोंडगाव, साखरपा ग्रामस्थ यांनी सहकार्य करण्यास तयारी दर्शविली आहे. साखरप्याच्या धर्तीवर काही नद्यांवर कामे झालेली असून ती यशस्वी देखील ठरली आहेत. नदी साक्षरता अभियानाचा अभ्यास आणि प्रत्यक्ष काम करण्यासाठी काही निधी नक्कीच लागेल (यात प्रामुख्याने यंत्रांना डीझेल हा मोठा खर्च आहे). यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीस जिल्हा नियोजन समिती अथवा राज्याच्या तिजोरीतून काही निधी उपलब्ध करून दिल्यास, स्थानिक नागरिक त्यात देणगीरूपाने भर घालून गुणात्मक काम करतील.
कोकण आणि पश्चिम घाटात सह्याद्रीच्या भागात पूर ही काही नवीन बाब नसली, तरी गेल्या काही वर्षांत या घटनांची तीव्रता वाढते आहे. कोकणातील नद्या अरुंद असून नद्यांचा उगम सह्याद्रीच्या माथ्यावरील पश्चिम घाटात होतो. तिथून पुढे वाहून अरबी समुद्राला मिळतात. सरासरी पर्जन्यमान २००० ते ६००० मिमी आहे. साधारण ६०० ते १५०० मीटर उंचीवरून येणार्या या नद्या अत्यंत वेगाने वाहतात. मागील काही वर्षात सुमारे ८० ते १०० दिवसाचा पावसाळा ४० ते ६० दिवसावर आला आहे, मात्र, सरासरी पाऊस तितकाच आहे, कमी काळात अधिक पावसामुळे माती वाहून जाणे, दरडी कोसळणे, आणि नद्या उथळ व भरपूर रूंद होणे हे प्रकार वाढले आहेत.
नदी ही एक जिवंत परिसंस्था असून, शास्त्रीय दृष्ट्या नदी समजून घेणे, नदीची परिसंस्था आणि जैवविविधता जाणून घेऊन त्यांच्या नोंदी ठेवणे अपरिहार्य आहे. मग त्यावर काम करणे हे आलेच! लवकरच साखरप्यात ‘नदीची शाळा’ सुरू होतेय. यातील प्रशिक्षित युवकयुवती हे नदीसाठी उपकारकच आहेत पण ११ ते १२ वर्षावरील मुलांमध्ये संस्कारक्षम वयात नदी-साक्षरता बिंबवणे गरजेचे आहे. ते काम इथे होईल.
महाराष्ट्र नेहमीच पुरोगामी राहलिा आहे. हे काम देखील देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला दिशा देणारे असेल याची खात्री आहे, असे जलसाक्षरता केंद्र, यशदा पुणे येथील माजी कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे म्हणाले.
कोकणातील नद्यांचा समग्र अभ्यास होणे आवश्यक आहे. पावसाळ्यातील महापूर आणि उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई अशा दुहेरी चक्रात अडकलेल्या कोकणाला नदी साक्षरतेसाठी लोकसहभागाला प्रशिक्षणाची आणि शासनाने कोकणात कायमस्वरूपी नदी अभ्यास व नदी-सेवा केंद्र सुरू करण्याची खरी गरज आहे. साखरपा पॅटर्न खरा शाश्वत नदी विकासाचा मार्ग ठरू शकेल, असा विश्वास जलनायकचे किशोर धारिया यांनी व्यक्त केला.
– प्रशांत सिनकर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासक आहेत.)