• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

जीवनाचा नवीन मार्ग

- सचिन परब (प्रबोधन १००)

सचिन परब by सचिन परब
December 30, 2021
in प्रबोधन १००
0

नाटक व्यवसायाला रामराम ठोकून प्रबोधनकार `जीवनाचा नवीन मार्ग’ शोधण्यासाठी मुंबईत परतले. तोवर ठाकरे कुटुंबाने पनवेलही कायमचं सोडलं होतं. त्यामुळे मुंबईत कायमस्वरूपी स्थिरस्थावर होताना प्रबोधनकारांना नवा मार्ग सापडला, तो होता खासगी कंपनीत सेल्समनगिरीचा.
—-

स्वदेशहितचिंतक नाटक कंपनीच्या परतवाडा मुक्कामात प्रबोधनकारांचं लग्न ठरलं. त्यानंतर पाच सहा महिन्यांनी इंदूरच्या मुक्कामात त्यांनी फक्त स्वदेशहितचिंतकच नाही, तर एकूण नाटक व्यवसायालाही सोडचिठ्ठी दिली. ते लिहितात, `झाले इतके जन्माचे नाटक पुरे झाले, अशा निर्धाराने जीवनाचा नवीन मार्ग शोधण्यासाठी ठाणे येथे यशवंताकडे आलो.’ यशवंता म्हणजे प्रबोधनकारांचे धाकटे भाऊ यशवंतराव ठाकरे. ते पीडब्ल्यूडी खात्यात नोकरीला होते. पनवेलचं सगळं कुटुंब तेव्हा यशवंतरावांकडेच होतं.
प्रबोधनकारांनी नाटक कंपनी सोडून ठाण्यात येण्याचा काळही नोंदवला आहे, जानेवारी १९०९. याच काळाच्या पुढेमागे ठाकरे कुटुंबाने पनवेल सोडलं असावं, असा अंदाज बांधता येतो. प्रबोधनकारांच्या आजोबांनी रामचंद्रपंतांनी त्यांना सांगितलं होतं, `माझ्यामागे हे झोपडे या जागेवर शिल्लक ठेवू नका आणि तुम्ही पनवेल कायमची सोडा. माझ्या त्यागाची पुण्याई खास राहणार आहे तुमच्या पाठीशी.’ तात्या देवीभक्त होते. त्यांचा पंथ पुढे चालवणं पुढच्या पिढ्यांना जमणार नव्हतं. त्यामुळे त्यांनी हा सल्ला दिला होता. त्यानुसार प्रबोधनकारांनी आजोबांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी पनवेल सोडलेलं दिसतं.
प्रबोधनकारांनी पनवेल सोडण्याच्या विषयी आणखी एक संदर्भ शिवसेनेचे पहिले पनवेल शहरप्रमुख माधव भिडे सांगतात. `माझी जीवनगाथा’च्या पहिल्या आवृत्तीत छापण्यासाठीचे फोटो काढण्यासाठी प्रबोधनकार भिडेंनाच सोबत घेऊन पनवेलमध्ये फिरले होते. विरुपाक्षाच्या देवळाजवळच्या घरातच प्रबोधनकारांचा जन्म झाला आणि वयाच्या चोविसाव्या वर्षापर्यंत तरी ते पनवेलशीच जोडलेले होते. त्या घराची जागा दाखवून प्रबोधनकारांनी भिडेंना सांगितलं होतं की त्यांना घरातून बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता नव्हता. त्यांच्या घरातून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी शेजार्‍याच्या अंगणातून जावं लागे. त्यामुळे त्यांनी पनवेलमधलं घर कायम ठेवलं नाही.
कारणं बहुदा दोन्ही असावीत, पण ठाकरेंनी पनवेलचं बिर्‍हाड हलवलं हे खरं. यशवंतरावांचं घर ठाण्याला होतं आणि ऑफिस अंधेरीला. ते लांब पडत असल्यामुळे त्यांनी अंधेरीत शिफ्ट व्हायचं ठरलं. त्यासाठी एक छोटेखानी बंगलाही भाड्याने घेतला. या धावपळीत प्रबोधनकार दिवसाआड मुंबईला फेरी मारत. वृतपत्रक्षेत्रात जुन्या परिचितांना भेटून पत्रकारितेशी संबंधित कामं मिळवत. त्यावेळेस सोशल सर्विस लीगचे एक आजीव सदस्य पुरुषोत्तम गोविंद काणेकर उर्फ शारदाश्रमवासी यांच्याशीही त्यांच्या भेटी होत. ते प्रबोधनकारांना मुंबईच्या मुक्कामात रोज सकाळ-संध्याकाळ खानावळीत जेवायलाही घेऊन जात. ते कामगार चळवळीचं मुखपत्र असणार्‍या `कामगार समाचार’ नावाच्या साप्ताहिकाचे संपादक होते. त्यात मनोरंजक गोष्टी लिहिण्याचं काम त्यांनी प्रबोधनकारांना दिलं. प्रबोधनकारांना काही कथा-कादंबर्‍या लिहिण्याची सोडा, वाचण्याचीही आवड नव्हती. त्यांचा रस इतिहास संशोधनात आणि वैचारिक लिखाणात. त्यामुळे मनोरंजक कथा लिहिण्याचं काम ते पहिल्यांदाच करणार होते. कारण त्यासाठी चांगलं मानधन मिळणार होतं. प्रत्येक कॉलमला एक रुपया अशी ठणठणीत बिदागी ठरली होती. पण काय लिहायचं हे कळत नव्हतं.
तेवढ्यात त्यांना ठाकूरद्वारच्या रस्त्यावर जुनी पुस्तकं आणि मासिकं विकणारा दिसला. प्रबोधनकारांनी त्याच्याकडून रेड मॅगझिनचा जुना अंक विकत घेतला. बोरीबंदरला लोकल ट्रेनमध्ये बसल्यावर त्यांनी ते चाळलं. त्यात एका कथेच्या सुरुवातीला तुफानात बुडत असलेल्या बोटीचं चित्र होतं. त्यांनी ती कथा पूर्ण वाचली. ती वाचताना प्रबोधनकारांना तेव्हा नुकताच झालेला रत्नागिरीच्या बोटीचा अपघात आठवला. त्यांनी इंग्रजी कथेचं सूत्र घेऊन रत्नागिरीच्या अपघाताच्या पार्श्वभूमीची जवळपास स्वतंत्रच कथा घरी येताच लिहायला सुरुवात केली. नाव दिलं, `अगाध किती विधिकरणी.’ आपल्याला कथाही लिहिता येते, हे प्रबोधनकारांना कळलं. जवळपास शंभर फुलस्केप हाताने लिहिलेल्या कथेचे पंच्याहत्तर कॉलम भरले. शारदाश्रमवासींना कथा खूप आवडली. ती `कामगार समाचार`मध्ये प्रत्येक आठवड्याला क्रमशः छापली जाऊ लागली. तिचं मानधन म्हणून प्रबोधनकारांना ७५ रुपये मिळाले. बेकारीच्या काळात ही मोठीच कमाई होती.
प्रबोधनकारांनी टायपिंगचं काम शिकायचं ठरवलं. त्यांचे जिवलग मित्र बच्चू मास्तर यांनी अ‍ॅडलर कंपनीचा नवाकोरा टाइपरायटर आणून दिला. टाइपरायटर देतानाच बच्चू मास्तरने प्रबोधनकारांच्या नोकरीचाही विचार करून ठेवला होता. १९०९च्या सप्टेंबर महिन्यात एक दिवस ते प्रबोधनकारांना गणेश नारायण उर्फ तात्यासाहेब परांजपेंकडे घेऊन गेले. त्यांची व्यापार्‍यांचे रेल्वेमधील क्लेम वसूल करून देणारी एजन्सी होती. त्यांनी जीआयपी रेल्वेत सुपरिटेंडंट म्हणून अनेक वर्षं काम केलं होतं. त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी राम एजन्सी नावाने कंपनी सुरू केली होती. ही एजन्सी शेकडो व्यापार्‍यांची कामं करत असे.
पण तोच त्यांचा एकमेव उद्योग नव्हता. ते पाश्चिमात्त्य कंपन्यांच्या अ‍ॅडलर टाइपरायटर्स, रोनिओ डुप्लिकेटर्स यांचे विक्रेतेही होते. तात्यासाहेबांनी प्रबोधनकारांना सांगितलं, `तुमचं इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे आणि संभाषणचातुर्यही आहे. आमचे सेल्समन म्हणून सर्व देशीविदेशी कंपन्यांत कॅनव्हासिंगला तुम्हाला फिरायचं आहे.’ प्रबोधनकारांना जवळपास आठ-नऊ महिने धड काम नव्हतं. त्यामुळे ते लगेच तयार झाले असावेत. तात्यासाहेबांनी त्यांना दरमहा ४० रुपये पगारावर सेल्समन म्हणून नोकरी दिली. त्याचबरोबर त्यांनी प्रबोधनकारांना मॅनेजरबरोबर क्रॉफर्ड मार्केटमध्ये पाठवून दिलं. तिथे त्यांना धोतर, सदरा, कोट, फेट्याचा जुना पोषाख बाजूला ठेवून नेकटाय, कॉलर, हॅटपँटवाले सेल्समन व्हायचं होतं.
अवघ्या अर्ध्या तासात नूर बदलून गेला. तात्यासाहेबांनी कंपनीच्या खर्चाने त्यांना फेल्टहॅट बुटात बॉम्बे जण्टलमन बनवलं. ते रोज सकाळी दहा ते दुपारी दीडदोन वाजेपर्यंत पाच सहा कंपन्यांच्या मॅनेजरना भेटायचे. टाइपरायटर, डुप्लिकेटरची जाहिरातपत्रं देऊन आग्रह करायचे. दोन वाजता ऑफिसात परत येऊन कामाचा रिपोर्ट द्यायचे. त्यानंतर उरलेल्या वेळात तात्यासाहेब पत्र डिक्टेट करत, ती टाइप करून घ्यायचे. असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला होता. या सेल्समनशिपमुळे जर्मन, अमेरिकन ब्रिटिश, जपानी कंपन्यांच्या देशीपरदेशी मोठमोठ्या अधिकार्‍यांशी त्यांची मैत्री झाली. पण ते काम सोपं नव्हतं. कारण तेव्हा मुंबईत किमान ३०-४० ब्रँडचे टाइपरायटर्स विक्रीसाठी उपलब्ध असायचे. त्या सगळ्या कंपन्यांचे सेल्समन कंपन्यांच्या मॅनेजरना भंडावून सोडत. त्यामुळे ते वैतागलेले असत. तरीही पहिल्याच महिन्यात दोन टाइपरायटर विकण्याची शर्यत त्यांनी जिंकली.
ऑफिसातही वेगवान आणि बिनचूक टायपिंगमुळे त्यांनी तात्यासाहेबांना जिंकून घेतलं होतं. पण शॉर्टहॅण्ड नसल्यामुळे त्यांची अडचण व्हायची. तात्यासाहेबांची रोज तीस-चाळीस पत्रं असायची. फायलींचा ढिगारा घेऊन ते प्रबोधनकारांच्या शेजारी येऊन बसत आणि पत्र डिक्टेट करत. त्यांच्या तोंडून शब्द निघताक्षणीच प्रबोधनकार ते टाइप करत. तरीही प्रबोधनकारांनी शॉर्टहॅण्ड शिकावं अशी तात्यासाहेबांची इच्छा होती. त्यांनीच फी भरून प्रबोधनकारांना क्लासमध्येही पाठवलं. तिथे घोकंपट्टीवर आधारित पिटमन पद्धत त्यांना पटली नाही. हे तात्यासाहेबांनी सांगितल्यावर त्यांनी लगेच एक पत्र `रोनिओ लिमिटेड कंपनी, लंडन’साठी डिक्टेट केलं- `आमच्याकडे एक क्रॅक हेडेड फास्ट टायपिस्ट आहे. सहज बिछान्यात लोळता लोळता शॉर्टहॅण्डची कला त्याला शिकायची आहे. तुमच्यापाशी यावर काही तोडगा आहे का?’ पत्राच्या उत्तरादाखल एका महिन्याने स्लोन डुप्लोयन फोनोग्राफीची दोन छोटी पुस्तकं आली. उत्तरात लिहिलं होतं, `तुमच्या कॉन्झर्वेटिव इंडियात रेमिंग्टन मीन्स टाइपरायटर आणि शॉर्टहॅण्ड मीन्स पिटमन एवढीच अकलेची बाजारपेठ आहे. जगात दीडशेपेक्षा जास्त शॉर्टहॅण्डच्या पद्धती आहेत. अमेरिकेची बॉइड सिस्टिम आणि आमच्याकडची स्लोन सिस्टिम यांची पुस्तकं तुमच्या वंडरफुल टायपिस्टला द्या आणि बघा काय चमत्कार होतो तो!’
प्रबोधनकारांना त्यातली स्लोन फोनोग्राफीची पद्धत आवडली. ती त्यांनी आठवडाभरातच अमलात आणायला सुरवात केली. त्यांचे शेजारी मित्र शंकर सीताराम उर्फ बाबूराव बेन्द्रे त्यांना रोज नियमित डिक्टेशन घालत. कारण त्यांना इंग्रजी वाचनाची पद्धत प्रबोधनकारांकडून शिकायची होती आणि प्रबोधनकारांना शॉर्टहॅण्डची. एका महिन्यातच प्रबोधनकार या नवीन कलेत तरबेज बनले.
त्याची परीक्षाही त्यांनी स्वतःच घेतली. दादरमध्येच ट्रेनिंग कॉलेजचे प्रिन्सिपल नेल्सन फ्रेजर यांचं `नेशन, नॅशनॅलिटी अँड नॅशनॅलिझम’ या विषयावरचं भाषण झालं. ते प्रबोधनकारांनी ते शब्दशः स्लोन पद्धतीने उतरून घेतलं. त्याचं ट्रान्सक्रिप्शन टाइप करून फ्रेजरना नेऊन दिलं. त्यातल्या तीन-चार चुका दाखवून फ्रेजरनी त्यांना एक्सलण्ट अशी शाबासकी दिली. दुसर्‍या दिवशी ते `बॉम्बे क्रॉनिकल’मध्ये छापूनही आलं.
पुढे प्रबोधनकारांचे मित्र इतिहासकार वा. सी. बेन्द्रे यांनी या विषयावर संशोधन करून एक पुस्तकही लिहिलं होतं. त्याचा परिचय आणि जाहिराती प्रबोधनमध्ये छापूनही आलेल्या आपल्याला आढळतात. ही पद्धत प्रबोधनकार अगदी उतारवयातही वापरत असत.

Previous Post

स.न.वि.वि.

Next Post

नववर्षाचे राशीभविष्य!

Next Post

नववर्षाचे राशीभविष्य!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.