उद्धवजी, आगे बढो!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे पूर्ण केली, ही अभिमानास्पद बाब आहे. दि. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मा. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा हे सरकार टिकणार नाही असे सांगितले जात होते. देवेंद्र फडणवीस सतत मी पुन्हा येईन, करेक्ट कार्यक्रम करू, अशी तारीख पे तारीख देत होते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचे नेते राज्यातील सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या धर्मनिरपेक्ष मानल्या जाणार्या पक्षांबरोबर शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षाची अनैसर्गिक आघाडी म्हणून हे सरकार किती दिवस टिकणार याबद्दल शंका होती. परंतु ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने दोन वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली.
दोन वर्षाचा काळ कोणत्याही सरकारच्या मूल्यमापनासाठी पुरेसा नाही. मात्र त्यातून सरकारची वहिवाट आणि पाऊलवाट राज्याला कुठे घेऊन जाणार हे स्पष्ट करण्यासाठी पुरेशी ठरावी. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्ह्णून राज्यातील जनतेला आश्वासक आणि प्रामाणिक वाटतात. मुख्यमंत्रीपदाच्या या कालावधीत कोरोनाचे ग्रहण लागले. सर्वाधिक संसर्ग झालेल्या राज्यांत महाराष्ट्राचा समावेश होता. परिस्थिती भीषण असताना मुंबईत अधिकारी बदलले, नामवंत डॉक्टरांची टीम तयार केली, आरोग्यमंत्र्यांवर जबाबदारी टाकून मोकळीक दिली. आरोग्यसुविधेमध्ये कुठेही कमतरता भासू दिली नाही. लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून सर्वात पुढे असल्याची ग्वाही दिली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ घोषवाक्य दिले आणि त्याप्रमाणे त्यांनी करून दाखवले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कोरोनाच्या काळातील कामाची दखल जागतिक पातळीवर तसेच सर्वोच्च न्यायालयाने घेतली.
कोरोनाचे संकट असतानाच कोकणात तौक्तेसारखी चक्रीवादळे आली, अवकाळी पाऊस, मराठवाडा, विदर्भ भागात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान तसेच पश्चिम महाराष्ट्रात दोनदा आलेला महापूर अशी आसमानी संकटे आली. या सर्व संकटाना तोंड देत असतानाच सरकारमधील काही मंत्र्यांच्या मागे ईडी, सीबीआय चौकशीचा ससेमिरा लावला गेला. अशा अनेक संकटांना एकाच वेळी तोंड देण्याची वेळ आली. पण ठाकरे यांनी संयमी पद्धतीने या सर्व परिस्थितीवर मात केली. राज्याचा कारभार सुरळीत चालावा याकडे जातीने लक्ष दिले. आपला पक्ष सत्तेपासून दूर आहे याचे शल्य भाजप नेत्यांना बोचत आहे.
विरोधी पक्षाकडे चांगले संख्याबळ असतानाही केवळ प्रशासकीय धोरणे आणि काही मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपला करता आलेला नाही. त्यांच्या टीकेने मुख्यमंत्री तसूभरही डगमगले नाहीत. कारण सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांचा कर्जाचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न केला. ‘शिवभोजन’ थाळीच्या माध्यमातून कोरोनासंकटाच्या काळात अनेक गोरगरिबांच्या भुकेचा प्रश्न मिटवला. मोफत धान्य देत राज्यातील जनतेला आधार दिला. जनसामान्यांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले, कोरोनाकाळात संकटाशी सामना करण्यासाठी आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि जनतेचे मनोधर्य वाढवले.
राज्य चालविण्याचा तसेच सत्तेतील पदाचा अनुभव नसताना अचानक मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळणे आणि तीन पक्षाचे सरकार चालविणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. मुख्यमंत्री हे महाराष्ट्राला नंबर एक राज्य बनविण्यात निश्चितपणे यशस्वी होतील. कारण ते संयमी, ठाम आणि निश्चयाचे महामेरू आहेत. शिवाय गोरगरीब कष्टकर्यांचे तारणहार असलेले देशातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले मुख्यमंत्री आहेत. लोककल्याणकारी राज्यासाठी उद्धवजींना उत्तम आयुरारोग्य लाभो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना!
– प्रशांत घाडीगांवकर (प्रमुख कार्यवाह)
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
‘सूत्रधार’ पडद्याआड गेला…
सिने दिग्दर्शक चंद्रकांत जोशी सरांचं निधन ही कला क्षेत्रातली अतीव दुःखद घटना आहे.चित्रपट महोत्सव कसा आयोजित करावा, कला प्रदर्शन कसं मांडावं, या कलाव्यवहारासोबत मानवी नातेसंबंध, सार्वजनिक जीवनात अनेक उपक्रम राबवतांना त्याला मानवी चेहरा देऊन कोणताही उपक्रम कलात्म आणि लोक सहभाग घेऊन अधिक व्यापक करण्याचा वस्तुपाठ देणारे जोशी सर आज आपल्यात नाहीत ही मोठीच हानी आहे. सर म्हणजे जणू टच्च भरलेले मधाचं पोळं होतं. चांगल्या उपक्रमशील माणसांचा, गुणांचा मधुसंचय त्यांनी केला. आणि आपल्या कल्पक नियोजनातून जे केलं ते उत्तमच. अशी माणसं प्रकाशातील बेटं असतात, लख्ख प्रकाश देणारी. सरांनी गिरीश कर्नाड यांची भूमिका असलेला ‘सूत्रधार’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आता हाच सूत्रधार आपल्यातून हरपला आहे.
सरांना विनम्र अभिवादन.
– अरुण नाईक
सोनिया गांधी नव्हेत, सुशेन गुप्ता!
ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीमध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपानंतर इडीनं चौकशी सुरू केली असता कागदपत्रांमध्ये ‘एसजी’ असा उल्लेख आढळला होता. त्यावरून भाजपनं सोनिया गांधींना निशाणा बनवून त्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले.
गांधी परिवाराला अतोनात त्रास आणि अपमानाला तोंड द्यावं लागलं!
प्रत्यक्षात ‘एसजी’ म्हणजे सुशेन गुप्ता हा दलाल असल्याचं आता इडीनेच दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे राफेल च्या खरेदीतही ह्याच सुशेन गुप्ताने मध्यस्थी केल्याचं नुकतेच उघड झालं आहे.
थोडक्यात न झालेल्या घोटाळ्यांचे बेछूट आरोप करून सत्तेत आलेल्यांना आता तोंडघशी पडावं लागणार आहे!
– अभिषेक शरद माळी