भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या आवडीचे वाहन कोणते, असे विचारले तर एकमुखी उत्तर येईल… ऑटोरिक्षा. या पक्षाचे द्वितीय क्रमांकाचे सर्वोच्च नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याही स्वप्नात हल्ली रिक्षा येऊ लागलेली दिसते. आधी काय ठरलं ते विसरून सत्तेची दुचाकी मीच चालवणार या हट्टापायी भाजपेयींनी महाराष्ट्रात स्वत:च्या पायावर कुर्हाड मारून घेतली आणि नंतर चौथी सीट बनून रिक्षात बेकायदा घुसण्याचा प्रयत्नही करून पाहिला. याला आता दोन वर्षं झाली तरी ठसठस काही जात नाही. आधी काही ठरलं होतं, याबद्दलच शाह यांनी कानावर हात ठेवले आहेत. आधी काही ठरलंच नव्हतं तर ते त्यांना गेल्या दोन वर्षांत का आठवलं नाही! महाराष्ट्रातल्या त्यांच्या पक्षांच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलेली ऑटोरिक्षाची उपमा पुढे खेचून अमित शाह म्हणाले की ही पंक्चरलेली रिक्षा आहे, ती कुठेच जात नाही, तिच्यातून फक्त धूर निघतो आहे.
दिल्लीतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणांमधून बाहेरचं काही दिसतं की नाही कोण जाणे! दिसत असलं तरी ते अंधुक दिसत असणार आणि मुळात स्वत:पलीकडे काही पाहण्याची वृत्ती नाही. यांना दिल्लीतली संसदही दिसत नाही. दिसल्या तर फक्त निवडणुकाच दिसतात. त्या दूरवर कुठेही असल्या, सूर्यमालेबाहेरच्या ग्रामपंचायतीच्या असल्या तरी यांचे दोन सर्वोच्च नेते तिथे मास्क न लावता पोहोचणार. अशी अवस्था असल्यामुळे अमित शाह यांचा दृष्टिभ्रम समजू शकतो. पण यानिमित्ताने रिक्षा हे वाहन समजून घेणे शाह यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनेही आवश्यक आहे.
महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही अनेक ठिकाणी रिक्षा चालतात. सायकल रिक्षा आणि ऑटो रिक्षा. तीन पायांची ही वाहनं अनेक गरीब लोकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देतात. रोजीरोटी देतात. तो चेष्टेचा विषय नाही. रिक्षा हे साधंसुधं वाहन. इव्हेंटबाज भपका त्याच्यात नाही. हे सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीनेही फार सोयीचं वाहन आहे. ते वाहतुकीच्या कोंडीतूनही झपाट्याने मार्ग काढतं. इच्छित स्थळी वेगाने आणि माफक दरांत पोहोचवतं. लांब पल्ल्याच्या अंतरांमध्ये शेअर रिक्षाचा सर्वांना परवडणारा पर्याय असतो. म्हणूनच तर ती सर्वसामान्यांमध्ये इतकी लोकप्रिय असते. शिवाय ती दुरुस्त करायला सोपी. पंक्चर झालीच तरी स्टेपनी टाकून किंवा पंक्चर काढून ती दुरुस्त करता येते.
आता रिक्षाच्या तुलनेत रोड रोलर या दोन चाकांच्या वाहनाचा विचार करून पाहू या.
रोड रोलर हा कुणालाही, कुठेही नेत नाही. त्याचं एकच काम. वाटेत येईल त्याला चिरडणे, दाबून रस्त्याच्या पातळीवर सपाट करून टाकणे. तो शेतकरी पाहात नाही, गोरगरीब मजूर पाहात नाही, कोरोना संकटाने ग्रासलेले सामान्य लोक पाहात नाही- समोर येईल त्याला चिरडत जातोष्ठ रोड रोलरचा वापर रस्त्यांच्या सपाटीकरणाखेरीज दुसरा नाही. त्याच्या साह्याने काहीही नवे उभारले जात नाही. जुने आहे ते सपाट केले जाते. त्यात एखादा नशाधुंद चालकाने चालवल्याप्रमाणे बेबंद सुटलेला रोड रोलर असेल तर तो रस्त्याच्या सपाटीकरणाचेही काम करत नाही, तो फक्त इतरांनी कष्टांनी उभारलेल्या गोष्टी भुईसपाट करत जातोष्ठ मग ती लोकशाहीची संसदीय मूल्ये असोत, देशातील सामाजिक सौहार्द असो की राजकीय विरोधकांना देशाचे शत्रू न मानण्याचे सौजन्य असो.
एकचालकानुवर्ती रोड रोलर महाशक्तिशाली दिसतो. चिरडत सुटण्याच्या कामात तो तसा असतोच. पण, रिक्षाला स्थैर्य असतं. ती कोणत्याही रस्त्यावरून मार्ग काढू शकते. रोड रोलरला आधी सपाट रस्ता लागतो, त्यावरून चालून तो पुढचा रस्ता सपाट करतो. खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्यावर रोड रोलरचा वापर शून्य असतो. असाही तो चालकाव्यतिरिक्त कोणाच्याही वाहतुकीच्या उपयोगाचा नाही. त्याला वेग नाही. पण, एखादी सायकल, एखादी रिक्षा कट मारून जाते किंवा रोलर उताणा पडतो आणि उताणा रोलर उचलायला क्रेन न्यावी लागते. ती पोहोचणार नसेल तर एवढा मोठा रोलर त्याच्या वजनाइतक्या भंगारापलीकडे काही मोलाचा राहात नाही. रोड रोलर पंक्चर होत नाही म्हणतात. पण, हीसुद्धा एक अंधश्रद्धाच आहे खरंतर. एखादं तृणमूल म्हणजे गवताचं पातंसुद्धा पूर्ण ताकदीने उभं राहिलं, तर रोलरला पंक्चरवून त्याचा पालापाचोळा करू शकतं, हे पश्चिम बंगालने एकदा दाखवून दिलं आणि रोड रोलरच्या नीट लक्षात राहावं म्हणून कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीत रोलरला लहान मुलांचं खेळणं बनवून दाखवलं.
हो, हा रोड रोलरचा फार महत्त्वाचा उपयोग आहे. सावंतवाडीमध्ये लाकडी खेळण्यांत रोड रोलर बनवला जातो. तो अर्धी चड्डीतल्या शाळकरी मुलांना खेळायला फार आवडतो. शोकेसमध्ये शोभून दिसतो.
अमित शाह यांच्या पक्षाचा सध्या असा एकलकोंडा, पोकळ विकासाचे भपकेबाज रस्ते बनवण्यापेक्षा वेगळा काही उपयोग नसलेला रोड रोलर झालेला आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आमदारांनी एकगठ्ठा राजीनामे देऊन नव्याने राज्यात निवडणुका घेऊन पाहाव्यात. ‘रिक्षा चिरडण्याच्या प्रयत्नात रोड रोलर खड्ड्यात’ अशी अवस्था होईल आणि महाराष्ट्रातल्या मुलाबाळांना नवे खेळणे मिळेल.
महाराष्ट्रातल्या सर्व आनंदी रिक्षाप्रवाशांना आणि रोड रोलरच्या एकट्या पडलेल्या केविलवाण्या चालकांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!