• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नववर्षाचे राशीभविष्य!

- पं. अनंत अपराधी

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 30, 2021
in भविष्यवाणी
0

बारा राशींच्या चिठ्ठ्या करून त्यावर प्रत्येक राशीचे नाव लिहा व गोल काठाच्या चौकोनी पातेल्यात ठेवा. त्यात साध्या कोर्‍या चिठ्ठ्या पण टाका. पातेल्याचे तोंड आग्नेयेकडे करावे. एक डोळा बंद करून उचललेली चिठ्ठी उघडा, त्यावर लिहिलेली रास ही तुमची! हे साल बावीस आहे. आणि अकरा दुणे बावीस. त्यामुळे वर्षभर दिवेलागणीस लायटर पेटवून मनातल्या मनात अकराचा पाढा म्हणावा घरातल्या वडील मंडळीस- पाढा येत नसल्यास बाजारात (सॉरी मार्केटमधे) पाढ्याचे पुस्तक मिळते. जाणकार माणसाकडून अकराचा पाढा कुठे आहे ते विचारून घ्या. या वर्षीचा शुभ अंक दोन आहे. त्यामुळे कुठलेही कार्य दोन वा दोनच्या पटीत करावे. उदा. कलिंगडसुद्धा एक न आणता दोन आणावीत. कानातले बड्सदेखील एकावेळी दोन वापरावेत. अगदी लग्नदेखील दोघांनी मिळून करावे. तंतोतंत सूचना पाळल्यास ३१ डिसेंबर २२पर्यंत अनुभव मिळेल. अनुभव न मिळाल्यास पुन्हा पुढचे वर्ष येणारच आहे.
—-

मेष : काही वेळा हेटाळणीयुक्त सुरात `मेषपात्र’ असा उल्लेख करतात. मात्र हे चूक आहे. या राशीइतकी ऊबदार रास कुठलीही नाही. अंगात स्वेटर घालून जन्माला येणारी ही मंडळी. शेळीमेंढी आपण म्हणतो ती बेऽऽबे करणारी. या बेबेमुळे बावीस साल या राशीचे. या राशीच्या मंडळींनी अहोरात्र बेबे असा घोष केल्यास ती नक्की `बे एरिया’मध्ये कॅलिफोर्नियात जाणार हे लिहून ठेवा. थोडीशी बाहेरून बावळट वाटत असली तरी या राशीची माणसे आतून हुषार असतात. मार्च महिन्यापर्यंत दम धरा मग पुढचा काळ तुमचाच आहे. इतर राशींपेक्षा ही मंडळी बायकोवर जास्त प्रेम करतात असे एका पाहणीत आढळले आहे. त्या प्रतिमेला तडा जाणार नाही याची काळजी घ्या! सध्या लग्नाचा सीझन आहे कुणी येणार असल्यास आम्हाला लाग्नाला जायचंय सांगा. शुभवेळ दुपारी २ ते ४.

वृषभ : तुमच्याइतके कष्टाळू या पृथ्वीतलावर कोणीही नाही. कुणी तुम्हाला `बैला’ अशी हाक मारली तर तो अपमान नसून तुमचा गौरवच आहे. अनेक बायका नवर्‍यांना `बैलोबा’ म्हणतात. हा तुमच्या कष्टाचा गौरवच आहे. ऑफिसात इतके लोक काम आटपून लवकर निघतात तुम्हाला मात्र शेवटपर्यंत डिस्पॅच डिपार्टमेंटचे महत्त्वाचे काम करावे लागते. डिस्पॅच क्लार्क असतो पण जगात कुठेही डिस्पॅच ऑफिसर हे पद नाही, त्यामुळे तुम्ही प्रमोशनपासून वंचित राहता आयुष्यभर. लेटर्स येतात आणि लेटर्स जातात हे तुम्ही निर्विकारपणे बघत असता. हे तुमच्या आयुष्याचे रहस्य. `न उल्लासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली’ हे तुमचे मर्म. तुम्हाला सगळी वर्षे आणि महिने सारखे. आयुष्य रवंथ करण्यात जाते. पाण्याची बाटली बदलत राहा. आतेभाऊ व मामेभाऊ यांच्यापासून अंतर ठेवा. अर्ध्या अर्ध्या तासाने खुर्चीतून उठून एक चक्कर मारा. वर्ष सुखाचे जाईल.

मिथुन : या वर्षी आपल्या राशीत अनेक चढउतार संभवतात. कांद्याचे जसे भाव वरखाली होत असतात तशी आपल्या राशीची परिस्थिती आहे. लिफ्ट चालवणारी अनेक मंडळी, गिर्यारोहक, घाटात काम करणारे हे बहुधा या राशीचे असतात. शेअर मार्केट जसे एक दिवस हजार पॉइंटने खाली जाते किंवा तीनशे पॉइंटने वर जाते तशी अवस्था या राशीची असणार आहे. या वर्षी शक्यतोवर आपण जमिनीवर भुसभुशीत जागी वावर ठेवावा. पडलात तरी गुदगुल्या झाल्यासारखे वाटेल. उटी-महाबळेश्वर-स्विसचे टॉप ऑफ युरोप अशी ठिकाणे टाळावीत. ऑगस्टनंतर ही स्थिती बदलेल. टॉवरमध्ये जागा बुक करायची की रोहाऊस असा प्रश्न पडला असेल तर तूर्त दोन्ही बुक करा, मात्र टॉवरमधे पुढच्या वर्षी राहायला जा. तुम्ही राहाता तिथल्या जमिनीची पुडी खिशात ठेवा. आभाळाकडे बघणे टाळा. पारदर्शक वस्त्रे टाळावीत.

कर्क : ही अत्यंत हळवी रास. या राशीच्या लोकांना, नळाखाली लावलेली बादली जशी भरून येते तसं भरून येते. विश्वातल्या करुणेचं वेदनेचं कॉन्ट्रॅक्ट जणू यांना दिलेलं असतं. उमललेलं फूल बघूनसुद्धा यांना, बिचार्‍या पाकळ्या आता उघड्या पडल्या, असं वाटत राहातं. अगदी हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलं तरी त्या माणसाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत `रडू नको रे- पहिल्या बायकोची आठवण येतेय का?’ असं विचारणार. सर्व राशीतील अत्यंत भावनाप्रधान अशी ही रास. पण कर्क राशीच्या लोकांना आता यावर्षी काळजी घ्यावी लागणार आहे. थोडे कठोर व्हायला शिका. रोज आक्रोड फोडा. दातांनी ऊस सोलून काढा. कलेसाठी छंदासाठी माणसे आयुष्य झोकून देतात तसं स्टेशनात लोकल आली की स्वत:ला झोकून द्या! तरच निभाव लागेल, सर्वत्र कडकपणा स्वीकारा. अगदी कपड्यांनाही डबल कांजी करा.

सिंह : भेदून टाकणारी गर्जना करणारी ही रास. खरे सांगायचे तर बावीस साल हे या राशीचे. अतिशय रुबाबदार रास! सिंह राशीचा भिकारी देखील सर्व भिकार्‍यांमध्ये उठून दिसतो. नेतृत्वाचे सगळे गुण या राशीत एकवटलेले असतात. मात्र सिंहावलोकन असा अत्यंत चुकीचा शब्द रुढ झाला आहे. आता इथून पुढे मागे वळून पाहायची गरजच नाही. एकदा आमदार म्हणून निवडून आल्यावर आपण कुठल्या पंचायत समितीवर निवडून आलो वगैरे किरकोळ गोष्टी विसरून जायच्या. आता सतत पुढे जायचे. वर आकाशात उंचावर गेलेला वैमानिक कधीही मागून कुठले विमान येतंय का याची चिंता करत नाही. कदाचित इतके गुंतून जाणार आहात की आपण कुठे कुठे काय काय केले हे आठवणारही नाही. हल्ली आत्मचरित्र लिहून देणार्‍या एजन्सी आल्या आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट वा रोज सकाळी १० मिनिटे भाषणाची प्रॅक्टिस करा व जमेल तेव्हा ओवा खा!

कन्या : सर्व राशीतली सर्वात धांदरट रास. आपलं भविष्य वाचायचं सोडून आधी दुसर्‍याच राशीचे भविष्य वाचणार. सतत दुसर्‍यांच्या साडेसातीची चिंता भेटल्यावर एकदम `उद्या गुरु बदलणार!’ म्हटलं की आधीचे कोणी गुरू होते आणि आता दुसरे गुरू करणार काय असं वाटतं. आता सामान्य माणसाला गुरू बदलणार म्हणजे नक्की काही कळत नाही. रोजचा पानवाला-पेपरवाला बदलणार असं काहीसं वाटत राहातं. या राशीच्या महिला एकावेळी गॅसवर दोन पदार्थ ठेवतात, त्यामुळे दोन्ही पदार्थ बिघडतात. पेपर वाचता वाचता चहात टोस्ट बुडवता बुडवता. मग कलंडतो आणि चहा सांडतो. या राशीच्या महिला नेमक्या हॉलिडेच्या दिवशी बँकेत जातात आणि परततात. एकाचवेळी दोन मुलांना शाळेत सोडताना नेमकी अदलाबदल होते यांची! नव्या वर्षात काळजी घ्या. लक्षात ठेवायच्या गोळ्या बाजारात मिळतात. त्याचे नाव लिहून घ्या व लक्षात ठेवा.

तूळ : ही अत्यंत कठोर रास. सर्व राशीतली दोन पारडी तंतोतंत एका लेव्हलमध्ये. जो न्याय आरोपीला तोच फिर्यादीला. दोघांनाही सारखाच दंड. कारण दोघांनीही कोर्टाचा अमूल्य वेळ खाल्लेला असतो. ड्राइव्ह करताना यांना वडापावचा, पावभाजीचा कशाचा वास येत नाही. वाटेत म्हैस आली तरी म्हशीला कडेनं चालायला शिकव असं मालकाला सांगणार. या राशीच्या व्यक्तीबरोबर कधीही वाद घालू नये. ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ याचा मूर्तिमंत आविष्कार! मार्च महिन्यात तुम्हाला लग्नाच्या बैठकीला जावे लागेल. तिथे तुमची कसोटी लागेल. थोडे अ‍ॅडजस्ट व्हायला शिका. आयुष्यात सगळे डोस सारखे नसतात. थोडे पुढेमागे होणारच. या वर्षी मे महिन्यात तूळ व्यक्तींना परीक्षक म्हणून बोलवण्याची दाट शक्यता आहे. प्रलोभनांना बळी पडू नका. एकमेकांना समजून घ्या. तुमचा रिचार्ज झालाय, पण समोरच्याचा बॅलन्स संपलेला असू शकतो!

वृश्चिक : नाव काढलं की लगेच कुणीतरी नांगी मारतेय असं वाटत राहातं. तुमच्याविषयीचा हा गैरसमज असाच चालत आलाय. खरं तर विष ज्याच्या त्याच्या आत असतंच! तुम्ही ते चावा घेऊन पसरवता. तुमची चांगली बाजू कुणाला कळत नाही, पण बावीस साल हे बदलवणार! तोंडावर सगळे तुम्हाला शिव्या देतात, मात्र मागून गोडवे गातात. अशी उलटी खूण. तुम्ही जगासाठी सगळं करता. अगदी हनीमूनला गेलात तरी आपली रूम मित्राला देऊन तुम्ही व्हरांड्यात झोपणार. का तर तो कुडकुडतोय. तुम्ही म्हणजे ‘दोन घाव तीन तुकडे’ म्हणतात त्यातले. (सध्या तिघांचे सरकार आहे ना!) तुम्ही कठोर वाटता. त्यावर उपाय म्हणजे रोज एक किलो मद्रास कांदे (बारीक) सोला. आपोआप डोळे ओलावतील. तुमच्या डोळ्यात पाणी पाहून लोक काय तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. मात्र या वर्षात तुमच्याविषयीचे गैरसमज दूर होतील. जिभेवर मध ठेवून शीर्षासन करा. यथाशक्ती जीन्स दान करा. कारल्याची भाजी वर्ज्य करा. सर्व ठीक होईल.

धनू : ही सर्वात पवित्र माणसांची रास. एका बाजूला पारड्यात सर्व राशींची माणसे आणि दुसरीकडे तुम्ही! तरीही तुमचे पारडे खालीच. कुठल्याच बाबतीत तुमची बरोबरी करू शकत नाहीत. तुम्ही केलेला फ्रॉडदेखील कौतुकाने बघावा असा. इतकं सुंदर नियोजन इतर कुणालाच जमत नाही. तुमच्या गैरप्रकारावरदेखील कुणी बोट ठेवू शकत नाही. उलट तुम्ही हे इतरांच्या भल्यासाठी केलंत असंच कोर्टदेखील म्हणतं. तुम्ही ज्या डिपार्टमेंटला जाल तिथली माणसं दिवाळी साजरी करतात. कारण तुमची समता! जे आपल्याला मिळालं ते सर्वांचे आहे ही भूमिका असते. कुठलीही सरकारे आली तरी तुम्हाला फरक पडत नाही. तुम्ही बदलून गेलात तरी लोक तुमचे नाव काढत राहतात. माणसाला याहून आयुष्यात आणि काय हवे? तुमच्या हितशत्रूंपासून सावध राहा. सगळे बँक अकाऊंट व लॉकर स्वच्छ ठेवा. रात्र वैर्‍याची आहे! जसं घेत गेलात त्याहून अधिक देत राहा. प्रत्येक घास चावून खा व ‘रोझ’ इसेन्स वापरा!

मकर : कुठल्याही परिस्थितीत क्षमता टिकवून धरण्याची तुमची हातोटी लाजवाब! भरगच्च गर्दीत लोकलच्या दरवाजातून आतल्या सीटकडे लीलया वाट काढणारा माणूस मकर राशीचा. परिस्थितीला तोंड देण्याची तुमची कुशलता वाखाणण्यासारखी. मग तो मास्क असो की आणखी काही… तुमची स्वच्छतेची आवड कचर्यातच्या डब्याच्या स्वच्छतेवरून ओळखता येते. इतका चकाचक डबा सोसायटीत कुणाचाच नसतो. खर्च करताना तुमचा हात आखडता नसतो. लादी पुसायला इतर लोक भोकं पडलेले जुने बनियन वापरतात. तुमच्याकडे लादी पुसायला नवा बनियन वापरतात हे बघून लोक थक्क होतात. कोरोनामुळे लोकांना स्वच्छतेचा साक्षात्कार झाला. तुमच्या रक्तातच स्वच्छता! हात धुवून घेणारे लोक खूप असतात, पण तुमच्यासारखा स्वच्छ हात असलेला दुर्मिळ. तुमची रास मकर असल्याने सोसायटीतले लोक पाण्यात बघतात. पण तुम्हालाच फॉलो करतात. एप्रिलमध्ये बद्धकोष्ठाचा त्रास संभवतो. बाकी सर्व सुरळीत होणार!

कुंभ : सर्व राशींत ओतप्रोत भरून वाहणारी आपली रास. वाहणे आणि वाहवत जाणे याची नेमकी जाण असलेली रास! पाझरणे म्हणजे काय हे तुमच्याकडून शिकावे. प्रवासात डायपर जवळ ठेवा. तुम्हाला जाताना त्रास होत नाही, मात्र येत्ााना अडचणी येतात. जानेवारीत तुम्हाला डायर्‍या व कॅलेंडर भेट म्हणून येतात. लोकांना वाटून टाकू म्हणत डिसेंबर महिना उजाडतो, पण मोह सुटत नाही. त्या मोहातून बाहेर पडा. बसमध्ये बसून राहण्याचा, एसीचा मोह तुम्हाला सुटत नाही. त्यामुळे अनेकदा तुमचा स्टॉप निघून जातो. तुमच्या आयुष्यातले अनेक थांबे विनाकारण निघून गेले. आयुष्यभर लोकांनी काय करायला हवेय यावर अगदी चॅनेलवर जाऊन चर्चा केलीत. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे हे राहूनच गेले. तुम्हाला आतापर्यंत जे आतून करावेसे वाटले ते करायची आता वेळ आली आहे. भर रस्त्यात नाच करावासा वाटला तर संकोचू नका! पाऊस महत्त्वाचा की छत्री याचा एकदा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. दररोज सुंठ घातलेला चहा तीनवेळा घ्या.

मीन : आपली रास सर्वोच्च पदावरची. या राशीनंतर रास नाही. वर्गात उंच मुलांना शेवटच्या बाकावर बसवतात तशी. किनार्यादजवळचे क्षुद्र मनोवृत्तीचे लोक तुम्हाला जाळ्यात पकडतात. पण तुम्ही अथांग सागरतळाशी डुंबणारे! मीन राशीला पोक्तपणामुळे कुठलाही निर्णय घेताना विचार करावा लागतो. गहू विकत आणून दळून आणायचे की रेडिमेड पीठ आणायचे हा निर्णय खूप कसोटीचा असतो. इतर राशीचे लोक ‘कालनिर्णय’ आलं की भिंतीवर अडकवतात. मीनेची व्यक्ती सर्व तारखा व वार, महिने सर्व तपासून घेते. अनेक लोक नवीन घड्याळ घेतात, पण ते किती वाजता घेतलं हे ९९ लोकांना सांगता येत नाही. मीनेचा माणूस ताडकन दोन वाजून पस्तीस मिनिटांनी घेतलं सांगतो. आयुष्यभर किती लेंगे शिवले आणि मध्य रेल्वेला पासापोटी किती पैसे दिले याची सर्व तारीखवार माहिती त्यांच्याकडे असते. मीन राशीची व्यक्ती अर्थमंत्रीपदापर्यंत पोहोचते. देशाला पुढच्या आर्थिक वर्षात किती टॉवेल लागतील असा प्रश्न पत्रकारांनी विचारला तर उत्तर देता आले पाहिजे. मीनेची व्यक्ती रिक्षेला लागणारा एक रुपया (सुटा) लगेच काढून देते. याला म्हणतात नियोजन! ऑफिसमध्ये पावसाची चाहूल लागली तर घरी येऊन छत्री घेऊन पुन्हा ऑफिसला जाणार. मीन राशीचे लोक सर्वोच्च पदावर असतात म्हणून आपला देश चाललाय आणि जगदेखील. या वर्षी एकच काळजी घ्या, झोपेत विचार करत बसू नका. विश्रांती घ्या! सर्व काही सुरळीत होणार आहे. सरकार वगैरे पडणार अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.

शुभं भवतु

Previous Post

जीवनाचा नवीन मार्ग

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

टपल्या आणि टिचक्या

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.