
जयपूर अत्रौली घराण्याचे संस्थापक उस्ताद अल्लादियां खान यांचे नातू उस्ताद अझीझुद्दिन खान यांच्यासह अनेक दिग्गजांकडूनही श्रुतीताईंनी शिक्षण घेतले. गुरूंकडील शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाबरोबरच त्यांनी याच विषयात एसएनडीटी महिला विद्यापीठातून एमए केले. वडिलांकडून वाचनाचे संस्कार आणि अनेक भाषांची गोडीही त्यांना लागली.
अमृत महोत्सव अनेकांचे होत असतात. त्यातही ती व्यक्ती एखाद्या क्षेत्रातील महनीय, कर्तृत्वसिद्ध किंवा प्रसिद्ध असेल तर असे सोहळे खासच असतात. आयुष्याच्या या टप्प्यावर खरेतर आजवरचे संचित त्यांनी ओंजळीतून रिते करावे, अशी अपेक्षा असते. शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात मात्र अनेकदा अशा मान्यवरांची शैली वा परंपरा केवळ त्यांच्या घराण्यापुरती किंवा पट्टशिष्य-शिष्यांपुरतीच मर्यादित राहते. याच बाबतीत जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी श्रुती सडोलीकर वेगळ्या ठरतात. २१ नोव्हेंबर रोजी त्यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात स्वरांचे अमृतधन त्या मुक्तहस्ते रसिकांना देणार आहेत.
श्रुतीताईंचा जन्म कुरुंदवाडचा असला तरी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्या मुंबईत राहिलेल्या आहेत. त्यांचे बालपण दादरच्या हिंदू कॉलनीत संगीतमय वातावरणातच गेले. श्रुतीताईंवर शास्त्रीय संगीताचे प्राथमिक संस्कार त्यांचे वडील पं. वामनराव सडोलीकर यांनी केले. पं. वामनराव हे स्वतः जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक उस्ताद अल्लादिया खाँ यांचे शिष्य आणि मराठी संगीत रंगभूमीवरील गंधर्वयुगातले प्रख्यात गायक नट होते. साहजिकच, श्रुतीताई अवघ्या दीड वर्षांच्या असल्यापासून सुरांशी त्यांची नाळ जोडली गेली. खेळण्याच्या वयात त्या लीलया बंदिशीमधल्या शब्द-सुरांशी खेळत होत्या. त्याच काळात शास्रीय संगीताच्या तालमीसोबतच त्या संगीत नाटकातही काम करू लागल्या. सं.शारदा, गीतसरिता, सं. तुलसीदास यासारख्या नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या असल्या तरी खर्या अर्थाने त्या शास्त्रीय संगीतातच अधिक रमल्या.
शास्त्रीय संगीत आणि नाटक यामुळे त्यांच्या घरी अनेक दिग्गज कलाकारांची ऊठबस होत होती. या कलाकारांच्या संगीतावरील चर्चा, बंदिशींची देवाण घेवाण त्यांच्या कानावर पडत होती. या मंडळींचा संगीताकडे पाहण्याचा उदात्त दृष्टिकोन तसेच वेगवेगळ्या शिष्यांना शिकवणार्या वडिलांना ऐकतच श्रुतीताईंचा गळा तयार होत होता. जयपूर घराण्याचे गायक उस्ताद गुलुभाई जसदनवाला हे त्यांचे पहिले शास्त्रोक्त संगीत शिक्षणाचे गुरू. सडोलीकरांना भेटण्यासाठी आलेल्या गुलुभाईंनी अगदी अनपेक्षितपपणे छोट्या श्रुतीला संगीत शिकवण्याची तयारी पं. वामनरावांकडे बोलून दाखवली. तेव्हापासून पुढे बारा वर्षे त्यांनी जयपूर घराण्याचे अनवट राग, अप्रचलित बंदिशींचा खजिनाच श्रुतीताईंसाठी खुला केला. याच उस्ताद जसदनवालांकडे त्या काळी पं. जितेंद्र अभिषेकी गायनाची तालीम घेण्यासाठी येत असत.
जसदनवालांकडे श्रुतीताईंच्या नंतर दोन वर्षांनी शिष्यत्व स्वीकारलेले गायक नट कृष्णराव चोणकर यांनी ताईंना बरीच गंधर्वपदे शिकवली. जयपूर अत्रौली घराण्याचे संस्थापक उस्ताद अल्लादियां खान यांचे नातू उस्ताद अझीझुद्दिन खान यांच्यासह अनेक दिग्गजांकडूनही ताईंनी शिक्षण घेतले. गुरूंकडील शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाबरोबरच त्यांनी याच विषयात एसएनडीटी महिला विद्यापीठातून एमए केले. वडिलांकडून वाचनाचे संस्कार आणि अनेक भाषांची गोडीही त्यांना लागली.
दरम्यान, मैफिलींतून गायन करताना त्यांचे नाव सर्वत्र होऊ लागले. याच सुमारास आयटीसी संगीत रिसर्च अकादमी कलकत्ता इथे श्रुतीताईंना शिकवण्यासाठी बोलावणे आले. पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्यानंतर ही मोठी जबाबदारी ताईंवर आली आणि तिथे त्यांनी जयपूर घराण्याची गायकी शिकवली. पुढे प्रसिद्ध संगीतज्ज्ञ डॉ. अशोक रानडे यांच्या सांगण्यावरून त्या मुंबई विद्यापीठातही शिकवू लागल्या. अगदी दोन चार महिन्यातच त्यांची २००९ साली लखनऊच्या भातखंडे संगीत संस्थान समविश्व विद्यालयाच्या कुलपतीपदी निवड झाली. तिथे त्यांनी संगीतविषयक अनेक नवे उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांनी गाणे शिकण्याबरोबरच ऑडिशन घेणे, मुख्य साथी कलाकारांबरोबर समन्वय साधणे, मैफिलीचे स्वरूप ठरवणे इथपासून ते साउंड सिस्टिम, रसिकांशी संवाद याचेही शिक्षण घेतले पाहिजे या दृष्टीने त्यांनी याविषयीचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. संगीत आणि विद्वत्ता हातात हात घालून चालली पाहिजे, असे ताईंचे म्हणणे होते आणि आहे.
वामनरावांकडून गाणं शिकत असतानाच आईकडून जीवनाकडे वस्तुनिष्ठपणे पाहायला त्या शिकल्या. कलाकार हा सुशिक्षितही असला पाहिजे, हा त्यांच्या आईचा आग्रह होता. ‘आपण जे गातो आहोत, त्या संगीतामागचं व्याकरण, शास्त्रीय आधार समोरून ऐकणार्यांना सांगता आले पाहिजे आणि त्यासाठी त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे,‘ हे आईचे हे शब्द गाण्यात एमएची पदवी घेण्यास कारण ठरले. जयपूर अत्रौली घराणे हे कठीण गायकीसाठी ओळखले जाते. अशा घराण्याच्या सूरांबरोबर येणार्या श्रुतीही सांभाळून गाणार्या ताईंच्या संगीतविषयक चिकित्सक दृष्टीमुळे त्या मैफिलीतल्या लोकप्रिय कलाकार आणि संगीतविदुषी म्हणूनही ओळखल्या जातात.
‘संगीत ही आजन्म चालणारी प्रक्रिया अाहे. ती शिकताना समजून उमजून शिकली तर त्याचे स्वरूप कळणे सोपे जाते. त्याचबरोबर गाण्यात एक शिस्तबद्धता, रियाजात सातत्य आणि नवीन शिकण्याची ऊर्मी असायला हवी. गुरू जसदनवाला यांनी त्यांच्याकडील अपरिमित विद्या मला देताना जराही हात आखडता घेतला नाही. उलट, ‘तुझ्यासारखी शिष्या आधीच मिळाली असती तर अजून बरेच काही शिकवता आले असते,’ असे ते म्हणाले होते. त्यांची ही शिकवण नेहमी माझ्या लक्षात राहिली. आज माझ्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने प्रकाशित होणार्या ‘मन्मना- बंदिशींची अमृतसिद्धी’ या ग्रंथातून माझे वडील, काका आणि बाबा खाँसाहेब या गुरूंच्या आशीर्वादातून साकारलेल्या माझ्या स्वरचित बंदिशी पुढीलांकडे देताना ‘विद्या दिल्याने प्रवाही राहते’, हाच विचार अधिक सुघट, सोपेपणाने मांडण्याचा प्रयत्न केल्याचे’, श्रुतीताई सांगतात. त्या म्हणतात, प्रत्येक घराण्याच्या शास्त्रीय गायनाची एक विशिष्ट परंपरा असते. त्यांच्या सांगीतिक रचना गळ्यावर चढवणे सर्वात महत्त्वाचे असते. त्या शिकण्याच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना त्या त्या रागातील बंदिशींचे स्वरूप समजले, तर शिकणे, आत्मसात करून गाणे त्यांना सुलभ होईल. या हेतूनचे मी रचलेल्या ७५ स्वररचना इथे एकत्र केल्या आहेत. बंदिशींची रचना, गेयता, सोपेपणा आणि स्वरसंगतीशी कोणतीही तडजोड न करता प्रवाही ठेवण्याकडे माझा कटाक्ष राहिला आहे.
त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ७५ बंदिशींचा अनमोल ठेवा असलेला हा वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ २१ नोव्हेंबर रोजी प्रकाशित होतो आहे. या ग्रंथात घराण्याच्या बंदिशींची परंपरा, त्यामागील अध्यात्म विचार, ऋतुवर्णन, गुरूमहिमा अशा विषयांचा समावेश आहे. या रचनांना क्युआर कोड देत ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याची संकल्पना ‘१४ विद्या आणि ६४ कला’ चे संस्थापक, छायाचित्रकार संजय पेठे यांची असून त्यांना ताईंचा शिष्यपरिवार आणि ग्रंथालीच्या सुदेश हिंगलासपूरकर यांनी अनमोल साथ दिलेली आहे. कलामहर्षी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते आणि राज्याचे
सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ग्रंथ प्रकाशित होतो आहे. रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे होणार्या सूरांच्या या अमृत वर्षावाचा आनंद सर्वांना घेता यावा, यासाठी हा कार्यक्रम रसिकांसाठी खुला ठेवण्यात आलेला आहे. या पुस्तकाच्या मांडणीची संकल्पना प्रसिद्ध छायाचित्रकार संजय पेठे यांची आहे.
बंदिशींना क्युआर कोड
‘मन्मना- बंदिशींची अमृतसिद्धी’ या ग्रंथामध्ये जयपूर-अत्रौली घराण्याकडून मिळालेला वारसा, गुरूंनी केलेले गानसंस्कार यातून सहज स्फुरलेल्या बंदिशींचा समावेश आहे. बंदिशींची रचना, त्यांची नोटेशन्स (स्वररचना) एवढ्यापुरताच हा ग्रंथ मर्यादित नाही. या ग्रंथाचे वेगळेपण म्हणजे यातील प्रत्येक बंदिशीला स्वतंत्र क्युआर कोड देण्यात आला आहे. हा क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर बंदिशीची स्वररचना, नेमकं स्वरूप, गायनाची पद्धत या सगळ्याची माहिती नवोदित कलाकारांना उपलब्ध होणार आहे. शास्त्रीय संगीत शिकणार्या विद्यार्थ्यांना या बंदिशी सुयोग्य पद्धतीने समजून घेता याव्यात तसेच सहजपणे गाता याव्यात यादृष्टीने अशी वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करण्यात आलेली आहे.

