
गेली काही वर्षं नामांकित क्रिकेटपटूंचं आत्मचरित्र किंवा चरित्रात्मक पुस्तक प्रकाशित करताना वाद निर्माण करून ती चर्चेत आणण्याचे प्रकार घडले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा या तुलनेने दुय्यम क्रिकेटपटूने ‘सब्र : फाइंडिंग माय वे इन क्रिकेट अँड लाइफ’ ह्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या निमित्तानं २०१८मधील चेंडू फेरफार प्रकरण चव्हाट्यावर आणून धुरळा उडवून दिलाय…
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा राज्य करीत होता. त्याच्या दोन राण्या होत्या. एक आवडती आणि दुसरी नावडती… लहानपणी आपण ऐकलेल्या शूर राजांच्या अनेक कथांची सुरुवात ही अशीच असायची. मग राजाच्या दोन्ही राण्या आवडत्या किंवा नावडत्या का नव्हत्या? किंवा राजकन्येला पळवून नेणारा राक्षस हा चुकीचा का? आणि तिला त्याच्या तावडीतून सोडवणारा गावातील तरुण हा बरोबर का? असा प्रश्न विचारायचा नसतो. नाण्याला जशा दोन बाजू असतात, तशाच चांगलं-वाईट, गोड-तिखट, खरं-खोटं अशा प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. माणसाचा विकास जसजसा होत जातो, तसतसा तो ‘आवडती माणसं’ आणि ‘नावडती माणसं’ अशा दोन याद्या बनवतो. मग आवडणार्या माणसांचं गुणगान होतं, तर नावडणार्या माणसांवर टीका. ही दोन टोकं म्हणजे नायक आणि खलनायक. चित्रपट, नाटक, मालिका, कादंबरी, कथा या कोणत्याही प्रकारात नायक आणि खलनायक असल्याशिवाय रंगत वाढत नाही. हेच समीकरण आत्मचरित्राच्या प्रकाशनातही हल्ली आवर्जून सांभाळलं जातं. पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस त्यातलं वादग्रस्त प्रकरण चव्हाट्यावर आणून खप वाढवण्याची पद्धत गेल्या काही दशकांत कमालीची लोकप्रिय झालीय. क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांनी जे केलं, तेच ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज उस्मान ख्वाजा याने ‘सब्र : फाइंडिंग माय वे इन क्रिकेट अँड लाइफ’ ह्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या निमित्तानं केलं आहे.
२०१८मधील चेंडू फेरफार प्रकरण हे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील एक सर्वात डागाळलेलं पान. ख्वाजाच्या एरवी फारशी उत्सुकता निर्माण न करणार्या पुस्तकातील १७वं प्रकरण आहे ‘सँडपेपर’ या शीर्षकाचं. चेंडू फेरफार प्रकरणात ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ या संघटनेनं चौकशी करून स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांना दोषी ठरवलं. फक्त ह्या तिघांवर बंदीची कारवाई झाली आणि आर्थिक दंड ठोठावण्यात आला; परंतु ह्या फसवणुकीची संपूर्ण संघाला माहिती होती, हा दावा हा या प्रकरणातला आणि पुस्तकातला सर्वात संवेदनाक्षम मजकूर बाहेर येताच अपेक्षित वणवा पेटला आहे. ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान’ हे प्रकाशनपूर्व वादांचं ब्रीद त्याने जपलेलं आहे. वॉर्नर, पॅट कमिन्स असे अनेक क्रिकेटपटू ह्या वादात उतरलेत. ख्वाजाचं आणि प्रकाशन संस्थेचं इप्सित त्यातून साध्य झालं आहे.
ख्वाजा हा ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करणारा पहिला मूळ पाकिस्तानी क्रिकेटपटू. त्याच्याकडे दुहेरी नागरिकत्व आहे. अन्य क्रिकेट प्रकारांपेक्षा कसोटी क्रिकेटमध्ये तो अधिक स्थिरावला. जानेवारीत निवृत्ती पत्करल्यानंतर अजून वर्षही सरलं नाही, तोच चाळीशीकडे वाटचाल करणार्या ह्या क्रिकेटपटूनं आपलं आत्मचरित्र प्रकाशझोतात आणलं. डिसेंबर २०२३मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव सत्रात ख्वाजाच्या बुटानं सर्वांचं लक्ष वेधलं. ‘सर्वांचे जीवन समान आहे’ आणि ‘स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे’ ही वाक्यं पॅलेस्टाइनच्या ध्वजाच्या रंगात त्यावर इंग्रजीत लिहिली होती. हे बूट त्याने पुन्हा परिधान केल्यास कारवाई करण्यात येईल, अशी तंबी ‘आयसीसी’नं दिल्यावर बुटावरील वाक्यांवर पट्टी लावून काळ्या दंडपट्ट्यासह तो पहिल्या कसोटीत उतरला. म्हणजे ‘आयसीसी’चा निषेध करण्याचं धारिष्ट्य त्यानं दाखवलं होतं. या इटक्यावरच थांबेल तर तो ख्वाजा कसला? थेट ‘इन्स्टाग्राम’वर ‘क्ष् विसंगत आणि क्ष् दुटप्पी’ असं भाष्य त्यानं केलं होतं. त्यामुळेच बंडखोरी त्याच्या नसानसांत होती.
ख्वाजा पुस्तकाच्या निमित्तानं जे करतोय, ते आधीही अनेकांनी केलं. आदर्शवत क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि बोरिया मुझुमदार यांनी २०१४मध्ये संयुक्तपणे लिहिलेल्या ‘प्लेइंग इट माय वे’ ह्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाप्रसंगीही असंच घडलं होतं. त्यात प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीत भारतीय क्रिकेटमध्ये दुफळी माजवणार्या ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग चॅपेलला ‘रिंगमास्टर’ असं संबोधण्यात आलं होतं. खेळाडूंना विश्वासात न घेता आपल्या योजना त्यांनी कशा लादल्या होत्या, हे प्रथमच सचिनकडूनच बाहेर आलं. ‘मंकीगेट’ प्रकरणात हरभजन सिंगला लक्ष्य करणारे अॅर्न्ड्र्यू सायमंड्स आणि रिकी पाँटिंग, प्रशिक्षक म्हणून अपेक्षाभंग करणारा कपिल देव, चेंडू कुरतडल्याचा ठपका ठेवणारा इंग्लिश सामनाधिकारी माइक डेनिस, १९९७मध्ये सचिनची कर्णधारपदावरून तडकाफडकी आणि अपमानजनक हकालपट्टी करणारे ‘बीसीसीआय’चे पदाधिकारी, आदी प्रकरणं त्यानं चर्चेत आणली होती.
२०१८मध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गौतम भट्टाचार्यसोबत लिहिलेल्या ‘अ सेंच्युरी इज नॉट इनफ’ ह्या आत्मचरित्रातही ग्रेग चॅपेललाच खलनायक ठरवलं. कारण गांगुली आणि चॅपेल गुरुजींचं वैर सर्वश्रुत होतं. गांगुलीनं चॅपेलच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाचं वर्णन, आपल्या कारकीर्दीतील ‘सर्वांत खडतर काळ’ असं केलं होतं. चॅपेलच्या कार्यपद्धतीमुळे संघातील एकजूट कमकुवत झाली आणि वरिष्ठ खेळाडूंचं महत्त्व कमी झालं, हे सांगणारी वादग्रस्त पानं गांगुलीनं प्रकाशनाप्रसंगी चर्चेत आणली आणि त्याच्या पुस्तकाची जोरदार पूर्वप्रसिद्धी झाली.
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग याने २०२१मध्ये प्रकाशित केलेल्या ‘व्हाय वुई नील, हाऊ वुई राइज’ ह्या पुस्तकात क्रीडाक्षेत्रातील आणि समाजातील वर्णद्वेष आणि भेदभाव यांच्यावर ताशेरे ओढले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौर्यांवर वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंनी कृष्णवर्णीय म्हणून अनुभवलेल्या वागणुकीचं प्रतिबिंब यात उमटलंय. या पुस्तकाची साधक-बाधक चर्चाही झाली. परंतु पुस्तक प्रकाशनानंतर काही दिवसांतच होल्डिंगनं क्रिकेट समालोचनातून अचानक आणि अनपेक्षित निवृत्ती पत्करली. इंग्लंडचा महान अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बोथमचं २००८मध्ये प्रकाशित झालेलं ‘हेड ऑन’ हे आत्मचरित्र त्याच्या खेळाइतकंच सनसनाटी ठरलं. यात त्याने आपल्या आयुष्यातील आणि क्रिकेट कारकीर्दीतील अनेक वादग्रस्त पैलूंवर मोकळेपणानं भाष्य केलं. गांजाचं सेवन, मद्यपानाच्या सवयी आणि मैदानाबाहेरील विविध घटनांबद्दल त्यानं स्पष्टपणे लिहिलं. पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे चेंडू कुरतडण्याचे प्रतापही त्याने मांडले होते. या प्रकरणांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. ब्रिटिश टॅब्लॉइड माध्यमांशी म्हणजेच पीतपत्रकारितेशी असलेल्या संघर्षपूर्ण संबंधांवरही त्यानं परखड विचारमंथन केलं होतं. ही माध्यमं त्याच्या मैदानावरील कामगिरीपेक्षा वैयक्तिक आयुष्याला अधिक प्रसिद्धी देत असत. हेच बोथमला खटकत होतं. 
२०२२मध्ये ‘फिरकीचा जादुगार’ शेन वॉर्ननं जगाचा आकस्मिकपणे निरोप घेतला. त्याआधी २०१८मध्ये त्यानं ‘नो स्पिन’ ह्या आत्मचरित्रातून क्रिकेट कारकीर्द आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले होते. ऑस्ट्रेलियाचा माजी विश्वविजेता कर्णधार स्टीव्ह वॉ याला त्याने स्वार्थी म्हटलं होतं. १९९९च्या वेस्ट इंडिज दौर्यात वॉर्नला संघातून वगळण्यात आल्यानंतर या दोघांमधील जुना वाद पुन्हा उफाळून आला होता. २००३च्या विश्वचषकादरम्यान बंदी घातलेल्या उत्तेजकांच्या सेवनामुळे झालेल्या निलंबनाच्या प्रकरणावरही वॉर्ननं माहिती दिली. आईने दिलेल्या औषधातून प्रतिबंधित पदार्थ शरीरात गेल्याचं आपल्याला माहीत नव्हतं, असा त्याचा दावा होता. याशिवाय त्यानं आपले प्रेमसंबंध, प्रसारमाध्यमांशी झालेले वाद आणि वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यांचाही ऊहापोह केला.
२०१४मध्ये आयरिश क्रीडा पत्रकार डेव्हिड वॉल्शच्या मदतीनं इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसननं ‘केपी’ हे सुधारित आत्मचरित्र लिहून धुरळा उडवला. इंग्लंड संघातून त्याची वादग्रस्त पद्धतीनं हकालपट्टी का झाली, याचा पर्दाफाश त्यानं यात केला. याशिवाय माजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्या कार्यशैलीवर हल्लाबोलही केला. ड्रेसिंगरूममध्ये भीतीदायक वातावरण निर्माण करणारे प्रशिक्षक अशी
फ्लॉवर यांची व्यक्तिरेखा त्यानं रेखाटली. इंग्लंडच्या वरिष्ठ खेळाडूंवरही पीटरसननं आत्मचरित्रात चांगलंच तोंडसुख घेतलं. इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वान याने पीटरसनचे आरोप फेटाळून लावत या पुस्तकाला ‘केपीचं काल्पनिक कथानक’ असं संबोधलं. एकंदरीतच ह्या आत्मचरित्रामुळे जोरदार शाब्दिक संघर्षाला तोंड फुटलं. हर्शल गिब्सनं ‘टू द पॉइंट’ (२०१०) ह्या आत्मचरित्रात दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएशी संबंधित सामना निश्चिती प्रकरणावर धक्कादायक खुलासे केले. या खुलाशांमुळे क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली.
पाकिस्तानी क्रिकेटपटूंची आत्मचरित्रं वादग्रस्त ठरली नाहीत, तरच आश्चर्य म्हणायला हवं! शोएब अख्तरच्या आत्मचरित्राचं नावच ‘कॉन्ट्रोव्हर्शियली युवर्स’ (२०११) असं आहे. ह्या आत्मचरित्रात अख्तरनं सचिन आणि राहुल द्रविडच्या वृत्तीवर तसेच सामन्याचा निकाल बदलण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं त्याने. फैसलाबादच्या संथ खेळपट्टीवर सचिन आपला वेगवान मारा खेळण्यास घाबरत होता, असा दावाही त्याने बिनदिक्कतपणे केला. मोहम्मद आसिफसोबतची ड्रेसिंगरूममधील हाणामारी, संघनिवडीतील राजकारण आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चेंडू कुरतडण्याच्या प्रकारांबाबत केलेल्या गौप्यस्फोटांमुळे हे पुस्तक वादाच्या भोवर्यात सापडलं. १९८८मध्ये माजी कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खानने ‘ऑल राऊंड व्ह्यू’ ह्या आत्मचरित्रात रिव्हर्स स्विंगसाठी वापरल्या जाणार्या तंत्रांची चर्चा करताना कौंटी क्रिकेटमध्ये चक्क बाटलीच्या झाकणानं चेंडू खरवडल्याचं मान्य केलं. माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आप्रिâदीनं ‘गेम चेंजर’ ह्या आत्मचरित्रात स्वत:च्याच जन्मतारखेवरून मोठा वाद निर्माण केला आणि नंतर तो निस्तरलाही. याशिवाय वकार युनूस आणि जावेद मियांदादशी असलेले मतभेदही त्यानं चव्हाट्यावर आणले. वसीम अक्रमनं ‘सुलतान : अ मेमोयर’ ह्या आत्मचरित्रात कोकेनच्या व्यसनाबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आलेल्या मानसिक आणि भावनिक संघर्षांबरोबरच १९९०च्या दशकातील पाकिस्तानी क्रिकेटवर केल्या गेलेल्या सामना निश्चितीच्या आरोपांवरही अक्रमनं प्रकाशझोत टाकला.
उस्मान ख्वाजानं आपल्या आत्मचरित्राला अरबी नाव दिलंय ‘सब्र’. म्हणजे संयम. ‘सब्र का फल मीठा होता है’ ह्या म्हणीप्रमाणेच ख्वाजानं ‘त्या’ प्रकरणानंतर आठ वर्षं संयम बाळगला. मग तो आतापर्यंत या विषयाबाबत मूग गिळून गप्प का होता? यातील अन्य प्रकरणांबाबत किंवा व्यक्तींबाबत आसूड त्यानं आताच का ओढले? या प्रश्नांना वाव आहे. परंतु गेली काही वर्षं मोठ्या क्रिकेटपटूंची आत्मचरित्रं किंवा चरित्रात्मक पुस्तकं वाद निर्माण करणारी प्रकरणं चर्चेत आणून खप वाढवतात, हा शिरस्ता त्यानंही जपला तर त्यात नवल काय!

