• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

दाराआडचा चोर

वैशाली देवडीकर विनोदी कथा

Marmik Team by Marmik Team
November 21, 2026
in दिवाळी स्पेशल
0
दाराआडचा  चोर

‘प्रबोधन गोरेगाव’ आणि ‘साप्ताहिक मार्मिक’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती विनोदी कथा स्पर्धेतील दुसर्‍या क्रमांकाची कथा.

आज शाळेला सुट्टी होती. सकाळी थोडा निवांत श्वास घ्यावा, गरम चहा हातात घेऊन खिडकीत उभं राहावं, रेडिओवर एखादं जुनं गाणं लागावं, आणि मग शांतपणे दिवस सुरू करावा, असा मीनलचा बेत होता. पण घरात दोन मुले, नोकरी करणारा नवरा, आणि चाळीतलं आयुष्य असेल तर ‘निवांत’ हा शब्द शब्दकोशातच शोभतो, प्रत्यक्षात नाही. सकाळपासूनच घरात लगबग सुरू होती. धाकटा रोहन जोड्यामधील एक चप्पल शोधत होता. त्याच्या एका चपलेत त्याच्याच प्लास्टिकच्या सैनिकाने मुक्काम ठोकला होता, त्यामुळे ती त्याला दिसत नव्हती. मोठी सई अभ्यासाचे पुस्तक घेऊन बसल्यासारखी दिसत होती, पण आतमध्ये चित्रं काढत होती. नवरा निलेश नेहमीप्रमाणे टॉवेल कमरेला अडकवून ‘माझा डबा भरलास का?’ ‘माझे वॉलेट कुठे आहे?’ ‘माझे सॉक्स कोणी पाहिलेत का?’ असे राष्ट्रीय प्रश्न विचारत होता.
‘तुझ्या वस्तू शोधायला मी स्वतंत्र कर्मचारी ठेवला आहे का?’ मीनलने स्वयंपाकघरातूनच आवाज दिला.
‘अगं, मी फक्त विचारतोय,’ निलेश म्हणाला.
‘हो, आणि घरात हरवलेली प्रत्येक वस्तू शोधायला माझ्याकडे अर्ज टाकायचा असतो, माहितीये नं?’
चाळीतल्या बाकीच्या बायका मीनलचं हे सडेतोड बोलणं ऐकून मजा घेत. मीनल ही त्या चाळीतील एकमेव शाळेत शिकवणारी शिक्षिका होती. त्यामुळे तिचं बोलणं, चालणं, वेळ पाळणं, आणि नवर्‍याला धारेवर धरणं, हे सगळं चाळीत विशेष आकर्षणाचा विषय होतं. खरं सांगायचं तर नवर्‍याला सडेतोड बोलणार्‍या मीनलचे त्यांना कौतुकच होते. त्यामुळे बाकीचे पुरुष चाळकरीही तिला घाबरून असत.
कामं आवरून, दुपारचं स्वतःचं आणि मुलांचं जेवण आटोपून, ‘आता बाजार करून येते’ असं त्यांना सांगून मीनल बाहेर पडणार, तेवढ्यात शेजारच्या बेन्द्रे काकू घरात आल्या. आल्याबरोबर त्यांनी घरावर चौकसपणे नजर फिरवलीच. मीनलला ते सवयीचे होते, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून ती त्यांना हाताला धरून बाहेर नेत म्हणाली, ‘मुले आत्ता पप्पूकडे खेळायला जात आहेत. मग नेहमीसारखे सगळे बाहेर खेळतील. संध्याकाळी त्यांना चावी द्या. थोडा वेळ खेळू दे, मग घरात जाऊन अभ्यासाला बसायला सांगा. जा रे पळा, मला कुलूप लावून लगेच निघायचं आहे.’
‘बरं, ती दाराला लटकवलेली
पॅन्ट पाहिली मी आत्ता, बरं दिसतं का ते असं?’
‘मी सकाळीच निलेशला सांगितलंय. मुख्य दाराच्या खिट्टीला काही अडकवू नकोस म्हणून. आता संध्याकाळी आला की त्यालाच त्याच्या हाताने ठेवायला सांगते. मी आत्ता केले तर ते परस्पर काम झाले म्हणून तो खूषच होईल. एका सांगण्यात ऐकतात हे नवरे लोक? त्यांना हवं तेच करतात.’ ती वैतागून म्हणाली.
हे ऐकून बेन्द्रे काकू खिदळल्या. मीनलने घराला कुलूप लावलं, काकूंना किल्ली दिली आणि बाहेर पडली.
बेन्द्रे काकूंनी चावी पदरात घट्ट बांधत विचारलं, ‘कधीपर्यंत येशील?’
‘जास्तीत जास्त सहा वाजतील. भाजी, किराणा, टेलर आणि स्टेशनरी एवढी कामं आहेत. तुम्हाला बाजारातून काही आणायचं आहे का?’ तिने नेहमीप्रमाणे विचारले. त्या काही नको म्हणाल्या आणि ती निघाली.
बाजारात गेल्यावर नेहमीप्रमाणे तिचा अर्धा वेळ ‘भाजी ताजी आहे’ म्हणणार्‍या भाजीवाल्याशी वाद घालण्यात गेला.
टोमॅटोवाला म्हणाला, ‘ताई, आजचा माल स्पेशल हाय बरं का.’
‘स्पेशल? कालचा शिल्लक आहे आणि त्याला तुम्ही स्पेशल म्हणताय?’
‘ नाय वो ताई, तसं नाय, पन घ्या, तुमच्यासाठी किंमत कमी करतो.’
‘तसं नको, माल चांगला दे म्हणजे झालं.’
भाजी, किराणा, टेलरकडचे ब्लाउज, मुलांसाठी कंपास पेटी आणि स्वतःसाठी केसात लावायच्या क्लिप्स घेत घेत वेळ गेला. बस उशिरा आली. बसमध्ये एक बाई मीनलच्या पिशवीवर अर्धं वजन ठेवून उभी राहिली होती. तेव्हा मात्र आतल्या
टोमॅटोंच्या काळजीने तिच्या मनाचे पाणी होत होते. उतरतानाही ही गर्दी होती. आता मात्र ती कंटाळली, सकाळचा उत्साह घामावाटे निघून गेला होता. तिच्या मनात एकच विचार होता- घरी पोहोचल्यावर फ्रेश होऊन मस्त चहा घ्यायचा…
घरातून ती दुपारी दोनला बाहेर पडली होती. सगळी कामे करून परत यायला सहा वाजले होतेच. चाळीच्या वळणावर वळताच तिला समोर एक विचित्र दृश्य दिसलं- तिची दोन्ही मुले घराबाहेर बसलेली आणि चेहर्‍य्aाावर अगदी पावसात भिजलेल्या मांजरासारखा भाव होता. म्हणजे ही बाहेरच कशी? अजून घरात जाऊन अभ्यासाला बसली नाहीत? जबाबदारी कशी कळत नाही? तिच्या मनात भरभर प्रश्न उमटू लागले.
ती जवळ आली, आणि दोघे धावत येऊन तिला बिलगले.
‘आई आई,’ सई धापा टाकत म्हणाली, ‘घरात कोणीतरी घुसलंय बहुतेक. आतून कडी घातली आहे!’
‘काय?’ मीनलने डोळे मोठे केले. ‘तुम्हाला कुलूप उघडता आलं नसेल. शेजारून चावी घेतलीत ना?’
‘घेतली. पण दार उघडतच नाहीये,’ रोहनने भर घातली. ‘मी दोनदा ढकललं.’ मग सई म्हणाली, ‘चोर असू शकतो.’
‘आणि मग तू?’ मीनलने विचारलं.
‘मी दूर उभा राहिलो,’ तो प्रामाणिकपणे म्हणाला, ‘कारण चोर असेल तर आधी सईला दिसेल.’
‘वा रे शूरवीर!’ ती वैतागून म्हणाली. खरं तर त्या चहाच्या तल्लफेने तिला कधी घरात जातोय असं झालं होतं.
तेवढ्यात बेन्द्रे काकू हातात चावी घेऊन बाहेर आल्या. ‘अग, तुझीच वाट पाहत होते. आम्ही कुलूप उघडलं, पण दार ढकलूनही उघडत नाही. आतून कोणीतरी कडी घालून बसलंय बहुतेक.’
‘काय?’ ती जोरात ओरडली. इतक्यात शेजारच्या आणखी दोन बायका बाहेर आल्या. मग अजून तीन. चाळीत कुठे काही घडलं की बातमीला पंख फुटायला पाच सेकंद पुरत. दोन मिनिटांत तिथे छोटेखानी सभा भरली.

ती चाळच तशी होती- समोरासमोर घरे, मधे मोकळी जागा, दुपारी बाहेर चटया टाकून बायका भाज्या निवडत किंवा इतर कामे करत बसायच्या, मुले क्रिकेट खेळायची आणि कोण कोणाच्या घरी आलं गेलं याची माहिती सगळ्यांना अपडेट असायची. कोणाच्या घराच्या दाराला कुलूप असलं तरी बाकीच्यांचे डोळे कायम सुरक्षारक्षक म्हणून ड्युटीवर असत.
‘तुम्ही कोणाला घरात जाताना पाहिलं का?’ मीनलने विचारलं.
‘नाही गं,’ एकीने सांगितलं, ‘आम्ही इथेच होतो. पण जरा चहा टाकायला आत गेलो होतो. तेवढ्यात कोणी शिरलं असेल तर सांगता येत नाही.’
‘पण घरातून आवाजही नाही.’
मीनलने दाराला कान लावला. आतून चक्क पंख्याचा आवाज येत होता.
तिच्या अंगावर काटा आला. ‘पंखा चालू आहे म्हणजे घरात कुणीतरी आहे आणि चक्क पंखा लावून बसलंय!’ ती म्हणाली. आपल्या घरात असं कोण घुसलंय आणि ते आपल्या सोफ्यावर बसलं असणार ह्या विचाराने तिच्या अंगावर काटा आला.
‘किंवा भूत,’ बेन्द्रे काकूंनी हळू आवाजात म्हटलं.
‘काकू, तुम्ही जरा थांबा. पहिल्याच मिनिटाला भूत आणू नका,’ मीनलने त्यांना थांबवलं.
तिने बाहेरचं कुलूप काढलं आणि दाराला धक्का दिला. पण खरंच, आतून कोणीतरी कडी घातल्यासारखं दार हलतच नव्हतं. आता तिच्या धीराचा बांध फुटला.
‘कोण आहे आत?’ ती जोरात ओरडली, ‘बर्‍या बोलाने बाहेर या. नाही तर पोलिसांना बोलावते!’
आतून शुकशुकाट.
‘बाहेर नाही आलात तर फार वाईट होईल!’ ती पुन्हा ओरडली.
‘काय वाईट होईल?’ रोहनने कुतूहलाने विचारलं.
‘गप रे. एक तर घरावर लक्ष ठेवले नाहीत आणि वर असे प्रश्न विचारतो आहेस!’ मीनल त्याला टोकत रागाने कटाक्ष टाकत म्हणाली.
मग अचानक चाळीतल्या सगळ्या बायकांच्या अंगात पराक्रम जागा झाला. कुणी घरातून लाटणं आणलं, कुणी चाकू, कुणी झार्‍याचा दांडा, कुणी मुसळ. समोरच्या सावंतकाकू तर लोखंडी तवा घेऊनच आल्या. ‘जर चोर असेल ना, तर थेट कपाळावर दणका देणार,’ त्या म्हणाल्या.
लहान मुलांनाही वीरश्री चढली. कुणी शाळेची पट्टी आणली, कुणी बॅट, कुणी कर्कटक. पप्पू नावाचा शेजारचा पोरगा तर क्रिकेटचे हेल्मेट घालून आला.
‘हे कशाला?’ मीनलने विचारलं.
‘चोराने आतून काही फेकलं आणि माझ्या डोक्यावर पडलं तर?’ तो गंभीरपणे म्हणाला.
‘तू आधी शर्टाची बटणं नीट लाव. चोराला तोंड द्यायला निघालाय…’ त्याची आई म्हणाली. निम्मी बटणं लावलेली, पण जी लावली तीही वरखाली लावली होती त्यामुळे निम्मा शर्ट वार्‍यावर ‘लेहरा जाये’ असा होता.
मीनलने पुन्हा दारावर धडाधडा थापा मारायला सुरुवात केली. मुलांनी उगाचच ‘हर हर महादेव’चा गजर सुरू केला. रोहननेही वातावरणात भर घालण्यासाठी त्याची पाण्याची रिकामी बाटली दारावर आपटली.
‘बर्‍या बोलाने दार उघडा!’ मीनल ओरडली, ‘आमच्या प्रत्येकीच्या हातात शस्त्र आहेत. आत आलो तर उगीच मारहाण होईल. सरळ बाहेर या!’
‘अगं या काय म्हणतेस? त्याला कसला आदर दाखवायचा?’ सावंतकाकू डाफरल्या.
‘अहो, एकापेक्षा जास्त असतील तर? म्हणून ती तसं म्हणत असेल,’ पप्पूची आई म्हणाली.
मीनलने त्याही स्थितीत कपाळाला हात लावला. परत तिने दार धडाधड हलवलं.
तरीही काहीच हालचाल नाही.
तेवढ्यात रोहनच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली. ‘आई, मी मागून जाऊन बघू का? स्वयंपाकघराची खिडकी उघडी असेल?’
‘ती मी बंद करूनच बाहेर गेले होते. पण चल, कान लावून पाहू.’
दोघे मागे गेले. बाकीचे सगळे मुद्दाम बाहेरच्या दाराशी तटबंदी करून उभे राहिले. मीनलने खिडकीला कान लावला. आतून पंख्याशिवाय काहीच आवाज नाही. तिने फटीतून डोकावण्याचा प्रयत्न केला, पण दिसेना. खिडकी ढकलून पाहिली—ती नाही उघडली.
आता मात्र तिच्या घशाला कोरड पडली. म्हणजे कोणीतरी मस्त पंखा लावून घरात लपून बसलंय? आपण इतका आवाज करतोय, तरी हलत नाही? कसलं निर्ढावलेलं चोरटं आहे!
ती आणि रोहन धावत पुढे आले.
इतक्यात निलेश कामावरून तिथे पोहोचला. समोर एवढी गर्दी, चाळीतल्या बायका शस्त्र हातात घेऊन, मुले हेल्मेट घालून, आणि बायको दाराशी थरथरत उभी— त्याला एकदमच काही कळेना.
‘काय झालं?’ तो म्हणाला.
एकाच वेळी दहा लोकांनी बोलायला सुरुवात केली.
‘असं झालं…’
‘दार उघडत नाही…’
‘पंखा चालू आहे…’
‘चोर आहे…’
‘भूत पण असू शकतं…’
निलेश शेवटी ओरडला, ‘एकेकजण बोला!’
मीनल पुढे झाली आणि प्रकार सांगितला. निलेशने पटकन फोन काढला.
‘काही उपयोग नाही, मी केव्हाचा १०० नंबर डायल करतोय, कोणीच उचलत नाहीये,’ आळीच्या कॉर्नरला रहाणारा दिपू म्हणाला.
निलेशने क्षणभर विचार केला, मग शेजारच्या गण्याला म्हणाला, ‘बाईक काढ! थेट पोलीस स्टेशनलाच जाऊ.’
गण्या दोन सेकंदात तयार झाला. त्याला गाडी चालवायला निमित्त मिळालं की तो स्वतःला सिनेमातील गुप्तहेर समजत असे. दोघे सुसाट पोलीस स्टेशनला गेले.
तोपर्यंत चाळकर्‍यांनी बाहेरून दाराला कडी लावून ‘चोर बाहेर पळू नये’ अशी आपापल्या मनाने व्यवस्था केली. सावंतकाका छाती पुढे काढून उभे राहिले होते, पण हातात मात्र उशीचा अभ्रे धरलेला होता.
‘काका, ते कशाला?’ कुणीतरी विचारलं.
‘गरज पडली तर चेहर्‍यावर टाकायचं,’ ते जोरात म्हणाले.
‘स्वतःच्या? त्याचा काय उपयोग? ते आत्ताही घाला की…’ मीनल चिडून म्हणाली.
‘नाही हो, माझ्या कशाला? चोर बाहेर आला की त्याच्या तोंडावर टाकून चांगल्या मुसक्या बांधून टाकू. चोर गोंधळेल.’ त्यांनाही आता चोर पकडण्याचे स्फुरण चढले होते.
‘चोर गोंधळेल की आपण?’ बेन्द्रे काकूंनी टोलवत त्यांच्या उत्साहाचा फुगा फोडला. निलेश, गण्या गेले आणि आपापल्या आयुष्यातील चोरीच्या किश्श्यांचा तिथे एक सोहळाच सुरू झाला. प्रत्येकाकडे काही न काही ष्टोरी होतीच आणि ती त्यांना तेव्हाच सगळ्यांना सांगायची होती.
दहा-पंधरा मिनिटांनी जीपचा आवाज आला. निलेश आणि गण्या दोन-तीन पोलिसांसह पोहोचले होते. पोलीस येताच गर्दी आपोआप दोन पावलं मागे सरकली, पण कान मात्र सगळ्यांचे पुढेच होते.
ताठ मिशा, आवाज भारी आणि दमदार चाल असे हवालदार भीमराव जाधव पुढे आले.
‘कुठं आहे चोर?’
मीनलने दाराकडे बोट दाखवलं.
‘दार उघडत नाही?’
‘नाही. आतून कडी लावून बसलाय.’ ती रडवेल्या आवाजात म्हणाली.
‘मेल्याने मस्त पंखा लावलाय,’ कोणीतरी कुजबुजलं.
‘आतून काही आवाज?’ जाधवांनी विचारलं.
‘फक्त पंख्याचा आवाज येतोय,’ त्याच रडवेल्या आवाजात मीनल म्हणाली.
‘हं,’ चोरीच्या उद्देशाने घरात शिरून पंखा लावून झोपला की काय? त्यांच्या विचार मनात चमकून गेला.
एक पोलीस मागच्या बाजूला गेला. दुसरा दाराशी उभा राहिला. हवालदारांनी दारावर ठोका दिला. ‘आत असलेल्याने ऐकावं! पोलिस बोलत आहेत. बर्‍या बोलाने दार उघडा. अजून संधी दिली जाते आहे.’
आतून काहीच आवाज नाही, हालचाल नाही.
‘बाहेर या! नाहीतर कारवाई होईल!’
तरीही शांतता.
बेन्द्रे काकू सईच्या कानात कुजबुजल्या, ‘भूतच दिसतंय.’
‘काकू, प्लीज,’ सई म्हणाली.
हवालदारांनी लोकांना मागे हटायला सांगितलं.
‘आपण दार तोडू. दुसरा काहीच पर्याय दिसत नाही. घराला दुसरा दरवाजा नाही. त्यामुळे दार तोडावेच लागेल.’ त्यांनी निलेशला पुढे बोलावून कल्पना दिली. निलेश असहाय्यपणे मीनलकडे बघायला लागला. त्या चोराने घरात कशाकशाला हात लावला असेल, आपल्या बेडवर तर झोपला नसेल? शी… तिच्या अंगावर काटा आला आणि ती ‘तोडा, तोडा, काय ते लवकर करा आणि त्याला बाहेर काढा’ असे ओरडली.
‘दार तोडलं तर आतला माणूस पळू शकतो. सगळे थोडे दूर उभे राहा आणि आम्हाला उभं राहायला जागा द्या,’ एक पोलीस म्हणाला आणि त्याने दारासमोरची गर्दी हटवायला सुरुवात केली.
‘आम्ही पकडतो,’ ऑफिसमधून आलेला पप्पूचा बाप म्हणाला. तिथल्या सगळ्यांच्यात आता चोराला पकडायची खुमखुमी निर्माण झालेली होती.
‘तुम्ही नको. आम्ही त्याकरताच आलो आहोत,’ पोलीस म्हणाला.
आता वातावरण एकदम सिनेमातल्यासारखं झालं. सगळे श्वास रोखून बघत होते. पोलिसांनी शेवटची
वॉर्निंग दिली, तरी आतून काहीच हालचाल नाही. एकदम गाढ झोपलेला दिसतोय चोर, असं सगळ्यांना वाटलं. मग एका पोलिसाने धावत येऊन दाराला धक्का दिला. दार ढिम्म हललं नाही. दुसर्‍याने प्रयत्न केला. काही नाही. मग दोन पोलिसांनी एकत्र येऊन एकदम धडका मारल्या, तरीही नाही.
सावंत काका कुजबुजले, ‘काय भक्कम दार आहे. मस्त काम झालंय सुताराचं.’ सगळ्यांनी त्यांच्याकडे रागाने पाहिलं. ‘अहो, मी फक्त माहिती म्हणून—’
‘बाबा, जरा गप बसा. आपण नंतर त्या सुताराचं कौतुक करू,’ त्यांची बायको त्यांच्यावर वैतागत म्हणाली.
पुन्हा एक जोरदार धक्का. आणि धड्डम! यावेळी कडी तुटली, दार आत जाऊन मागच्या भिंतीवर आदळलं आणि दोन पोलीस जवळजवळ लोळत आत गेले. गर्दीतून ‘अय्यो!’ ‘अरे!’ ‘धरा!’ असे आवाज उठले.
सगळ्यांचे डोळे दाराकडे लागले. बाहेरच्या खोलीत कोणी दिसेना. कोणी पळत बाहेरही आले नाही. बाहेरच्या लोकांना आत न येण्याची ताकीद देत पोलीस धाडदिशी आत शिरले.
त्यांनी बाहेरची खोली चेक केली. कोणी नाही.
मधली खोली पहिली. कोणी नाही.
मग दबा धरून थांबले आणि एकदम स्वयंपाकघरावर चढाई केली. कोणी नाही. एकदम शांतता पसरली.
मग मात्र पोलीस सगळ्या घरात पांगले पांगले आणि पलंगाखाली, माळ्यावर, बाथरूममध्ये, कोठीत, कपाटामागे— एकही जागा सोडली नाही. पण चोराचा पत्ता नाही. कोणी कुठेच दिसत नव्हते.
आता बाहेरच्या सगळ्यांच्या चेहर्‍यावर एकच भाव— मग हा पठ्ठ्या गेला कुठे? त्यांनी मीनल आणि निलेशला आत बोलावले. बेन्द्रे काकू हक्काने त्यांच्याबरोबर आत शिरल्या.
‘तुमच्या घरात चोरकप्पा आहे का?’ एका पोलिसाने विचारलं.
‘नाही,’ मीनल म्हणाली.
‘भिंतीत काही फट?’
‘नाही.’
‘माळ्यावरून दुसर्‍या घरात उडी मारता येते का?’
‘अहो, आमचं घर जादूचा बंगला नाही,’ तिने फटकारले.
तेवढ्यात बेन्द्रे काकूंचा संयम सुटला. ‘मी म्हणत होते ना, भुताटकी असू शकते. आमच्या माहेरी…’
‘काकू, चला बाहेर, तुम्ही आत कशाला आलात?’ हवालदारांनी सरळ सांगितलं. त्या बाहेर गेल्या, पण बाहेरही थांबल्या नाहीत. ‘माझ्या मामाच्या गावात एकदा असंच झालं होतं…’ असं म्हणत त्यांनी बाकीच्यांना तात्काळ गोष्ट सांगायला सुरुवात केली.
घरात हवालदार जाधव शांतपणे निरीक्षण करत होते, इकडे तिकडे बघत होते. जमिनीवर, कपाटावर, भिंतीकडे, पंख्याकडे. बाहेरच्या खोलीत पंखा अजूनही फुल स्पीडमध्ये फिरत होता. दार एका बाजूने निखळून लोंबत होतं.
हवालदारांनी दार परत उचललं. ‘जरा बाजूला व्हा,’ दारापाशी उभ्या असलेल्या लोकांना ते म्हणाले.
सगळे बाजूला झाले.
त्यांनी दार लावलेलं होतं तिथे तसंच धरून पाहिलं आणि पुढच्या क्षणी त्यांच्या चेहर्‍यावरचं भाव बदलले. त्यांनी वर पाहिलं. मग दारामागे पाहिलं. मग डोक्याला हात लावत मोठ्याने श्वास सोडला.
मीनल, निलेश, पोलीस आणि बाकी मंडळी कुतूहलाने बघत होती. दारामागच्या खिट्टीला निलेशची जीन्स अडकवलेली होती. पंख्याच्या वार्‍याने ती जोमात हेलकावे खात होती आणि हेलकावे घेताना तिचा पायघोळ खालच्या कडीला पुढे ढकलत होता. त्यामुळे दार ढकललं की ती कडी लागत होती आणि दार आतून लागलं जात होतं. निखळलेला दाराच्या कडीला ती आत्ताही पुढे ढकलत होती.
दोन सेकंद पूर्ण शांतता पसरली.
मग प्रथम एका पोलिसाच्या तोंडून हसू फुटलं. मग दुसर्‍या.
मग बेन्द्रे काकू बाहेरूनच ओरडल्या, ‘काय झालं? भूत दिसलं का?’
हवालदारांनी दार उघडून बाहेर बघत जाहीर केलं, ‘भूत नाही. चोरसुद्धा नाही, ह्या सगळ्या घटनेचे कारण ही दारामागे लावलेली जीन्सची पॅन्ट आहे.’
मीनलने कपाळावर हात मारला. निलेशने मान खाली घातली.
हवालदार जाधवांनी मिशा पिळत निलेशकडे पाहिलं. ‘ही तुमची?’
निलेश हळू आवाजात म्हणाला, ‘हो.’
‘आणि ती इथे का?’
मीनल मध्येच म्हणाली, ‘सकाळीच मी सांगितलं होतं यांना, मुख्य दाराच्या खिट्टीला काही अडकवू नका. पण हे ऐकतच नाहीत.’
‘अगं, मी घाईत होतो,’ निलेशने कुजबुजत बचाव केला, ‘रात्री आत नेतो म्हणालो होतो.’
‘आणि पंखा?’
‘तो तू विसरलीस.’
‘म्हणजे सगळी चूक माझी?’ मीनलने कटाक्ष टाकला.
‘नाही नाही, संयुक्त उपक्रम,’ हवालदार म्हणाले, आणि बाकी पोलीस खदखदले. सावंतकाकांनी कपाळावर हात मारला. बाहेरचे चाळकरी आता घरात डोकावून डोकावून पॅन्ट बघत होते, जणू एखाद्या गुन्हेगाराचा प्रत्यक्ष पुरावा पाहत आहेत. पप्पू तर म्हणाला, ‘काका, ही
पॅन्ट जप्त करणार का पोलीस?’
‘तुझ्या डोक्यावर घालू का? आता डोक्यावर चढवलं आहेस ते काढ आधी.’ त्याची आई करवदली.
बेन्द्रे काकू लगेच म्हणाल्या, ‘मी सकाळीच म्हटलं होतं. पॅन्ट तिथे चांगली दिसत नाही. आता बघा. काही कारण नसताना घरात पोलिस आले आणि दार तुटलं!’
सावंतकाका अजूनही आपल्या तांत्रिक विश्लेषणात होते. ‘म्हणजे पंख्याचा वेग,
पॅन्टचं वजन आणि कडीचा कोन, यामुळे दाराची कडी लागली. फार इंटरेस्टिंग
मेकॅनिझम आहे.’
‘काका, तुम्ही यावर संशोधन पेपर लिहा,’ कुणीतरी म्हणालं.
हवालदारांनी कागदावर काहीतरी लिहिल्यासारखं केलं आणि मग हसत हसत म्हणाले, ‘ठीक आहे. आता हे प्रकरण निकाली काढतो आहे. पण पुढच्या वेळी चोर शोधायच्या आधी पॅन्ट, टॉवेल, बादली, झाडू आणि दारं सगळं तपासा. मगच पोलिसांना बोलवा.’
मीनलला इतकी लाज वाटत होती की तिला जमीन दुभंगावी आणि आपण त्यात जावं असं वाटत होतं. पण त्याचवेळी परिस्थिती इतकी विनोदी होती की तिच्याही तोंडून हसू फुटलं. निलेशकडे पाहून ती म्हणाली, ‘तुमच्या एका पॅन्टने संपूर्ण सरकारी यंत्रणा हलवली.’
‘मग, पॅन्ट कोणाची आहे?,’ निलेश म्हणाला.
दोघेही हसू लागले.
पोलिस निघून गेले. जाताना हवालदार म्हणाले, ‘आता खराखुरा चोर असेल तेव्हाच येऊ, पॅन्टकरता नको.’
रात्र झाली. चाळ शांत झाली. पण गोष्ट शांत झाली नाही.
दुसर्‍या दिवशी सकाळपासून सगळ्यांची त्या विषयावरून मजा सुरू झाली. दूधवाला आला तेव्हा म्हणाला, ‘ताई, आज दार उघडतंय ना व्यवस्थित?’ पेपरवाला म्हणाला, ‘चोर पकडलात का?’ भाजीवालीने तर थेट विचारलं, ‘ती जीन्स देऊन टाकायची आहे का? मला द्या, नवर्‍याकरता हो…’
मुलांचं तर वेगळंच. रोहनचा शाळेत मान वाढला. त्याचे मित्र म्हणाले, ‘तुझ्या घरी चोर आला होता?’ तो छाती फुगवून म्हणाला, ‘हो. पण आम्ही पोलिस बोलावले. मग कळलं की तो पॅन्ट होता.’ मित्रांनी दोन सेकंद त्याच्याकडे पाहिलं, मग सगळे हसू लागले.
सईच्या मैत्रिणींनी तर तिला नवीन नाव दिलं— ‘इन्स्पेक्टर सई.’
चाळीतल्या लोकांनी संध्याकाळी कट्ट्यावर बसून घटनेचं विश्लेषण केलं. बेन्द्रे काकू अजूनही म्हणत होत्या, ‘माझ्या मते भुताटकीचा अंश होता. नाहीतर पॅन्ट इतकी हलते कशी?’ सावंतकाका लगेच म्हणाले, ‘भौतिकशास्त्र, काकू, भौतिकशास्त्र.’
‘तुम्ही आता गप्पच बसा. काल दाराचं कौतुक करत होतात.’
मीनलने त्या दिवशी सगळ्या चाळीकरता एक नवा नियम केला- कोणीही मुख्य दाराच्या खिट्टीला काहीही अडकवायचं नाही. नाही म्हणजे नाही. अगदी रुमालसुद्धा नाही. दुसरा नियम-घरातून बाहेर पडताना पंखा, गॅस, कडी, कुलूप, खिडकी, सगळं तपासायचं. तिसरा नियम- जर दार उघडत नसेल, तर आधी शांतपणे दारामागे काही आहे का, याचा विचार करायचा.
सगळ्यांनी माना डोलावल्या. पण दोन दिवसांनी निलेशने पुन्हा
टॉवेल दाराला अडकवला आणि मीनलने त्याच्यावर जसा कटाक्ष टाकला, ते पाहून त्याने टॉवेल दोन सेकंदात उचलला.
काही दिवसांनी चाळीत नवीन भाडेकरू आले. त्यांना सगळ्यांची ओळख करून दिली. आणि ओळख करून देताना बेन्द्रे काकूंनी पहिल्याच दिवशी सांगितलं, ‘ही मीनल. शिक्षिका आहे आणि हे तिचे मिस्टर निलेश. यांच्या पॅन्टमुळे हे दार तोडावे लागले होते.’
मीनलने कपाळावर हात मारला. ‘काकू, पुरे करा आता.’
‘अग, एवढा धमाल किस्सा कसा विसरायचा?’
आणि खरंच, तो किस्सा विसरला गेला नाही. प्रत्येक सणाला, प्रत्येक कट्ट्यावर, कुणी नवीन आलं किंवा कुणी ‘चोर’ हा शब्द जरी काढला तरी, ही गोष्ट नक्की बाहेर यायची. ‘अग, आमच्या चाळीत एकदा काय झालं माहितेय?’ अशी सुरुवात होताच सगळे हसायला तयार असत.
मीनललाही नंतर या गोष्टीचा राग राहिला नाही. उलट कधी कधी ती स्वतःच म्हणायची, ‘आमच्या घरी एकदा चोर घुसलाच नव्हता, पण पोलिस मात्र घुसले होते.’ आणि सगळे पुन्हा हसायचे.
शेवटी एवढं मात्र खरं की- कधी कधी आयुष्यातली मोठी भीती, भयानक वाटणारा प्रसंग हे एका विसरभोळेपणातून आणि एका जीन्स पॅन्टमुळेही घडू शकते. आणि मग वर्षानुवर्षे लोकांच्या हसण्याचा विषय बनतो.
खरं तर चोर घरात घुसलेलाच नव्हता. पण दाराच्या खिट्टीला लावलेली निलेशची पॅन्ट मात्र इतिहास घडवून गेली होती.

Previous Post

अकलेचा दुष्काळ!

Next Post

हे सुरांनो चंद्र व्हा!

Next Post
हे सुरांनो चंद्र व्हा!

हे सुरांनो चंद्र व्हा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.