• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

अकलेचा दुष्काळ!

टोक्या टोचणकर टोचन

Marmik Team by Marmik Team
November 21, 2026
in टोचन
0
अकलेचा दुष्काळ!

दिवाळीत काही प्रमुख राजकीय मंत्र्यांनी दिवाळी कशी साजरी केली याविषयी त्यांच्या मुलाखती घेण्यास माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या गेला तेव्हाच मी समजून गेलो की आता हा ऑडिओ टेपमधून खमंग फराळ घेऊन येणार, आणि ते खरेच झाले. त्याच नेत्यांच्या या प्रतिक्रिया-

फडणवीस : राज्यात एवढा मोठा दुष्काळ पडला असताना माझ्या या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पोटाला फराळ गोड कसा लागणार? त्यामुळे यंदा मी दिवाळीत बेसनचे लाडू, मुगाचे लाडू, रव्याचे लाडू, बुंदीचे लाडू न खाता शेव, चिवडा, कचोरी, फाफडा, गाठ्या, ढोकळा असे तिखट पदार्थ डोळ्यातून अश्रू ओघळेपर्यंत खाल्ले आणि ढेकर दिला. माझ्या डोळ्यासमोर सारखे त्या दुष्काळात होरपळत असलेल्या गरीब बिचार्‍या शेतकर्‍यांचे चेहरे येत होते. त्यामुळे प्रत्येक दुष्काळी शेतकर्‍याला पाच हजार रुपये इतकी मोठी रक्कम देण्याचा निर्णय आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आणि ती भलीमोठी रक्कम त्यांच्या खात्यात जेव्हा जमा झाली तेव्हाच मी सुटकेचा नि:श्वास सोडला. काही सहकारी म्हणाले, लाडक्या बहिणींप्रमाणे लाडके शेतकरी योजना सुरू करून प्रत्येक दुष्काळी शेतकर्‍याला दर महिन्याला दीड-दीड हजार रुपये देऊ या. मला त्यांचे म्हणणे पटले. कुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ही योजना सुरू करण्याचा विचार आहे. दुष्काळी भागात त्या गरीब शेतकर्‍यांच्या घरी जाऊन त्यांच्याबरोबर चटणी-भाकरही खाल्ली मी. त्या मायभगिनींनी मला केलेल्या ओवाळणीत मी चक्क शंभर-शंभर रुपये टाकले. त्यांना मी म्हटले, चिंता करू नका. आमचे सरकार गरीब आहे. डोक्यावर हजारो कोटींचे कर्ज आहे. जरी आमचे नेते, आमचे मंत्री आलिशान फ्लॅटमध्ये, बंगल्यामध्ये राहात आहेत. त्यांच्याकडे गडगंज पैसा असला तरी शेवटी त्यांच्या पुढच्या सात पिढ्यांपर्यंत तो पुरला पाहिजे याची काळजी त्यांनी घेतलीच पाहिजे ना! जसा शेतकरी जगला पाहिजे तसे आमचे नेते आणि मंत्रीही जगले पाहिजेत. तुमची सगळी कर्जे पुढच्या दुष्काळापर्यंत आम्ही संपूर्ण माफ करू, पण प्लीज आत्महत्या करू नका. नवीन कर्ज काढा. भविष्यात आम्ही ते माफ करू. सध्या पाच-पाच हजार देतोय, पुढे दहा-दहा हजार करू. पण आम्हाला मते द्या आणि या सरकारचे विसर्जन होणार नाही याची काळजी घ्या. जय-जवान जय किसान!

एकनाथ शिंदे : दुष्काळी शेतकर्‍यांची गंभीर परिस्थिती पाहून मी दिवाळीसुद्धा साजरी केली नाही. आज मी मुख्यमंत्री असतो तर प्रत्येक शेतकर्‍याला किमान पाच लाख आणि कमाल पन्नास लाख रुपये सरकारने दिले असते, तेही रोख. मी स्वत: शेतकरी आहे. शेतकर्‍यांची दु:खे मला माहीत आहेत. आता त्या शेतकर्‍यांची चाललेली थट्टा पाहून माझा जीव तीळतीळ तुटतो. पण मी काय करू? मला पुन्हा मुख्यमंत्री करा असे मी माझे अन्नदाते अमितजी शहाजी साहेबांना किती तरी प्रकारे पटवण्याचा प्रयत्न केला. मला मुख्यमंत्री केले तर सार्‍या राज्याला कसे आबादी आबाद करून सोडतो ते तुम्ही पहात राहा, असे मी त्यांना सांगितले तरी माझे ऐकायला तयार नाहीत. स्वत:च्या पक्षाचे इंप्रेशन मारण्यासाठी सारख्या महाराष्ट्रात चकरा मारतायत आणि आम्हाला नंदीसारखे त्यांच्या कार्यक्रमात स्टेजवर बसून मुंडी हलवावी लागते. माझा जीव तडफडतो, मी स्वत:वरच चरफडतो आणि माझ्या दरे गावी जाऊन विसावा घेत मन शांत करतो. नुसते शेतकर्‍यांच्या घरात त्यांच्याबरोबर जेवण घेतले म्हणजे दुष्काळ संपत नाही. त्यासाठी खमका मुख्यमंत्री पाहिजे. तोही माझ्यासारखा दिलदार आणि सारखे पैसे फेकणारा. पैसा कोणत्याही मार्गाने कमावलेला असो, तो हवा त्यांना हवा तेवढा देण्याची दानत पाहिजे. ती माझ्यात आहे. म्हणून मला दानशूर कर्ण म्हणतात. पण माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या रथाचे चाक कमळाच्या पक्षाच्या चिखलात जे रुतून बसले आहे ते निघत नाही तोपर्यंत माझे काही खरे नाही. एक तर माझे एकेक चित्रविचित्र सहकारी रोज काहीतरी नवीन उपद्व्याप करून मला अडचणीत आणत असतात. त्यांना समजावूनह कळत नाही. अशी बथ्थड माणसे माझ्याभोवती का आणि कशी गोळा झाली तेच समजत नाही. हीच माझ्या कर्माची फळे असतील तर त्यांच्या अकलेच्या दुष्काळाची बाधा मला तर होणार नाही ना, याचीच भीती वाटते. बघू काय होते ते. नाही तर आहेच आपली शेती आपली माती!

सुनेत्रा पवार : यंदा मी सुद्धा दुष्काळी भागांना भेटी दिल्या, शेतकर्‍यांचे दु:ख पाहिले. डोळ्यात पाणी आले. पवार घराण्यात आज आमचे हे असते तर शेतकर्‍यांवर अशी पाळी येऊ दिली नसती. आमच्या बारामतीत शेतकरी सुखी आहे, समाधानी आहे, ही अजितरावांची कृपा. त्यांनी आणि त्यांच्या काकांनी बारामतीसाठी खूप काही केले. संपत्ती चांगल्या कामासाठी खर्च व्हावी ही माझी इच्छा. ती दुष्काळग्रस्तांसाठी कारणी लागली तर मला खूप समाधान मिळेल.

Previous Post

मानसी

Next Post

दाराआडचा चोर

Next Post
दाराआडचा  चोर

दाराआडचा चोर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.