आषाढ महिना कधी धसमुसळा बरसतो तर कधी एखादी रिमझिमती सर घेऊन येतो. एक प्रकारे आषाढ श्रावणाचे चित्र काढण्यास सुरुवात करतो. चित्रात एक एक रंग भरले जातात. आषाढ फक्त रंग घेऊन येत नाही, तर गंधही घेऊन येतो. मातीला सुगंध देण्याची किमया केवळ पावसातच. तो कधी जोरदार बरसून जातो तर कधी दोन दोन दिवस पावसाची रिपरिप चालते. अशा वेळी नको नको वाटतो पाऊस. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने… अशी आपली अवस्था होते कवी ग्रेस यांच्या भाषेत. परंतु झाडांच्या अंगोपांगी आंघोळी होतात.
मोठमोठाली झाडेही सादळतात. उन्हाळाभर कोळपून निघालेला लाल करड्या मातीचा कोपरानकोपरा हिरवागार होतो. निसर्ग हिरवी जादू जमिनीवर पांघरून टाकतो. कोकीळ आदी पक्ष्यांनी मिलनाच्या आर्त हाका देऊन झालेल्या असतात. पावशाने पेरते व्हा, पेरते व्हा…म्हणत शेतकरी राजाला पेरणीचे संकेत दिलेले असतात. शेतकरी हे संकेत पाळत पेरणी उरकतो. त्यातून पोपटी अंकुर तरारून येतात. मातीच्या पोटात झिरपणारा पावसाचा एक एक थेंब पिऊन पिकं सरसरून वाढू लागतात. बघता बघता शेतांमध्ये पिकांच्या हिरव्या टवटवीत रांगा वार्यावर सळसळू लागतात. कवी ना. धों. महानोर यांच्या भाषेत या नभाने या भुईला हिरवेकंच दान दिलेले. आणि मातीतून चैतन्यही उगवून आलेले. भराभर गवत वाढीस लागते. उन्हाळ्यात चार्यासाठी दातावर दात घासणार्या जनावरांच्या तोंडी हिरवा घास पडलेला असतो. ही जित्राबं गवतावर कुरू कुरू ताव मारत असतात. कितीतरी प्रकारच्या कोवळ्या रानभाज्या तजेलदारपणे सळसळत असतात. सृष्टीचा अवघा सृजनसोहळा रंगलेला असतो.
कोरडेठक्क डोंगर नितळकंच पाण्याने पाझरू लागतात. धबधबे फेसाळत कोसळत असतात. नद्या नाले दुथडी वाहत असतात. जुने वाडे आणि भिंतीवर मखमली पोपटी शेवाळ रसरसून येते. बाभळीच्या हळदुल्या फुलांना अत्तरी सुगंध येत असतो. वर्षभरही झाडांना फुलं येतच असतात. पण फुलांनी झाड लदबदून जाणं ही खास पावसाळ्याचीच देणगी. घाणेरीची झुडपं रस्त्याकडेने फोफावलेली नेहमीच दिसतात. परंतु घाणेरीच्या एकाच फुलात लाल, गुलाबी, केशरी रंग खुलतो तो पावसाळ्याच्या रिमझिम धारांमध्ये. जाई, जुई, मोगर्याचा वेल यांनी खुलण्या फुलण्याचा कळस गाठलेला असतो आषाढात. पावसाच्या सरीवर सरी कोसळत राहतात. पावसाची सर थांबली की एखादा पक्षी पाऊस थेंबांनी जड झालेल्या झाडाच्या फांदीवर अलगद येऊन बसतो. अचानक आलेल्या पावसात पक्षी नेमके कुठे आश्रय घेतात हा एक प्रश्नच असतो. अशावेळी बा. सी. मर्ढेकरांची ‘ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी…’ ही ओळ मनात रेंगाळू लागते. सृष्टीला अवघं हिरवंपण बहाल करत आषाढ श्रावणापर्यंत येऊन पोहोचतो.
पावसाचा आषाढातला जोर विरळ होत जातो. आणि अचानक निसर्गात काही बदल जाणवू लागतात. सकाळी सकाळीच वार्यावर भुरभुरत पावसाचे काही कण येतात. आकाशभर धावणार्या करड्या ढगांमधून अचानक सूर्य डोकावतो. आपण हे दृश्य पाहत असतानाच पुन्हा झाकोळून येतं. पुन्हा पावसाची रिमझिम सुरू होते. क्षणाक्षणाला ऊन पावसाचा खेळ सुरू होतो. आपोआपच मनात आनंदलहरी उमटू लागतात. बालकवींनी रेखाटलेला हाच तो ‘हर्षमानस’. आपल्या डोळ्यासमोर लखलखीतपणे बालकवींचा ‘श्रावणमास’ येतो. ज्या निसर्गानं श्रावण महिना रचला त्यानेच प्रत्यक्ष बालकवी यांच्याकडून श्रावणमासी हर्ष मानसी… ही कविता लिहून घेतली असावी.
श्रावणातल्या एखाद्या दुपारी पाऊस झुरमुरत येतो. अंगातून एक थंडीची लहर उठते. आणि अचानक केशरी ऊन पांघरले जाते. आपण या उबदार उन्हात जाऊन उभे राहतो. उन्हाचे कोमट हात आपल्या अंगावरून फिरत असतात. तितक्यात पूर्वेकडे आभाळ लक्ष वेधून घेते. सप्तरंगी कमान उमटलेली असते. निसर्गाने इंद्रधनुष्य साकारलेला असतो. बालकवींच्या भाषेत ‘इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे…’ या ओळीचा तंतोतंत प्रत्यय आपल्याला येतो. आणि आपण स्वगत म्हटल्यासारखं स्वतःशीच म्हणतो, वाह क्या बात है… भिरभिरणार्या फुलपाखरांच्या पंखांवरील विविध रंगांच्या नक्षीकामात आपण हरवून जातो. निसर्गाइतका मोठा चित्रकारच नाही, हे फुलपाखरांच्या पंखांवरील अद्भूत कोरीव कामातून आपल्याला कळते.

श्रावणाचे हे विविध रंग आपण न्याहाळत असतानाच आपल्या लक्षात येते की अरे परिस्थिती तर फार बदलली. बालकवींच्या कवितेतील ‘सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह’ आता बागडतात कुठे? या हरणी तर आता केवळ उन्हाळ्यातच पाण्यासाठी सैरभैर ऊनझळा पिताना दिसतात. परंतु खिल्लारे अजूनही रानावनात चरताना दिसतात हेही नसे थोडके. ‘हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमलीचे’ अजूनही आढळतात ही सकारात्मक बाब.
श्रावणाचे असे आडवे उभे धागे आपल्या मनात विणले जात असतानाच आपल्याला आठवतं की, श्रावण हा तर महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. श्रावण म्हणजे खास सणांचा महिना. नवविवाहितांसाठी तर खास पर्वणीच. नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांवर श्रावणाचा अमीट ठसा उमटलेला आहे. नवविवाहिता श्रावणात सणावाराच्या निमित्ताने हमखास माहेरी जातात.
चार दिसावर उभा,
ओला श्रावण्ा झुलवा
न्याया पाठवा भावाला,
तिला माहेरी बोलवा
सासुरवाशीणीला सणानिमित्त माहेरची लागलेली ओढ शांता शेळके यांनी या कवितेतून मांडली आहे. या केवळ कवितेच्या ओळी नाहीत तर त्या माहेरवाशीणीच्या सुप्त भावनाच आहेत. आजच्यासारखी स्त्री काही वर्षांपूर्वीपर्यंत मुक्त नव्हती. तिच्यावर असंख्य बंधने लादण्यात आलेली होती. झोपेतून उठल्यापासून पुन्हा झोपेपर्यंत फक्त कष्ट आणि कष्टच स्त्रीच्या वाट्याला आलेले होते. या कष्टातून काही वेळ मुक्त होण्याचे प्रतीक नागपंचमीचा झोका बनले होते. यानिमित्ताने स्त्रीला आनंदहिंदोळ्यावर झुलता यायचे. नंतर मात्र परिस्थिती बदलत गेली आणि विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवत महिलांना आपला ‘झोका’ उंच उंच नेता आला.
नागपंचमीनंतर येणारा रक्षाबंधन हा सण देखील स्त्री भावविश्वाशी निगडितच. माणसांमधली पशुवृत्ती पूर्वीही होती, आजही कमी अधिक प्रमाणात आहेच. अशावेळी तिचे संरक्षण करण्यासाठी भावाइतका जवळचा कोणी नव्हता. त्यामुळे आजही स्त्री भावाला राखी बांधते. भाऊरायाला आयुष्यभर रक्षण करण्याच्या बंधनात ती एका धाग्यात गुंफून टाकते. पूर्वी नागपंचमीला झाडाझाडांवर झोके दिसायचे. एकाच झोक्यावर दोन मैत्रिणी उभ्या राहत. त्यांची झोका चढवण्याची चढाओढ लागायची. गेल्या दहा-बारा वर्षांपासून नागपंचमीच्या झोक्यांची दृश्य हळूहळू विरळ होत गेली. मोबाईलच्या जगात हरवलेल्या या काळात झोका जवळपास दिसेनासा झालाय.

महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीतला बैलपोळा हा सण श्रावण महिन्यातलाच. शेतीसाठी काबाडकष्ट करणार्या बैलाच्या श्रमाचा सन्मान म्हणजे हा सण. बैलांची सेवा करण्याची ही खास संधी. बैलांना खळखळून आंघोळी घालणे, त्यांची खांदेमळणी करणे, त्यांची शिंगे साळून त्याला रंग देणे यात पूर्वी सकाळची वेळ निघून जायची. बाजारातून आणलेल्या घुंगुरमाळा बैलांच्या गळ्यात बांधल्या जायच्या. नवीन कासरे (बैल बांधण्याचा दोर) जोडले जायचे. हिरवे, गुलाबी, निळे रंग खरेदीसाठी शेतकर्यांची बाजारात गर्दी उसळायची. हे रंग घरी आणून पाण्यात कालवून बटाट्याचे काप केले जायचे. त्यावर स्वस्तिक किंवा अन्य नक्षी करून हे शिक्के बैलांच्या पाठीवर मारले जायचे. भेंडीच्या कापाचे शिक्के म्हणजे फुलाफुलांची नक्षीच. शिवारातून असे हजारो बैल शेतकरी एकत्र करायचे. गावाच्या वेशीतून हे बैल मारुती मंदिराला फेर्या मारून आणले जायचे. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जायचा. बैलपोळ्याला हल्ली हे दृश्यही क्वचित दिसते.
श्रावण महिन्याची रंगत वाढवत नेण्यासाठी या सणांची रचना करण्यात आली. परंतु ग्रामीण भागाचे रूपही झपाट्याने बदलत गेले. तंत्रयुगात या सणांचे महत्त्व अल्पसे उरले. काळ यापुढेही बदलत राहील. आपल्याला पाठीमागे जाता येणार नाही. परंतु निसर्गाने दिलेलं सृष्टीवैभव आपल्याला जपता येईल. त्याचा आनंदही घेता येईल.
श्रावणसरीत मृदगंध ओला,
फुलाफुलांतून गंध भरला
मंगेश पाडगावकरांनी लक्ष वेधलेला हा ओला मृदगंध आपल्याला श्वासा श्वासात भरून घेता येईल. फुला फुलात ओतप्रोत भरलेला हा अलौकिक दरवळ आपल्याला जगण्याची नवी उभारी देईल.
झालासा सूर्यास्त वाटतो
सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरांवर,
उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे
या बालकवींच्या ओळींचा या श्रावणात आपल्याला प्रत्यय येईलच.
आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी
बा. सी. मर्ढेकर यांच्या कवितेसारखंच हा पावसाळा चातकचोचीने पीतच राहावा, असं वाटणं साहजिकच.

