• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नाटकाच्या कोंदणातला एकपात्री!

संजय डहाळे तिसरी घंटा

Marmik Team by Marmik Team
August 21, 2026
in तिसरी घंटा
0
नाटकाच्या कोंदणातला एकपात्री!

हिरो बनण्याची स्वप्नं डोक्यात घेऊन देशभरातून शेकडो तरुण मुंबईकडे ‘बॉलीवूड’च्या दिशेने रोजच येतात. या ग्लॅमरस दुनियेबद्दल कमालीची क्रेझ असणं तसं स्वाभाविकच आहे, कारण हे चंदेरी-रुपेरी जग उभं आयुष्य बदलून टाकतं. मग त्यासाठी वाट्टेल ते करण्याची या तरुणांची तयारी असते. पण ही वाट कमालीची तापदायक आणि नशिबावर अवलंबून असते. पण, जे स्वप्नात असतं ते नशिबात असेलच, असं नाही. सारेच अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खान बनू शकत नाहीत. पण स्वप्नं काही केल्या संपत नाहीत. अशाच एका धडपड्या तरुणाचं ‘सुपरस्टार’ बनण्याचं स्वप्न आहे. तो त्याच्या गावातून मुंबापुरीत येतो, त्याच्या स्वप्नांचं पुढे काय होतं, याच कथानक सिनेसृष्टीतील कल्पक दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘अ‍ॅनिमल’ या नाटकातून नव्याने मांडलंय. ते अनोख्या नाट्यशैलीत वेध घेणारे ठरते. असरानी यांच्या ‘चला मुरारी हिरो बनने!’ या चित्रपटाच्या नावाच्या चालीवर ‘चला दत्तू हिरो बनने!’ असंच म्हणावं लागेल!
दत्तू मांजरसुंभेकर हा नाटकाचा नायक. ग्रामीण बोली असलेला तरुण. प्रेक्षकांच्या खुर्च्या पार करून रंगमंचावर पोहोचतो. तो
नॉनस्टॉप बोलतोय. थकवा जराही नाही. कारण त्याचं स्वप्न आहे चित्रपटात सुपरस्टार बनायचं. त्याने तो झपाटलाय. त्यासाठी मुंबईत पोहोचलाही आहे…

मांजरसुंभे हे ग्रामीण महाराष्ट्रातलं एक दुष्काळी गाव. घरची गरीबी. दोन वेळेचं जेवण कसंबसं मिळायचं… घरात आई-वडील आणि बहीण. पोरगा मुंबईला निघाला म्हणून आईने हातातल्या सोन्याच्या बांगड्या त्याला दिल्यात. अडीअडचणीला त्याच्या कामाला येतील ही तिची काळजी. मुंबईत दत्तू आला खरा पण घर नाही, कुठलाही आधार नाही. मग मैदानात, फुटपाथवर, टपरीवर, जिथे जागा मिळेल तिथे तो कसाबसा दिवस काढतोय. मुंबई शहरातलं जिणं म्हणजे सारा पैशाचा खेळ. त्यात त्याचे पैसे संपतात. संकटाचे एक एक डोंगर आडवे येतात. पण काही केल्या त्याला ‘सुपरस्टार’ बनायचंय. त्याखेरीज त्याला शांतता नाही.

फाटक्या अवस्थेत दत्तू चित्रनगरीत पोहोचतो. एकेक निर्मात्यांची कार्यालयं गाठतो. कामासाठी दिवसरात्र पाठपुरावा चालूच. प्रसंगी लटकत ट्रेनमधून प्रवास करतो. धावपळीत पडतो, पळतो, रडतो. पण सगळीकडून नकारघंटा वाजते. काहीदा हकालपट्टीही होते. तरीही सुपरस्टारपदाच्या स्वप्नाने त्याच्यावर पूर्ण ताबा मिळवलाय. त्यातून सुटका अशक्यच. कुण्या शेट्टी नामक दिग्दर्शकाकडे तो पोहोचतो. इथे काम निश्चित होणारच, अशी पक्की आशा त्याला वाटते. अभिनयाचे नमुने तो दाखवतो. स्टारच्या नकला करतो. डायलॉग मारतो. आपण भविष्यातला सुपरस्टार असल्याचेही त्यांना सांगतो. पण प्रत्यक्षात त्याला ‘स्पॉटबॉय’चं काम मिळतं. त्यातही तो समाधानी आहे. कारण आज ना उद्या ‘स्पॉट बॉय’चा स्टार बनेल, अशी त्याला खात्री आहे. यापूर्वी अनेक जण असेच स्टार बनलेत असं तो सांगतो.

तिकडे गावात दत्तूची मैत्रीण सुमन आहे. दोघांच प्रेम प्रकरण. दोघांनी एकमेकांना लग्नाची वचनं दिलेली. ती गावाकडे दत्तूची वाट बघतेय. स्टार बनलेला दत्तू गावात येईल आणि सुखी संसार सुरू होईल, ही तिची स्वप्नं. सुमनच्या घरचे तिचं लग्न ठरवितात. दत्तूचं मनापासून प्रेम असलं तरी ते लग्नापर्यंत पोहोचू शकत नाही. तो हताश, अगतिक! सर्वांना फसवतो. आनंदी आहे. पिक्चर येतोय. स्टार बनलोय, असं खोटंनाटं सांगून गाववाल्यांची फसवणूक करतो.

दत्तूवर जीवापाड प्रेम करणारी त्याची बहीण देखील वाट बघतेय. ती आता घर चालविण्यासाठी गावाकडे कष्ट करतेय. मोलमजुरी करून दिवस काढतेय. आई-वडिलांना तिचाच एकमेव आधार आहे. आपला भाऊ खूप मोठा माणूस व्हावा असं तिलाही वाटतेय. काबाडकष्टामुळे ती आजारी पडते. तिचं काय होतं? दत्तू या मायानगरीत सुपरस्टार बनतो का? त्याचा संघर्ष यशस्वी होतो का? या प्रश्नांच्या उत्तरासाठी थेट अ‍ॅनिमल नाटक बघणं उत्तम.

नाटककार दिग्दर्शक खुद्द महेश मांजरेकर असल्याने हिंदी सिनेसृष्टीचं वातावरण संहितेतून तसेच प्रतीकात्मक नेपथ्यातून ताकदीने उभं केलंय. २०१० साली ‘मी शाहरुख मांजरसुंभेकर’ हे त्यांचं नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आलं होतं. त्याच नाटकाची आता नव्याने रंगरंगोटी करून अ‍ॅनिमल अवतरलाय. दोन्ही प्रयोगांचा तुलनात्मक विचार करता नवा प्रयोग अधिक प्रभावी झाल्याचे दिसते. नाटकाची शैली एकपात्री आहे. म्हणजे यात सहकारी पात्रे आहेत, पण ती निव्वळ मूकपटाप्रमाणे पुढे येतात. प्रतिसादापुरती आहेत. दत्तूलाच संवाद दिलेत. हे एक शैलीतलं वेगळेपण. दिग्दर्शन वेगवान, कुठेही रेंगाळत नाही. प्रसंगामागून प्रसंग घडतच जातात. घटनापटाची गुंफण आशयाला न्याय देणारी ठरते. चर्चेच्या ओघात काही राजकीय, सामाजिक घटनांचा संदर्भ येतो. उदाहरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजकीय बदल, पेपरफुटीचे आंदोलन वगैरे विषयांचे संदर्भ ताजे असल्याने त्यांच्यावरच्या टिप्पणीला रसिकांचा प्रतिसाद मिळतो खरा, पण त्यामुळे मूळ नाट्य भरकटण्याचे भय आहे. म्हणून ते अनावश्यक वाटते.

प्रसंगबदलात गाजलेल्या हिंदी गाण्यांचा समर्पक वापर केलाय. गुलाबी आँखें… किसीकी मुस्कुराहटों पे हो निसार… मुसाफिर हूँ यारो… जागो मोहन प्यारे… थोडी थोडी पिया करो… जा जा मुझे ना अब याद आ… अशी गाणी नेमकेपणाने निवडली आहेत. दिग्दर्शन आणि संहिता ही एकहाती असल्याने प्रयोग पकड घेतो. नायक सिद्धार्थ जाधव याने महेश मांजरेकरांसोबत बरीच वर्षे काम केलेलं असल्याने दोघांचे ट्युनिंग मस्त आहे. त्यामुळे अनेक गाळलेल्या जागा सफाईदारपणे भरल्या जातात.

गेली पंचवीसएक वर्षे रसिकांना भुरळ पाडणारा स्टार अभिनेता सिद्धार्थ जाधव याची दत्तूची भूमिका हेच या नाटकाचे आकर्षण आहे. लोच्या झाला रे, जागो मोहन प्यारे, तुमचा मुलगा काय करतोय, गेला उडत अशा नाटकांतून सिद्धार्थने यापूर्वी ठसा उमटविला आहे. पण मध्यंतरी तो हिंदी चित्रपटांत गेल्याने चक्क आठ वर्षांनी त्याने पुन्हा मराठी रंगभूमीवर पदार्पण केलंय. कारुण्य, भोळेपणा, स्वप्नाळू वृत्ती या अनेक भावभावना त्याच्या भूमिकेतून प्रगट होतात. दुःखाचा मनात कोंडमारा करून स्वप्नांचा घेतलेला वेध विलक्षणच ठरतो. दोन तास नॉनस्टॉप संवाद ज्या आत्मविश्वासाने तो पेश करतो, ते थक्क करून सोडतं. टायमिंगची अचूक जाण आणि प्रचंड ऊर्जा ही त्यातल्या कलाकाराची जमेची बाजू. नाटकाचा शेवट हृदय पिळवटून टाकणारा. तो उत्कर्षबिंदू ठरतो. तो प्रसंग अक्षरशः अंगावर येतो. अस्वस्थही करतो. त्यातली उत्कटता विलक्षण आहे. त्यामुळे दत्तूची व्यक्तिरेखा एका उंचीवर पोहोचते आणि चटका लावून जाते. दत्तूच्या भूमिकेने खास सिद्धार्थसाठीच जन्म घेतलाय, एवढी फिट्ट बसते ती. मराठी नाटकाला अमराठी प्रेक्षकांनाही खेचून आणण्याचे श्रेयही सिद्धार्थला आहे. पडदा पडला तरी दत्तूची कथा, व्यथा सलत राहते. अस्वस्थ करते.

सिद्धार्थ जाधव या नाटकाच्या निमित्ताने निर्माताही बनलाय. त्याने नाट्यउभारणीत कुठेही कसूर ठेवलेली नाही. भरत जाधव, प्रशांत दामले यांच्या मालिकेत निर्माता कम अभिनेता अशा दुहेरी भूमिका बजावणारा तो रंगधर्मी ठरलाय. या नव्या जबाबदारीसाठी त्याला शुभेच्छा. नाट्यात दत्तूसोबत वावरणार्‍या रंगकर्मींना संवाद नसले तरी भूमिकेची चांगली समज प्रत्येकाला आहे. जवळचा दोस्त असलेला सिद्धार्थ साळवी याने एकही शब्द न बोलता अभिनयातून साथ दिलीय. शुभ्र कपड्यातला हा मित्र दत्तूच्या रंगप्रवासाचा साक्षीदार ठरतो. अन्य भूमिकांमध्ये पंकज पंचारिया, अतिका अर्जुन, आदित्य पंढरे, संदीप जुवाटकर यांनी हजेरी लावली आहे. ट्रेनच्या प्रवासातली गर्दी सार्‍यांनी मस्त उभी केलीय. टीमवर्क चांगले जुळले आहे.

नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी प्रतीकात्मक नेपथ्य केले असून त्यातून नेमकी वातावरणनिर्मिती होते. जॉगिंग ट्रॅक आणि मैदान, फुटपाथवरचा मुक्काम, ट्रेनचा दरवाजा, माउंट मेरी रस्ता, चित्रनगरी, निर्मात्यांचे ऑफिस, डीकास्टा कंट्रीबार, शूटिंग स्पॉट हे सारं काही प्रसंगाला न्याय देणारे. श्याम चव्हाण यांची प्रकाशयोजना आणि सायली पांगारे यांची वेशभूषा आहे. एकूणच तांत्रिक बाजूंनी हा नाटकातला एकपात्री प्रयोग उत्तम सजविण्यात आलाय. संगीताची बाजू महेश मांजरेकर यांनी हाती घेतली असून त्यात ‘बॉलिवूड टच’ देण्याचा प्रयत्न दिसतो. मराठीप्रमाणे हिंदीतही या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. त्यासाठी मांजरेकरांनी पुढाकार घेतलाय. देशभरात या नाटकाचे दोन्ही भाषांत प्रयोग करण्याचाही निर्मात्यांचा प्रयत्न आहे.

नाटकाचे नाव ‘अ‍ॅनिमल’. आता हेच नाव का ?कशाला? यावर एक भलं मोठं दत्तूचं स्वगत येतं खरं, पण ते पटत नाही. नाव अधिक सुसंगत असतं तर बरं झालं असतं. कारण या नावातून आशयाचा अर्थबोध होत नाही आणि रसिकांची उत्कंठाही वाढत नाही. अनेक नाटकांची रसिकांच्या पचनी न पडलेली नावे आजकाल बदलली आहेत. त्याचे अनुकरण करण्यास हरकत नसावी. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा ‘वन अँड ओन्ली’ सिद्धार्थ जाधव याला डोळ्यापुढे ठेवून त्याच्या देहबोलीवर बेतलेले हे नाट्य. सिद्धूने मनोरंजन दुनियेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलीय. तो घराघरात पोहोचला आहे. या नाटकातला हा ‘वन मॅन शो’ जो चाणाक्ष दिग्दर्शक आणि उत्साही नायक यांनी परिणामकारकपणे हाताळला आहे. आवर्जून पहावं असाच हा प्रयोग आहे.
अ‍ॅनिमल
लेखन /दिग्दर्शन :- महेश मांजरेकर
नेपथ्य :- संदेश बेंद्रे
प्रकाश :- श्याम सावंत
संगीत :- महेश मांजरेकर
वेशभूषा :- सायली पांगारे
रंगभूषा :- बिपिन येरूणकर
सूत्रधार :- गोट्या सावंत
निर्माता :- सिद्धार्थ जाधव
निर्मिती संस्था :- अश्वमी थिएटर्स/ ताराराम प्रोडक्शन
छायाचित्रे : संजय पेठे

Previous Post

प्रक्षाळ काढा

Next Post

हिरवे हिरवेगार गालिचे, शब्दतृणांच्या मखमालीचे…

Next Post
हिरवे हिरवेगार गालिचे,  शब्दतृणांच्या मखमालीचे…

हिरवे हिरवेगार गालिचे, शब्दतृणांच्या मखमालीचे...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.