• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

हिंदुराष्ट्र आणि विश्वगुरु!

योगेश वसंत त्रिवेदी (चौफेर)

marmik by marmik
May 8, 2026
in विशेष लेख
0
हिंदुराष्ट्र आणि विश्वगुरु!

पांडुरंग शास्त्री आठवले, डोंगरे महाराज यांच्यापासून मोरारी बापू, रमेशभाई ओझा आदींच्या मुखाने श्रीमद्भगवत आणि रामकथा ऐकण्याची एक पर्वणी असते. अलीकडे कवी कुमार विश्वास हेही लोकप्रिय होत आहेत. परंतु या सर्वांपेक्षा हल्ली सरसंघचालक डॉ. मोहनरावांचे ‘भागवत’ ऐकण्याची सुसंधी लाभतेय. आता त्यांनी त्यात नवीनच मुद्द्याला हात घातला आहे. हा मुद्दा आहे हिंदुराष्ट्राचा. डॉ मोहन भागवत म्हणतात की आपला देश हा मुळातच हिंदुस्थान आहे आणि तो खर्‍या अर्थाने हिंदुराष्ट्रच आहे, त्यामुळे स्वतंत्र हिंदुराष्ट्र जाहीर करण्याची आवश्यकता नाही.

भारताच्या फाळणीला कारक ठरला होता लाहोर ठराव किंवा लाहोर प्रस्ताव (उर्दू : क़रारदाद-ए-लाहौर ; बंगाली : लाहोर प्रोश्ताब). याला स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव असे सुद्धा म्हटले जाते. २२ ते २४ मार्च १९४० या काळात तत्कालीन भारतातील लाहोर येथे मुस्लिम लीगच्या तीन दिवसीय अधिवेशनात मांडलेल्या या ठरावात स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करण्यात आली होती. मोहम्मद जफरुल्लाह खान यांनी लिहिलेल्या ठरावानुसार भारताच्या पूर्व आणि पश्चिम मुस्लिमबहुल प्रांताला स्वतंत्र पाकिस्तानचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. नवीन देशाचे पाकिस्तान हे नाव फार पूर्वीच चौधरी रहमत अली यांनी ठरवले होते.

बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि इतर मुस्लिम नेते जवळपास १९३९पर्यंत हिंदू मुस्लिम ऐक्यावर ठाम होते. परंतु इंग्रजांनी अवलंबलेल्या फोडा आणि राज्य करा या कूटनीतीमुळे शेवटी हा ठराव संमत करण्यात आला. १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारतातून फुटून पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानचे नाव ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’ असे आहे. पाकिस्तानच्या पारपत्रावरही (पासपोर्ट) हेच नाव अंकित करण्यात आले आहे. परंतु, भारताचे नाव ‘हिंदू रिपब्लिक ऑफ हिंदुस्थान’ करण्यात आलेले नाही. राजा भरतामुळे झालेला भारत, हिंदुस्थान आणि इंडिया अशी आपल्या देशाची तीन प्रकारची नावे आहेत. आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्याला बारा वर्षे उलटून गेली तरी त्यात यात कोणताही बदल होऊ शकलेला नाही. अगदी अलाहाबादचे प्रयागराज करण्यापासून अहमदनगरचे अहिल्या नगर झाले असले तरी अहमदाबादचे कर्णावती होऊ शकलेले नाही.

त्याउलट २६ जानेवारी १९५० रोजी भारत हा प्रजासत्ताक देश म्हणून ओळखण्यात येऊ लागला. धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हा आपल्या राज्यघटनेचा पाया आहे. इतकेच नव्हे तर दुहेरी निष्ठेच्या खडकावर जनता पक्षाची बोट फुटून ६ एप्रिल १९८० रोजी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विजयाराजे शिंदे यांच्या आधिपत्याखाली मुंबईत महाअधिवेशन भरवून भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हा त्या पक्षानेही गांधीवादी समाजवाद स्वीकारला होता. हिंदुराष्ट्रवाद नाही.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८७ साली खणखणीत, दणदणीत हिंदुत्व स्वीकारले. ते लक्षात घेऊन भाजपचे चाणक्य प्रमोद महाजन यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेशी युती केली. परंतु भाजपचे नेतृत्व पक्षाच्या झेंड्यातून हिरवा रंग काढू शकलेले नाही. उलटपक्षी शिवसेनेचा झेंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निखळ आणि निव्वळ भगवा झेंडा आहे. नरेंद्र मोदी बारा वर्षे पंतप्रधान असूनही ‘हिंदू खतरेमें’ असल्याची आवई उठवली जाते. मग समाजमाध्यमावर खिल्ली उडवितांना ‘अब मुस्लिम प्रधानमंत्री बनेगा तो ही मुस्लिम खतरेमें आएगा!’ असे संदेश फिरतात. वैष्णव जन तो तेणे कहिये जे पीड पराई जाणे रे अशी प्रार्थना करणारे महात्मा गांधी भारताचे हिंदुराष्ट्र करू शकले नाहीत, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या माध्यमातूनही ते करवून घेऊ शकले नाहीत. आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनाच या देशाला हिंदुराष्ट्र बनविण्यासाठी डॉ. भागवत यांनी गळ घालणे आवश्यक आहे. पण आता ते होऊ शकणार नाही. कारण चंद्राबाबू नायडू आणि नीतिशकुमार यांच्या दोन कुबड्यांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार टिकून आहे. या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता असती तर आणि तरच ते घडू शकले असते हे निःसंशय. परंतु शिवसेनाप्रमुखांच्या मेहेरबानीवर राज्यशकट हाकणार्‍या सत्ताधीशांनीच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तुकडे करून त्यांचे धनुष्यबाण हिरावून घेतले आहे.

विश्वगुरूपद बरखास्त?
नरेंद्र मोदी २६ मे २०१४ रोजी देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हापासून त्यांचे भक्त त्यांना विश्वगुरूची उपाधी देत आहेत. काही भक्त तर मोदींचे भगवान विष्णूच्या तेराव्या अवतारात दर्शन घेते झाले. पुण्यात तर चक्क मोदींचे मंदिर उभारण्याचा प्रयत्न झाला आणि हनुमान चालीसाप्रमाणे मोदी चालीसाही अस्तित्वात आली. मातोश्रींचं निधन झाल्यानंतर मोदींनी आपण देवाने पाठविलेले (नॉन बायो
लॉजिकल) असल्याचे सांगितले होते. थोर प्रकांड पंडित आणि भारतीय जनता पक्षाचे संस्थापक सदस्य डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी एप्रिल २०२६च्या तिसर्‍या आठवड्याच्या प्रारंभी नवी दिल्ली येथे भक्तांना सणसणीत चपराक लगावली. ‘भारत विश्वगुरू’ नाही, असे विधान करून त्यांनी संघ व भाजपच्या नेत्यांवर खोचक टिप्पणी केली. ‘संस्कृत भारती’च्या मुख्यालयाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना जोशींनी, ‘विश्वगुरू’ हा शब्दप्रयोग टाळावा, असाही सल्ला दिला. आपण सध्या ‘विश्वगुरू’ नाही. मात्र, ‘विश्वगुरू’ होण्याची आकांक्षा ठेवली पाहिजे, असे जोशी म्हणाले. मराठीमध्ये एक म्हण आहे की सोनाराने कान टोचले तर ते दुखत नाहीत. परंतु सोनारांनी कितीही कान टोचले तरी ‘यां(भक्तां)ना’ काहीही फरक पडणार नाही हेही तितकेच खरे. तूर्तास इतकेच!

(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)

Previous Post

शिव्या हेच आपले छुपे वैभव!

Next Post

वेगे वेगे धावे, सेबास्टियन सावे!

Next Post
वेगे वेगे धावे, सेबास्टियन सावे!

वेगे वेगे धावे, सेबास्टियन सावे!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.