
१०० मीटर शर्यतीत विजेता हा जगातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून गौरवला जातो; पण ४२.१९५ किलोमीटर अंतर पूर्ण करीत दीर्घ पल्ल्याची मॅरेथॉन शर्यत जिंकणारा धावपटू दुर्लक्षित राहतो. नुकतीच केनियाच्या सेबास्टियन सावेने लंडन मॅरेथॉन शर्यत १ तास, ५९ मिनिटे आणि ३० सेकंदांत पूर्ण करीत विश्वविक्रम नोंदवला. मानवी क्षमतेची सर्वोच्च कसोटी पाहणार्या या पराक्रमाने दोन तासांच्या आत ही शर्यत जिंकणार्या ‘मॅरेथॉनच्या राजा’च्या कामगिरीचा हा आढावा-
जगातील सर्वात वेगवान धावपटू कोण? उसेन बोल्ट!… हे तर कुणीही सांगेल. पण मॅरेथॉनमधील विश्वविजेता कोण? हे कुणालाही सांगता येणार नाही. मॅरेथॉन ही मोठी शर्यत असते, लांब पल्ल्याची. मला मोठ्या शर्यतीत जिंकायच्या आहेत, असे सैफ अली खान ‘रेस’ चित्रपटात म्हणतो. पण, वास्तवात १०० मीटरमधील विजेता हा जगातला सर्वात वेगवान व्यक्ती म्हणून गौरवला जातो. लांब पल्ल्याची मॅरेथॉन शर्यत जिंकणार्या धावपटूची कधीच चर्चा होत नाही. मॅरेथॉनच्या उगमाची ग्रीक आख्यायिका सर्वपरिचित आहे. १८९६च्या ऑलिम्पिकमध्येही या स्पर्धेचा समावेश होता. पण हे अंतर प्रारंभीच्या काळात निश्चित नव्हते. ते स्पर्धेनुसार बदलले जायचे. पण १९२१पासून ते ४२.१९५ किलोमीटर म्हणजेच सुमारे २६.२ मैल असे प्रमाणित करण्यात आले. ही शर्यत पूर्ण करण्यासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागायचा. देशोदेशी अनेक मॅरेथॉन स्पर्धा होतात. पण त्या लक्षात राहात नाहीत, येतात आणि जातात. पण रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ची लंडन
मॅरेथॉन शर्यतीने जगभराचे लक्ष वेधले. न भूतो, न भविष्यती असा पराक्रम केनियाच्या ३१ वर्षीय सेबास्टियन सावेने करून दाखवला. त्याने ही शर्यत १ तास, ५९ मिनिटे आणि ३० सेकंदांत पूर्ण केली. या शर्यतीत दुसरा क्रमांक मिळवणार्या योमिफ केजेलचा आणि सावे यांच्यातील वेळेचा फरक हा फक्त ११ सेकंदांचा.
२०२३च्या शिकागो मॅरेथॉनमध्ये केनियाच्याच केल्व्हिन किपटमने २ तास, ३५ सेकंदांत शर्यत पूर्ण करून दखल घ्यायला लावली होती. पण तरीही दोन तासापेक्षा कमी वेळ धावपटूंना साद घालत होती. अंतर तितकेच, पण ते गाठण्याची क्षमता असणारे बरेच धावपटू हे केनियाचे, काही वेळा इथियोपियाचे, म्हणजेच आप्रिâका खंडातले. डोंगर-दर्यांचा हा प्रदेश आणि जगण्यासाठीचा अथक संघर्ष हा तिथल्या मातीचाच गुण. त्यामुळे वेळेशी स्पर्धा करणे, उच्च दर्जाचे प्रशिक्षण, सुपर शूज हे घटक महत्त्वाचे ठरतात. गेल्या शंभर-सव्वाशे वर्षांच्या
मॅरेथॉनच्या इतिहासातील मानवी क्षमतेच्या पल्याडची ही विश्वविक्रमी धाव, म्हणूनच मिथक!
सेबास्टियन सावे कोण?
कोण हा सेबास्टियन सावे, हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. सेबास्टियनचा जन्म रिफ्ट खोर्यातील बार्सोम्बे या गावात झाला. इथेच तो लहानाचा मोठा झाला. जिथून केल्विन किपटम, एल्युड किपचोगे, फेथ किपयेगॉन यांसारखे अनेक धावपटू उदयास आले. हे सर्व कालेनजिन वंशातील लांब पल्ल्याचे धावपटू. सध्या पुरुष आणि महिलांच्या अनेक शर्यतींवर आणि विक्रमांवर त्यांचेच वर्चस्व दिसून येते. म्हणजेच सेबास्टियनने ज्याचा विक्रम मोडला, तोही याच भागातला. तर किपचोगे हा पाच हजार मीटरचा विश्वविजेता. सेबास्टियनचे वडील सिमियन हे शेतकरी, तर आई एमली हिलासुद्धा धावण्याची आवड होती; परंतु परिस्थितीमुळे खेळाकडे दुर्लक्ष झाले. आई-वडील मक्याच्या शेतांवर मजुरी करण्यासाठी स्थलांतरित व्हायचे. त्यामुळे सेबास्टियनचे बालपणी संगोपन त्याच्या आजीने केले. तो वाढला, तेव्हा त्याच्या घरात वीज नव्हती. पण जिद्दीने इटेन येथील सेंट पॅट्रिक्स हायस्कूल येथे त्याने शिक्षण पूर्ण केले. त्याचे शिक्षक ज्युलियस केमेई यांनी त्याचे धावण्याचे कौशल्य ओळखले आणि त्याला प्रोत्साहन दिले. त्याचे काका अब्राहम शेपकिरवोक हे युगांडामधील ८०० मीटर अंतराच्या शर्यतीचे राष्ट्रीय विक्रमवीर. त्यांच्याकडून धावण्याचे प्राथमिक धडे गिरवल्यानंतर सेबास्टियनची सुरुवातीची कारकीर्द ट्रॅकवर आणि
अर्ध-मॅरेथॉन शर्यतीत गेली.

सप्टेंबर २०२२मध्ये त्याने ब्रुसेल्स येथील अर्ध-मॅरेथॉन शर्यत साठ मिनिटांत पार करत केनियाचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला, जो जागतिक विक्रमाच्या अगदी जवळ होता. त्या पराक्रमामुळे सेबास्टियन चर्चेत आला. जो खेळाडू ट्रॅकवर एका तासासाठी प्रति किमी अडीच मिनिटांपेक्षा कमी गती टिकवू शकतो, तो नक्कीच भविष्यात चमत्कार घडवू शकतो. मग सप्टेंबर २०२४ मध्ये कोपेनहॅगन
अर्ध-मॅरेथॉन शर्यतीत सेबास्टियनने ५८ मिनिटे, ०५ सेकंद अशी आश्चर्यकारक वेळ नोंदवली. मग सेबास्टियनला वेध लागले, ते २६.२ मैलांचे आणि जगाच्या त्याच्याकडून अपेक्षा उंचावल्या. या वर्षी त्याने प्रथमच व्हॅलेन्सिया मॅरेथॉनमध्ये भाग घेत २ तास, २ मिनिटे, ५ सेकंद अशी वेळ नोंदवली. २०२५ मध्ये हे यश कायम ठेवताना लंडन मॅरेथॉन (२ तास, २ मिनिटे, २७ सेकंद) आणि बर्लिन मॅरेथॉन (२ तास, २ मिनिटे, १६ सेकंद) स्पर्धा जिंकण्याची किमया साधली. त्यामुळे किपटमचा वारसदार म्हणून सेबास्टियनकडे पाहिले जाऊ लागले. मग या वर्षे अपेक्षेप्रमाणेच त्याने ही विश्वविक्रमी धाव घेतली.
उत्तेजक चाचण्यांचा ससेमिरा!
गेल्या काही वर्षांत केनियाचे मॅरेथॉनविश्व उत्तेजकांच्या विळख्याने हादरले आहे. अनेकांवर बंदीची कारवाईसुद्धा झाली आहे. सेबास्टियनने दोन वर्षांपूर्वी पदार्पणातच लक्षवेधी कामगिरी, तेव्हा या अज्ञात धावपटूविषयी सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आणि त्याच्या कामगिरीबाबत शंकाही उपस्थित केल्या गेल्या. बर्लिन मॅरेथॉनच्या तयारीदरम्यान क्रीडापटू नैतिकता समितीकडून त्याच्या जवळपास २५ स्पर्धेव्यतिरिक्त उत्तेजक चाचण्या घेण्यात आल्या. पण सेबास्टियन यापैकी कोणत्याही चाचणीत दोषी आढळला नाही. यंदाच्या लंडन
मॅरेथॉनच्या तयारीदरम्यानही अशाच प्रकारे उत्तेजक चाचण्यांचे अडथळे त्याने ओलांडले.
कोणती विश्वविक्रमी वेळ योग्य?
सेबास्टियनने दोन तासांच्या आत वेळ गाठून जो महापराक्रम दाखवला, त्यात नावीन्य काय? ही वेळ तर ईल्युड किपचोगेने ऑक्टोबर २०१९मध्ये व्हिएन्नात आधीच नोंदवली आहे. यात तथ्य नाही. किपचोगेची कामगिरी जरी थक्क करणारी असली, तरी काही तांत्रिक कारणांमुळे त्या कामगिरीला अधिकृत विश्वविक्रम म्हणून मान्यता मिळाली नाही. यापैकी पहिले कारण म्हणजे व्हिएन्नातील ज्या स्पर्धेत किपचोगे धावला, ती खुली शर्यत नव्हती. म्हणजेच किपचोगे इतर धावपटूंविरुद्ध नाही, तर एकटाच धावत होता. सतत बदलणार्या ४१ नामांकित पेसमेकर्सचा संरक्षित गट त्याच्या सोबतीला होता. एक कार रस्त्यावर त्याला योग्य गती दाखवत होती. याचप्रमाणे त्याला पाणी किंवा एनर्जी पेयाच्या बाटल्या स्थिर टेबलवरून घेण्याऐवजी चालत्या सायकलवरून दिल्या जात होत्या. त्या तुलनेत, सेबास्टियन ज्या लंडन
मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला, ती जागतिक मॅरेथॉनमधील प्रतिष्ठेची शर्यत आहे. यात दिग्गज धावपटूंचाही सहभाग होता. तसेच पेसर ठराविक अंतरानंतर बाहेर पडले. म्हणजेच जागतिक अॅथलेटिक्स संघटनेच्या मानक नियमांनुसार ही मॅरेथॉन शर्यत झाली.
सेबास्टियनसमोर पुढील आव्हान
आता सेबास्टियनसमोर पुढील आव्हान असेल, ते सप्टेंबरमध्ये बर्लिन मॅरेथॉनचे. तो पुन्हा दोन तासांच्या आयात ही शर्यत जिंकण्याचे कर्तृत्व दाखवेल का? तो आपलाच विश्वविक्रम पुन्हा मोडीत काढून नवी वेळ नोंदवेल का? हे प्रश्न सध्या चर्चेत आहेत. खरे आव्हान तर त्यांच्यापुढे दोन वर्षांनी आहे, ते म्हणजे लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचे. जगातील या सर्वात मोठ्या व्यासपीठावर तो आपल्या पराक्रमाची पुनरावृत्ती करेल का? तूर्तास, दोन वर्षांपूर्वी मॅरेथॉनविश्वाला ठाऊक नसलेला हा केनियाचा पठ्ठ्या वयाच्या ३१ व्या वर्षी मॅरेथॉन म्हणजेच सर्वात दीर्घ पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीत मानवाच्या अचाट क्षमतेचे दर्शन घडवतो, याचे कौतुक करूया!

