
मुंबईच्या परळ परिसरात उभं असलेलं किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल ज्याला मुंबईकर ‘के.ई.एम.’ म्हणतात ही केवळ एक रुग्णालयाची इमारत नाही; ती एक जिवंत संस्था आहे. गेल्या शंभर वर्षांत लाखो गरीब, मध्यमवर्गीय आणि सामान्य माणसांनी या रुग्णालयाच्या दारात येऊन जगण्याची आशा जपली आहे. आज मात्र या रुग्णालयाच्या नावावरून एक वेगळाच वाद पेटला आहे आणि तो वाद राजकारण, अस्मिता आणि प्राधान्यक्रमाचा आहे.
इतिहासाची पाळंमुळं
के.ई.एम. हॉस्पिटलची स्थापना १९२६मध्ये झाली. ब्रिटिश राजवटीत मुंबई महापालिकेने हे रुग्णालय उभारलं आणि त्याला तत्कालीन ब्रिटिश सम्राट किंग एडवर्ड सातवे यांचं नाव देण्यात आलं. किंग एडवर्ड सातवे (९ नोव्हेंबर १८४१ ते ६ मे १९१०) हे ब्रिटनचे राजे होते. ते राणी व्हिक्टोरिया आणि प्रिन्स अल्बर्ट यांचे थोरले चिरंजीव होते. ते १९०१ ते १९१० या काळात युनायटेड किंगडमचे राजे आणि भारताचे सम्राट होते. राणी व्हिक्टोरियाच्या दीर्घ कारकीर्दीनंतर त्यांनी राजघराण्याची प्रतिमा जपली. एडवर्ड सातवे यांनी के.ई.एम. हॉस्पिटलला एक पैसाही दिला नव्हता! रुग्णालय बांधलं गेलं १९२६मध्ये पण एडवर्ड सातवे १९१०मध्येच मरण पावले होते. म्हणजे जेव्हा हे रुग्णालय उभं राहिलं, तेव्हा ते जिवंतही नव्हते! मग नाव का दिलं? तर के.ई.एम.चं नावं देणं ही एक श्रद्धांजली होती. ब्रिटिश राजाच्या स्मरणार्थ नाव दिलेलं एक स्मारक रुग्णालय. ब्रिटिश राजवटीत अशा प्रकारे राजाचं नाव सार्वजनिक ठिकाणांना देण्याची प्रथा होती हा एक राजकीय आदरभाव होता.
तेव्हा रुग्णालयाच्या बांधकामाचा एकूण खर्च २५,२७,६९९ आला होता, तर वैद्यकीय महाविद्यालयाचा खर्च रु. १३,६४,५७४ झाला होता. हा सगळा पैसा मुंबई महापालिकेने दिला होता. याशिवाय शेठ गोरधनदास सुंदरदास यांच्या वारसांनी वैद्यकीय महाविद्यालयासाठी रु. १४.५ लाखची धर्मादाय देणगी दिली होती. म्हणूनच महाविद्यालयाचं नाव शेठ जी.एस. मेडिकल कॉलेज आहे. त्या काळात हे एक धाडसाचं पाऊल होतं. मुंबईसारख्या बंदर शहरात, जिथे कापड गिरण्यांमध्ये हजारो कामगार राबत होते, त्यांच्यासाठी एक मोठं सार्वजनिक रुग्णालय उभारण्याची दूरदृष्टी महापालिकेने दाखवली. किंग एडवर्ड यांचं प्रत्यक्ष योगदान हे मुख्यतः प्रतीकात्मक होतं, ते नाव एक आदरभाव होता, एक ओळख होती. पण या रुग्णालयाला खरी ओळख मिळवून दिली ती इथल्या डॉक्टरांनी, परिचारिकांनी आणि इथे उपचार घेणार्या लाखो रुग्णांनी.

लोढांचा नामकरण अट्टहास
अलीकडच्या काळात खासदार मिलिंद देवरा आणि त्यांच्यानंतर राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री, भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी या रुग्णालयाचं नाव बदलण्याचा आग्रह धरला आहे. लोढा यांची मागणी आहे की, के.ई.एम.चं नाव बदलून ते एखाद्या हिंदू महापुरुषाच्या नावाने ओळखलं जावं. हे केवळ एकट्या के.ई.एम.पुरतं नाही मुंबईतील नायर, कूपर, सेंट जॉर्ज अशा अनेक रुग्णालयांची नावं बदलण्याचा एक मोठा अजेंडा त्यामागे आहे असं दिसतं. लोढा यांचा हा ‘ओढा’ नामांतराकडे आहे, पण त्यामागे कोणता व्यापक उद्देश आहे हे जनतेला स्पष्ट झालेलं नाही. लोढा यांनी जे नाव बदलायचं म्हटलंय, ते मुळात एका परक्या राजाचं आहे, ज्याने या रुग्णालयासाठी काहीच केलं नव्हतं हे खरं आहे. पण ज्यांनी ते नाव दिलं त्यांनी ते हॉस्पिटल बांधलेलं आहे. आताच्या काळात हे नाव बदलण्याऐवजी सेवा सुधारणं हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण जनतेला नाव नाही, उपचार हवे आहेत!
शिवसेनेचं विरोधास्त्र का?
नामांतराची ही प्रक्रिया नवीन नाही. मुंबईत व्हिक्टोरिया टर्मिनसचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झालं, एल्फिन्स्टन रोडचं नाव प्रभादेवी झालं या बदलांमध्ये एक ऐतिहासिक न्याय होता. इतकंच काय, बॉम्बेचं मुंबई झालं त्या सगळ्या नामकरणामागे शिवसेनाच होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आग्रहाचे आणि शिवसेनेच्या पदाधिकारांच्या सततच्या पाठपुराव्याचे ते फलित होते. पण के.ई.एम.सारखं रुग्णालय, ज्याचं स्वतःचं एक अस्तित्व आणि ओळख आहे, जे जगभरातील लोकांच्या अगदी ध्यानीमनी आणि मुखी बसलं आहे ते बदलणं म्हणजे एक परिचित चेहरा बेनाम करण्यासारखं आहे. अस्सल शिवसेनेने लोढा यांच्या या भूमिकेला जोरदार विरोध केला आहे. अर्थात आमचा युक्तिवाद साधा आहे. नावाने रुग्णालय सुधारत नाही, तर त्यातील सेवेने सुधारते. नावं बदलण्यापेक्षा के.ई.एम.मधील रुग्णांना पुरेसे बेड मिळत नाहीत, ऑपरेशन थिएटर पुरेसे नाहीत, औषधांचा तुटवडा आहे, यावर काय उपाय आहे? तिथे कौशल्य दाखवण्याची अधिक गरज आहे. मराठी माणसाच्या रुग्णालयाचं नाव मराठी नसलं तरी चालतं, पण त्याची सेवा मराठी मनाला म्हणजे सामान्य माणसाला मिळालीच पाहिजे.
या नामांतराच्या वादात एक उपवाद डोकावतो मराठी अस्मितेचा. काही नेत्यांचं म्हणणं आहे की परकीय, विशेषतः ब्रिटिश, नावं असलेली ठिकाणं स्वदेशी नावांनी ओळखली जावीत. हा युक्तिवाद भावनिकदृष्ट्या आकर्षक वाटतो. पण मुंबईसारख्या शहरात जिथे गुजराती, राजस्थानी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आणि मराठी सगळे एकत्र राहतात, तिथे रुग्णालयाचं नाव हा विभाजनाचा मुद्दा बनवणं, हे एक प्रकारे ‘राजकीय हत्यार’ आहे, वैद्यकीय नाही. के.ई.एम. हे रुग्णालय मराठी-अमराठी भेद न करता सर्वांना सेवा देतं हीच त्याची खरी ‘मराठी’ भावना आहे.

सुविधांचा बोजवारा तरीही विश्वास अढळ
नावाच्या वादात जे हरवतं ते म्हणजे वास्तव. के.ई.एम. हॉस्पिटलमधील परिस्थिती गेल्या अनेक वर्षांत ढासळत चालली आहे. ओपीडीत रोज हजारो रुग्ण येतात, पण डॉक्टर-रुग्ण प्रमाण भयंकर असमतोल आहे. एकेका डॉक्टरला शंभरहून अधिक रुग्णांना तपासावं लागतं. रात्री बारा-बारा तास काम करणारे निवासी डॉक्टर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेले असतात. याच थकव्यातून डॉक्टर-रुग्ण संघर्षाचे प्रसंग उद्भवतात. रुग्णालयातील शौचालयांची अवस्था, वॉर्डमधील स्वच्छता, उपकरणांची देखभाल या सगळ्या बाबतीत के.ई.एम. नेहमीच टीकेच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. कोविडकाळात मात्र या रुग्णालयाने जे योगदान दिलं ते अतुलनीय होतं. तेव्हा नाव बदलण्याचा विचार कुणाच्या मनात आला नाही. कारण संकटाच्या वेळी माणूस व्यवस्था शोधतो, नाव नाही. के.ई.एम. हे मुंबईच्या सामान्य माणसाचं रुग्णालय आहे. धारावीतील झोपडीवासी, कुर्ल्याचा कामगार, गिरणगावचा माजी कामगार, मध्य मुंबईतील छोटा व्यापारी सगळे इथे येतात. खासगी रुग्णालयांचे लाखोंचे बिल परवडणार नाही म्हणून हे लोक के.ई.एम.वर विश्वास ठेवतात. इथे गर्दी असते, प्रतीक्षा असते, कधीकधी गैरसोय असते, पण उपचार मिळतो. हे रुग्णालय बंद पडत नाही, उपचार नाकारत नाही. हीच त्याची शक्ती आहे आणि हीच त्याच्या वेगळेपणाची ओळख आहे. असुविधा असणे ही दुर्दैवाने के.ई.एम.ची आता ओळख झाली आहे. तरीही गरीब रुग्ण तिथे जातो
कारण त्याचा विश्वास तेथील डॉक्टरांवर, नर्सेसवर आणि वॉर्डदादावर आहे आणि असुविधेच्या दुष्टचक्रातही तो विश्वास तसुभरही ढळला नाही.
के.ई.एम.ला देशातील आघाडीचं वैद्यकीय शिक्षण केंद्र म्हणून ओळखलं जातं. इथून बाहेर पडलेले डॉक्टर जगभरात नावाजलेले आहेत. अनेक तज्ज्ञ सांगतात की के.ई.एम.मध्ये ट्रेनिंग घेणं म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो, कारण इथे आजारांचं वैविध्य इतकं मोठं आहे की खासगी रुग्णालयात कदाचित आयुष्यात एकदाच दिसेल, अशी केस इथे रोज येते. हे वैविध्य के.ई.एम.च्या डॉक्टरांना तयार करतं. इथला रेसिडेन्सी अनुभव कठीण असतो, पण तो माणसाला खरा डॉक्टर बनवतो.
महानगरपालिकेचं योगदान
बृहन्मुंबई महानगरपालिका ही के.ई.एम.ची मालक आणि प्रशासक आहे. पालिकेने या रुग्णालयावर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. नवीन इमारती बांधल्या, उपकरणे आणली. पण व्यवस्थापनात सुधारणा करण्यात पालिका कमी पडली आहे. राजकीय हस्तक्षेप, नियुत्तäयांमध्ये भ्रष्टाचार, देखभालीकडे दुर्लक्ष या समस्या के.ई.एम.ला आतून पोखरत राहिल्या आहेत. जेव्हा नेत्यांचं लक्ष नावाकडे जातं, तेव्हा ते व्यवस्थेकडून विचलित होतं हेच सर्वात मोठं दुखणं आहे.
व्यवस्था बदला
लोढा किंवा इतर कुणाही नेत्याने के.ई.एम.ची खरोखरच काळजी असेल, तर त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं द्यावीत. इथे
डॉक्टरांची किती रिक्त पदे आहेत? नर्सिंग स्टाफची कमतरता किती आहे? रात्री आपत्कालीन विभागात किती रुग्णांना फरशीवर झोपवलं जातं? या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर खरी समस्या दिसेल. नाव बदलणं सोपं आहे कारण त्यात फक्त बोर्ड बदलावे लागतात. व्यवस्था बदलणं कठीण आहे, त्यासाठी इच्छाशक्ती, संसाधने आणि सातत्य लागतं. के.ई.एम. हे नाव आता एक ब्रँड झालं आहे. रुग्ण ते नाव ऐकून येतात. डॉक्टर त्या नावाचा अभिमान बाळगतात. इतिहास त्या नावात सामावलेला आहे. हे नाव बदललं तरी समस्या सुटणार नाहीत आणि नाही बदललं तरी समस्या आहेतच. म्हणूनच खरा प्रश्न नामांतराचा नाही, खरा प्रश्न आहे आरोग्यसेवेचा, माणुसकीचा आणि प्राधान्यक्रमाचा आहे.
मुंबईच्या सामान्य माणसाला नाव नको, सेवा हवी. त्याला दीर्घ प्रतीक्षा नको, वेळेवर उपचार हवे. त्याला ओसाड वॉर्ड नकोत, स्वच्छ बेड हवे. लोढांचा ओढा नावाकडे आहे, पण जनतेचा ओढा आहे तो एक चांगलं, कार्यक्षम आणि माणुसकीयुक्त रुग्णालय असावं याकडे. तो ओढा पूर्ण करणं हेच खरं राजकारण आहे, खरी सेवा आहे.
(प्रवक्ता आणि जनसंपर्कप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)

