• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे संस्थापक

सचिन परब (प्रबोधन-१००)

marmik by marmik
July 2, 2026
in प्रबोधन १००
0
गोव्यात सामाजिक क्रांतीचा एल्गार

महाराष्ट्राच्या मातीतला, मराठी संस्कृतीचा खरा सार्वजनिक उत्सव म्हणजे नवरात्रीतला शिवभवानीचा सोहळा, अशी वैचारिक मांडणीच प्रबोधनकारांनी केली. पण विचार फक्त कागदावर लिहिणारे ते आर्मचेअर
फिलॉसॉफर नव्हते, त्यांनी हा उत्सव लगेचच जमिनीवर आणण्यासाठी कंबर कसली. त्यासाठीचा आराखडा त्यांच्या सर्जनशील डोक्यात तयारच होता.

 

दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव बंद पाडल्याचा आळ प्रबोधनकारांवर आला. प्रामुख्याने अस्पृश्यांना आणि एकूणच बहुजनांना सार्वजनिक गणेशोत्सवात सन्मान मिळायला हवा, यासाठीची त्यांची भूमिका आक्रमक असल्यामुळे तेच आंदोलनाचा चेहरा बनले. मुळात आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक प्रेरणेने सुरू झालेलं होतं आणि रावबहाद्दूर सी.के. बोलेंसारखे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते त्याचं नेतृत्व करत होते. तरीही प्रत्यक्षात अवघे काही तास आंदोलनात सामील होऊनही गणेशोत्सव बंद करण्याचा आरोप प्रबोधनकारांवरच झाला. ठाकर्‍याने गणपती बंद पाडला, या आरोपामागे त्यांनी दादरमध्ये तोवर केलेलं काम कारणीभूत होतंच, पण त्यांची टोकाची तळमळ आणि वैचारिक भूमिकाही होती.

ही वैचारिक भूमिका त्यांनी राष्ट्रीय उत्सवांची चिकित्सा या नवयुग नावाच्या साप्ताहिकात लिहून स्पष्ट केली. १९२८च्या या गणेशोत्सवातल्या राड्यानंतर लगेचच त्यांनी हा लेख लिहिला होता. त्यात त्यांनी कोणती भूमिका मांडली होती, हे आपण जसंच्या तसं मागील दोन भागांत समजून घेतलं. ब्राह्मणी गणेशोत्सव नाही तर बहुजनांचा नवरात्रौत्सव हा खरा महाराष्ट्राचा सार्वजनिक उत्सव असल्याचं त्यांनी इतिहासातले दाखले देत मांडलं. त्याची वैचारिक भूमिकाही स्पष्ट केली. पण ते कागदावर विचार उतरवून समाधानी होणारे विचारवंत नव्हते. त्यांना त्या विचारांना जमिनीवर मूर्तरूप देण्याचा आराखडाच त्यांच्या डोक्यात होतं. त्यासाठी अत्यंत योग्य संधीही या निमित्ताने तयार झाली होती. ही सांस्कृतिक लढाई होती. त्यासाठीची वेळ वारंवार येत नसते. तेव्हा ती आली होती. दादरचा गणेशोत्सव बंद पडला होता. त्याला नवा सांस्कृतिक पर्याय देण्याची ती वेळ होती. प्रबोधनकारांना काय वाटत होतं, ते त्यांच्या एका वाक्यात आलं आहे, बहुजन समाजाला असा आकर्षक महोत्सव हवा होता की ज्यात अब्राह्मण शूद्रादी अस्पृश्यांनाही आपुलकीने नि मोकळ्या मनाने सहज भाग घेता यावा. प्रबोधनकारांना सर्वसमावेशक बहुजनी उत्सवाचं एक प्रारूप उभं करायचं होतं.

त्यासाठी त्यांनी रावबहाद्दूर बोलेंच्या बंगल्यावर काही मित्रांची बैठक बोलावली. त्यात त्यांनीच नव्या उत्सवाची भूमिका मांडली. माझी जीवनगाथा`मधे ती अशी आली आहे – `महाराष्ट्राची मुख्य देवता श्री मायभवानी. तिच्या दरबारात सगळ्यांना मुक्तदार, तिचा नवरात्र महोत्सव हाच वास्तविक महाराष्ट्राचा राष्ट्रीय महोत्सव. प्राचीन काळचा इतिहास सोडा, छत्रपती श्रीशिवरायापासून हा नवरात्रोत्सव संबंध महाराष्ट्रात घरोघरी आणि गडोगडी थाटामाटाने साजरा होत असे. पेशवाईच्या नि त्यांच्या गणेश दैवताच्या स्तोमामुळे तो उत्सव माजी पडला. लो. टिळकांनी त्याला सार्वजनिक स्वरूप देऊन त्या स्तोमाचे पुनरुज्जीवनच केले. आपण यापुढे नवरात्र महोत्सव साजरा करण्याचा परिपाठ चालू करून, बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा म्हणजे जुन्या ऐतिहासिक परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचा आत्ताच, यंदाच प्रयत्न करावा.

अर्थातच प्रबोधनकारांनी केलेली ही सूचना उपस्थितांनी लगेचच मान्य केली. त्यांनी त्यासाठी लोकहितवादी संघ’ नावाची संस्था स्थापन केली. त्या आधी प्रबोधनकारांनी दादरमध्येच स्वाध्यायाश्रम, गोविंदाग्रज मंडळ आणि हुंडा विध्वंसक मंडळासारखी मंडळं सुरू केली होती. पण त्याचं स्वरूप तरुणांचं अनौपचारिक संघटन असंच होतं. लोकहितवादी संघात मात्र दादरमधले मान्यवर सत्यशोधक एकत्रित आले होते. ६ सप्टेंबर १९२९ च्या `बहिष्कृत भारत पाक्षिकात या लोकहितवादी संघाचं सार्वजनिक गणेशोत्सवावर आवाहन बहिष्कार घालण्याचं आणि सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करण्याचं आवाहन प्रसिद्ध झालंय. त्या आवाहनाखाली लोकहितवादी संघाची कार्यकारिणी छापलेली आहे. त्यावरून या संस्थेच्या स्थापनेला कोण उपस्थित होतं, याची कल्पना येऊ शकते. लोकहितवादी संघ, दादर, मुंबई नं. १४ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून सीताराम केशव बोले यांचं नाव आहे. तर उपाध्यक्ष म्हणून केशव सिताराम ठाकरे तसंच चिटणीस म्हणून त्यांचे धाकटे भाऊ यशवंत सिताराम ठाकरे यांचं नाव आहे. इतर नावांमध्ये बी. एन. वेदक (बी.ए., एल.एल.बी.), टी. आर. नवलकर (बी.ए., एल.एल.बी.), नरहरी विठ्ठल खांडके, जयवंत ब. मिटबावकर, केसरीनाथ जी. वगळ ही नावं आहेत. या नावांइतकंच एक महत्त्वाचं नाव या पाक्षिकाच्या पहिल्या पानावर संपादक आणि प्रकाशक म्हणून प्रसिद्ध झालं होतं, ते म्हणजे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, बार अ‍ॅट लॉ.

आत्मचरित्रात प्रबोधनकारांनी दावा केला आहे की मुंबई किंवा महाराष्ट्रात श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याचा कोणताही प्रघात त्यापूर्वी नव्हता. ते खरंच आहे. बंगालमध्ये दुर्गाष्टमी आणि गुजरातेत गरबा साजरा करण्याची पद्धत होती. पण आज महाराष्ट्रात मूर्ती आणून सार्वजनिकरित्या नवरात्र साजरी करण्याची पद्धत आता प्रचल्िात आहे, त्याची ही सुरुवात होती. अशा प्रकारे प्रबोधनकारांनी १९२८ सालच्या नवरात्रीत सार्वजनिक नवरात्रौत्सवाची स्थापना केली. प्रबोधनकार या उत्सवाला श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव असं म्हणत. विशेष म्हणजे दादरच्या काळ्या मैदानावरच्या कार्यक्रमांची सुरुवातही याच नवरात्रौत्सवाने झाली. तेव्हा दादरचं रेल्वे स्टेशन आणि टिळक पुलाच्या दरम्यान मोकळ्या जागेत हे मैदान होतं. पूर्वी इथे एक तलाव होता. महापालिकेने रेल्वेचा जळलेला दगडी कोळसा टाकून हा तलाव बुजवला होता. त्या जागेला काळं मैदान म्हटलं जाई. त्या परिसरात फक्त एक धुरू
हॉलचीच इमारत होती. बाकी सगळा परिसर रिकामा होता. या मैदानावर पुढे तीन चार वर्षं सार्वजनिक कार्यक्रम होत राहिले. त्यात लाला लजपतरायांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन प्रबोधनकारांच्या अध्यक्षतेत झालं. या कार्यक्रमात सरोजिनी नायडूंनी मुख्य भाषण केलं होतं.
सगळ्या स्पृश्य अस्पृश्य हिंदूंनी एकत्र येऊन सार्वजनिक उत्सव साजरा करण्याची कल्पनाच तेव्हा अभूतपूर्व होती. ब्राह्मणी सार्वजनिकपणाच्या विरोधात ते एक महत्त्वाचं बंड होतं. त्यामुळे त्याला अभूतपूर्व असाच प्रतिसाद मिळाला. प्रबोधनकार सांगतात की ही कल्पनाच इतकी आकर्षक ठरली की कुलाबा ते कल्याण आणि पालघरपर्यंतची मर्‍हाठी जनता या उत्सवासाठी उत्साहाने एकत्र आली. विशेष म्हणजे त्यासाठी भराभर देणग्या गोळा झाल्या. वेगवेगळ्या सामुग्रीसाठी भरपूर आश्वासनं देण्यात आली. काळ्या मैदानावर ८० फूट लांब आणि ६० फूल रुंद असा भव्य मंडप थाटला गेला. त्याचा अर्धा भाग भवानीमातेची मूर्ती आणि इतर घटस्थापनेसारख्या धार्मिक कार्यक्रमासाठी आखून ठेवला होता. तर उरलेला अर्धा भाग नवरात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मंचासारखा वापरासाठी ठेवला होता
नवरात्र सुरू होण्याच्या आधी आठवडाभर प्रबोधनकारांच्या नेतृत्वात शेकडो तरुण स्पृश्य अस्पृश्य भेद मोडून एकत्रित तयारीला लागले होते. अमुक पाहिजे, असा शब्द तोंडातून निघताच ती वस्तू पुरवण्यासाठी लोक हजर असत. परळ येथील तांब्यापितळेच्या वस्तूंचे प्रसिद्ध कारखानदार बाबाजी अनंत तारकर यांनी तर त्यांचा एक माणूस मंडपात उभाच ठेवला होता. घट हवा म्हणताच तासाभराच्या आत पितळेचा मोठा पाट आणि तांब्याचा दोन फुटी हंडा हजर झाला. शिवरायांचा भगवा झेडा हवा असं म्हणताच सहा फूट लांब आणि पाच फूट रुंद रेशमी जरीपटका हजर झाला. तो उभारण्यासाठी काठी हवी, तर तारकरांनी ५० फूट उंच स्तंभ पांढर्‍या दोरासह तासात हजर केला. घटाजवळ ठेवण्यासाठी भवानीमातेची सात आठ फूट उंच प्रतिमा हवी होती. एका सिनेमा कंपनीने राजा रविवर्माच्या कालीमातेच्या तांडवनृत्याच्या चित्रानुसार एक मोठा कटआऊट तयार केला होता. तो उचलून आणण्यात आला. त्याला शोभेशा पुरुषभराच्या उंचीच्या समयाही तारकरांनी पाठवल्या. आता इतक्या मोठ्या समयांसाठी कापसाच्या वाती पुरणार नव्हत्या. मग त्यासाठी मनिला रोपचे बंडल दाखल झालं. घटाशेजारचा भाग रंगबिरंगी पडद्यांनी सजवण्यात आला. गिरगावातल्या मुगभाटातल्या वाजंत्री कुटुंबांनी दररोज सकाळ संध्याकाळी सनई चौघड्याच्या पाळ्या वाटून घेतल्या.

नवरात्रीचा उत्सव सुरू व्हायला वेळ होता, तरी त्याच्या तयारीसाठीच लोकांच्या झुंडीच्या झुंडी मैदानावर गोळा होऊ लागल्या. समयांमध्ये अखंड दीप जाळण्यासाठी दादर, परळ, गिरगावातून अनेक मुली बायका तेल घेऊन येऊ लागल्या. ते तेल साठवण्यासाठी तारकरांनी नळ असलेला मोठा चौकोनी तांब्याचा हौद लाकडी स्टँडसह पाठवला. हे घडून गेल्यानंतर जवळपास चाळीस वर्षांनी प्रबोधनकारांनी आत्मचरित्रात हे वर्णन लिहिलंय. त्याविषयी ते लिहितात, अगदी हे लिहीत असतानाही गहिवरून सांगतो की ‘अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने’ या संतोक्तीचा प्रत्यक्ष अनुभव मला या उत्सवप्रसंगी पदोपदी आला. यातली तारकरांची मदत लक्षणीय आहे. प्रबोधनमध्ये मदत करणार्‍यांची यादी वारंवार छापून येत असे. त्यातही तारकरांचं नाव आलेलं आहे.

या पहिल्या सार्वजनिक नवरात्रौत्सवाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याचं कारण मुंबईतल्या बहुजन समाजाला हा उत्सव आपला वाटला. तोवर सार्वजनिक गणेशोत्सव हा नावालाच सार्वजनिक होता. तो सर्वजनांना नव्हता, तर फक्त ब्राह्मणांचाच होता. पदाधिकारीही तेच असत आणि कार्यक्रमही त्यांचेच होते. बहुजन समाज हा त्यात फक्त वर्गणीदार म्हणूनच होता. अस्पृश्यांना तर पूजेची परवानगीच नव्हती. इथे मात्र असं नसणार होतं. सगळे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून शक्तीच्या पूजेला एकत्र येणार होते. गणेशोत्सवातल्या आंदोलनामुळे आधीच नवरात्रौत्सवाची भूमिकाही स्पष्ट झाली होती. मुळात तशीही बहुजनांमध्ये आणि विशेषतः कायस्थांमध्ये नवरात्रीचा उत्सव उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आहेच. प्रबोधनकारांच्या घरातही त्यांच्या लहानपणी आजोबा असताना हा उत्सव जवळपास सार्वजनिक पद्धतीनेच साजरा व्हायचा. त्यासाठी शेकडो लोक त्यांच्या घरी गोळा होत असत. त्याचा प्रभाव प्रबोधनकारांवर असणारच. त्या प्रभावाला प्रबोधनकारांनी एका सांस्कृतिक लढाईचं रूप दिलं आणि त्यातून मराठी पद्धतीच्या सार्वजनिक नवरात्रौत्सवाची स्थापना झाली.

Previous Post

आप तैसाचि दुसरा

Next Post

ओ राम जी, बडा दुःख दीना…

Next Post
ओ राम जी, बडा दुःख दीना…

ओ राम जी, बडा दुःख दीना...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.