
गुरुशिष्यपण।
हे तो अधम लक्षण ।।१ ।।
भूती नारायण खरा।
आप तैसा चि दुसरा ।।२ ।।
न कळता दोरी साप।
राहू नेदावा तो काप ।।३ ।।
तुका म्हणे गुणदोषी।
ऐसे न पडावे सोसी ।।४ ।।
आपल्या भारतीय परंपरेत गुरु-शिष्य या नात्याविषयी खूप लिहिलं-बोललं गेलं आहे. हे नातं अत्यंत पवित्र मानलेलं आहे. काही संप्रदायात तर गुरुभक्तीच प्रधान मानली गेलेली आहे. गुरु श्रेष्ठ तर शिष्य कनिष्ठ हे त्यात अपेक्षितच आहे. शिष्याने गुरुला देवाच्या जागी मानावं असं काही संप्रदायांत सांगितलं जातं, काही ठिकाणी तर गुरु हा देवापेक्षाही श्रेष्ठ मानला गेलेला आहे. गुरुची सर्व प्रकारची सेवा शिष्याने करावी असा एक संकेत असतो. अगदी किरकोळ हलकी कामंही शिष्यांना करण्याची सक्ती केली जाते. गुरु हा मालक तर शिष्य हा त्याचा सेवक अशीच भूमिका त्यातून तयार झाली. याच भूमिकेचा गैरफायदा घेत गुरुबाजी आणि त्यातूनच मग बुवाबाजी जन्माला आली. गुरु-शिष्याच्या नात्याचा पायाच विषमता, शोषण आणि फसवणूक बनला. काही वेळा या नात्यात टोकाची विकृतीही शिरली. केवळ गुरुत्वाच्या नावाखाली शिष्यांची फसवणूक करून घाणेरड्या गोष्टी सुरू झाल्या. त्यासाठी शिष्यांची संख्या वाढवण्यावर अनेक गुरु भर द्यायला लागले. विविध संप्रदायात गुरुबाजीचं पेव फुटलं.
संतांच्या, विशेषतः तुकोबारायाच्या काळात महाराष्ट्रात अशा गुरुबाजीने उचल खाल्ली. त्यावर तुकोबारायांनी कडाडून प्रहार केले. त्याचबरोबर गुरु – शिष्याच्या नात्याचा आदर्श व्यवहारही संतांनी सांगितला. तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगात तोच व्यवहार विशद केला आहे.
वारकरी संप्रदायात गुरुपरंपरा आहे, पण त्या नात्यात समता आहे. त्यात गुरु श्रेष्ठ आणि शिष्य कनिष्ठ असा भेदभाव नाही. तुकोबाराय म्हणतात,
गुरुशिष्यपण। हे तो अधमाचे लक्षण ।।
भूती नारायण खरा। आप तैसाची दुसरा ।।
प्रत्येक जीवाच्या ठिकाणी नारायण आहे. त्यामुळे तात्त्विकदृष्ट्या सगळेजण समान आहेत. जर सगळेजण समान असतील तर एकजण गुरु आणि एकजण शिष्य असा भेदाभेद नकोच. साहजिकच त्यामुळे शिष्याने गुरुची सेवा करणं वारकरी संप्रदायाला मंजूर नाही.
शिष्याची जो ने घे सेवा। मानी देवासारिखे ।।
असं तुकोबाराय म्हणतात. खरा आदर्श गुरु उलट शिष्याला देवासमान मानतो. शिष्य हा गुरुचा विचार इतर लोकांपर्यंत पोचवणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे गुरुने शिष्याचा आदर करायला हवा. संतांनी हे प्रत्यक्ष आचरणातही आणून दाखवलं. वारकरी संप्रदायात आदर्श गुरु-शिष्य म्हणून आपल्याला नामदेवराय आणि चोखोबाराय यांचं उदाहरण देता येईल. चोखोबाराय हे नामदेवरायांचे शिष्य आहेत. त्यांच्याविषयी गुरुच्या मनात असलेला आदर आणि श्रद्धाभाव किती उदात्त आहे याचा दाखला नामदेवरायांच्या अभंगात सापडतो.
चोखा माझा जीव चोखा माझा भाव।
कुळधर्म देव चोखा माझा ।।
चोखोबाराय म्हणजे माझा जिवलग आहे आणि माझा कुळदेव आहे असं नामदेवराय म्हणतात. शिष्याला थेट देव म्हणून त्याची स्तुती करणारा जगातला पहिला गुरु नामदेवरायच असतील. एवढंच नाही तर त्यांनी चोखोबारायांची समाधी पंढरपूर नगराच्या मध्यवर्ती भागात आणि विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर बांधली. वारकरी संप्रदायात गुरु-शिष्य नातं मित्रतेवरही आधारित आहे. अलीकडे आपल्याकडे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड अशी एक संकल्पना आली आहे. त्या संकल्पनेत संत बसतात. निळोबाराय तुकोबारायांना गुरु मानत होते. ते त्यांचा उल्लेख ‘जिवलग’ असा करतात.
जयजयाजी सद् गुरु स्वामी तुकया दातारा।
तारक तू सकळांचा जीवलग सोयरा ।।
त्याचबरोबर वारकरी संप्रदाय हा गुप्ततेचा संप्रदाय नाही. त्यामुळे फक्त शिष्यांनाच उपदेश करावा असा दंडक इथे नाही. कोणालाही उपदेश करावा अशी संतांची भूमिका आहे.
मेघवृष्टिने करावा उपदेश परि।
गुरुने न करावा शिष्य ।।
असं तुकोबाराय म्हणतात. याचा अर्थ ज्याप्रमाणे पाऊस पडतो त्याप्रमाणे उपदेश करावा. पाऊस भरड जमिनीतही पडतो, सुपीक जमिनीतही पडतो आणि हागणदारीही पडतो. त्याचप्रमाणे संतही त्यांचा उपदेश फक्त त्यांच्या शिष्यांपुरता मर्यादित ठेवत नाहीत. ते सर्वांनाच उपदेश करतात. गुरुबाजीला संतांनी पूर्णपणे फाटा दिलेला आहे. तुकोबारायांनी तर उघडपणे घोषणाच केलेली होती. ते म्हणत होते- ‘नाही शिष्यशाखा। सांगो आयाचित लोका ।।’ ‘आमची कोठेही शिष्यशाखा नाही’ असं तुकोबारायांनी जाहीरच केलेलं होतं. अर्थात त्या काळात हजारो वारकरी त्यांना गुरु मानत होते यात शंका नाही. वारकरी संप्रदायातील आदर्श गुरु-शिष्याचा व्यवहार घडत असेल तर एखाद्याला आदरापोटी गुरु मानण्यात काहीही अडचण नाही. गुरुबाजीवर तुटून पडणार्या तुकोबारायांसारख्या संतांना गुरु मानणं हे तर भूषणावहच आहे.
तुकोबारायांना त्यांच्या हयातीत तर भरपूर शिष्यगण लाभलाच पण त्यांच्यानंतरही त्यांना गुरु मानणारे अनेकजण होऊन गेले. त्यात कचेश्वर भट ब्रह्मे, निळोबाराय आणि महिपती यांचा उल्लेख करता येईल. अलीकडच्या काळात तुकोबारायांना गुरु मानणारे वारकरी सत्पुरुष म्हणजे गाडगेबाबा होत. गाडगेबाबा म्हणत, ‘मला कुणी शिष्य नाही मला कुणी गुरु नाही.’ आणि पुढे जाऊन ते म्हणत, ‘बाप्पा, तुकाराम महाराज आमचे समद्याहिचे गुरु. त्याहिचे आमी सगयेच शिष्य न हो काय?’
वारकरी संप्रदायात साधारणपणे ज्याच्याकडून तुळशीमाळ घातली जाते त्याला गुरु मानलं जातं. गाडगेबाबांच्या गळ्यात तुळशीची माळ होती असा उल्लेख गो. नी. दांडेकर यांनी केला आहे. ठाण्याच्या किन्हवली गावात गाडगेबाबांचं कीर्तन होतं. कीर्तनानंतर गाडगेबाबा लोकांची गर्दी आणि त्यांच्याकडून पाया पडून घेणं टाळण्यासाठी अचानक गायब होत. त्यासाठी त्यांनी आधीच एक जागा हेरून ठेवलेली असायची. थंडीचे दिवस असतील तर ते आणि त्यांच्यासोबतीची मंडळी त्या हेरलेल्या जागेवर लाकडाचा ओंडका आणून ठेवत. तो ओंडका पेटवून त्याच्याभोवती गाडगेबाबा आणि त्यांची मंडळी शेकत बसत. नेमक्या त्याच वेळी गो. नी. दांडेकर गेले. तेव्हा त्या त् ोजस्वी प्रकाशात गाडगेबाबांच्या गळ्यात त्यांना तुळशीची माळ दिसली. ही माळ त्यांनी नेमकी कोणाकडून घातली की स्वतःच घातली याविषयी काहीही माहिती नाही. तरीही ते तुकोबारायांना गुरु मानत असत असं प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या गाडगेबाबांच्या चरित्रात नोंदवलं आहे.
शीख धर्मात दहा गुरु होऊन गेले. अखेरचे दहावे गुरु म्हणजे गुरु गोविंदसिंग. त्यांनी त्यांच्यानंतर शीख धर्मात कोणीही गुरु असणार नाही अशी घोषणा केली. तोवरच्या दहा गुरुंच्या आणि इतर पूर्वसुरी संतांच्या रचना एकत्रित केलेला गुरुग्रंथसाहिब हा धर्मग्रंथच शीखांचा गुरु असेल असं त्यांनी सांगितलं. तोच प्रयोग वारकरी संप्रदायात गाडगेबाबांनी केला. संतग्रंथ आणि पर्यायाने संतच वारकरी संप्रदायाचे खर्या अर्थाने गुरु आहेत. त्यामुळेच या संप्रदायाचा कळस असलेले तुकोबाराय हेच सगळ्यांचे गुरु आहेत अशी गाडगेबाबांची भूमिका महत्त्वाची, क्रांतिकारक आणि संतविचारांशी सुसंगत मानावी लागते. गाडगेबाबा जरी स्वतःला मी कोणाचाही गुरु नाही असं म्हणत असले तरी त्यांना गुरु मानणारे अनेकजण होते. हे नातं प्रेमाचं आणि समतेचं असेल तर ते नाकारण्याचं काही कारण नाही.
गुरुबाजी आणि जातिभेद या दोन बाबीही एकमेकात गुंतलेल्या आहेत. गुरु करताना एकतर तो उच्चजातीचा असावा अथवा स्वजातीचा असावा असा एक नियमच आहे. गुरु शिष्यापेक्षा श्रेष्ठ ठरवल्यानं हा नियम जातिभेदाची जपणूक करतो. त्याचबरोबर पुरुषच स्त्रीचा गुरु होतो. सहसा स्त्री पुरुषांचा गुरु होऊ शकत नाही. वारकरी संप्रदायात असा प्रकार संतकाळात नव्हता. त्यामुळेच नामदेवराय शिंपी असूनही परिसा भागवत हे ब्राह्मण त्यांना गुरु मानत असत. त्याचबरोबर तुकोबाराय कुणबी असूनही त्यांचे अनेक ब्राह्मण शिष्य होते. वडगावचे कृष्णप्पास्वामी हे ब्राह्मण असून ते जंगम जातीतल्या शांतलिंगप्पांना गुरु मानत. मुक्ताई आणि बहिणाबाई या स्त्री संतांना गुरु मानणारे अनेक पुरुष होते. त्याचबरोबर शेख महंमदबाबांना गुरु मानणारे अनेकजण हिंदू वारकरी होते. त्यामुळे जात, धर्म आणि लिंग या आधारे गुरु मानण्याचा नियम संतांनी झुगारून दिला.
शिष्य करवून घेतानाही जातीचे नियम आहेत. सहसा उच्चजातीय शिष्यांना अधिक सन्मान देण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर मूळ वेदांत शिकवताना तो फक्त ब्राह्मणांना शिकवावा आणि इतर बहुजनांना दुय्यम दर्जाचे त्यांना अधिकार असलेले वेदांती ग्रंथ शिकवावेत, ही परंपरा यातूनच रुजलेली होती. याबाबतीत पंडित निश्चलदासांचं उदाहरण देता येईल. निश्चलदास हे जाट समाजातील. त्यांना मूळ जात लपवून ब्राह्मण असल्याचं सांगून वेदांतविद्या ग्रहण करावी लागली. शिष्यांतही जातीच्या आधारे भेदभाव करणारे गुरु आहेत. काही संप्रदायात दलितांना दीक्षा देताना त्यांना आधी पीठ दिलं जातं. हे पीठ त्यांनी त्यांच्या घरातल्या पिठात मिसळून खाल्ल्यानंतर मगच त्यांना दीक्षा दिली जाते. काही गुरु त्यांच्यापेक्षा हीन मानल्या जाणार्या जातीतल्या शिष्यांच्या घरी जेवत नाहीत. वारकरी संप्रदायाने या सर्व गोष्टी नाकारलेल्या आहेत. नामदेवरायांना परिसा भागवत आणि चोखोबाराय असे अनुक्रमे ब्राह्मण आणि महार जातीतील शिष्य लाभले होते. नामदेवरायांनी त्यांच्यात कोणताही भेदभाव केला नाही. गाडगेबाबांनाही ब्राह्मणांपासून दलित-आदिवासी-भटके विमुक्त अशा सर्व जातीतील शिष्य लाभले होते. त्यांच्यात गाडगेबाबांनी कधीही भेदभाव केला नाही. त्यामुळेच त्यांच्या परंपरेत वैâकाडी महाराजांसारखे भटक्या जातीजमातील सत्पुरुषही अग्रगण्य स्थानावर होते.
गुरु आणि शिष्य यांचं नातं समतेवर आधारित आहे असं मानलं की मग गुरुची चूक दाखवण्याचा अधिकारही शिष्याला उरतो. पारंपरिक गुरुबाजीत गुरुची चूक झाली तरी केवळ गुरुचा आदेश म्हणून त्याचं पालन करणं शिष्यांना बंधनकारक मानलं जातं. तुकोबारायांनी हे बंधन धुडकावून लावलं आहे. ‘न मानावे तैसे गुरुचे वचन। जेणे नारायण अंतरे ते ।।१ ।।’ ज्या गुरुवचनामुळे नारायण म्हणजे देव अंतरतो ते गुरुवचन मानू नये असं तुकोबाराय सांगतात. त्याचा प्रत्यय १९४७ साली आला. दलितांना विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केलं. तो सत्याग्रह यशस्वी होऊन दलितांना विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळाला. दलितांच्या प्रवेशाने देव बाटला म्हणून पंढरपुरातल्या सनातनी शास्त्रीपंडितांनी देवावर आणि देवळावर बहिष्कार टाकला. या शास्त्रीपंडितांनी वारकरी संप्रदायातील काही महाराजांना वेदांताचे पाठ शिकवले होते. साहजिकच हे पंडित या वारकरी महाराजांचे गुरु ठरले. त्यांनी गुरुपदाचा, खरं म्हणजे गुरुबाजीचा फायदा घेत या वारकरी महाराजांनाही देवावर बहिष्कार टाकायला भाग पाडलं. एका बाजूला देवाचं दर्शन आणि दुसर्या बाजूला गुरुचा आदेश असं द्ंवद्व उभं राहिलं. वेदांती गुरुबाजीचा पगडा असल्यामुळं काही महाराजांनी गुरुचा आदेश प्रमाण मानून विठ्ठलावर बहिष्कार टाकला. गुरुबाजी, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता हातात हात घालून कशी नांदते याचं हे उदाहरण होतं. समतेचा विचार सांगणार्या संतांनी गुरुबाजी आणि जातीव्यवस्था नाकारली. त्याऐवजी समतेवर आणि प्रेमावर आधारित आदर्श गुरु-शिष्य व्यवहार सांगितला.

