• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

ओ राम जी, बडा दुःख दीना…

अ‍ॅड. हर्षल प्रधान मुद्देसूद

marmik by marmik
July 2, 2026
in मुद्देसूद
0
ओ राम जी, बडा दुःख दीना…

राम मंदिर. हा शब्द ऐकला की हिंदू मनात एक वेगळीच लहर उमटते. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेची, त्यागाची, रक्तबंबाळ कारसेवेची आणि अंतिमतः विजयाची कहाणी. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा देशभरात दिवाळी साजरी झाली. लाखो भाविकांच्या डोळ्यात अश्रू होते, हृदयात आनंदाचा गोडवा होता. ‘अब राम राज्य आएगा,’ असे घोषवाक्य गल्लोगल्लीतून घुमले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन झाले आणि भाजपाने, संघ परिवाराने याला केवळ धार्मिक नव्हे तर राजकीय-आध्यात्मिक महाविजय बनवले. परंतु आज, त्याच पवित्र रामलल्लाच्या गर्भगृहाजवळील दानपेट्यांमधून कोट्यवधी रुपयांची चोरी उघडकीस आली आहे. हा केवळ आर्थिक घोटाळा नाही. हा श्रद्धेचा, विश्वासाचा आणि रामभक्तीचा विश्वासघात आहे.

राम मंदिर ट्रस्टने (श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट) भाविकांकडून गोळा केलेल्या दानपेट्यांतल्या रोख रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप आता सार्वजनिक झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ही रक्कम २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. मंदिराच्या गर्भगृहाजवळ आणि दर्शन मार्गावर ठेवलेल्या दानपेट्यांमधील रोकड एका ‘गोपनीय कक्षात’ नेली जायची. या कक्षात ५० कर्मचारी काम करत होते. २४ नोटा मोजणारे (खासगी एजन्सीमार्फत), १२ देखरेख करणारे (ट्रस्टचे), आणि १४ एसबीआय व टीसीएसचे प्रतिनिधी. बहुस्तरीय नियंत्रण असूनही चोरी बिनबोभाट सुरू राहिली. हे यंत्रणेचे अपयश आहे की संगनमत? हा प्रश्न आज प्रत्येक रामभक्ताला पडला आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयितांमध्ये रामशंकर उर्फ टिन्नू यादव यांचे नाव सर्वात चर्चित आहे. पूर्वी अयोध्येमध्ये ऑटो चालवणारा हा माणूस आज अयोध्या-लखनऊमध्ये ५० कोटींच्या जंगम व स्थावर संपत्तीचा मालक म्हणून समोर आला आहे. विमानतळाजवळ ७० खोल्यांचे वसतिगृह, तीन रेस्टॉरंट्समध्ये भागीदारी, फॉर्च्युनर गाडी, लखनऊतील घर हे सर्व १४,५०० रुपयांच्या पगारावर कसे कमावले असेल त्याने? त्याचा पुतण्या मनीष यादव याचीही नियुक्ती त्याच पैशांच्या मोजणीच्या कामावर झाली. लवकुश पूर्वी कार मेकॅनिक होता, अनुकल्प मिश्रा ज्याने फार्महाऊस बांधले, त्याने भागवत कथा आयोजित केली होती, केडी तिवारी ज्याच्यावर सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जबाबदारी होती, राजेश पाठक या सर्वांच्या जीवनशैलीत झपाट्याने बदल झाला. शेणात पैसे दाबून लपवणे, घरात कपाटात लपवणे हे प्रकार वाचून मन सुन्न होते.

रामशंकर उर्फ टिन्नू यादव                             अनुकल्प मिश्रा                                    लवकुश

एका गरीब भाविकाने महिन्याच्या कमाईतून शंभर रुपये रामाच्या चरणी अर्पण केले. एका आजीने मंगळसूत्रातील सोने काढून दिले. एका शेतकर्‍याने पिकाच्या उत्पन्नातून दान दिले. आणि ते पैसे ट्रस्टच्या कर्मचार्‍यांनी आपल्या खिशात घातले? हा विचार करवत नाही. रामाच्या नावाने गोळा झालेल्या पैशाने रामाच्याच घरात डल्ला मारला गेला याहून मोठी शोकांतिका कोणती?
राजकीय आयाम आणि विश्वासघात भाजपाने राम मंदिराला केवळ मंदिर नव्हे तर राजकीय हत्यार बनवले. ७० वर्षांच्या संघर्षाची गाथा सांगितली, कारसेवकांचा बलिदानाचा इतिहास सांगितला आणि ‘राम राज्या’चे स्वप्न दाखवले. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत अयोध्येतही भाजपाला पराभव स्वीकारावा लागला, तो जनतेचा पहिला इशारा होता. आता हा घोटाळा उघडकीस आल्याने संपूर्ण राजकीय चित्र बदलले आहे. जे लोक ‘जय श्री राम’ चा नारा देत सत्ता मिळवतात, त्यांच्याच विश्वस्त संस्थेत असे घाणेरडे प्रकार घडत असतील तर

राम राज्य कसे येणार?
ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे सहकारी टिन्नू यादव यांची नेमणूक आणि प्रभाव हे सर्व आता तपासाच्या कक्षेत आहे. अंतर्गत तक्रारींकडे दुर्लक्ष झाले, रामकोट मोहल्ल्यातील कर्मचार्‍याने मंदिर प्रशासनाला सांगितले तरी ऐकले गेले नाही. शेवटी ही माहिती अखिलेश यादव यांच्यापर्यंत पोहोचली आणि राजकीय दबाव आल्यावर सरकार हलले. लोकशाहीत हे लाजिरवाणे आहे. मंदिर निर्मितीपूर्वी २०२०-२०२३च्या दरम्यान गोळा झालेल्या निधीचा पूर्ण हिशेब आजही जनतेसमोर नाही. माहिती अधिकारात मागवलेली माहिती नाकारली गेली, विरोधकांना ‘हिंदुद्रोही’ ठरवले गेले. सार्वजनिक न्यास असूनही पारदर्शकतेचे नियम लागू न झाल्याने हा पहिला घोटाळा घडला. दानपेटीचा घोटाळा हा दुसरा आणि अधिक भयंकर आहे.

उत्तर प्रदेश सरकारने तीन सदस्यीय एसआयटी स्थापन केली आहे. लखनऊ आयुक्त विजय विश्वास पंत (आयएएस), आयजी किरण एस. (आयपीएस) आणि विशेष सचिव नीलरत्न यांचा तिच्यात समावेश आहे. १५ दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश आहेत. दिल्लीहून आयपीएस अधिकारी विशेष विमानाने आले. काही कर्मचार्‍यांकडून दोन कोटी रुपये, कार, आयफोन जप्त झाले आहेत. लवकुश यांच्या घरी शेणात १० लाख रुपये मिळाले. परंतु अयोध्येतील संत आणि भाविक आश्वस्त नाहीत. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीची मागणी फेटाळली गेली. ज्या यंत्रणा ईडी -सीबीआयचा वापर राजकीय विरोधकांवर करतात, त्या रामाच्या घरातील चोरांवर कठोर कारवाई करतील का? ट्रस्टने पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे, पण विश्वास कायम ठेवणे कठीण आहे. चंपत राय यांची चौकशी झाली परंतु संपूर्ण सत्य समोर येईल का?

हा रामभक्तीचा अपमान
हा केवळ पैशाचा प्रश्न नाही. हा रामभक्तीचा अपमान आहे. ज्या मंदिरासाठी लाखो लोकांनी वर्षानुवर्षे संघर्ष केला, ज्या मंदिराच्या नावाने राजकारण केले गेले, त्याच मंदिरात श्रद्धेची तिजोरी लुटली गेली. छोट्या गावातील गरीब भाविक, ज्याने आपल्या पोटाला चिमटा काढून दान दिले, त्याला आज काय उत्तर द्यायचे? ‘राम राज्या’च्या नावाने सत्ता मिळवणार्‍यांनी रामाच्याच घरात चोरी केली? राम हे केवळ देव नाहीत. राम हे न्याय, धर्म आणि आदर्शांचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावाने झालेला विश्वासघात हा संपूर्ण हिंदू समाजाच्या आत्म्यावर घाव आहे. संत, साधू आणि सामान्य भाविक यांचा राग न्याय्य आहे. ट्रस्टने आता तातडीने सर्व आर्थिक हिशेब सार्वजनिक करावेत, ऑडिट पारदर्शक करावे आणि व्यावसायिक व्यवस्थापन आणावे.

राम मंदिर ही केवळ एक इमारत नाही. ती भारतीय सांस्कृतिक जागृतीचे प्रतीक आहे. या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, धर्म आणि राजकारण यांचा मेळ कितीही चांगला वाटला तरी, पारदर्शकता आणि जबाबदारीशिवाय तो टिकत नाही. भाजप सरकारने आणि ट्रस्टने यातून धडा घ्यावा. संपूर्ण निधीचा हिशेब, सीसीटीव्ही फुटेज,

ऑडिट रिपोर्ट जनतेसमोर आणावेत. दोषींवर कठोर कारवाई व्हावी. आणि सर्वात महत्त्वाचे भाविकांच्या श्रद्धेची पुन्हा उभारणी व्हावी. ओ राम जी, खरंच मोठं दु:ख दिलं आहे भाविकांना, पण हे दुःख प्रभू श्रीरामांनी दिलेलं नाही. रामाच्या नावाने राजकारण करणार्‍या आणि ट्रस्ट चालवणार्‍या काही लोकांनी दिले आहे. जनता, न्यायालय आणि इतिहास यांना या विश्वासघाताची किंमत चुकवावीच लागेल. राम राज्य खरे असेल तर ते न्यायावर, पारदर्शकतेवर आणि श्रद्धेच्या रक्षणावर उभे राहील चोरी आणि भ्रष्टाचारावर नाही.
प्रकरण अद्याप तपासाधीन असल्याने अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच समोर येईल. सत्याची चौकशी होणे आणि दोषींना शिक्षा होणे अपेक्षित आहे. राम रक्षा स्रोत्रात म्हटले आहे
श्रीराम राम रघुनन्दन राम राम।
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।।
श्रीराम राम रणकर्कश राम राम।
श्रीराम राम शरणं भव राम राम ।।

अर्थात श्रीराम, रघुनंदन राम… असे नामस्मरण करणे आणि रामाला शरण जाणे हे सर्व संकटांपासून रक्षण करते. विशेषतः या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी रामाच्या शरणागतीतून मानसिक शांती आणि न्यायाची प्रतीक्षा करावी. राम रक्षा करो!

(प्रवक्ता आणि जनसंपर्कप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)

Previous Post

सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे संस्थापक

Next Post

प्रादेशिक पक्षांचे फेडरेशन गरजेचे!

Next Post
प्रादेशिक पक्षांचे फेडरेशन गरजेचे!

प्रादेशिक पक्षांचे फेडरेशन गरजेचे!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.