
नुकतेच दिल्ली येथे महिला शासकीय अधिकार्यांचे साहित्य संमेलन पार पडले. या साहित्य संमेलनानिमित्त आयोजकांनी प्रकाशित केलेल्या ‘सौदामिनी’ या स्मरणिकेतील एका लेखात महराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायातील घुसखोरीबद्दल टीका-टिप्पणी केली आहे. शरद पवार लेखात म्हणतात की, ‘वारकरी संप्रदाया’सारख्या समतेच्या चळवळीतही गेल्या काही वर्षापासून प्रतिगाम्यांची घुसखोरी वाढत चालली आहे. शरद पवारांनी मांडलेल्या या मतामुळे त्यांच्यावर महायुतीतील नेत्यांनी आणि धर्माध शक्तींनी टीका केली. शरद पवार हे अल्पसंख्याकांना खूष ठेवण्यासाठी हिंदू धर्माच्या जाती-जातीत फूट पाडत आहेत, हा समस्त वारकर्यांचा अपमान आहे, असेही प्रतिगाम्यांना वाटते. तर वारकरी संप्रदाय हा बहुजन समाज आहे. सनातनी हिंदुंच्या कच्छपि लाभलेल्या बहुजन समाजाला खरे हिंदुत्व काय हे सांगण्याची गरज आहे, असे पुरोगाम्यांना वाटते.
त्यात वारकरी संप्रदायात वारकरी विचारांशी संबंध नसणार्या किंबहुना त्यांच्याविरुद्धच्या विचारांच्या मंडळींनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यातील काहीजण ‘शहरी माओवादी’ होते याचे व्हिडिओ चित्रण माझ्याकडे आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. वारकरी संप्रदाय हा पुरोगामी विचारांचा वारसा सांगणारा असून, तो मनुवादाच्या विरोधात आहे. मात्र सध्या वारकरी संप्रदायाच्या आड राहून काही लोक प्रतिगामी विचार मांडत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी ही स्त्री-पुरुष समानता आणि जातीवाद मानणारी आहे, असा आरोप हर्षवर्धन सकपाळ यांनी केला. वारकर्यांमधील घुसखोरीवरून पुरोगामी आणि प्रतिगामी यांनी वार-प्रतिवार केले.
सत्य कटू असते. पण गेल्या काही वर्षांपासून कला-साहित्य-क्रीडा-शिक्षण आदी क्षेत्रात प्रतिगाम्यांची घुसखोरी सुरू आहे. हे सत्य आहे. कुठे उघडपणे तर कुठे छुप्या रीतीने. गेल्याच आठवड्यापासून महात्मा जोतिबा फुले यांचे द्विशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत त्यांच्या कार्याचा गौरव करणारे लेख लिहिले आहेत. त्यात महात्मा फुले यांनी केलेले कार्य आणि भाजपाच्या सरकारची कार्येही समान आहेत, असे ते लिहितात. महात्मा फुले यांचे शिक्षणाविषयीचे विचार, दूरदृष्टी यांच्याप्रमाणेच आमच्या सरकारने युवकांसाठी संशोधन हा पाया रचण्याचा प्रयत्न गेल्या दशकभरात केला आहे, असे मोदी म्हणतात. देशातील सर्व महान/थोर व्यक्तींचे विचार आणि कार्य याचा संबंध भाजपा व संघनेते स्वतःच्या विचारप्रणालीशी जोडण्याचा प्रयत्न करतात. त्याचाच हा एक भाग आहे. दलितांचे श्रद्धास्थान असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल, शिखांचे गुरू गोविंद सिंग, संत रवीदास, गौतमबुद्ध यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या मोठ्या प्रमाणात साजर्या करून त्या धर्माच्या-जातीच्या अनुयायांना आपल्या विचारांशी बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मदिनी वृत्तपत्रात लेख, जाहिरात देऊन आम्हीच खरे त्यांच्या विचारांचे पाईक आहोत हे दाखवून भाजपाची घुसखोरी सुरू आहे.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हा मोठ्या प्रमाणात आहे. तो धार्मिक विचारसरणीचा नसून आध्यात्मिक आहे. या संप्रदायाला हिंदुंत्वाच्या झेंड्याखाली एकत्रित आणून तो आपल्या विचारसरणीला बांधायचा हा भाजपाचा अजेंडा आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्यामुळे त्यांनी काही सरकारी सवलतींचा वर्षाव वारकरी संप्रदायावर केला आहे. वारकरी संप्रदाय ही हजारो वर्षांची परंपरा आहे. भागवत धर्माचे विचार व पर्यावरणस्नेही विचारांवर तो चालतो. स्वतःच्या कष्टाची चटणी-भाकरी खात शेकडो मैल चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला भक्तिभावाने जातो. त्यांची श्रद्धा विठोबाच्या चरणी वाहिलेली असते. या संप्रदायाला हिंदुधर्माच्या नावाखाली हिंदू संघटना-प्रतिगामी लोक आपल्या विचारसरणीच्या दावणीला बांधत आहे, हे सत्य शरद पवारांनी मांडले. त्यात शरद पवारांचे काही चुकले नाही. त्यांनी वारकरी संप्रदायाला सावधच केले आहे.
आणखी एक ताजी घटना पाहा. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा चेहरा हा तसा सर्वसमावेशक होता. निधर्मीवादी होता. पण गेल्या काही वर्षांत या विद्यापीठाचे ‘भगवीकरण’ करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. भाजपाची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थी संघटना त्यासाठी प्रयत्नात असते. जवाहलाल नेहरू विद्यापीठावर भाजपचा झेंडा फडकवण्यात अजून तरी त्यांना यश आले नाही. देशातील विविध राज्यांतून शिक्षणासाठी येणार्या विविध जाती-धर्मातील विद्यार्थ्यांनी/शिक्षकांनी हे होऊ दिले नाही. विद्यापीठाचा पुरोगामी चेहरा विद्रूप होऊ दिला नाही. ही निधर्मी विचारसरणीची तटबंदी मोडण्याचा प्रयत्न भाजपा-संघ सातत्याने करीत आहेत. त्यासाठी नव-नवीन प्रयोग-कार्यक्रम-उपक्रम राबविणे सुरू ठेवले जाते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी रामनवमीचा उत्सव नेहरू विद्यापीठात साजरा केला. विद्यापीठाच्या आवारात सर्वत्र भगवे झेंडे, जय श्री रामच्या पताका लावलेल्या पहावयास मिळाल्या. तिथे अभाविपला उजव्या विचारसरणीचा प्रभाव वाढवायचा आहे. भगवीकरण करण्याचाच हा एक भाग त्यांचा आहे. प्रतिगाम्यांनी अशाप्रकारे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसखोरी आरंभली आहे.
साहित्य संस्थावर देखील प्रतिगाम्यांचा कब्जा सुरू आहे. मार्च महिन्यात नागपूर येथील विदर्भ साहित्य संघ आणि पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या दोन्ही संस्था या प्रतिगाम्यांनी सत्ताधारी भाजपच्या सहकार्याने जिंकल्या. दोन्ही संस्थांच्या अध्यक्षपदी संघ-भाजपा विचारसरणीच्या व्यक्ती निवडून आल्या. विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी भाजपाचे गिरीश गांधी निवडून आले. निवडणुकीत गिरीश गांधी यांनी आपल्याला निवडून देण्याचे आवाहन करणारे पत्रक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे, असा प्रचार केला. पण त्यांच्यावरील टीकेनंतर नामदार नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितले की, मी असले कुठलेही पत्रक काढले नाही. परंतु जो संदेश जायचा तो मतदारांना गेला आणि गांधी भरघोस मतांनी निवडून आले. संघ भाजपाने गिरीश गांधी आणि त्यांचे पॅनल निवडून यावे म्हणून निवडणूक प्रचार यंत्रणा राबविली. गिरीश गांधी निवडून आल्यानंतर त्यांचा सत्कार कार्यक्रम घडवून आणण्यात विदर्भातील साहित्यिक व साहित्यप्रेमींपेक्षा संघ-भाजपा पदाधिकारीच आघाडीवर होते. कारण प्रतिगाम्यांचा विदर्भ साहित्य संस्थातील घुसखोरीचा डाव यशस्वी झाला होता.

दुसरी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेतील निवडणूक संघ भाजपाप्रणित पॅनेलने जिंकली आणि एकांकिकार-नाटककार योगेश सोमण हे अध्यक्षपदी निवडून आले. त्यांच्या साहित्य संवर्धन पॅनलचा विजय झाला. त्यांनी पुरोगामी पॅनलच्या पराभव केला. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहाय्याने निवडणूक यंत्रणा पार पाडली. सभासदांवर पोलीसी व तत्सम यंत्रणेचा दबाव टाकला, असा आरोप परिवर्तन उत्कर्ष आघाडीने केला. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतरच्या सत्कार समारंभात भाजपा आघाडीवर होती तेव्हा प्रतिगाम्यांची घुसखोरी यशस्वी ठरली. या दोन्ही साहित्य संस्थांचा कारभार प्रतिगाम्यांकडे गेला आहे.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यकारिणीसाठी निवडणूक ही गेल्याच महिन्यात झाली. प्रतिगाम्यांनी स्वतःच्या ताब्यात ही संस्था असावी म्हणून आटोकाट प्रयत्न केले. परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत. साहित्यप्रेमी, राजकारणी व पुरोगामी विचारांचे शरद पवार हे अध्यक्षपदी निवडून आले तर कार्यकारिणीत पुरोगाम्यांचा वरचष्मा राहिला. मुंबईतील एशियाटिक लायब्ररीची निवडणूकही काही कारणे दाखवून अडथळा निर्माण करून पुढे ढकलली जात आहेत. पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ संपादक व माजी खासदार कुमार केतकर यांच्या पॅनेलविरोधात भाजपाचे विनय सहस्त्रबुद्धे आणि मंडळी केतकर निवडून येऊ नयेत म्हणून प्रयत्न करीत आहेत. कारण प्रतिगाम्यांना एशियाटिक लायब्ररीचा कारभार स्वतःच्या हातात घ्यायचा आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मंत्री व बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा यांच्या पॅनेलला मराठी साहित्यप्रेमी मतदारांनी नाकारले. मराठी साहित्य चळवळीचे प्रमुख केंद्र असणार्या गिरगावातील मुंबई मराठी साहित्य संघ काबीज करण्याचा भाजपचा डाव उधळून लावला. या निवडणुकीत ऊर्जा
पॅनेलच्या डॉ. उषा तांबे या अध्यक्षपदी निवडून आल्या, तर त्यांच्या पॅनेलचे सातपैकी पाच जण उपाध्यक्षपदी निवडून आले. मुंबईत गेली आठ दशके साहित्य-नाट्यक्षेत्रात कार्यरत असलेली ही वास्तू लोढा यांना ताब्यात घ्यायची होती असा आरोप त्यांच्यावर झाला. कारण ऐन मोक्याच्या जागेवर ही साहित्य संघाची इमारत असून ती पाडून तिथे टोलेजंग इमारत बांधायची आणि अमराठी व्यवसायिकांना गाळे/कार्यालये द्यायची असा घाट घातला जात होता अशी कुणकुण लागल्यामुळे मराठी साहित्यप्रेमी-भाषाप्रेमी मतदार जागरूक झाले आणि भाजपाचा हा कुटील डाव हाणून पाडला.
२०१४ साली भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आल्यापासून देशातील अग्रणी शिक्षण संस्था-विद्यापीठे, साहित्य संस्था, विज्ञान संस्था, कला-सांस्कृतिक केंद्रे, क्रीडा संस्था तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नॅशनल बुक ट्रस्ट, आय.आय.टी., आय.आय.एम. आदींवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. काही ठिकाणी ते यशस्वी होत आहेत. तर काही ठिकाणी त्यांना प्रखर विरोध होत आहे. या संस्थामध्ये संघ-भाजप विचारसरणीच्या व्यक्तींच्या ताब्यात राहाव्यात म्हणून भाजप नेते प्रयत्नशील आहेत. वारकरी संप्रदायातच नव्हे तर सर्वच क्षेत्रात प्रतिगाम्यांची घुसखोरी सुरू आहे. महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा पुसून टाकण्याचा प्रयत्न ही प्रतिगामी मंडळी करीत आहे. तेव्हा भारतीय संविधानाला धक्का देणार्या प्रतिगाम्यांच्या घुसखोरीला आवर घालणे जरुरीचे आहे.

