• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

`सरहदचा सांगाती’ संजय नहार!

राजश्री जाधव पाटील व्यक्तिविशेष

Marmik Team by Marmik Team
September 5, 2026
in मोठी माणसं, विशेष लेख
0
`सरहदचा सांगाती’ संजय नहार!

‘सरहदें रोक नहीं सकतीं कभी जज़्बातों को,
प्यार का जज्बा तो हर दिल में बसा होता है।
बाँट दे मुल्क को जो,
वो सियासत होगी,
जो दिलों को मिला दे,
वही फरिश्ता होता है।’
आपल्या देशात आणि समाजात जेव्हा जेव्हा द्वेषाचा, अस्वस्थता आणि संशयाचा गदारोळ माजतो, तेव्हा समाजविघाताच्या त्या वातावरणात शांततेचा, प्रेमाचा आणि संवेदनशीलतेचा आवाज क्षीण होतो की काय, अशी रास्त भीती निर्माण होते. राजकीय स्वार्थ, प्रांतीय अस्मिता आणि धार्मिक संकुचिततेच्या भिंती जेव्हा मानवी मूल्यांभोवती तटबंदी उभारू लागतात, तेव्हा सामान्यांचे जिणे असह्य होते. परंतु, याच अस्वस्थ वातावरणात काही अशी ध्येयवेडी आणि समर्पित व्यक्तिमत्त्वे जन्माला येतात, जी प्रांतांच्या, धर्माच्या व भाषांच्या सर्व कृत्रिम सीमा ओलांडून केवळ ‘माणूसपण’ जपण्याचा अखंड ध्यास घेतात. अशाच एका राष्ट्रप्रेमी अवलियाचे नाव म्हणजे ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार.

नुकताच पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडलेला संजय नहार यांचा एकसष्टी अभिष्टचिंतन, ‘सरहदचा सांगाती’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन आणि ‘सरहद’ या सामाजिक संस्थेच्या त्रिदशकपूर्ती सोहळ्याचा प्रत्यक्ष साक्षीदार होण्याचा अनमोल योग मला आला. हा सोहळा केवळ एका व्यक्तीचा वाढदिवस किंवा एका संस्थेचा वर्धापन दिन नव्हता; तर गेल्या तीन दशकांपासून पंजाब, काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारतातील अशांत व दहशतीने होरपळलेल्या सीमेवरील भागांत महाराष्ट्राच्या मायेचा रेशमी धागा विणणार्‍या एका मानवी चळवळीचा तो उत्सव होता.
अलीकडच्या काळात पुण्याची ‘सांस्कृतिक राजधानी’ अशी ओळख काहीशी पुसट होत असल्याची चर्चा ऐकू येते. तसेच, आजच्या धकाधकीच्या आणि स्वकेंद्रित जगण्यात समाजमनामध्ये एकमेकांबद्दल एक प्रकारची अलिप्तताही वाढीस लागलेली दिसते. मात्र, या सगळ्या अस्वस्थ पार्श्वभूमीवर २७ ऑगस्ट २०२६च्या त्या सायंकाळी गणेश कला क्रीडा मंचावर पाऊल ठेवताच एक सुखद आणि आश्वासक चित्र पाहायला मिळाले. संजय नहार यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी तब्बल तीन हजारांहून अधिक सहृदयी लोकांचा जनसागर लोटला होता. समाजमनातील वाढत्या अलिप्ततेच्या काळात माणुसकीसाठी जमलेली ही अलोट उपस्थिती विशेष दखल घेण्यासारखी होती. सभागृहातील वातावरण एका वेगळ्याच ओलाव्याने आणि राष्ट्रीय भावनेने भारलेले जाणवत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे डोळ्याचे पारणे फेडणारे नृत्य ‘सरहद’च्या विद्यार्थ्यांनी सादर केले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, पुणे बुक फेस्टिव्हलचे संयोजक राजेश पांडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, आसामचे खासदार प्रमोद बोडो, लडाखचे खासदार मोहम्मद हनीफा जान, ‘ग्रेटर काश्मीर’चे मुख्य संपादक पैâय्याझ कल्लू, ज्येष्ठ उद्योगपती मुश्ताक छाया आणि गौरव समितीचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया यांच्यासह देशभरातून आलेले असंख्य मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दूरस्थ माध्यमातून उपस्थिती नोंदवून नहार यांच्या कार्याचा गौरव केला. या सोहळ्यात विचारपीठावरील विविध दिग्गजांनी संजय नहार यांच्या ३० वर्षांच्या ऐतिहासिक वाटचालीचा अत्यंत सार्थ शब्दांत सन्मान केला. दिल्लीतून ऑनलाइन संवाद साधताना नितीन गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय एकता, एकात्मता आणि अखंडतेसाठी संजय नहार यांनी तीन दशकांपासून केलेले कार्य अभूतपूर्व आहे. केवळ विचार मांडण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष सीमाभागात जाऊन प्रतिकूल परिस्थितीत प्रबोधन करण्याचे काम त्यांनी केले. आजच्या काळात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही खरी समस्या बनली असून, देश जोडण्यासाठी अशा निष्पाप व प्रामाणिक कार्यकर्त्यांची खरी गरज आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अत्यंत भावुक आठवणींना उजाळा दिला. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंजाबमध्ये जाण्याचे धाडस कुणी करत नसताना संजय नहार यांनी तरुण देशभक्त म्हणून तिथे उडी घेतली आणि शांततेचा संदेश दिला. त्यानंतर काश्मीरमधील भीषण दहशतीच्या काळातही ‘महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे’ हा विश्वासाचा हात त्यांनी तेथील दुःखी व पीडित नागरिकांना दिला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नहार यांच्यातील सामाजिक उत्तरदायित्वाची प्रशंसा करताना नमूद केले की केवळ सत्ताकारण महत्त्वाचे नसून समाजकारण व राष्ट्रकारण महत्त्वाचे आहे, हेच नहार यांनी काश्मिरी मुलींच्या वसतिगृहापासून मणिपूरच्या अनाथ बालकांसाठी उभारलेल्या प्रकल्पांतून दाखवून दिले आहे.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे यांनी ऐतिहासिक संदर्भ जोडत सांगितले की, मध्ययुगीन काळात संत नामदेव महाराजांनी महाराष्ट्रातून पंजाबमध्ये जाऊन भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला होता; आजच्या आधुनिक काळात पंजाब, काश्मीर, लडाख व महाराष्ट्राला सांस्कृतिक व भावनिक धाग्याने जोडणारे संजय नहार हे खर्‍या अर्थाने ‘आधुनिक व्ाâाळातील संत नामदेव’ व संस्कृतीचे सांगाती आहेत. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ.गिरीश गांधी म्हणाले, आजकाल समाजात चिंता व्यक्त करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. चांगलं काम केल्याचे कौतुक नाही आणि वाईट काम केलेल्याला शिक्षा नाही, अशावेळी संजय नहार यांच्या कार्यप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा घडवून आणल्याबद्दल संयोजन समितीचे विशेष कौतुक आणि आभार. गांधी म्हणाले की शेजारी उपाशी असेल तर आपण जेऊ नये असे कुराण सांगते, एवढी संवेदनशीलता आपल्या ठायी आहे का, याचा प्रत्येकांनी विचार करायला हवा. ते म्हणाले नहार यांनी अशा दुभंगलेल्या निरागस मनांना जोडण्याचे काम केले ज्या मुलांनी हिंसाचारात आपल्या आई वडीलांना गमावले, आईवर अत्याचार होताना पाहिले. या सैरभैर मुलांना महाराष्ट्रात घेऊन येणे, त्यांच्यावर मायेची पाखर घालून त्यांना आश्वासक मदतीचा हात देणे ही साधी गोष्ट नाही.

उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेणारे भावुक मनोगत मांडताना संजय नहार म्हणाले, ‘सरहद ही केवळ कागदावर नोंदणी झालेली संस्था नसून एक जिवंत मानवी भावना आहे. क्रांतिवीर भगतसिंग हे माझे नायक आहेत. आपण शरीराने टिकून राहण्यापेक्षा विचाराने अधिक काळ टिकतो, यावर माझा विश्वास आहे. आयुष्यात कोणतीही मोठी संपत्ती न उभारता देशभरातून कमावलेली माणसेच माझी खरी संपत्ती आहे.’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या ऋणानुबंधांचा त्यांनी अत्यंत कृतज्ञतेने उल्लेख केला. काश्मीर आणि पंजाबातील अशांततेच्या काळात बाळासाहेबांनी त्यांना मोठे नैतिक बळ दिले होते. ‘सीमेवरील दुःखी माणसाला दूर महाराष्ट्रात त्याचा भाऊ पाठीशी उभा असल्याचा विश्वास वाटला पाहिजे,’ हे बाळासाहेबांचे शब्दच आपल्या आयुष्याची ऊर्जा बनल्याचे नहार यांनी सांगितले. या सोहळ्यात ‘सरहदचा सांगाती’ या विशेष गौरवग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले. हा ग्रंथ म्हणजे केवळ एका व्यक्तीची स्तुती नसून भारतातील गेल्या तीन दशकांतील सामाजिक आणि राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी सांगणारा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. या गौरवग्रंथात काश्मीर ते कन्याकुमारी आणि समाजकारण ते राजकारण, साहित्य, लष्कर व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक अग्रगण्य मान्यवरांनी नहार यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. यामध्ये राजकीय व सामाजिक क्षेत्रातून शरद पवार, चंद्रकांत पाटील, सुशीलकुमार शिंदे, राज ठाकरे, संजय राऊत, प्रमोद बोरो आणि डॉ. गिरीश गांधी यांसारख्या प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे. माजी भूदलप्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक, डॉ. शाह पैâसल आणि एस. एस. विर्क यांनी नहार यांच्या राष्ट्रउभारणीतील आणि सीमावर्ती भागातील योगदानावर प्रकाश टाकला आहे. यासोबतच साहित्य, उद्योग व पत्रकारिता क्षेत्रातून डॉ. श्रीराम पवार, उद्योजक अभय फिरोदिया, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत तळणीकर, ‘मार्मिक’चे स्तंभलेखक विकास झाडे, राजीव साबडे यांसारख्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे लेख या ग्रंथात समाविष्ट असून, त्यांतून नहार यांच्या अथांग सामाजिक कार्याचा व स्नेहबंधांचा कृतज्ञतापूर्वक परिचय होतो.

केवळ भूतकाळातील यशावर समाधान न मानता ‘सरहद’ संस्थेने या प्रसंगी एका नवीन संवेदनशील संकल्पाची घोषणा केली. ईशान्य भारतातील मणिपूर येथे झालेल्या वांशिक हिंसाचारात अनाथ झालेल्या बालकांना महाराष्ट्रात आणून, त्यांच्या राहण्याची, शिक्षणाची आणि संगोपनाची संपूर्ण जबाबदारी ‘सरहद’ उचलणार आहे. काश्मीरनंतर आता मणिपूरच्या दुःखी मुलांच्या पाठीशी उभे राहण्याच्या या घोषणेने सभागृहातील प्रत्येकाचे मन हेलावून गेले. काश्मीरची दरी असो, पंजाबची शेतं असोत वा ईशान्य भारताची जंगले असोत; जिथे जिथे अस्वस्थता आली, तिथे तिथे नहार धावून गेले आहेत. जात, धर्म आणि प्रांतांच्या सीमा ओलांडून केवळ माणूसपणाची आणि राष्ट्रप्रेमाची पेरणी करणार्‍या या ध्येयवेड्या अवलियाला आणि त्यांच्या संपूर्ण ‘सरहद’ परिवाराला मानाचा मुजरा!
‘मैं अकेला ही चला था
जानिब-ए-मंज़िल मगर,
लोग साथ आते गए और
कारवाँ बनता गया।’

(लेखिका सहसंचालक, महाराष्ट्र वित्त सेवा, मुंबई या पदावर कार्यरत आहेत.)

Previous Post

तीन पिढ्यांची गमतीदार गोष्ट!

Next Post

पंचमी सामाजिक सौहार्दाची

Next Post
पंचमी सामाजिक सौहार्दाची

पंचमी सामाजिक सौहार्दाची

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.