• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

तीन पिढ्यांची गमतीदार गोष्ट!

संजय डहाळे तिसरी घंटा

Marmik Team by Marmik Team
September 5, 2026
in तिसरी घंटा
0
तीन पिढ्यांची गमतीदार गोष्ट!

‘जेन झी’ची ताकद उभ्या जगाने नुकतीच जंतरमंतरवर अनुभवली. आजच्या नवतंत्रज्ञानाच्या युगात वाढलेल्या पिढीचे कल्चर हे सर्वस्वी थक्क करून सोडणारे आहे. बदललेला काळ, वाढलेली क्षमता, नवनवीन तंत्रज्ञान यामुळे दोन्ही पिढ्यांमध्ये टोकाचे अंतर असते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी एकमेकांना समजून घेणं ही काळाची गरज ठरते. योग्य संधी आणि दिशा या मिळाल्यास प्रत्येक पिढी ताकदीने अन् आनंदाने उभी राहू शकेल. त्यातून नव्या-जुन्यांचा संघर्षही टाळू शकता येईल…

आपल्या मुलांनी कायम आनंदी असावं, हे स्वप्न प्रत्येक जन्मदात्यांचं असतं खरं, पण पालकांच्या आनंदाच्या संकल्पना आजच्या वेगवान काळापुढे बाद ठरतात. दोघांमध्ये वैचारिक अंतर असते. कालानुरुप प्रत्येक पिढी पूर्वीपेक्षा वेगळा विचार करते. ‘जुनं ते सोनं’ म्हणण्याऐवजी ‘जुनं ते माती’ अशी परिस्थिती होते. त्यातून मग दोन्ही पिढ्यांमध्ये वादविवाद होतात. कर्मठ परंपरा जपणारे आणि नवविचारांचे मतप्रदर्शन बिनधास्त करणारे समोरासमोर उभे ठाकतात. रक्ताची नाती असलेल्या दोन पिढ्या शत्रूप्रमाणे एकमेकांविरुद्ध उभे ठाकतात…. कारण प्रत्येक पिढीची गोष्टच वेगळी!

पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या मधुकर गणपुले यांचा वाडा. संस्कृती आणि सभ्यता जपणारा. पडदा उघडताच गणपुले रसिकांशी संवाद साधतात. सूत्रधार आणि गणपुले अशा दुहेरी भूमिकेत गरज पडेल तसे ते अधून मधून प्रगटतात. मुक्काम पोस्ट सदाशिव पेठ म्हणजे एक पारंपारिक संस्कृतीच! त्यांची पत्नी मालती आणि तरुण मुलगा मकरंद सोबत आहे. नोकरीच्या निमित्ताने मकरंद हा लंडनला निघतोय. त्याचं लग्नाचं वय झालेलं. त्याच्या आईच्या मनात सदाशिव पेठेतल्या एका सोज्वळ मुलीशी लग्न लावण्याचा विचार आहे. पण त्याला मकरंद अनुकूल दिसत नाही. परदेशी गेलेली मुलं तिथल्याच मुलींशीच लग्न करतात, मग आपली संस्कृती बाद ठरते हे भय आई-वडिलांच्या मनात आहे. त्यामुळे परदेशी मुलीशी कुठल्याही परिस्थितीत लग्न करायचं नाही, असं वचन ते मकरंदकडून घेतात.

मकरंद लंडनला पोहोचतो आणि मकरंदच्या आई-वडिलांना ज्याची काळजी होती नेमकं तेच घडतं. तिथल्या एका जर्मन तरुणीशी ओळख होते. ‘लव अ‍ॅट फस्ट साईट.’ दोघेही पाहताक्षणी एकमेकांच्या प्रेमात पडतात. लग्नही करतात. आजवर फक्त ‘जर्मन भांड्यांशी संबंध’ असलेल्यांच्या नशिबावर ‘जर्मन सूनबाई’ कोसळतात! पालकांना हे लग्न अमान्य. तरीही मकरंद त्यांना पटविण्याचा प्रयत्न करतो. दोघे पुण्यात पोहोचतात. पण काही एक उपयोग होत नाही. दोन्हीकडे ताठर भूमिका असल्याने समेट अशक्यच. यात २० वर्षे उलटतात. कुठलाही संवाद होत नाही.

या मध्यंतरात जग बदललेलं. पुण्यातल्या आई-वडिलांचं वय झालेलं. मुलगा असून नसल्यासारखा. त्यातच तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झालेली. इंस्टाग्राम, फेसबुकचा जमाना आलेला. तिकडे लंडनची फॅमिली वाढलेली. त्यांना एक मुलगी झालेली. ती देखील वयात आलेली. पुण्यात नवर्‍याला न जुमानता आई त्यांचा एक फोटो ‘लाइक’ करते आणि व्हर्च्युअल गाठीभेटी सुरू होतात. पुन्हा एकदा दुरावलेले गणपुले कुटुंबीय एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. पुणेकर आईबाबा लंडन मुक्कामी पोहचतात. तिथे राहणीमानापासून ते खाण्यापिण्यापर्यंत जमीन अस्मानाचा फरक. पुणेकर शाकाहारी तर लंडनकर पक्के मांसाहारी! जेवणापासून वादळ उठतं. त्यात आई पुण्याला निघते. तिच्यासोबत मुलगा मकरंदही पोहोचविण्यासाठी जातो. बाबांना लंडन फिरायचं असतं. राणीची भेट घ्यायची असते. त्यामुळे ते तिथेच राहण्याचा निर्णय घेतात. दरम्यान मकरंदची मुलगी मोना ही शिक्षणासाठी फ्रान्सला जाते. म्हणजे पुण्यात मकरंद आणि आई मालती तर लंडनला वडील मधुकर आणि जर्मन सुनबाई गुंडा आणि फ्रान्सला मुलगी मोना! अशाप्रकारे पाच जण तीन जागी पोहोचलेले. त्यात कोरोना महासंकट पसरते. लॉकडाऊनमुळे सगळे अडकतात. सारे घरात बंदिस्त. व्यवहार ठप्प. केवळ मोबाईलचा एकमेव आधार एकमेकांना उरतो. त्यावर त्यांच्या भेटीगाठी सुरू होतात. त्यातून एक भलताच प्रकार समोर येतो. मूळ पालक गणपुले यांच्या पिढीला पुढल्या मकरंदच्या पिढीमुळे जो मानसिक त्रास झाला, तोच पुढे मकरंदला पुढली पिढी मोनाने दिलाय, असं दिसतं. तीन पिढ्यांचा हा भोज्जा ! प्रत्येक पिढी पुढल्या पिढीला संस्कृती, संस्कारांचा जाब विचारते. प्रत्येक पिढीतला अंतर बदलतं. आचार, विचार, वर्तन यात फरक पडतो. तो स्वीकारणं किंवा त्यातून मार्ग काढणं गरजेचं असतं. तेच या नाटकात दिसतं.

संहितेच्या भक्कम पायावर नाटकाचा डोलारा उभा असतो. हा पाया ठिसूळ असेल तर नाट्य कोसळण्याचे भय अधिक असते. नाटककार अमोल पाटील यांचे व्यावसायिक रंगभूमीवर हे पदार्पणच. पण ज्या ताकदीने संहितेची मांडणी केली आहे ती विलक्षणच. आजच्या युगातल नाट्य यात आहे. कुठेही कृत्रिमता वाटत नाही. समकालीन वास्तवावरचं भाष्य बारकाईने केलंय. रसिकांना सत्यघटनेवरील नाटक वाटतं यातच नाटककाराच यश आहे. प्रसंग आणि संवाद हे कुठेही खटकत नाहीत. नेमके आहेत. तीन पिढ्यांचा घेतलेला वेध तसेच प्रत्येक व्यक्तिरेखा आणि त्यांचे नातेसंबंध हे पकड घेतात. विचार आणि विनोद याची भट्टी चांगली जमलीय. िवषयाच्या ताजेपणामुळे अमोल पाटील यांच्याकडून यापुढे आशा वाढल्या आहेत.

नव्या पिढीचा कल्पक दिग्दर्शक अद्वैत दादरकर याने सादरीकरणात चैतन्य आणलं आहे. हसविणारी एकही जागा शिल्लक ठेवलेली नाही. तसा हा गंभीर विषय पण मिश्किल आवरणात हळुवारपणे गुंडाळून रसिकांपुढे पेश केलाय. दिग्दर्शनकौशल्य हे दाद देण्याजोगं. हशा, टाळ्या, वन्समोअरने रसिकांची दाद वसूल होते. नाट्य कुठेही रेंगाळत नाही. पात्रनिवड अचूक आहे. खिळवून ठेवणारे नाट्य जमले असून वेगळेच परिमाण दिग्दर्शनामुळे मिळालंय. वेगळी रंगमंचीय भाषा शोधण्याचा प्रयोग यामागे आहे.

कलाकारांची चांगली टीम या गोष्टीत जमवलीय. सुनील बर्वे यांची एका पिढीचा चॉकलेट हिरो अशी ओळख होती. त्याच्या रंगमंच कारकीर्दीलाही चाळीशी पूर्ण झालीय. हा गुणी अभिनेता या नाटकात अवतरलाय. ही जमेची बाजू म्हणावी लागेल. वाढत्या वयाचे पुरेपूर भान त्यामागे आहे. टिपिकल पुणेरी बाज असलेला मधुकर गणपुले त्याने चांगला उभा केलाय. प्रवेशालाच टाळ्यांची उत्स्फूर्त दाद त्याला मिळते. पुणे ते लंडन रिटर्न असा हा भूमिकेचा प्रवास आणि फरक त्याने देहबोलीतून प्रभावीपणे दाखवलाय. राणीच्या भेटीची आतुरता म्हणजे कळसच! प्रभावी निवेदन, गाणं, नृत्य याने गणपुले परिपूर्ण आहे. अभिनयकौशल्यावर खलनायिकेला एक दर्जा मिळवून देणार्‍या हर्षदा खानविलकर यात मालती गणपुले या संयमी भूमिकेत आहेत. मालिकेतील बिझी स्टार असूनही एका मध्यंतरानंतर त्यांची नाटकात हजेरी लागलीय. नवरा बायकोची जोडी शोभून दिसते. ट्युनिंगही चांगलं जुळलं आहे. एका नाचावर त्यांनी तालही धरला आहे. सासूसुनेचा वाद इथेही आहेच! जर्मन सुनबाई गुंडा बनल्यात शर्मिला शिंदे. ही आणखी एक तयारीची अभिनेत्री. परदेशी उच्चार, वर्तन फिट्ट आहे. शेवटपर्यंत बेअरिंग चांगलं पकडून ठेवलंय. साडी नेसून चालताना उड्या मारणे तसेच मराठी गाणी परदेशी उच्चारात गाणे- याने एकच हशा पिकतो. ‘या चिमण्यांनो परत फिरा… ‘ या ‘ ताने’ला वन्समोअर मिळते. या धम्माल भूमिकेत त्यांनी कमाल केलीय. नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी मोना. यात वैष्णवी आंबवणे आणि अरबी उघडा शेख बनलेला शंतनू ढवळी या जोडीने समजून भूमिका केल्यात. उघडा शेखचे विदूषकी चाळे तणाव कमी करतात. मकरंदच्या भूमिकेत अक्षर कोठारी याची घुसमट ठळकपणे दिसते. मुलगा आणि बाप या दोन्ही नात्यांतील गुंतागुंत प्रभावीपणे साकारली आहे.

तांत्रिक बाजूंनीही जुळवाजुळव योग्य केलीय. नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांचे सदाशिव पेठेतील टिपिकल घर आणि लंडनचं मुलाचं घर तशीच मोनाची बेडरूम हे सारं काही वातावरणनिर्मितीला पूरक ठरतंय. व्हिडिओ कॉलिंगसाठीची नेपथ्यरचना नेमकी आहे. अमोघ फडके यांची प्रकाशयोजना आणि सौरभ भालेराव यांचे संगीत देश-परदेशातली तफावत दाखविते. श्वेता बापट यांनी विचारपूर्वक गेटअप करून दिलेत.
व्यावसायिक रंगभूमीवर सध्या चार गोष्टी गाजताहेत. प्रशांत दामले यांचं ‘एका लग्नाची पुढली गोष्ट’, दुसरं राजन ताम्हाणे दिग्दर्शित ‘गोष्ट तिच्या घटस्फोटाची’, तिसरं सोनल प्रोडक्शनचं ‘जर तरची गोष्ट’ आणि चौथे ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ योगायोग म्हणजे नंदू कदम आणि प्रिया बापट यांची निर्मिती असलेल्या शेवटच्या दोन्ही नाट्यमय गोष्टीच आहेत. एका गोष्टीने नाबाद ४०० प्रयोगांचा टप्पा गाजविला, तर दुसरी गोष्टही त्याच वेगात निघालीय. या दोन्ही गोष्टींचे निर्माते एकच आहेत. तसेच दिग्दर्शकही अद्वैत दादरकरही कायम आहे. एक चांगली टीम यामागे उभी दिसतेय. जणू सोनल प्रोडक्शनला ‘गोष्ट’ हा शब्द लकी ठरलाय. निर्मितीमूल्ये समाधानकारक. निर्माते नंदू कदम यांना असणारा निर्मितीचा अनुभव यामागे आहे.

नात्याच्या मुळाशी अन् घराच्या मातीशी घट्ट असलेली नाळ ही पिढी बदलली तरी बाद होता कामा नये. त्याची कायमच जपणूक करायला हवी हा विचार कथानकातून डोकावतो. तीन पिढ्यांचे फक्त एका क्लिकवर संबंध तुटले जातात. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयासाठी वेळ लागणं हे आता नव्या पिढीला अमान्य आहे. सारं झटपट. संयमच कमी होतोय. मनावरलं नियंत्रण संपत चाललंय. सारी शॉर्टफॉर्मची चलती. विचार व तंत्रज्ञान यांचं जसं नवं आव्हानच उभं ठाकलंय. पडदा पडला तरी नाटक संपल्यासारखं वाटत नाही. कारण कुटुंबातील नातेसंबंधावर काही प्रश्न मनात घुटमळत राहतात. घुमत राहतात. हे याचे वैशिष्ट्य आहे. अखेर या कुटुंबाचा दस्ताऐवज दिग्दर्शक ठरतोय, हेच याचं बलस्थान. तीन पिढ्यातील तसा हा गमतीदार प्रवास. त्यात प्रत्येक पिढी म्हणणारच आहे की- ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ हे नाटक न राहता एक कुटुंब अनुभव ठरतो.
आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!

लेखन- अमोल पाटील
दिग्दर्शन- अद्वैत दादरकर
नेपथ्य- संदेश बेंद्रे
प्रकाश- अमोघ फडके
संगीत- सौरभ भालेराव
वेशभूषा- श्वेता बापट
छायाचित्रे- संजय पेठे
निर्माता- नंदू कदम
निर्मिती- सोनल प्रोडक्शन

Previous Post

गड्या आपला गाव बरा!

Next Post

`सरहदचा सांगाती’ संजय नहार!

Next Post
`सरहदचा सांगाती’ संजय नहार!

`सरहदचा सांगाती' संजय नहार!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.