
पंढरपूरमधील नागपंचमी खूपच उत्साहात साजरी होते. यासाठी खास आलेल्या माहेरवाशीणींचे लाड करायचे, त्यांना मनसोक्त खेळू द्यायचे, खाऊपिऊ घालायचे, संध्याकाळी देवळात जायचे. तेथे सभामंडपातही सर्व खेळ खेळायचे. घराजवळ कासारांची खूप दुकानं आहेत. चार दिवस तेथे बायकांची अक्षरश: जत्रा असते. पंचक्रोशीतील बायका-मुली पण बांगड्या भरायला येतात.
फांद्यांवरी बांधिले गं मुलींनी हिंदोले
पंचमीचा सण आला डोळे माझे ओले
जळ भरे पानोपानी संतोषली वनराणी
खळाखळा वाहतात, धुंद नदीनाले
पागोळ्या गळतात बुडबुडे पळतात
भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले
गीतकार ग. दि. माडगुळकर, संगीत व स्वर गजानन वाटवे यांचा. पूर्वी नागपंचमीच्या सुमारास हे गाणे आकाशवाणीवर हमखास लागायचे. वाटव्यांचा सुरेल व भावोत्कट स्वर श्रावणातल्या नागपंचमीचे चित्र डोळ्यांसमोर उभा करायचा.
लहानपणी कॉलेजच्या रस्त्यावर किंवा प्लॅटफॉर्मच्या जवळपास गारुडी दिसायचा. यातून येऊ घातलेल्या नागपंचमीची चाहूल लागायची. नागपंचमीचा आईचा खास मेनू म्हणजे खांडवी. जिवतीचा आघाडा आणि दुर्वा वाहिलेला कागद आणि त्यासमोर रांगोळीने काढलेला नागोबा. याला दूध, लाह्या, व खांडवीचा नैवेद्य दाखवायचा. मग गरमागरम खांडवीवर तुपाची धार धरून आडवा हात मारायचा.
लग्न होऊन पंढरपूरला आले. पहिल्या नागपंचमीला मला वेगळाच माहौल पाहायला मिळाला. नागपंचमीच्या आदल्या दिवसापासूनच मुली आणि बायका रात्री रस्त्यावर वेगवेगळे खेळ खेळायच्या. झिम्मा, फुगडी, फेर धरायच्या. मला हे सारे नवीनच होते. या सगळ्याजणी त्या दिवशी उपवास करतात भाजका किंवा एकादशीसारखा. त्याला ‘भावाचा उपवास’ म्हणतात. भावाला दीर्घायुष्य लाभण्यासाठी हा उपास. यावेळी म्हटल्या जाणार्या काही भावपूर्ण ओव्या मला मानसी केसकर यांनी सांगितल्या.
।। माझ्या गं दारावरून रंगीत
गाड्या गेल्या ।।
।। भावानं गं बहिणी नेल्या
पंचमीच्या सणाला गं ।।
।। चाट्याच्या गं दुकानी
भाऊ बसला गादीवरी ।।
।।हिरवी पैठणी मांडीवरी
हरणीच्या लाडासाठी ।।
नागपंचमीच्या दिवशी सकाळी आमच्याकडे स्वयंपाक करणार्या कमलकाकू मला कासाराकडे बांगड्या भरायला घेऊन गेल्या, दुपारी सासूबाईंनी नवीन साडी दिली, थोड्या वेळाने दोघी नणंदा आल्या. येताना मेंदीचे कोन, नेलपेंट एक ना अनेक वस्तू भेट देऊन गेल्या. कारण काय तर माझी पहिली नागपंचमी. एकंदरीत पंढरपूरमधील नागपंचमी खूपच उत्साहात साजरी होते. यासाठी खास आलेल्या माहेरवाशीणींचे लाड करायचे, त्यांना मनसोक्त खेळू द्यायचे, खाऊपिऊ घालायचे, संध्याकाळी देवळात जायचे. तेथे सभामंडपातही सर्व खेळ खेळायचे. घराजवळ कासारांची खूप दुकानं आहेत. चार दिवस तेथे बायकांची अक्षरश: जत्रा असते.
पंचक्रोशीतील बायका-मुली पण बांगड्या भरायला येतात. गल्लीबोळांतून महिलांचे खेळ चालू असताना मुख्य रस्त्यावर मुलांच्या सुरपाट्या रंगतात. रस्त्यावरच चुन्याने मोठमोठे चौकोन रंगवून हा खेळ खेळला जातो. चापल्य, दमदारपणा आणि बुद्धिकौशल्य या तिन्ही गोष्टींचा कस लावणारा अत्यंत वेगवान आणि नेत्रदीपक असा हा खेळ आहे. रस्त्यावर जाग्या असणार्या या तरुणाईने गल्लीबोळात खेळणार्या महिलांना आपसूकच संरक्षण मिळते.
माहेरी जरी खांडवी असली तरी सासरी मात्र पुरणपोळी किंवा दिंड करायची पद्धत. स्वाभाविकपणे महिलांचा ओढा माहेर लवकर मिळवायच्या दृष्टीने बघू याकडे असतो. त्यामुळे आज जरा खांडवीबद्दल बोलावे असा मानस आहे.
नागपंचमीच्या दुसर्या दिवशी देवळात श्री रुक्मिणी पांडुरंगापुढे मातीची गजगौरी मांडतात. गजारूढ गौरीशंकराची मूर्ती हाताने माती कालवून बनवली जाते. यात या विधीचे मुख्य यजमान पाटील तर सर्व बारा बलुतेदारांचा सहभाग असतो. गावातील कुंभार माती आणून देतात. चितारी (वीणा, मृदुंग, पखवाज बनवणारे) मातीचा हत्ती बनवतात. याला लागणारे लाकूड पाटील पुरवतात तर डोळे म्हणून कवड्या वापरतात. मूर्ती तयार झाली की त्याला कुंची आणि केवड्याची कलगी घालतात. अशाप्रकारे सुस्थापित मूर्तीच्या अग्रपूजेचा मान चितारी यांचा. त्यांना पाटलांकडून मानाचा नारळ दिला जातो. सर्व ग्रामस्थ दिवसभर या गौरीच्या दर्शनासाठी येतात. महालक्ष्मीप्रमाणे याही गौरीला दोरे वाहण्याची प्रथा आहे.
आपल्या गावगाड्यात देऊळ हे एक सांस्कृतिक केंद्र आहे, मुक्तद्वार आहे. घरात जशी आत्मीयता असते तशीच ती देवळातही असते. त्यामुळे सगळ्या माहेरवाशीणी व सासुरवाशीणी मिळून मनसोक्त खेळ खेळतात. मावळतीपूर्वी गौरीचे विसर्जन करतात. या विसर्जनावेळी भोई समाज लाकडी पाटावर ही मूर्ती वाहून नेतो. वाजंत्री,जरीपटके, अब्दागिरी, छत्री अशी मोठ्या थाटात मिरवणूक निघते. स्थानिक घडशी समाज वाजंत्री वाजवतो. रस्त्यात मिरवणुकीपुढे लोणार तालमीतील मुले दांडपट्टा, लेझीम, काठी असे मर्दानी खेळ खेळतात. मिरवणूक पुढे वाळवंटात जाते, तिथे कोळी समाज आपल्या नावा पताका व फुलांनी सजवतात. वाळवंटात बुरुड समाज बांबू रोवून झोपाळे बांधतात. हे सर्व मुली आणि महिलांसाठी असते. तिथेही फुगड्या आणि इतर खेळ खेळले जातात. शेवटी विसर्जनाचा मान कोळी बांधवांचा. गौरीची कुंची आणि केवड्याची कलगी मात्र तशीच वाजतगाजत परत नेऊन देवळातील महालक्ष्मीपुढे ठेवतात.
मिरवणुकीत खेळ सादर करणार्या वस्तादालाही मानाचा नारळ देतात. प्रत्यक्ष खेळ करणार्या ५० ते १०० पैलवान मुलांचे काय? अर्थात त्यांचीही काळजी घेतली जाते. पाटलांच्या वतीने १० ते २० किलो हरभरा डाळ भिजवून त्याची उसळ प्रसाद म्हणून द्रोण भरून वाटली जाते. ही आरोग्यदायी प्रथा आजही चालू आहे. सामाजिक ऐक्य जपणार्या या परंपरा आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्यात डोळसपणे वेळोवेळी कालसुसंगत बदलही केले पाहिजेत आणि या बदलांसह त्या जतनही केल्या पाहिजेत नाही का?
इतके वाचल्यावर भूक लागणे स्वाभाविकच आहे. तर बघूयात खांडवीची कृती व साहित्य-

खांडवी
साहित्य : १ वाटी तांदूळ रवा, १ १/२ वाटी बारीक चिरलेला गूळ, अर्धी वाटी नारळ खोवलेला, ४ लवंगा, छोटा तुकडा आल्याचा किसलेला, मीठ, २ चमचे तूप, जायफळ.
कृती :
रवा दोन चमचे तूप घालून गुलबट भाजून घ्यायचा. तोपर्यंत पातेलीत ३ वाटी पाणी घालून उकळत ठेवायचं. पाण्याला आधण आले की त्यात खोवलेला नारळ, गूळ, लवंग, आलं, किंचित मीठ घालायचं. उकळलेल्या पाण्यात रवा घालायचा. एकसारखा ढवळावा लागतो. गुठळी होऊ द्यायची नाही. दणकून वाफ आणा. ताटाला तूप लावून ठेवा. आता पातेलीतील शिरा ताटात पसरवा. वरून खोबरं भुरभुरा. वड्या कापून गार करत ठेवा, गार झाल्यावर तुपाबरोबर स्वाद घ्या. केशर घातले तर रंगही छान येतो.

