
लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत या सर्व निवडणुका पार पडल्या आहेत. आता नजिकच्या काळात कुठल्याही निवडणुका नाहीत. तब्बल तीन वर्षानंतर २०२९ ची लोकसभा निवडणूक होणार आहे. तेव्हा तीन वर्षांच्या काळात आपापल्या पक्ष-संघटना बांधण्याची, वाढवण्याची संधी राजकीय पक्षांना आहे. शिवसेना त्यासाठी सज्ज झाली आहे. यंदाचे वर्ष हे वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. तेव्हा या सुवर्णक्षणाचे औचित्य साधून शिवसेना पक्ष संघटनेला मजबूत करण्यासाठी व शिवसैनिकांना नवी उभारी घेण्याची ही सुवर्णसंधी आहे.
वंदनीय बाळासाहेबांनी जून १९६६ मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना केली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र अंगिकारिले. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सभागृहात व सभागृहाबाहेर शिवसेना नेहमीच अग्रेसर राहिली आहे. बाळासाहेबांचे महाराष्ट्र-राष्ट्रासाठीचे जाज्ज्वल्य विचार, सामाजिक व राजकीय प्रश्नावर घेतलेली रोखठोक भूमिका, मराठी भाषा व अस्मितेसाठी दिलेला लढा, हिंदुत्वाची धरलेली कास आणि महाराष्ट्राचे भले व्हावे यासाठीचा ध्यास आठवावा आणि तो सर्वत्र पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी महाराष्ट्र ढवळून काढावा.
महाराष्ट्राने पाहिले आहे की शिवसैनिकांच्या नसानसांत बाळासाहेबांचे विचार भिनले आहेत. त्यामुळे लढण्यासाठी शिवसैनिक नेहमीच तयार असतो. जनसामान्यांसाठी संघर्ष करण्यासाठी तो मागेपुढे पाहात नाही. परंतु सध्याचे राजकारण एवढे गढूळ झाले आहे की ज्या जनतेसाठी लढले ती जनता सत्ताधार्यांच्या भूलथापांना ऐन निवडणुकीच्या वेळी बळी पडते. सत्ताधार्यांना दाखवलेली आमिषे, स्वप्ने ही तात्पुरती असतात हे तिला समजत नाही. या समाजाला खरे काय व खोटे काय हे समजून सांगण्याची गरज आहे. प्रबोधनाची गरज आहे, प्रशिक्षणाचीही गरज आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी जनतेशी संवाद व संपर्क वाढवून सत्य परिस्थिती सांगितली पाहिजे. महाराष्ट्राचे हित जपणारी व रक्षण करणारी शिवसेनाच आहे आणि शिवसेनाप्रमुखांचे विचारच महाराष्ट्राला योग्य दिशा दाखवून प्रगतिपथावर नेतील हे ठासून सांगण्यासाठी जिल्ह्या-जिल्ह्यात संपर्क साधण्याच्या कार्यक्रमांचा उपयोग होणार आहे.
शिवसेनेची महिला आघाडी, युवासेना त्याशिवाय शिवसेनाप्रणित सर्व अंगीकृत संघटनेनी या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या संघटनांचे पदाधिकारी मेळावे, वर्धापनदिन, अधिवेशने, प्रशिक्षण घेऊन शिवसेना व शिवसेनाप्रमुखांच्या विचारांने महाराष्ट्र ढवळून काढावा. त्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेना भवन येथे झालेल्या महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुख व मुंबईतील नगरसेवकांंच्या बैठकीत पदाधिकार्यांना याबाबत सूचना दिल्या. शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात भव्यदिव्य स्वरूपात करण्यात येणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात भव्य रक्तदान शिबीर, वैद्यकीय शिबीर, वक्तृत्व स्पर्धा, शालेय क्रीडा स्पर्धा, आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद
स्पर्धा, आंतरविद्यापीठ वाद-विवाद स्पर्धा, विचारवंतांच्या मनातील बाळासाहेब-व्याख्यानमाला, जिल्हावार-शिवसेना वर्धापन दिन, शिवसेनाप्रमुख व शिवसेनेवरील पुस्तक प्रदर्शन, बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन, भजन स्पर्धा, वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुखांनी काढलेली व्यंगचित्रे, मार्मिक-सामनातील अग्रलेख यांचे प्रदर्शन, शिवसैनिक नोंदणी अभियान आदी कार्यक्रमांचे जिल्ह्यातील आयोजन शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, अंगिकृत संघटना या सर्वांनी एकत्र येऊन सदर कार्यक्रम भव्यदिव्य स्वरूपात करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
त्यासाठी जुन्या अनुभवी पदाधिकार्यांसोबतच नव्या दमाच्या शिलेदारांवर कार्यक्रमांच्या नियोजनासाठी जिल्हानिहाय जबाबदारी सोपवली आहे ती अशी –
ठाणे- धर्मेंद्र राजाराम काळे, पालघर-चिंतामणी दत्ताराम निवाटे, नाशिक- सुहास चंद्रकांत वाडकर, धुळे-तुळशीराम धोंडीबा शिंदे, नंदुरबार- जितेंद्र हिरालाल वळवी, जळगाव- प्रमोद पांडुरंग सावंत, अहिल्यानगर- सदा परब, जीशान चंगेज मुलतानी, जालना- गीतेश विनायक राऊत, हिंगोली- दीपक राजाराम सावंत, बीड-विश्वास तुकाराम शिंदे, नांदेड- सुनील सयाजी मोरे, अमरावती- रमाकांत सखाराम रहाटे, अकोला- अनिल लक्ष्मण कदम, वाशीम- हरी जगन्नाथ शास्त्री, बुलढाणा- जोसेफ मनवेल कोळी, चंद्रपूर- निशिकांत गोविंद शिंदे, भंडारा- राजू मुल्ला, गोंदिया- शशिकांत झोरे, यवतमाळ- विजय जगन्नाथ भणगे, नागपूर-किरण प्रभाकर तावडे, वर्धा- सचिन देवदास पडवळ, गडचिरोली- विठ्ठल गोविंद लोकरे, रायगड- अंकित सुनील प्रभू, रत्नागिरी- सचिन बाळकृष्ण पाटील, सिंधुदुर्ग– सुरेश पाटील, पुणे- सोमनाथ सांगळे, सातारा- सत्यवान उभे, सांगली- स्वप्नील कुंजिर, सोलापूर– कैलास पाठक, जगदीश थैईवालापिल, कोल्हापूर- उदय दळवी, छत्रपती संभाजीनगर- आशीष चेंबूरकर, परभणी- राजू पाटील, धाराशीव- सुनील छबुलाल पाटील, लातूर- मुकेश साळुंखे.
‘‘लोकसभा निवडणुकीतील यशामुळे आपण विधानसभेला गाफील राहिलो, याउलट भाजपने मात्र लोकसभेतील अपयशानंतर विधानसभेला अधिक मेहनत घेत संधी साधली. त्यामुळे आगामी काळात अतिआत्मविश्वासाने हुरळून न जाता जमिनीवर काम करायला हवे. विरोधी पक्षाची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आपण झटायला हवे,’’ अशा शब्दांत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मागच्या लोकसभेच्या यशानंतर विरोधी पक्षातील आमच्या काही सहकार्यांनी तर आगामी विधानसभा आपलीच असे समजून मंत्रिपदाची जॅकेटही शिवली. मात्र आता आपल्याला असे न करता जमिनीवर राहून काम करायला हवे.
येत्या तीन वर्षांत शिवसेना पक्षबांधणीसाठी वेळ आहे. पक्षाची पूर्ण संघटनात्मक बांधणी करण्याची नामी संधी आहे. राजकारणात मधून मधून भाकरी फिरवावी लागते. ती वेळ आता आली आहे. वर्षोनवर्ष पद भोगणार्या पदाधिकार्यांच्या जागी नव्याने नेमणूक करण्याचा निर्णय शिवसेना नेतृत्वाने घ्यायला हवा. सुरूवात झाली आहे. ती अशीच पुढे चालू ठेवावी आणि गतिमान करावी. मुंबईतील काही विभागप्रमुख, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख बरीच वर्ष त्या पदाला चिकटून आहेत. त्यामुळे मरगळ आली आहे. त्यातले काही अकार्यक्षम पदाधिकार्यांना दूर करून त्यांच्या जागी नव्या शिलेदारांची नेमणूक करणे गरजेचे आहे. पक्षाच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्याची गरज आहे. त्यासाठी हीच वेळ योग्य आहे.

समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून त्याची महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठीची मते जाणून घेऊन त्याचा उपयोग पक्षविस्तारासाठी करावा. समाजातील युवक व महिला, दलित, मुस्लीम, वंचित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यक्रमात अग्रक्रम द्यावा. रंजल्या-गांजल्यासाठी शिवसेना आधार बनली पाहिजे. जाती-पातीच्या, धर्माच्या पलिकडे जाऊन समाजकारण करण्याची बाळासाहेबांची भूमिका शिवसैनिकांनी पुढे नेली पाहिजे. मराठी जनतेला मूळ शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र आणण्यासाठी आपला संपर्क वाढवावा. शिवसेनेच्या कार्याची, उपक्रमाची आणि बाळासाहेबांचे विचार घरोघरी पोहोचण्यासाठी माध्यम-समाजमाध्यमाचा शिवसैनिकांनी योग्य रीतीने वापर करावा. सत्ताधारी सत्ताकारणात व्यग्र आहेत. शिवसेनेचा पाया हा समाजकारणाचा आहे. तेव्हा शिवसैनिकांनी समाजकारणाचे हे असिधारा व्रत चालू ठेवण्यासाठी जनतेशी संवाद व संपर्क वाढवावा.
योग्य संवाद आणि संपर्कामुळे आपले मत मांडण्यात येते आणि इतरांचीही मते कळतात. त्यामुळे शिवसेना मजबूत करण्यासाठी आणि वाढीसाठी त्याचा निश्चितच उपयोग होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसैनिकांनी शिवधनुष्य उचलून बाळासाहेबांना खरी आदरांजली वाहावी.
बाळासाहेब ठाकरे हे हाडाचे कलावंत होते. जागतिक दर्जाचे थोर व्यंगचित्रकार होते. सडेतोड पत्रकार-संपादक तसेच रोखठोक बोलणारे वक्ते होते. या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या ह्या इंद्रधनुषी व्यक्तिमत्त्वाचा अविष्कार घडवावा. बाळासाहेबांच्या महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी विचारांचा निनाद सर्वत्र घुमवा. जगाला हेवा वाटेल असे बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष दमदार-जोरदारपणे साजरे करावे.
