
मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या काही राज्यात गणेशोत्सवाची धूम जोरात सुरू असतानाच, तितक्याच उत्साहाने सातासमुद्रापलीकडे अमेरिका, युरोपसह जगातील कित्येक देशांत गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. यंदा १२ दिवसांचा हा उत्सव असणार असून नऊ वर्षांनंतर असा दुर्मिळ आणि विशेष योग आला आहे.
लोकमान्य टिळकांनी भारतात सुरू केलेला हा सार्वजनिक उत्सव आज जागतिक स्तरावर विविध देशांमध्ये तिथल्या स्थानिक संस्कृतीशी एकरूप होऊन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव हा आज केवळ भारतीयांचाच नव्हे, तर जागतिक आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. विश्वव्यापी श्री गणेशाची मनोभावे पूजा करून गणेशोत्सव अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम, कॅनडा,न्यूझीलंड आणि आशिया ते दक्षिण आशियातील देशांत उत्साहात साजरा केला जातो. मुख्य म्हणजे या देशांत महाराष्ट्रातील किल्ले, छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर श्रेष्ठ नेत्यांच्या प्रतिकृती उभारल्या जातात आणि महाराष्ट्राची लोकधारा, लावणी, गोंधळ, भारुड यांच्यासारखे कार्यक्रम, लेझीम, दांडपट्टा यांसारखे मैदानी कसरती यांच गणेश मंडळांतर्फे आयोजन केले जाते. पुणे, इंदोर येथील ढोल पथकांना विशेष आमंत्रण दिले जाते. याचबरोबर उत्सवाच्या दिवसांत अस्सल मराठी चवीचे उकडीचे मोदक, पुरणपोळी, लाडू आणि मुंबईचा वडापाव यांच्यासारखे मराठी खाद्यपदार्थ बनविले जाऊन ते गणेशभक्तांना दिले जातात. काही ठिकाणी महाराष्ट्रातून गणेशमूर्ती आयात केल्या जातात, तर काही ठिकाणी त्या त्या देशांच्या नियमानुसार पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यात येतात.
पाहू या कुठे कसा गणेशोत्सव साजरा होतो ते.
अमेरिका- केवळ अमेरिकेत डझनाहून अधिक महाराष्ट्र मंडळातर्फे मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षी अमेरिकेत वॉशिंग्टन ते सीएटल, शिकागो ते डल्लास, न्यूयॉर्क ते बे एरिया अशा विविध भागात गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जात आहे. मात्र सणाचा अवधी कमी आहे. काही ठिकाणी एकच दिवस सण साजरा केला जाईल, काही ठिकाणी तो २-३ दिवस साजरा केला जाईल आणि काही मोजक्याच ठिकाणी अनंत चतुर्दशीपर्यंत सोहळा सुरू असेल.
अमेरिकेत गणेशोत्सव साजरा करणारी काही मंडळे : लॉस एंजिलिस, एटलांटा, बे एरिया येथील महाराष्ट्र मंडळे; मराठी मंडळ, पिट्सबर्ग (‘अमेरिकेचा राजा’), वूड ब्रिज सेंटर, न्यू जर्सी (१४ सप्टेंबर-२० सप्टेंबर), न्यू जर्सी इंडिया स्क्वेअर गणेश फेस्टिवल, नेवार्क एव्हेन्यू (१४ सप्टेंबर-२० सप्टेंबर), गणेशोत्सव मंडळ, सीएटल, रेडमंड सिटी हॉल, वॉशिंग्टन (१८ सप्टेंबर-२० सप्टेंबर), मराठी कला मंडळ, वॉशिंग्टन (जॉन चॅम्प हायस्कूल, व्हर्जिनिया (२० सप्टेंबर), दी ईस्ट बे मराठी मंडळ, प्लेझंन्टोन, कॅलिफोर्निया (२० सप्टेंबर), बे एरिया इंडियन कल्चरल सोसायटी, एमरेल्ड ग्लीन पीक, डब्लिन, ओहायो (२० सप्टेंबर), कॅलिफोर्निया व्हॅली मराठी मंडळ, माऊंटन हाऊस (१९ सप्टेंबर), दी सिद्धीविनायक मंदीर, ग्लेन बर्नी, मेरीलॅण्ड (१४ सप्टेंबर-२५ सप्टेंबर), मराठी कला मंडळ, वॉशिंग्टन (१९ सप्टेंबर), व्हर्जिनिया गणेश उत्सव, साऊथ रायडिंग, व्हर्जिनिया (१४ सप्टेंबर), बाल्टीमोर मराठी मंडळ, फिंग्सबर्ग, वॉशिंग्टन (१३ सप्टेंबर), वेस्टचेस्टर मराठी मंडळ गणेशोत्सव, न्यूयॉर्क (१९ सप्टेंबर) आणि ब्रूम स्ट्रीट गणेश मंदिर गणेशोत्सव, मॅनहॅटन (१० सप्टेंबर-१४ सप्टेंबर).
युरोप-युनायटेड किंग्डममध्ये (ग्रेट ब्रिटन) गणेशोत्सव मर्यादित स्वरूपात साजरा केला जातो. गणेशोत्सव साजरा करणारी काही मंडळे : हॉडनस्लो गणेशोत्सव मंडळ, लंडन, सटन मित्रमंडळ (सटनचा राजा), इंग्लंड आणि गणेशोत्सव मंडळ, ग्लासगो, स्कॉटलंड. गणेश मूर्तींचे थेम्स नदी, मर्सी नदी (लिवरपूल) आणि काल्डेकोट लेक (मिल्टन) येथे विसर्जन केले जाते.
जर्मनी- जर्मनीतील बर्लिनमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो. यांत स्थानिक मराठी मित्रांसोबत पुण्याच्या ‘रमणबाग युवा मंच’चे ढोल-ताशा पथकही सहभागी होते.
स्पेन-स्पेनमधील बार्सिलोनामध्ये महाराष्ट्र मंडळ, स्पेन यांच्यातर्फे गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येऊन शेकडो मराठी आणि भारतीय बांधव एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने पूजा आणि आरती करतात. येथे ऐतिहासिक देखावे देखील उभारले जातात. इथे गेल्या वर्षी शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याची प्रतिकृति उभारण्यात आली होती.
फ्रान्स- फ्रान्समध्ये ‘महाराष्ट्र मंडळ फ्रान्स’ यांच्यातर्फे पॅरिसमध्ये श्री गणरायाची स्थापना होते. पॅरिसच्या रस्त्यांवर तामीळ, मराठी आणि इतर बांधवांतर्फे भव्य मिरवणूक काढली जाते.
लक्झमबर्ग- वायव्य युरोपातील लक्झमबर्ग मध्ये मराठी मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा केला जातो. पर्यावरणाच्या दृष्टीने गणेश मूर्तीच्या विसर्जनाला परवानगी नसल्यामुळे मूर्तीचे बादलीत पाणी घेऊन विसर्जन केले जाते. नंतर ते पाणी झाडांना घातले जाते.
बेल्जियम- बेल्जियम मराठी मंडळातर्फे, बेल्जियममध्ये १३ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव साजरा केला जाईल.
स्वीडन-स्वीडनमध्येही ‘महाराष्ट्र मंडळ गोथेनबर्ग’ यांच्यातर्फे एक दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जातो. पालखीतून गणरायाची मिरवणूक काढली जाते. गेल्या वर्षी पंढरपूर वारीच्या संकल्पनेवर गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. स्वीडनमध्ये मूर्ती विसर्जनाला परवानगी नसल्यामुळे गणेशत्सवानंतर मूर्ती पुढच्या गणेशोत्सवापर्यंत जपून ठेवली जाते.
ऑस्ट्रेलिया-ऑस्ट्रेलियात ‘युनायटेड इंडियन ऑफ साउथ ऑस्ट्रेलिया’तर्फे ‘ऑस्ट्रेलियाचा राजा’ची प्रतिष्ठापना केली जाते. यासाठी मुंबईतील लालबागवरून मूर्ती मागवली जाते. इनडोअर स्टेडियममध्ये ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाची भव्य पालखी निघते.
मॉरिशस-बहुतांश लोकसंख्या भारतीय वंशाची असल्यामुळे आफ्रिकेच्या पूर्व किनार्यावर असलेल्या मॉरिशसला ‘छोटा भारत’ म्हणून संबोधतात. येथे गणेशोत्सव अत्यंत भव्य स्वरूपात आणि सामुदायिक पद्धतीने साजरा होतो. मोठमोठे सार्वजनिक मंडप उभारले जाऊन आकर्षक मूर्तींची स्थापना केली जाते. भजन-कीर्तन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनंत चतुर्दशीला श्रद्धा आणि जल्लोषात गणेश विसर्जन पार पडते.
नायजेरिया-पश्चिम आफ्रिकेतील नायजेरियामध्ये ‘महाराष्ट्र मंडळ रेसिडेंशियल असोसिएशन ऑफ नायजेरिया’तर्फे लागोस शहरात ‘लागोसच्या राजा’ या नांवाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.
दुबई-आखातातील दुबईमध्येही महाराष्ट्र मंडळांतर्फे धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. घराघरात श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. शिवाय ‘मनखूल’मध्ये विशेष सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. हजारो मराठी बांधव धोतर कुर्ता घालून आणि भगिनी नऊवारी साड्या नेसून ढोल-ताशांच्या तालावर दुबईच्या ‘बुर दुबई’ परिसरात श्री गणरायाचे जल्लोषात स्वागत करतात. समुद्रात विसर्जन करण्यासाठी परवानगी नसल्यामुळे फार्म हाऊसमध्ये विसर्जनाची विशेष सोय केली जाते.
दुबई शहराच्या पूर्वस असलेल्या ‘सोनापूर कॅम्प’मध्येही गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. भारतातील हैदराबादचे भारतीय अब्दुल नासेर आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील सुब्बा राजू पटनम यांनी एकत्र येऊन ‘सोनापूर कॅम्प’मध्ये काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवाला सुरुवात केली होती. तेव्हापासून या उत्सवात भाविक मोठ्या प्रमाणात दरवर्षी भाग घेतात. ‘सोनापूर कॅम्प’ला मोठ्या उपखंडीय मनुष्यबळामुळे ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळखले जाते.
आशिया-गणेशोत्सव आशिया ते दक्षिण आशिया पर्यंत पसरला आहे. बर्याच दक्षिण आशियाई देश बौद्धधर्मीय आहेत. पण बौद्ध आणि हिंदू धर्माचा समागम आढळून येतो.
सिंगापूर- सिंगापूरमध्ये महाराष्ट्र मंडळ आणि ‘सिंगापूर कोस्टल कनेक्ट’ यांच्या विद्यमाने या वर्षी १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या काळात फॅरर पार्क येथे गणेशोत्सव साजरा होत आहे. या शिवाय घरोघरी प्रतिष्ठापनेसाठी जवळ जवळ ४०० गणेशमूर्ती भारतातून मागविण्यात आल्या आहेत. उल्लेख करण्यासारखी बाब म्हणजे सिंगापूरातील महाराष्ट्र मंडळ महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी नातं जपणार्या सर्वांना एकत्र आणून महाराष्ट्र दिन, मकर संक्रांत आणि इतर सण साजरे करते. या मंडळातर्फे छोट्या बालमित्रांसाठी ‘हसत खेळत मराठी’ यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या मंडळातर्फे दिवाळी अंकही प्रसिद्ध केले जातात. हे मंडळ सांस्कृतिक, औद्योगिक, वैचारिकदृष्ट्या प्रगतीशील महाराष्ट्राची आग्नेय आशियातील महत्त्वाची शाखाच आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये.
नेपाळ-नेपाळमध्ये गणेश चतुर्थीचा सण हा प्रामुख्याने ‘चथा’ किंवा ‘गणेश चथा’ या नांवाने ओळखला जातो. हा सण पारंपारिक आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा केला जातो. नेपाळमध्ये मारु गणेश (काठमांडू), कमलादी गणेश मंदिर (काठमांडू), सूर्य विनायक (भक्तपूर) अशा मंदिरात गणेशोत्सव साजरा केला जातो आणि तिथे भाविक गर्दी करतात. पूजेमध्ये गणपतीला पारंपारिक नेवारी खाद्यपदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो, ज्यामध्ये उकडलेले अंडे, तळलेले मासे, भैंसेचा चोईला, भातमास (बटर्णा), चपटा तांदूळ (पोहे), साग आणि पारंपारिक मद्य (आयला) यांचा समावेश असतो.
इंडोनेशिया- इंडोनेशियात श्री गणेशाचे अस्तित्व सातव्या शतकापासून आहे. इंडोनेशियातील हिंदू समाजावर प्राचीन परंपरेचा मोठा प्रभाव असून, विशेषत: बालीमध्ये हिंदू मंदिरात, बाली आणि भारतीय संस्कृती प्रमाणे प्रार्थनांचं आयोजन करून गणेशोत्सव साजरा केला जातो. बाली भागातील हिंदू धर्मीय समाजात श्री गणेशाला ज्ञान, कला आणि बुद्धीचे अधिष्ठाता मानून मनोभावे पूजा करतात. मोठ्या मूर्ती आणि देखाव्यांपेक्षा प्रतीकात्मक पूजा आणि प्रार्थनांवर भर दिला जातो. बालीच्या कला-संस्कृतीत गणेशाचे सुंदर चित्रण आढळते.
थायलंड-थायलंडमध्ये मूळ थायलंडवासीयांतर्फे गणेशोत्सव ‘फ्रा फिकानेट’ या नांवाने कला, व्यवसाय वृद्धी आणि मन:शांतीसाठी साजरा केला जातो. थायलंडमध्ये बरीच गणेश मंदिरे आहेत, ज्यांच्याकडे पर्यटकांचा ओढा असतो. ‘वॅट फ्रा श्री उमादेवी मंदिरात’ संगीत, प्रार्थना आणि पूजेचे आयोजन केले जाते. या मंदिराला थायलंडचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र मानले जाते. या वर्षी ‘फुकेट’मधील ‘श्रीमंत दगडूशेट गणपती देवालयात’ गणेशोत्सव साजरा केला जाईल. हे मंदिर उद्योजक पापा सॉन मिपा यांच्या पुढाकाराने नुकतेच उभारण्यात आले. याशिवाय बँकॉक येथील आयटीसीसी हॉलमध्ये १९ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या काळात डॉ.संजय कुमार यांच्या पुढाकाराने या वर्षी गणेशोत्सव साजरा होत आहे. उत्सवासाठी इंदोरच्या ढोल पथकाला आमंत्रण देण्यात आले आहे. याच बरोबर ‘थायलंडचा राजा’ची प्रतिष्ठापना स्थानिक मराठी हिंदू समाजातर्फे केली जात आहे. विश्व हिंदू परिषद, थायलंड, यावर्षी आपला १९वा गणेशोत्सव १९ सप्टेंबर-२० सप्टेंबर या दोन दिवसांत बँकॉकमधील निमीबुत्र स्टेडियममध्ये साजरा करीत आहे.
जपान-जपानमध्ये ‘कांगितेन’ला श्री गणेशाचे रूप मानले जाते. उत्साह आणि यशाचे प्रतीक मानून ‘कांगितेन’ पूजा केली जाते. मत्सुचिया शोडेन (टोकयो), होझांजी (नारा) आणि इतर मंदिरात सामूदायिक प्रार्थना केली जाते. देवाला डायकॉन मुळ्याचा नैवेद्य दाखवला जातो. जपानमधील गणेशोत्सव बौद्ध आणि हिंदू धर्मांचा प्रभाव दर्शवितो.
कंबोडिया- कंबोडियात श्री गणेशाचे अस्तित्व सातव्या पाचव्या शतकापासून आहे. इथे ‘प्राहाकनैत’ या नावाने श्री गणेशाची पूजा केली जाते. कंबोडियातील गणेश मंदिरात हिंदू समुदायाचे लोक एकत्र प्रार्थना करून गणेशोत्सव साजरा करतात. मात्र गणेशमूर्तीत थोडा फरक असतो. गणेशाचे कान मोठे असतात, डोक्यावर मुकुट नसतो आणि गणपती उंदराऐवजी कमळावर विराजमान असतात. कंबोडियातील गणेश पूजेचा संबंध तत्कालीन ‘ख्मेर’ साम्राज्याशी आहे. आंग्कोर वाट आणि इतर मंदिरांमध्ये गणेश मूर्ती आजही सापडतात. कंबोडियात उद्योजक किरण आणि कृष्णा रेड्डी यांच्या पुढाकाराने गेली काही वर्षे गणेशोत्सव साजरा होत आहे.
मलेशिया-मलेशियातील कुवाला लंपूर येथील श्री सिथी विनयगार आणि इतर मंदिरात तामिळ हिंदू समाजातर्फे गणेशोत्सव साजरा केला जातो. याचबरोबर घराघरातही गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. श्री गणेश म्हणजे विघ्नहर्ता आणि गणेश पूजा म्हणजे नवी सुरुवात असे मानले जाते.
यावरून दिसून येते की गणेशोत्सवाचा जयघोष केवळ भारतापुरता मर्यादित नसून, जगातील अनेक ठिकाणी बाप्पाचे भक्त श्रद्धेनुसार हा सण साजरा करतात.

