६सप्टेंबर रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात हजारो माणसं गोळा झाली होती. उत्सवांच्या काळात अहोरात्र प्रचंड आवाजात वाजणार्या डीजेच्या आवाजाचा आम्हाला त्रास होतो, असे ती सांगत होती. महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये डीजेबंदी होऊ शकते, तर पुण्यात का होऊ शकत नाही, असा सवाल ती विचारत होती… हे सगळे लोक दर सणाला, उत्सवाला मोठ्या आवाजाचा त्रास भोगत आहेत. पण, त्यांच्यात बेबंद उत्सवबाजांच्या विरोधात आवाज उठवायची हिंमत नव्हती. विद्यानंद बापट या तर्ककठोर नास्तिकाने त्यांना ती हिंमत दिली, हे विशेष. महापालिकेच्या बैठकीत डीजेचा आवाज बंद झाला पाहिजे, हा मुद्दा हिंस्त्र ‘कार्यकर्त्यां’च्या झुंडीसमोर बापटांनी एकट्याने मांडला आणि त्यांना पोलिसांच्या संरक्षणात बाहेर काढण्याची वेळ आली.
मात्र, त्यानंतर बापट चॅनेलांवरच्या मुलाखतींमधून लोकांसमोर यायला लागले. त्यांची मुद्देसूद मांडणी, उत्तम मराठी भाषा, इतर भाषांमधले दाखले, संस्कृत भाषेवरचं प्रभुत्व, संस्कृती आणि परंपरा यांचा अभ्यास आणि मुद्दा लावून धरण्याची हिंमत यावर शांतताप्रेमी पुणेकर फिदा झाले आणि पुण्यातच नव्हे, तर राज्यभरात एक संघर्ष उभा राहिला. ‘आमचा सण जोरातच होणार,’ हे ठासून सांगणारे आणि आपणे सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने, डीजेबाजी न करता साजरा करण्यात काय अडचण आहे, हे विचारणारे यांच्यात वाद होऊ लागले. त्यात अंगावर असंख्य गुन्हे असलेल्या एका कार्यकर्त्याने बापट यांच्याशी चर्चा करण्याच्या मिषाने भररस्त्यात त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. बापटांना गोत्यात आणण्याची सुपारी घेतल्याप्रमाणे काही चॅनेलांनी आणि काही पत्रकारांनी त्यांना भलते सलते प्रश्न विचारायला सुरुवात केली. चतुर आणि सराईत राजकारणी नसल्याने बापटही सगळ्या प्रश्नांना अकारण उत्तरे देऊ लागले. त्यातून बापटांची नास्तिकता आणि शस्त्रसज्जतेविषयीची विधानं, पोलिसांनी डीजेबाजांवर कशी कारवाई करावी, याची टोकाची मांडणी, पोलिसांनी हल्लेखोराला तुडवावं, ही सूचना, अशा गोष्टींनी बापटांच्या युक्तिवादाची धार कमी करण्याचा प्रयत्न बापट-विरोधकांनी केला. पुण्याबाहेरून आलेल्या बापटांनी पुणेकरांना शिकवू नये, असे सांगणार्या एका राजकारणी महिलेच्या हे लक्षातही आलं नाही की मुळात गणेशोत्सवही, बापट जिथून आले त्या रत्नागिरीतूनच पुण्याला आलेल्या लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला आहे!
बापट नास्तिक आहेत, धार्मिक स्वातंत्र्याला स्खलन स्वातंत्र्य म्हणतात आणि कोणतीही धार्मिक सवलत ही सर्वसामान्य नागरिकांच्या नागरी अधिकारांच्या आड येता कामा नये, असं सांगतात तेव्हा ते हेकट आहेत, तर्ककर्कश आहेत, धर्मविरोधी आहेत, असा युक्तिवाद उत्सवबाज करतात. म्हणजे आता आपल्याकडे रस्त्याने चालण्याचा, वाहन चालवण्याचा हक्क महत्त्वाचा आहे की रस्ते अडवून मंडप बांधण्याचा? माणसाचा शांततेने जगण्याचा अधिकार महत्त्वाचा आहे की मानवी वस्तीत मनाला येईल तेव्हा कितीही मोठा आवाज करण्याचा. माणसाच्या जगण्याच्या अधिकाराच्या आड येणार्या कोणत्याही कृती प्रथा, परंपरा बंद केल्या पाहिजेत, हे सांगणारा माणूस हेकट आहे आणि ‘आपल्या’च लोकांना कितीही त्रास झाला तरी चालेल, डीजेच्या आवाजाने भिंती पडल्या तरी चालतील, वाहतुकीचा बोजवारा उडाला तरी चालेल, लोक बहिरे झाले तरी चालेल, पण आम्ही उत्सव असाच साजरा करणार, हे सांगणारे लोक कोण आहेत?… हेकटपणा हा शब्द त्यांच्या वर्णनाला अपुरा ठरेल.
सण-उत्सव हे आनंद वाटून घेण्यासाठी साजरे करायचे असतात. आपल्या आनंदापायी दुसर्याने त्रास सहन करावा, ही अपेक्षा किती स्वार्थी आणि बेजबाबदार आहे! आणि त्यात नेमकी उज्वल परंपरा तरी काय आहे? लोकमान्यांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला, त्याला सव्वाशे वर्षे झाले असतील. दीडेकशे वर्षांच्या मागे सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा नाही. तेव्हा लाऊडस्पीकर नव्हते आणि डीजेही नव्हते. मग ही कसली सांस्कृतिक परंपरा आपण सांगत आहोत? शिवाय परंपरा काही आंधळेपणाने चालवायची गोष्ट नाही, ते डबकं नाही, ती वाहती असली पाहिजे, त्यात काळानुसार बदल झाला पाहिजे, काही परंपरा काळानुरूप बंदही झाल्या पाहिजेत. आपणही अशा अनेक परंपरा बंद केलेल्या आहेतच की!
पुण्यात बापटांमुळे सुरू झालेला हा सामाजिक घुसळणीचा अध्याय सुरू असतानाच गोकुळाष्टमीचा सण राज्यभर साजरा झाला आणि सण उत्सवांचा आपण काय ‘काला’ करून ठेवला आहे, त्याचं भेसूर दर्शन ठिकठिकाणी घडलं. एकेकाळी उत्तर भारतीयांच्या सणांच्या थिल्लरतेला नावे ठेवणार्या महाराष्ट्राने महिलांची अश्लील नृत्ये हे आपल्या सणाचे आकर्षण बनवण्यापर्यंत घसरून दाखवले आहे. ज्या पश्चिम महाराष्ट्राने आर. आर. आबा पाटील हा खमक्या गृहमंत्री राज्याला दिला, ज्याने डान्स बारची कीड वेळीच नष्ट करण्याची हिंमत दाखवली होती, त्याच पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या सत्तेतल्या अनेक मान्यवरांच्या आशीर्वादाने, लहान मुलाबाळांसमोर, सार्वजनिक ठिकाणी हे बीभत्स डान्स बारच दिवसाढवळ्या अवतरले होते. त्या हिडीस नृत्यांमुळे आपली सणाउत्सवांची उदात्त परंपरा बुडते आहे, असे एरवी धर्माच्या नावाने टिळे लावून वटवट करत फिरणार्या एकाही बोलक्या पोपटाला वाटले नाही. किंबहुना हीच सात्त्विक धार्मिकता आहे, अशीही अनेकांची धारण्ाा आहे.
धार्मिक उन्मादाला पद्धतशीर खतपाणी घालणारं सरकार सत्तेत असल्यामुळे सध्या सगळा देश आणि महाराष्ट्रही एका विलक्षण वळणावर उभा आहे. आपल्याला सण-उत्सव साजरे करताना नेमकं काय करायचं आहे, आपली खरी परंपरा काय आहे, हे प्रश्न आता उभे राहात आहेत. इव्हेंटबाजी, डीजे धुडगूस, बायका नाचवणे हे आपल्याला धार्मिक शक्तिप्रदर्शन वाटत असेल तर आपण बापटांच्या शब्दांत स्खलनाचेच स्वातंत्र्य अनुभवतो आहोत. आपल्याला हे उथळ स्वातंत्र्य हवे आहे की सणवार मांगल्याने, पावित्र्याने, सात्त्विकतेने साजरे करून त्याचा रोजच्या जीवनरहाटीवर कमीत कमी परिणाम होईल याची काळजी आपण घेणार आहोत, हा प्रश्न बापट अध्यायातून आपल्यासमोर उभा राहिलेला आहे.
महाराष्ट्र यातला कोणता मार्ग निवडतो, ते आता गणेशोत्सवात समजेलच. गणराया, योग्य निवडीची सद्बुद्धी दे रे!

