• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

वर्णाभिमान नष्ट करणारा अभंग

ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर अभंगबोध

marmik by marmik
June 30, 2026
in भाष्य, विशेष लेख
0
वर्णाभिमान नष्ट करणारा अभंग

पवित्र ते कुळ पावन तो देश।
जेथे हरिचे दास जन्म घेती ।।१ ।।
कर्मधर्म त्याचे जाला नारायण।
त्याचेनी पावन तिन्ही लोक ।।२ ।।
वर्णअभिमाने कोण जाले पावन।
ऐसे द्या सांगून मजपाशी ।।३ ।।
अंत्यजादि योनी तरल्या हरिभजने।
तयाची पुराणे भाट जाली ।।४ ।।
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार।
धागा हा चांभार रोहिदास ।।५ ।।
कबीर मोमीन लतिफ मुसलमान।
सेना न्हावी जाण विष्णुदास ।।६ ।।
कान्होपात्र खोदू पिंजारी तो दादु।
भजनी अभेदू हरिचे पायी ।।७ ।।
चोखामेळा बंका जातीचा महार।
त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ।।८ ।।
नामयाची जनी कोण तिचा भाव।
जेवी पंढरीराव तियेसवे ।।९ ।।
मैराळा जनक कोण कुळ त्याचे।
महिमान तयाचे काय सांगो ।।१० ।।
यातायातीधर्म नाही विष्णुदासा।
निर्णय हा ऐसा वेदशास्त्री ।।११ ।।
तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ।
तारिले पतित नेणो किती ।।१२ ।।

आपल्याकडे पवित्र-अपवित्र कुळाचा निर्देश करण्यासाठी जातवर्णाचा विचार केला जातो. तथाकथित पवित्र कुळात जन्माला येणारा अपवित्र आचरण करत असेल तरीही तो पवित्र मानला जातो. याउलट अपवित्र आणि हीन मानल्या गेलेल्या कुळात जन्मलेला पवित्र आचरण करत असला तरी तो अपवित्रच मानला जातो. त्यालाच प्रस्तुत अभंगात तुकोबाराय छेद देतात. त्यांच्या मते ज्या कुळात हरिभक्त जन्माला येतात ते कुळ पवित्र आहे. आजवर पवित्र कुळात हरिदास जन्म घेतात असं मानलं जात होतं. तुकोबाराय त्याच्या उलट सांगतात. हरिदासाच्या कुळाबरोबरच त्याचा जन्म ज्या देशात होतो तो देशही पावन होतो, असं ते म्हणतात.

कोणत्याही राष्ट्राची उभारणी करताना त्या राष्ट्रातील लोकांत एकात्मता निर्माण होण्याची गरज असते. महात्मा जोतिबा फुल्यांनी ‘एकमय लोक’ म्हणजे राष्ट्र अशी राष्ट्राची अभिनव व्याखा केलेली होती. अठरापगड जातींच्या देशात जातमुक्त भावनिक एकमयता निर्माण झाल्याशिवाय खर्‍या राष्ट्राची उभारणी होऊ शकत नाही. त्यामुळेच महात्मा फुल्यांनी ‘जातमुक्त राष्ट्रवादाचा’ नवा विचार मांडला होता. तोच तुकोबारायांच्या या अभंगातही दिसतो. तुकोबाराय म्हणतात की हरिदास जातधर्मापासून मुक्त असतात. त्यांचा कर्मधर्म हा नारायणच असतो. त्यांच्या असण्याने तिन्ही लोक पावन होतात. वर्णाभिमानाने कोणीही पावन होत नाही. उलट वर्णाभिमानाने उच्चवर्णीय लोक अहंकार आणि कर्मकांडात फसतात. अंत्यजादी अस्पृश्य योनी मात्र हरिभजनाने तरल्या आहेत. पुराणांनी भाट होऊन या हरिभक्तांची कीर्ती गायली आहे. यानंतर तुकोबाराय पुराणातील आणि त्यानंतर भक्तीपरंपरेतील संतांचे दाखले देतात. तुकोबारायांनी उल्लेखलेले संत भिन्न भिन्न अशा वंचित, हीन आणि तिरस्करणीय मानलेल्या सामाजिक घटकांतून आलेले आहेत.

१) वर्णाधारित हीनता
आपल्याकडे चातुर्वर्ण्याधारित समाजरचनेत ब्राह्मण आणि क्षत्रिय हे वर्ण उच्च तर वैश्य आणि शूद्र हे वर्ण हीन मानले गेलेले आहेत. यातील वैश्य वर्ण तसा द्विज म्हणजे मुंजीचा आणि वेदाध्ययनाचा अधिकार असलेला वर्ग आहे. तरीही कालौघात वैश्यांनाही हीन मानलं गेलं. वैश्य आणि शूद्रांचा दर्जा काही प्रमाणात समानच ठरला. याबाबतीत दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचं उदाहरण देता येईल. हे महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक. ते जातीने वैश्य वर्णातील शेणवी. त्यांनाही वर्णविषमतेचा सामना करावा लागता. यासंदर्भात डॉ. सदानंद मोरे लिहितात- ‘आद्य व्याकरणकार किंवा मराठीचे पाणिनी अशी विशेषणे लावून दादोबांचा गौरव केला म्हणजे आपले कर्तव्य संपले, असे आमचे अभ्यासक समजतात. व्याकरण सिद्ध करणे ही महत्त्वाची कामगिरी खरी, पण त्याहीपेक्षा दादोबा हे अव्वल दर्जाचे धर्मचिंतक व धर्मसंस्थापक होते, ही बाब अधिक महत्त्वाची आहे. अर्थात त्यांचे व्याकरणसुद्धा ते जातीने वैश्य म्हणून अनअधिकारी असल्यामुळे वादग्रस्त ठरले. पूर्वीचे स्वधर्मी राज्य असते, तर त्यांचे पारिपत्य झाले झाले असते अशी मतेही व्यक्त झाली. तुकोबांच्या अभंगरचनेला देण्यात आलेल्या आव्हानाच्या इतिहासाची ही छोटी पुनरावृत्ती म्हणावी लागेल.’

इथे तुकोबारायही प्रस्तुत अभंगात पहिलं उदाहरण वैश्य वर्णातील तुळाधाराचं आहे. तुळाधाराची कथा महाभारताच्या शांतीपर्वात आली आहे. त्या कथेनुसार जाजली नावाचा एक ब्राह्मण ऋषी होता. त्याने अत्यंत कठोर तपश्चर्या केली होती. तिच्या अभिमानाने तो ग्रासला गेला होता. आपल्याला संपूर्ण धर्म समजला आहे अशी त्याला घमेंड होती. ती घमेंड नष्ट करायला कारणीभूत ठरले ते तुळाधार. ते तुळाधारांना भेटायला गेले तेव्हा तुळाधार त्यांच्या दुकानात बसले होते. जाजली आणि तुळाधार यांचा संवाद सुरू झाला. त्यावेळी तुळाधारांनी जाजलींना खर्‍या धर्माचा विचार समजून सांगितला. त्यासाठी त्यांच्या व्यापारातील तराजूच्या प्रतीकाचा वापर केला. तराजूची दांडी जशी वजनमापन करताना भेदाभेद करत नाही त्याचप्रमाणे समदर्शी असणं यातच खरा धर्म आहे असा उपदेश तुळाधारांनी केला. व्यापारात कोणाचीही फसवणूक आणि लुबाडणूक न करता कुटुंबाच्या उदरनिर्वाहापुरता पैसा ते कमावत असत. उत्तम व्यवहाराने गरजेपुरता पैसा कमावणं, समदर्शी राहणं, सत्य वागणं आणि व्यवहारातील कर्तव्ये पार पार पाडताना ईश्वरभक्ती करणं हाच धर्माचा गाभा असल्याची शिकवण तुळाधारांनी जाजलींना दिली. हा उपदेश ऐकून जाजलींना खरा धर्म समजला. ही कथा पांडित्याच्या, तपश्चर्येच्या आणि वर्णश्रेष्ठत्वाच्या अहंकाराचा चक्काचूर करून समता, कर्म आणि सत्याची शिकवण देणारी कथा आहे. वारकरी विचार नेमकेपणाने या कथेतून मांडला गेल्यामुळे तुकोबारायांना ही कथा जवळची वाटली असणार.

२) जात्याधारित हीनता
तुकोबाराय या अभंगात जातीच्या आधारावर हीन मानले गेलेल्या संतांचीही उदाहरणं देतात. चातुर्वर्ण्य रचनेत शूद्र आणि अतिशूद्र हे तळातील वर्ण आहेत. यातील शूद्रवर्णीय हे सवर्ण मानले गेलेले आहेत, कारण त्यांना वर्ण आहे. अतिशूद्र मात्र वर्णबाह्य आहेत. शूद्रवर्णीय स्पृश्य तर अतिशूद्र अस्पृश्य मानले गेलेले आहेत. तुकोबारायांनी गोरोबाकाका (कुंभार), दादू (पिंजारी) आणि सेना महाराज (नाभिक) या तीन निम्न मानल्या गेलेल्या जातीतील संतांचा दाखला दिला आहे. त्याचबरोबर रोहिदास (चर्मकार), चोखामेळा आणि बंका या तीन अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीतील संतांचेही दाखले दिले आहेत.

३) लिंगाधारित हीनता
तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगात दोन स्त्री संतांचाही उल्लेख केलाय. त्यातील कान्होपात्रा गणिका आईच्या पोटी जन्माला आल्या होत्या, तर जनाबाई दासी होत्या. वेश्येची मुलगी आपल्या भारतीय समाजरचनेच्या दृष्टीने हीन मानली गेलेली आहे. वारकरी संप्रदायात असा भेदाभेद नसल्यानं त्यांनी कान्होपात्रा माऊलींना संत म्हणून स्वीकारलं. त्याचबरोबर दासी म्हणून नामदेवरायांच्या घरी राबणार्‍या जनाबाई वारकरी संप्रदायात प्रतिष्ठित, अधिकारी आणि लोकप्रिय संत ठरल्या. वारकरी संप्रदायात स्त्रियांना तर अधिकार आहेच, पण त्याचबरोबर वेश्या आणि दासी अशा निम्नवर्गीय मानलेल्या स्त्रियाही संप्रदायात संत म्हणून प्रतिष्ठित आहेत.

४) धर्माधारित हीनता
स्वधर्मीयांबरोबरच परधर्मीयांनाही हीन लेखण्याची प्रवृत्ती उच्चवर्णीयात होती. त्यामुळेच ते मुस्लीमांना म्लेंछ म्हणत असत. त्यांना दुय्यम आणि काहीवेळा थेट अस्पृश्यसदृश वागणूक दिली जात होती. भेदभावमुक्त वारकरी संप्रदायात मात्र अनेक मुस्लीम संतही होऊन गेले. त्यात मोमीन जातीचे कबीर आणि लतीफ महाराज या दोन संतांचा उल्लेख तुकोबाराय करतात. मूळ इस्लाम धर्मात जरी जातिभेद नसला तरी भारतात आल्यानंतर भारतीय मुसलमान समाजात जातिभेदाची लागण झाली. त्यात मोमीन म्हणजे विणकर ही जात निम्नस्तरीय मानली गेलेली आहे. त्याचबरोबर लतीफ हे तुकोबारायांच्या आधीच्या काळातील महान मराठी वारकरी संत. त्यांनी अभंगरचनाही केली आहे. त्यांच्या काही कथा वारकरी संप्रदायात रुढ आहेत.

५) उत्तर भारतीय संत
तुकाराम महाराजांनी या अभंगात रोहिदास, दादू आणि कबीर या तीन उत्तर भारतीय संतांचे उल्लेख केलेले आहेत. पुराणकालीन तुळाधारांचाही उल्लेख केला आहे. यातील दादू हे दादू दयाळ होत. ते ब्राह्मण होते असा एक सूर अलीकडे निर्माण झाला आहे. तुकोबारायांनी मात्र दादू हे पिंजारी असल्याचं नि:शंकपणे सांगितलं आहे. रोहिदासही पूर्वजन्मी ब्राह्मण होते वगैरे कथा सांगून त्यांच्याही ब्राह्मणीकरणाचा प्रयत्न झाला होता. तो फारसा यशस्वी झाला नाही. दादू जातिभेदाचे प्रखर विरोधक होते. त्यांच्यावर कबीरांचा मोठा प्रभाव होता. दादूपंथीय लोकही कबीरपंथीयांप्रमाणे जातीभेद मानत नसत.

तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगातून भारताच्या विविध भागातील, विविध सामाजिक घटकातील आणि विविध कालखंडातील संतांचे दाखले देत वर्णाभिमानातला फोलपणा सांगितला आहे. भक्तीच्या क्षेत्रात उच्चकुलीन असण्याची गरज नाहीच. उलट हीन मानल्या गेलेल्या समाजघटकातील लोकांचा भक्तीच्या क्षेत्रात त्यांच्या कीर्तीचा सुगंध दरवळत आहे. तुकोबारायांच्या या अभंगात खोदू आणि मैराळ जनक असे दोन उल्लेख येतात. त्यांच्याविषयी कोणतीही माहिती मिळत नाही. खोदू हिजडा असा काही ठिकाणी उल्लेख आहे, पण त्याला सबळ पुरावा नाही.

तुकोबारायांनी या अभंगात संतांच्या जात-वर्णाचे उल्लेख आवर्जून केले आहेत. ते समाजशास्त्राच्या अभ्यासासाठी उपयुक्त असतात. ‘आम्ही जात मानत नाही’ असं एकीकडे ढोबळपणे म्हणून जर आपण उच्चजातीयांना प्राधान्य देत असू तर तो जातीयवादच आहे. जाती निर्मूलनासाठी ‘सामाजिक न्याय’ हे तत्त्व फार महत्त्वाचं आहे. न्यायाचा अर्थ मानवाला त्याच्या मानव म्हणून सन्मानपूर्वक समतेने जगण्याच्या नैसर्गिक हक्कांपासून वंचित ठेवलं गेलं तर त्याची भरपाई करणं आणि अन्याय करणार्‍याला त्याची शिक्षा करणं. नामदेवरायांनी चोखोबारायांची समाधी विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात बांधली. ती सामाजिक न्यायाचं चिरस्मारक आहे. इतर सवर्ण संतांच्या समाध्या पंढरपुरात मंदिरापासून दूर अंतरावर आहेत. फक्त चोखोबारायांचीच समाधी मंदिराच्या महाद्वारासमोर नगराच्या मध्यवर्ती भागात आहे. नामदेवरायांना ही समाधी चोखोबारायांच्या मूळ गावी (मेहुणाराजा), पंढरपुरातल्या त्यांच्या झोपडीजवळ (चंद्रभागेपलीकडे), वाळवंटात, किंवा खुद्द नामदेवांच्या घरी अशा कोणत्याही ठिकाणी बांधता आली असती. पण नामदेवरायांनी मुद्दाम फक्त त्यांचीच समाधी महाद्वारासमोर बांधली. त्यातला त्यांचा हेतू होता ज्यांना पिढ्यानपिढ्या सामाजिक सन्मानापासून वंचित रहावं लागलं, त्यांना जास्तीत जास्त सन्मान देण्याचा. ही खरी सामाजिक न्यायाची भूमिका आहे.

अभंगाच्या अखेरच्या दोन चरणात तुकोबाराय म्हणतात की विष्णुदासाला जातधर्म नाही असा वेदशास्त्रांचाही अभिप्राय आहे. इतरही ग्रंथात असे अनेक पतित मानले गेलेले लोक तरल्याचा उल्लेख आहे. वर्णाभिमानी लोक ज्या वेदशास्त्र आणि पुराणांच्या आधाराने वर्णश्रेष्ठत्वाची भूमिका मांडत असतात, त्याच ग्रंथातील दाखले देत तुकोबाराय वर्णाभिमानाचा फोलपणा दाखवतात. या अभंगातील भाषा नेहमीप्रमाणेच परखड आणि वर्णाभिमान्यासाठी आव्हानात्मक आहे.

Previous Post

खरा सार्वजनिक उत्सव कोणता?

Next Post

शिवसेना नसती तर…

Next Post
शिवसेना नसती तर…

शिवसेना नसती तर...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.