• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

शिवसेना नसती तर…

marmik by marmik
June 30, 2026
in इतर
0
शिवसेना नसती तर…

महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा जरीपटका फडकवणारी शिवसेना स्थापन झाली, त्याला आता ५९ वर्षे पूर्ण झाली आहेत, १९ जून रोजी शिवसेनेने साठीत प्रवेश केला आहे.

महाराष्ट्रात मराठी अस्मितेला वाहिलेली संघटना स्थापन व्हावी, हे त्या काळात एक आक्रीतच. कारण, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर असलेले प्रांत तीन. बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब. स्वातंत्र्यलढ्यातले अनेक नेते या भागांतून आले, क्रांतिकारकही इथलेच अधिक. १९४७च्या आधी वेगवेगळ्या राजवटींच्या आधिपत्याखाली कधी विखुरलेला, कधी एखाद्या साम्राज्याचा भाग असलेला हा सगळा भूभाग आधुनिक अर्थाने एक देश म्हणून आकाराला आणण्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रीय बाणाही आधीपासूनच होता. अगदी मराठी माणसाचं हित सर्वोपरि ठेवणार्‍या शिवसेनेनेही नेहमी घोषणा दिली ती ‘जय हिंद, जय महाराष्ट्र.’

स्वातंत्र्यलढ्याच्या आणि त्यानंतरच्या स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात प्रादेशिक ओळखी राष्ट्रीय ओळखीत मिसळून टाकायला हव्यात, आपण फक्त आणि फक्त ‘भारतीय’ बनायला हवे, असे एक आदर्शवादी स्वप्न सगळ्या देशाने पाहिले. महाराष्ट्राने मुंबईच्या रूपाने या स्वप्नाचा प्रत्यक्षात अनुभवही घेतला. मुंबई सगळ्या देशाची स्वप्ननगरी. सगळ्यांना सामावून घेणारी. जणू हा मिनी भारतच. असाच सगळा देश बनावा, असं काही काळ सर्वांनाच वाटत होतं, खासकरून महाराष्ट्राला वाटत होतं. पण, हळुहळू लक्षात यायला लागलं की इथे पोट भरायला येणारे परप्रांतीय संख्याबळ कमी असेपर्यंत सौजन्यशील असतात, संख्याबळ प्राप्त झालं की स्थानिकांवरच गुरकावू लागतात, त्यांना ‘राष्ट्रीय बाणा’ शिकवायला लागतात. या देशात कुणालाही कुठेही जाऊन काम करण्याचा अधिकार आहे, हे मुजोरीने सांगू लागतात. जिथे जाऊ तिथली भाषा शिकली पाहिजे, तिथली संस्कृती आत्मसात केली पाहिजे, त्या संस्कृतीत मिसळलं पाहिजे, हे राहिलं बाजूला- राष्ट्रीय एकात्मतेच्या नावाखाली मुंबई आणि महाराष्ट्रावर लोंढे आदळत राहिले आणि आता तर महाराष्ट्रावर त्यांची भाषा शिकण्याची सक्ती करू पाहणारे अस्तनीतले निखारे सत्तापदांवर जाऊन बसले आहेत.

आज शिवसेनेच्या साठीतल्या पदार्पणाच्या निमित्ताने कोणत्याही पक्षाच्या, विचारधारेच्या, कोणाही मराठी माणसाने प्रामाणिकपणे स्वत:शी विचार करून पाहावा- गेली साठ वर्षे शिवसेना राज्यात मराठी अस्मितेचा झेंडा डौलाने फडकवते आहे. तथाकथित राष्ट्रीय पक्षांचे आणि अनाठायी उदारमतवादी मराठी बांधवांचे शिव्याशाप खाते आहे, मराठीला नडला त्याला फोडला, अशा हिरीरीने धावून जाते आहे- तरीही आज कोणी फटिचर भय्या, रस्त्यावर थुंकू नकोस असं सांगणार्‍या वृद्धाला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्याची वेळ येईपर्यंत मारतो, काही जैनधर्मीय सार्वजनिक जागांवर पांढरे पट्टे मारून हिंदूधर्मीयांना खिजवतात, स्वत:ला मुनी म्हणवणारा कुणी मवाली गलिच्छ भाषेत मराठी माणसांना आव्हान देतो, मांसाहारी मराठी माणसांना घरं नाकारण्याची हिंमत परभाषिक करत असतात, दुकानांच्या पाट्या मराठीत पण असल्या पाहिजेत, यासाठी कायदा करावा लागतो आणि त्यालाही आव्हान देणार्‍या अवलादी इथे पैदा होतात, महाराष्ट्रात व्यवसाय करू, इथेच पोट भरू, इथेच पिढ्यानपिढ्या राहू, पण इथली भाषा बोलणार नाही, असा उद्दामपणा केला जातो- शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही दोन धडाकेबाज भावंडे कार्यरत असताना हे होत आहे- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ५९ वर्षांपूर्वी ही संघटनाच स्थापन केली नसती, तर महाराष्ट्रात काय झाले असते?

आज मुंबईत मराठी माणूस ताठ मानेने फिरू शकतो आणि अरेरावी करणार्‍याला वठणीवर आणू शकतो, तो शिवसेनेमुळेच! मराठी माणसांच्या अतिरेकी राष्ट्रीय बाण्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात भूमिपुत्र बाजूला ठेवून सगळीकडे वेगवेगळ्या अन्यप्रांतीयांची भरती सुरू आहे, हे पाहिल्यावर बाळासाहेबांनी सळसळत्या रक्ताच्या तरुणांची ही संघटना स्थापन केली आणि ‘ग्लानिर्भवती महाराष्ट्रा’ला खडबडवून जागे केले. पण मराठी माणूस खर्‍या अर्थाने जागा झाला का?

दुर्दैवाने याचं उत्तर नाही असं आहे.

प्रादेशिक अस्मिता कशी असते, ते आजही दक्षिणेकडची राज्येच दाखवत आहेत. त्यांनी हिंदी भाषेची झंझटच मुळात तिकडे शिरू दिली नाही आणि आपली प्रादेशिक ओळख राष्ट्रीयत्वात समर्पित करायला नकार दिला. तेच योग्य आहे. कारण, देशात संघराज्य व्यवस्था आहे, याचा केंद्राच्या सत्तेत पोहोचल्यावर राष्ट्रीय पक्षांना विसर पडतो. काँग्रेसची राष्ट्रीयतेची कल्पना भाबडी आणि स्वप्नाळू राहिलेली आहे. पण हिंदीचा वरवंटा त्याच कल्पनेआडून देशाच्या बर्‍याच भागावर फिरला, त्याचे काय! काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण संघराज्याच्या नावाखाली प्रादेशिक ओळखच पुसायला निघण्याचा राक्षसीपणा त्या पक्षाने केलेला दिसत नाही. दुसरा तथाकथित राष्ट्रीय पक्ष म्हणजे विद्यमान सत्ताधारी भारतीय जनता पक्ष. हा इतरांची पिल्लं खाऊन मोठा झालेला सापनाथ. त्याच्यावरची अन्य पक्षांतून आलेली सूज उतरवली की त्याची मूळची दोनपाच राज्यांपुरती मर्यादित तोळामासा प्रकृती लक्षात येते. प्रादेशिक अस्मिता संपवून आपल्या पुराणमतवादी मातृसंस्थेच्या मागास विचारांची समरसता सगळ्या देशावर थोपू पाहणारा सत्तापिपासू ऑक्टोपस आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून दूर राहिलेला, आधुनिक देश संकल्पना, देशाचं संविधान यातलं काहीही मान्य नसलेला हा पक्ष सगळ्या देशावर सपाटीकरणाचा बुलडोझर फिरवतो आहे. आपल्या मालकांना देश विकतो आहे. इस्रायल आणि अमेरिका यांच्या दावणीला नेऊन बांधतो आहे. ही राजवट उलथून टाकण्याची हिंमत असलेल्या महाराष्ट्रातली शिवसेना फोडून झाली, आता बंगालमध्ये निवडणूक चोरून ममता बॅनर्जींना विकल करून टाकले, तिसरा नंबर लागेल पंजाबचा!

भाजपचा भ्रष्ट, सत्तामदाने मदमस्त झालेल्या राजवटीची तर्‍हा काय आहे, ते देश रोज पाहतो आहे, भोगतो आहे. देश असंतोषाने खदखदतो आहे. मराठी माणसालाही याचे चटके बसत आहेतच. पण तो भानावर आला आहे का? राष्ट्रीय बाण्याच्या गाढ झोपेतून तो जागा होईल का? एका पाताळयंत्री विचारधारेच्या सोयीपुरते एक असूनही आपण सेफ नाही, हे त्याच्या लक्षात येईल का?
शिवसेनेचा जन्मच मुळात अखंडपणे मराठी अस्मितेचा गजर करण्यासाठी झाला आहे. तो ती करत राहीलच. हे सतीचं वाण शिवसेनेने मरहट्ट्यांचा राष्ट्रधर्म म्हणून स्वीकारलेलं आहे. शिवसेना कधीच उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही!

Previous Post

वर्णाभिमान नष्ट करणारा अभंग

Next Post

नाय नो नेव्हर

Next Post
नाय नो नेव्हर

नाय नो नेव्हर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.