आज कोणते कपडे घालू, आडवा गंध लावू, उभा लावू का नुसती टिकली लावू, हे ज्याला दिल्लीतल्या मालकाला विचारल्याशिवाय स्वत:चं स्वत: करता येत नाही, त्याने स्वत:ला सेनापती वगैरे म्हणवून घेणे शोभते का संतोषराव?- नरेश ढस्के, ठाणे
सर्वसामान्य माणसाला राजा बनवणार्या चाणक्याची गोष्ट माहीत आहे ना, मग एका ‘सामान्य’ माणसाला किंग बनवणार्या चाणक्याने, जर एखाद्या ‘अतिसामान्य’ माणसाला सेनापती बनवण्याचा कर कर प्रयत्न करून सुद्धा, लोक त्या ‘अति सामान्य’ माणसाला सेनापती म्हणतच नसतील, तर त्या दोघांनी बिचार्यांनी काय करायचं? ते एकमेकांनाच ‘तू सेनापती… तुम्ही चाणक्य’ असं म्हणत सेनापती- चाणक्य खेळत असतील, तर तुमच्यासारख्या तिसर्याला काय करायचंय? तुम्ही तुमचं बघा ना… ते त्यांचं बघतायत तसं…
ऑपरेशन ही गोष्ट डॉक्टर करतात, ते जीव वाचवतात- ऑपरेशन सैन्यदलंही करतात, त्यातून ते देश वाचवतात! धमक्या देऊन किंवा आमिषं दाखवून लोकप्रतिनिधी पळवून नेण्यासारख्या असंवैधानिक, लोकशाहीविरोधी, गलिच्छ कृत्याला ‘ऑपरेशन’म्हणणं हा त्या शब्दाचा अपमान नाही का? – शैलेश शिंदे, चाळीसगाव
खरं म्हणजे ती सर्व ऑपरेशन्स ही ‘ऑपरेशन लोकशाहीच’ आहेत… पण अजून काहींच्या मनात लोकशाहीला मान आहे, म्हणून स्पष्ट बोलून लोकशाहीचा अपमान त्यांना करवत नसेल, हाच ते लोकशाहीचा मान ठेवतायेत… असं आपण समजूया, लिहूया, वाचूया आणि थंड बसूया..
ज्यांना हातात चिठ्ठी किंवा समोर टेलिप्रॉम्प्टर असल्याशिवाय कुठेच दोन शब्द धड बोलता येत नाहीत, ते जगाला दिशा देणारे विश्वगुरू वगैरे आहेत, असल्या थापा त्यांचे चेले कसे काय मारू शकतात?- संदीप कांबळे, परभणी
तुम्हाला समजत नसेल, तरी स्वतःला समजावा की जगाला दिशा दाखवणार्यांनी, घरबसल्या पद, पैसा, पुरस्कार कमावू पाहणार्यांना एक वेगळी दिशा दाखवलेली आहे… त्या बदल्यात गुरूंचे चेले ‘गुरुगान’ करत असतील तर तुम्ही त्याला थापा म्हणताय? पण या थापा आहेत हे खुद्द गुरूंनी आणि कुठल्याही चेल्याने आतापर्यंत नाकारलेलं नाही, हा गुरु-चेल्यांचा प्रामाणिकपणा तरी अॅप्रिशिएट करा…
जगभरात आईच्या ममतेची, वात्सल्याची किती कौतुकं केली जातात- बापाला मात्र कुटुंबासाठी झीज झीज झिजल्यावरही कोणी विचारत नाही- बापाने काय घोडं मारलंय? – देवेंद्र सोनवणे, भिवंडी
बापाने घोडं मारलेलं नसतं, तर ‘नुसता घोड्यासारखा वाढलाय असं म्हणत आपल्या तट्टूूला घोड्यासारखं बदडलेलं असतं.’ मग असे तट्टू घोडा झाल्यावर बापाला विचारतील? फार फार तर ते बापाला एक प्रश्न विचारतात की ‘तुम्ही आमच्यासाठी काय केलं?’ तेव्हा बापाला वाटत असेल की ‘मुलं स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करतील’, या विश्वासाने मर मर मेहनत करून, आपल्या कर्माची फळ मुलांना भोगावी लागू नयेत म्हणून सरळमार्गी राहून मुलांना वाढवलं, तरी मुलं मलाच का दोष देतात? मी असं यांचं काय घोडं मारलंय?
इटलीसारख्या छोट्या देशाच्या महिला पंतप्रधान त्यांच्याविषयी खोटं बोलणार्या डोनाल्ड ट्रम्पला थेट ठणकावू शकतात, आपल्याकडे मात्र देशाचे खलाशी मारले, युद्ध परस्पर थांबवले, काहीही टॅरिफ लादले, उठता बसता अपमान केला तरी ‘हिज एक्सलन्सी’ म्हणून लाचार हसत लोणी लावले जाते- कणा कुठे हरवला आपल्या देशाचा? – प्रतिमा कुलकर्णी, धाराशिव
कणे दोन प्रकारचे असतात. वाकणारे आणि न वाकणारे. वाकणारे कणे खूप असतात. पण न वाकणारा कणा फार दुर्मीळ असतो… तो सगळ्यांकडेच नसतो, हे समजून घ्या ना ताई… हे नवीन वाटेल, पण यह नया भारत है/ असं म्हणत कित्येक गोष्टी समजून घेतल्यात ना… तसा हा अदृश्य कणा हाच ‘नवीन देशाचा नवीन कणा आहे’ हे पण समजून घ्या प्लीज…
आपले राजकारणी लोक भाषणांमध्ये जशा कोलांटउड्या मारतात, तशा सर्कशीतल्या कसरतपटूंना तरी मारता येतील का? ही मंडळी वैचारिक मांडणीच्या नावाखाली जे काही भीषण विनोद करतात, तसे विनोद तुम्हाला तरी नाटककार म्हणून करता येतात का? – गणेश मानकर, पुणे
यांच्या नाटकांना आमचीच काय, कोणाचीच नाटकं टक्कर देऊ शकत नाहीत.. आणि समजा आम्ही तसं करायचं ठरवलं तरी आम्ही करून करून शाब्दिक कोट्या करू शकतो… पण नेत्यांप्रमाणे कोट्याधीश होऊ शकतो का? लोकांचं प्रेम मिळत असताना उगाच लोकांच्या शिव्या खायचे धंदे कराल का, असं का विचारताय?
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

