
दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सवात तत्कालीन अस्पृश्यांना पूजेचा समान अधिकार मिळवून दिल्यानंतर प्रबोधनकारांनी मुळावरच घाव घालायला सुरुवात केली. लगेचच गणेशोत्सवाच्या सार्वजनिक आणि तथाकथित राष्ट्रीय स्वरूपाविषयी मूलभूत प्रश्न उभे केले. त्या दृष्टीने त्यांचा राष्ट्रीय उत्सवाची चिकित्सा हा लेख महत्त्वपूर्ण आहे. त्याचा पूर्वार्ध आपण मागील भागात पाहिलाच. आता पुढचा भाग जसाच्या तसा.
आत्मप्रौढीकर व राष्ट्रोद्धारक अशा सार्वजनिक स्वरूपाच्या उत्सवांची कल्पना महाराष्ट्रात फार जुनी आहे. या कल्पनेच्या पितृत्वाचा मान कै. टिळकांनाच काही द्यावयास नको. विजयनगरच्या साम्राज्यात आणि त्यानंतर शिवशाहीत नवरात्राचा दुर्गा महोत्सव हाच सार्वजनिक उत्सव सर्वत्र अभेद भावाने आणि दांडग्या थाटामाटाने सर्व महाराष्ट्रात साजरा होत असे. गणपतीपूजन सर्वत्र नमनापुरते रूढ होतेच. तथापि गणपती-भक्तांचे ‘फंड’ दांडग्या प्रमाणावर जरी भट-पेशव्यांनीच सुरू केले, तरी केवळ छत्रपतींच्या नाटकी मुर्वतीसाठी त्यांनी नवरात्राचा उत्सव वाड्यात चालू ठेविलाच होता. गणेश दरवाजा, गणेश महाल, गणेश चौक इत्यादी पेशवाई स्मारकांच्या अभिमानी टिळकांनी नवरात्राच्या खर्याखुर्या लोकमान्य उत्सवाला बगल मारून, पेशव्यांच्या रमण्या चिमण्या गणपतीचाच सार्वजनिकत्वाच्या थेरासाठी स्वीकार केला, यात त्यांनी देशहितबुद्धीपेक्षा पेशवाईप्रिय आपली भटी निष्ठाच विशेष व्यक्त केली, असे आजचा भाद्रपदी शिमगाच सिद्ध करीत आहे.
पेशव्यांच्या गणेशनिष्ठेने छत्रपतीच्या सत्तेला कशी बोलता बोलता गणेशटोपी घातली, हे आता नव्याने कोणाला सांगणेच नको. शिवरायाने किंवा दुसर्या कोणत्याही छत्रपतीने गणपतीचे थेर माजविल्याचा दाखला इतिहासात नाही. असेल तर कोणी दाखवावा. छत्रपती जर लाडूखाऊ देवतांच्या भजनाला लागते, तर त्यांना छत्रपतीपद प्राप्त झाले नसते. शिवरायाने आपले सर्वस्व श्रीतुळजाभवानीला अर्पण करून, स्वराज्याचा सुखसोहळा महाराष्ट्राला दाखविला. प्रतापगडावर तिचीच प्राणप्रतिष्ठा केली. त्यांनी मोठे गणपतीचे सार्वजनिक दंगे थाटले नाहीत. शिवाजी महाराज शक्तीचे उपासक होते. ते शाक्त होते. त्यांना महाराष्ट्रात शक्तीचा संप्रदाय स्फुरून त्याला स्वतंत्र करावयाचे होते. म्हणून त्यांनी प्राचीन क्षात्र परंपरा दुर्गापूजनाचाच नवरात्र महोत्सव स्वतः सुरू करून तमाम महाराष्ट्रात घरोघर त्यांचे लोण नेऊन पोहोचविले. समर्थ रामदासांनी सुद्धा तुळजामातेचीच उपासना केली आणि सर्व मठात नवरात्राचा महोत्सव सार्वजनिक थाटाने चालू केला. शक्तिदायक अष्टभुजा तुळजादेवी अधिक महाराष्ट्राला जितकी जवळची वाटते, तितका भट पेशव्यांचा चतुर्भुज मोदकसक्षक भटी गणपती मुळीच वाटणे शक्य नाही. निदान ब्राह्मणेतरांनी तरी तुळजादेवीच्या नवरात्राला डावलून गणपती-भक्तांचे प्रदर्शन करणे, म्हणजे श्रीशिवछत्रपतीच्या पुण्यस्मरण संप्रदायाशी बेइमानी करण्यासारखे आहे.
बंगालकडे नीट लक्ष घ्या
जसा देव तसा त्यांचा भक्त. कै. टिळकांनी सार्या महाराष्ट्राला गणोबाचे टाळ कुटायला लावून, अखेर कसल्या मोक्षाचे खापर ब्राह्मण-ब्राह्मणेतर आणि हिंदू-मुसलमान जनतेच्या पदरात पाडले, ते पहा; आणि कालीपूजक बंगालकडे पहा. काव्य, वाङ्मय, शास्त्र, समाजोद्धार, राजकारण, स्वयंसेवाव्रती, स्वार्थत्याग, आत्ममद, इत्यादी वाटेल ती बाब घ्या, बंगाल आज अखिल भरतखंडात फर्स्टक्लास फर्स्ट आहे. बंगाली तरुण म्हणजे आज जळती ज्योत चमकत आहे. बंगालपुढे स्वराज्याचा दिमाख मिरविणारा महाराष्ट्र म्हणर््ीजे इंद्राच्या ऐरावतापुढे शामभटाच्या तट्टूप्रमाणे दिसत आहे. आणि तसा तो कां दिसू नये? महाराष्ट्राने शिवरायाच्या कुळस्वामिनीच्या, महाराष्ट्राच्या स्वराज्यदायिनी दुर्गेचा शक्तिसंप्रदाय अजीबात लाथाडून, तो जर बाळभटी रामभटी शामभटी गणोबालाच डोक्यावर घेऊन नाचू लागला, तर त्याला शामभटाच्या तटाणीच्या कंठाळीचे भटी भाग्य कां प्राप्त होऊं नये?
बंगालने आपल्या कालीमातेशी कधीहि प्रतारणा केली नाही. बंगाल कट्टा शाक्त राहिला म्हणूनच त्याची सर्वांगीण शक्ति आज शस्त्रास्त्रसंपन्न ब्रिटिश नोकरशाहीलाहि अहोरात्र जाग्रणे घडवीत आहे, ज्याची भक्ती करायची ते दैवत असेच चैतन्यदायक व समर्थ असावे की नुसत्या नामस्मरणाने देह थरथरून, आचार विचारांचे थैमान सुरू व्हावा. मोदकमक्षक गणपतीत असे काय चैतन्य आहे की त्याच्या सार्वजनिक उत्सवाच्या थाबड्या डोक्यावर नाचवून या शक्तीमुमुक्षु महाराष्ट्राचा उद्धार होणार? निदान शिवरायाभिमानी ब्राम्हणेतरांनी, केवळ भटी उपद्व्यापाच्या नकलेला बळी पडून, भटी भाद्रपदी शिमग्यात भाग घेणे, लज्जास्पद आहे. भटांनी गुळचट बोलबोलून ब्राम्हणेतराना गणपती-उत्सवात गुळाचे गणपती आजपर्यंत बनविले, तितके आता पुरे झाले. यापुढे भटी गुलामगिरीचा नायनाट करण्याचे जाज्वल्य शस्त्र म्हणून पुण्यस्मरण शिवरायाच्या नवरात्रोत्सवाचे पुनरुज्जीवन करून, अख्िाल महाराष्ट्राला शक्युपासक शाक्त संप्रदायात रंगविणे अगत्याचे आहे. ज्या वेळी श्रीशिवभवानी नवरात्रोत्सव अखिल महाराष्ट्राच्या कोनाकोपर्यास दणदणाट करू लागेल, त्या वेळी महाराष्ट्राची चैतन्य-देवता ती श्रीतुळजामाता, शिवरायाचे जीवनदैवत ती प्रतापगडची भवानी भक्तांच्या हाकेला हाक दिल्याशिवाय खास राहणार नाही. महिषासुरमर्दिनी काली-दुर्गामाता महाराष्ट्रातील अखिल ब्राह्मणेतर दुनिया फार प्राचीन काळापासून काली-दुर्गा-पूजक आहे. दुर्गा हे दैवत मोठे रौद्र व कडकडीत आहे. काही ब्राह्मण जातीसुद्धा दुर्गाभक्त आहेत. गणेशोत्सव प्रसारक परशुरामपंथीय चित्पावन तोंडाने
कितीहि भार्गवी रौद्रपणा दाखवीत असले, तरी अॅकिलीसने अॅगामेमनॉनला उद्देशून म्हटल्याप्रमाणे, ‘ते सारे तोंडाचे कुत्रे असून मनाने हरणासारखे भेकड आहेत.’ ते कालीमातेच्या उपासनेच्या फंदात पडणार नाहीत. त्यांचा पिंड गाणपत्य आहे; मोदकमक्षक आहे; तुळजाभक्त मर्हाठ्यांप्रमाणे महिषासुरमर्दक नाही. बॅरिस्टर एस. सी. मुकरजी आपल्या `हिंदुजनांचा र्हास आणि अध:पात`नामक त्रिखंडविश्रुत ग्रंथात कालीदेवीचे माहात्म्य कसे रंगवितात ते वाचकांनी नीट विचारात घ्यावे:-
शक्तिपूजा म्हणजे काळ्या फत्तराच्या एका अक्राळ-विक्राळ देवीची, भरंसाट भेसूर प्रकाराने आज तुम्ही करीत असलेली पूजा नव्हे. तुमच्या सामाजिक घाशीरामीखाली दडपून पडलेल्या देशातील स्त्रीजातीच्या पवित्र हृदयात तुमच्या राष्ट्राची शक्ती धमधमत आहे. जुन्या चित्रकाराने शक्तीचे-काली देवीचे-जे चित्र रंगविले आहे, त्यातील तपशीलाच्या चिन्हांचा वास्तविक अर्थ कोणालाच समजत नाही. प्राचीन चित्रकार आपल्या गूढ भावनाना चिन्हांच्या द्वारे व्यक्त करीत असत. कालीचे चित्र कसे आहे? एक नग्न उग्र स्त्री, हातात नागवी तरवार, गर्द निळा रंग, गळ्यांत माणसांच्या मुंडक्याच्या माळा, बेफाम थैमान घालीत आहे. ही तुमची काली देवीची मूर्ती. तिच्या पायाशी तुडवून लाथाडून पडला आहे तो कोण? हे चिन्ह काय दर्शविते? काली देवीने लाथाडून लोळविलेला तो भिक्षुकशाहीचा दांभिक व लुच्चा भट आहे. सत्याची नागवी तलवार परजीत, आपल्या वाजवी हकांसाठी, या भटाला चिरडून जमीनदोस्त करणेच काली देवीला प्राप्त आहे.
विचार करा. सावध व्हा. नाहीतर, आज तुमच्या गुलामगिरीखाली दाबून गेलेली स्त्रीजात-हिंदुस्थानची शक्ती कालीदेवी संतापाने भडकून जाऊन, भरतभूमीवरून या दांभिक लबाड भिक्षुकशाहीचे तळपट उडविण्यासाठी खरोखरच नागवी तरवार प्रत्यक्ष परजीत, भयंकर थैमान घालायला सोडणार नाही. तुमच्या अस्तित्वाला दडपीत चिरडीत नेणार्या न्यायनिष्ठुर कर्मन्यायाची याद राखा. कर्मन्यायाचा कचकाच असा आहे की त्याला व्यक्तीची पर्वा नाही, की जातीची किंमत नाही. आडवा आला कीं काप, एवढेच त्याला माहीत. या पुराणप्राचीन जगतात आजपर्यंत शेकडो मानव वंश नामशेष झाले, सफाई आस्तित्वातून उठले. कालीदेवीच्या गळ्यात जी नरुंडमाळा घातलेली आहे, ती विचारपूर्वक पहा. प्रत्येक मुंडके म्हणजे पृथ्वीतलावरून कर्मन्यायाने नष्ट झालेल्या एकेका मानववंशाची निशाणी आहे.
कालीभवानीच्या उत्सवाचे महत्त्व
भटांचा गणपती चार हातांचा, तर ब्राम्हणेतराची काली दुर्गा आठ हातांची. गणपतीचे वाहन उंदीर. दुर्गेचे वाहन सिंह. गणपती मोदक-मर्दक, तर तुळजाभवानी महिषासुर-मर्दक. गणपती नुसत्या शाब्दिक ‘शांतिरस्तु पुष्टिष्तिष्वास्तू’चा आशिर्वादा, तर आमच्या शिवरायाची भवानी हाकेला हाक देऊन बोलबोलता प्रतापगडाचा प्रताप आकाशापाताळत दुमदुमविणारी. भटांच्या गणपतीला पुराणाच्या पातड्याचा काल्पनिक आधार, आमच्या भवानीला ताजा तडफडीत शिवशाहीचा ब्राम्हणेतरांच्या प्रत्यक्ष आतड्याच्या जिव्हाळ्याचा-इतिहास. गणपतीकडे पाहिले तर वेद दिसतील, ब्रम्ह दिसेल, माया दिसेल, ब्राम्हण दिसेल, मोदक दिसतील. तुळजाभवानीचे नाव उच्चारा की सबंध शिवशाहीचा स्वराज्यपट आणि त्यातले सर्व वीर व विरांगना आमच्या मनश्चक्षूंपुढे जिवंत नाचू लागतील.
विशेषतः ‘गणपति-विसर्जन’ आणि दुर्गेचे ‘सीमोल्लंघन’ या दोन कार्यक्रमात होणारे मनावरचे परिणाम नीट लक्षात घ्या. स्पष्ट सांगायचे तर पहिल्यात उत्साहभंग विशेष. आठचार दिवस थाटमाटाने पूजलेली मूर्ती उचलून नेऊन पाण्यात फेकून देणे मृत्युप्रसंगाइतकेच चमत्कारिक. पण दुर्गेचा सीमोल्लंघन विधी साजरा करून घरी परतणार्या प्रत्येक भक्ताला ओवाळणीचे स्वागत मिळते. ‘सोने लुटून’ परत येणे, या भावनेतला उत्साहाचा परमावधि गणपति विसर्जनांत मुळीच आढळायचा नाही. असा हा आमचा खास जिव्हाळ्याचा १० दिवसाचा प्राचीन शिवपरंपरेचा भवानी महोत्सव डावलून, भटी पिंडाच्या टिळकी गणपतीला ब्राह्मणेतरांनी डोक्यावर घेऊन नाचावे, यावरून भटी मध्यस्थीचे विष भटेतर समाजांच्या किती पिंडी ब्रह्मांडी जाऊन भिनले आहे, याचा विचारवंतांनी विचार केला पाहिजे.
गणपति हे अखिल हिंदूंचे दैवत धरले, तर प्रत्येकजण त्याची आपापल्या घरांत पूजा करीतच असतो. तेवढ्यासाठी त्याचे चव्हाट्यावर सार्वजनिक डोले मिरविण्याची जरूर नाही. केवळ भटांच्या भाद्रपदी शिमग्याला तोडीस तोड आणि जोडीस जोड देण्यासाठी गणपति आणि मेळे यांचा उपद्रव्याप केला तरी ‘का? अखेर आमच्या लोकमान्यांचा सार्वजनिक गणपति भटेतरांच्या बोडक्यावर आम्ही बसविलाच कीं नाही?’ म्हणून भटलोक हिणवायला मागे पुढे पहाणार नाहीत. आणि आज पहातहि नाहीत.
उत्सव कसा साजरा करावा
बंगालला कालीउपासना आहे, पण इतिहास नाही. महाराष्ट्राला काली-उपासना आहे आणि जबरदस्त इतिहासहि आहे. कालीउपासना करून बंगाल आपला नवीन इतिहास घडवीत आहे. महाराष्ट्र आज उपासना आणि इतिहास या दोन्हि महत्त्वाच्या गोष्टीना रामराम ठोकून, भटी गणपतीच्या फिसाटात भटी काष्ट्याच्या वळणाने आत्मघातालाच मोक्ष मानून त्यात रंगला आहे. ही भटी रंगभंगका लोटा आता लाथाडून, महाराष्ट्राने शक्तीपूजनाची कास धरली पाहिजे आणि भटी प्राबल्यामुळे मागे पडलेल्या शिवरायाच्या सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे पुनरुज्जीवन केले पाहिजे.
आश्विन शुद्ध प्रतिपदेला अष्टभुजा महिषासुरमर्दिनी दुर्गादेवीच्या आणि बंगालच्या कालीमातेच्या प्रतिमेची यथाविधी प्राणप्रतिष्ठा करावी. आजूबाजूला शिवछत्रपति, संभाजी वगैरे सर्व छत्रपति; तानाजी, बाजीप्रभु, अहिल्याबाई होळकर, सुभेदार मल्हारराव, गायकवाड, शिंदे, आदिकरून सर्वांच्या प्रतिमांनी मखर व मंडप शृंगारावा. नवरात्रीत महाराष्ट्राच्या इतिहासाची पोवाडे, कथा, कीर्तने, भजने, जलसे, व्याख्याने, प्रवचने यांच्या द्वारे मनोवेधक व आत्मप्रबोधक उजळणी होईल, असा कार्यक्रम आखवा. सकाळ संध्याकाळ पूजा आणि आरती ठेवावी. या आणि इतर सर्व कार्यक्रमात आपल्या अस्पृश्य बांधवांना सर्रास भाग घेऊ द्यावा. इतकेच नव्हे तर त्यांना विशेष महत्व देऊन, कीर्तने करणार्या व पोवाडे म्हणणार्या अस्पृश्य कीर्तनकाराना व शाहिराना अग्रपूजेचा मान द्यावा.
सर्वांना सहजगत्या स्वतः पूजा करता येईल, असा घटस्थापनेचा प्रचंड घट मखरात समोरच ठेवावा. दोन्ही बाजूला दोन रोहाची क्षेत्रे रुजवणीस लावावी. दोन समयांचा नंदादीप नऊ रात्र अखंड तेवत ठेवावा. दहाव्या दिवशी सर्व आबालवृद्ध कालीभक्तानी घरोघर मिष्ठान्न भोजनोत्तर एकत्र जमून, जगदंबेच्या प्रतिमेची पालखी अनंत वाद्यांच्या गजरात मर्हाठशाही थाटाच्या स्वारीने सीमोल्लंघनाला न्यावी. तेथे सुवर्ण पूजनोत्तर सोने लुटावे, आणि जगदंबेची पालखी वाजत गाजत मण्डपात परत आणावी. ठिकठिकाणच्या स्वाभिमानी ब्राम्हणेतरांनी श्रीशिवरायाच्या परंपरेचा अभिमान बाळगून, हा महोत्सव सर्रास रूढ करण्याची खटपट केल्यास, गणेशोत्सवाची भटी गुलामगिरी आपोआप बंद पडून महाराष्ट्राला योग्य मार्ग दाखविल्याचे पुण्य त्यांना लाभेल.

