ग्रहस्थिती : मंगळ मेष राशीत, हर्षल वृषभेत, गुरु, शुक्र कर्केत, राहू कुंभेत, शनि नेपच्युन मीनेत, रवि-बुध मिथुनेत, केतू सिंहेत, प्लूटो मकरेत.दिनविशेष : २० जून अरण्यषष्ठी, विंध्यवासिनी पूजा, २१ जून भानुसप्तमी, २२, जून रोजी दुर्गाष्टमी, २५ जून निर्जला एकादशी, २६ जून मोहरम.

मेष : नवीन वास्तू घेण्याचे योग जुळतील. अडकलेली कामे पुढे सरकतील. सरकारी कामांत दिरंगाई होईल. घरात वाद होतील. तरुणांना स्पर्धेत, नवीन नोकरीच्या प्रयत्नांत यश मिळेल. मुलांशी जमवून घ्या. महिलांच्या कानावर खूषखबर पडेल. आमदनी आणि खर्चाचा मेळ साधणे कठीण जाईल. नोकरीत जमवून घ्या. कामाची घाई नको. कामानिमित्ताने दूरचे प्रवास करावे लागतील. घाईगडबडीने कामे पुढे नेण्याचा मोह टाळा. विद्यार्थ्यांना यशदायी काळ. उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. कामात अतिउत्साह टाळा. सकारात्मक विचार करा. व्यवसायात नव्या कल्पनांना आकार मिळण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल.

वृषभ : अति घाई आणि ठोकर खाई अशी स्थिती टाळण्यासाठी प्रत्येक पाऊल जपून टाका. व्यवसायात मोठे निर्णय घेताना घाई नको. नोकरीत अतिविश्वास दाखवणे अडचणीचे ठरेल. कलाकारांना अपेक्षित यश मिळेल. नव्या कामाच्या संधी चालून येतील. भागीदारीत आर्थिक लाभ मिळतील. मालमत्तांचे विषय मार्गी लागतील. घरात ज्येष्ठांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. मुलांच्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. अनावश्यक कामावर पैसे खर्च होतील. मित्रांबरोबर मौजमजा कराल. व्यवसायात आर्थिक नियोजन करा, अन्यथा गणित बिघडेल.

मिथुन : विवाहेच्छुकांचा प्रश्न सुटेल. प्रेमप्रकरणात वाद होतील. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत काळजी घ्या, चुकून ध चा मा होऊ शकतो. नव्या ओळखींमधून कामे पुढे सरकतील. सरकारी कामांत घाई टाळा. तरुणांना यशासाठी अधिकचे कष्ट घ्यावे लागतील. घरासाठी महाग वस्तू खरेदी कराल. कुटुंबाला वेळ द्याल. घरात आनंद वाढवणार्या घटना घडतील. मुलांना यश मिळेल. व्यवसायात नव्या ऑर्डर मिळतील. थकीत येणे वसूल होईल. उच्च शिक्षणाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. पैशाचे गणित जपून सांभाळा.

कर्क : मोठ्या लोकांच्या ओळखी होतील, त्यातून नवीन कामे मिळतील. सरकारी कामे झटपट पुढे सरकतील. घरात आनंदी वातावरण राहील. प्रवासात खिसा पाकीट सांभाळा. वाहन जपून चालवा. व्यवसायात येणे वसूल होईल. थंडीतापाचा विकार त्रास देईल. सार्वजनिक ठिकाणी काळजीपूर्वक वागा. सामाजिक क्षेत्रात सन्मान होईल. लेखक, कलाकारांना सन्मान लाभेल. नोकरीनिमित्ताने प्रवास कराल. आत्मविश्वास ढळू देऊ नका. सार्वजनिक जीवनात डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा. किरकोळ वादाकडे दुर्लक्ष करा.

सिंह : ब्रोकरांनी आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. मोठ्या व्यवहारात कायदेशीर बाजू तपासा. घरात वाद टाळा. व्यवसायात कामगारवर्गाकडून त्रास होईल. नोकरीत लाभ मिळतील. शेअर, लॉटरीमधून लाभ होईल. उच्चशिक्षणासाठी विदेशात सुरू असणार्या प्रयत्नांना यश मिळेल. महिलांना आनंद वाढवणारी बातमी कळेल. आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील. आई-वडिलांचा सल्ला माना. तरुणांना यश मिळवण्यासाठी झटावे लागेल. व्यवसायात योजना सफल होतील. बँकेची कामे मार्गी लागतील. मित्रांच्या वादात पडू नका. मध्यस्थी टाळा.

कन्या : तरुणांना मनासारख्या संधी लाभतील. नोकरीनिमित्ताने विदेशात जाल. व्यावसायिकांना मोठे यश मिळेल. कोर्ट-कचेरीची कामे पुढे सरकतील. पत्रकार, संपादक, जनसंपर्क क्षेत्रात यश मिळेल. तरुणांचे मौजमजेवर पैसे खर्च होतील. वाहन चालवताना घाई करू नका, तुमची चूक नसताना तापदायक घटनेचा सामना करावा लागेल. नोकरीच्या संधी चालून येतील. नव्या संकल्पना आर्थिक बाजू भक्कम करतील. घरात एखादा छोटेखानी आनंदसोहळा होईल. कलाकारांचा कौतुक सोहळा होईल. व्यवसायात अडचणी जाणवतील.

तूळ : व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत प्रमोशन, पगारवाढीचे योग आहेत. लॉटरी, सट्टा यांच्या प्रेमात पडू नका. मित्रांच्या सल्ल्याकडे लक्ष देऊ नका. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. घरात वाद टाळा. सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रवासात अनोळखी व्यक्तीशी अनावश्यक बोलू नका. पत्नीची चांगली साथ मिळेल. भावंडांशी वाद टाळा. व्यवसायाच्या बाबतीतल्या मोठ्या योजना मार्गी लागतील. काम झाले नाही तर त्यात फार गुंतून राहू नका. खेळाडूंना ध्येयप्राप्तीसाठी अधिक कष्ट करावे लागतील.

वृश्चिक : वेंधळेपणा करू नका. महिलांनी आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे. तरुणांना करियरला आकार देण्याची संधी मिळेल. खेळाडूंना यश मिळेल. व्यवसायात येणे वसूल होईल. मामाकडून लाभ मिळेल. कलाकार, संगीतकार, ब्रोकर, खाद्यान्न व्यावसायिकांना यशदायी काळ. मुलांकडे लक्ष द्या. नोकरीत तुमच्या अधिकारांत वाढ होईल. नव्या कामांमधून आर्थिक बाजू भक्कम होईल. मुलांना शिक्षणात यश मिळेल. तरुणांचा आत्मविश्वास वाढेल. मनाचे आरोग्य सांभाळा. बँकेचे व्यवहार करताना घाई नको. कुटुंबासाठी अधिकचा खर्च करावा लागेल. रेंगाळलेला नव्या वास्तूचा प्रश्न मार्गी लागेल.

धनु : आर्थिक नियोजनात चुका करू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. कायदेशाrर चौकटीत राहून काम करा. कुटुंबात वाद होतील. तरुणांना नोकरीच्या संधी येतील. मित्रांशी जुने वाद काढू नका. शिक्षक, संशोधकांना यशदायी काळ. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. मालमत्तेचे व्यवहार मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी अतिआत्मविश्वास दाखवणे टाळा. व्यवसायाची नवीन आयडिया सापडेल. विदेशात शिक्षणासाठी जाल. तरुणांना ताणांचा सामना करावा लागेल. गुंतवणूक करताना काळजी घ्या. प्रेमप्रकरणात मिठाचा खडा पडू देऊ नका.

मकर : घरातील वातावरण आनंद देणारे राहील. नोकरीत कौतुक होईल. तरुण चैनीवर खर्च करतील. नव्या कामाच्या संधी येतील. रागावर नियंत्रण ठेवा. संयम आणि अहंकार सांभाळा. आर्थिक नियोजनात चुका करू नका. व्यवसायात हातून चूक होण्याची शक्यता आहे. आयटी इंजिनियर, विमा एजंट, गुंतवणूक सल्लागार, औषध व्यावसायिक, लेखक, पत्रकार, प्रकाशकांसाठी चांगला काळ. आर्थिक भुर्दंड बसेल असे काही करू नका. गरजेपुरतेच पैसे खर्च करा. भविष्याच्या दृष्टीने पैशाचे नियोजन करा. बँकेची कठीण कामे मार्गी लागतील.

कुंभ : नोकरीत ठिकाणी नियमाचे पालन करा. जाहीर वाद टाळा. मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. महिलांना यश मिळेल. सामाजिक कार्यात गौरव होईल. तरुणांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. जनसंपर्क, पत्रकारितेत चांगला काळ. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. आमदनी आणि खर्च यांचा ताळमेळ साधा. पोटाचे विकार डोके वर काढतील, काळजी घ्या. काही ठिकाणी बंधने पाळा. नव्या ओळखींमधून लाभ मिळेल. त्याचा योग्य विनियोग करा. मौज-मजेवर पैसे कमी खर्च करा. महागडी वस्तू खरेदी तूर्तास तर नकोच.

मीन : बुद्धिकौशल्यावर मोठे यश मिळेल. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. महिलांना यशदायी काळ. नोकरीनिमित्ताने विदेशात जाण्याची संधी चालून येईल. कुटुंबात किरकोळ मानापमानाकडे दुर्लक्ष करा. महिलांशी वाद टाळा. तरुणांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. व्यवसायात एखादी गोष्ट न पटल्यास त्यावर विचारमंथन करू नका. उधार-उसनवारी टाळा. आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्या. घरात आनंद देणारी बातमी कळेल, छोटेखानी समारंभात आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. मित्र आर्थिक मदतीची याचना करतील, वेळ पाहून निर्णय घ्या.
