• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आशा डायनिंग हॉल

सुधीर साबळे (पुणे तिथे खाणे...)

marmik by marmik
June 30, 2026
in खानपान, चला खाऊया!
0
आशा डायनिंग हॉल

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुण्याने अनेक पिढ्या घडवल्या. देशभरातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी इथल्या मेस संस्कृतीचा अनुभव घेतला. भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव असोत किंवा पुढे मोठे झालेले अनेक साहित्यिक, कलाकार, उद्योजक आणि राजकारणी; त्यांच्या पुण्यातील आठवणींमध्ये एखाद्या खानावळीचा उल्लेख हमखास सापडतो. पुण्यात शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मेस म्हणजे केवळ जेवणाची जागा नसते, तर ते त्यांचे दुसरे घरच असते. एकेकाळी मेस म्हणजे साधे, मोजके आणि फक्त पोटभर जेवण मिळण्याचे ठिकाण अशी ओळख होती. मात्र काही ठिकाणांनी या साधेपणालाच आपली ताकद बनवले. आपटे रोडवरील धनश्री सोसायटीत असलेले ‘आशा डायनिंग हॉल’ ही अशीच एक जागा.

१५ ऑगस्ट १९४९ रोजी सुरू झालेल्या या ठिकाणाने तब्बल ७६ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. काळ बदलला, पुणे बदलले, खाद्यसंस्कृती बदलली; पण आशा डायनिंगमधील चव मात्र आजही तशीच आहे. इथे जेवण सुरू करताना मिळणारी गरमागरम पोळी, बटाट्याच्या काचर्‍यांची साधी पण स्वादिष्ट भाजी आणि डाळीच्या पाण्यापासून तयार केलेले खास रस्सम ही जेवणाची ओळख बनली आहे. इथे मिळणारे जेवण हे मराठी आणि बेळगावी पद्धतीचे आहे. त्यामुळे त्याची चव युनिक वाटते. अनेक दशकांपूर्वी जे पदार्थ ज्या चवीने बनत होते, त्याच चवीची परंपरा इथे आजही जपली जाते. त्यामुळे पुणेकरांसोबतच बाहेरगावाहून आलेले अनेक जणही या घरगुती जेवणाच्या प्रेमात पडतात. महाराष्ट्रीयन चवीचे अस्सल, साधे आणि मन तृप्त करणार्‍या जेवणाच्या शोधात असणार्‍या मंडळींसाठी आशा डायनिंग हॉल हा उत्तम पर्याय ठरतो.

प्रवासाची सुरुवात
आशा डायनिंग हॉलचा प्रवास रंजक आहे. कारवार जवळील होनावर इथे राहणारे रामराव किणी हे १९४५च्या सुमारास कामानिमित्ताने पुण्यामध्ये आले. सदाशिव पेठेतील माडीवाले कॉलनीमधील रेगे यांच्याकडे ते काम करू लागले. तिथे त्यांना स्वयंपाक करण्याचा अनुभव मिळाला. त्या काळात फर्ग्युसन कॉलेजमध्ये सात ते आठ प्रकारच्या मेस होत्या. रामराव यांना स्वयंपाक करता येत असल्यामुळे त्यांनी कॉलेजमधली मेस चालवायला घेतली. मेसमध्ये मिळणार्‍या जेवणात भाजी, भात, पोळी यांचा समावेश असे.

कॉलेजमध्ये मेस चालवण्याचा अनुभव घेतल्यानंतर प्रभात रोडवरील सातव्या गल्लीत असणार्‍या बलभीम मंदिरासमोरच्या जागेत त्यांनी मेस सुरू केली. घरगुती चवीचे पदार्थ तिथे मिळत असल्याने मेसमध्ये कायम गर्दी होत असे. आपटे रोडवर पूर्वी वैदिक आश्रम चालवला जात असे. पुरोहित तिथे वेदांचा अभ्यास करत असत. हा आश्रम बंद पडल्यावर तिथे किणी यांची खानावळ सुरू झाली. तेव्हा इथे चाळीसारखी व्यवस्था होती. ११ रुपये महिना पडत असे. पन्नास पैशांमध्ये जेवण मिळत असे. त्यामध्ये दोन भाज्या, आमटी, पोळी, भात असा मेनू असे. मेसमध्ये येणार्‍या प्रत्येक मुलाला पोटभर जेवायला घालण्याचे काम रामरावांनी केले. दर रविवारी अमर्यादित फीस्ट (गोडाधोडाचे, खास रविवारचे जेवण) मिळत असे. त्यामुळे इथे जेवणासाठी गर्दी होत असे. रविवारी इथे जो जेवायला येईल त्याला तब्बल एक तास लागायचा जेवायला. रविवारच्या जेवणात मसालेभात, गुलाबजाम, जिलबी असे पदार्थ अमर्यादित स्वरूपात दिले जात असल्यामुळे ते खाण्यासाठी इथे स्पर्धा लागायची. मेस सकाळी साडेनऊ वाजता सुरू होत असे आणि दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बंद होत असे, या डायनिंग हॉलचे आजच्या पिढीतले मालक प्रकाश किणी सांगतात.

सिग्नेचर डिश रस्सम
आशा डायनिंग हॉलमध्ये एक खास चवीचे रस्सम मिळते, ती या डायनिंग हॉलची ओळख बनली आहे. ते इथे कसे तयार झाले, याची कहाणी मोठी इंटरेस्टिंग आहे. आंध्र प्रदेशातल्या विजयवाडामधील काही विद्यार्थी पुण्यात शिकण्यासाठी आले होते. ते आमच्या मेसमध्ये जेवणासाठी येत असत. त्यांनी एकदा सांगितले, आपल्याला जेवणात रस्सम हवे आहे, बाकी काही नसले तरी चालेल. आम्ही भाताबरोबर ते खाऊ. डाळीचे पाणी, टोमॅटो आणि खास तयार केलेला मसाला वापरून आम्ही रस्सम तयार केले, तेव्हा ते इथे येणार्‍या प्रत्येकाच्या पसंतीला उतरले. नियमितणे जेवण्यास येणारा रस्समची वाटी आवर्जून मागून घेतो. आजही खास रस्समसाठी इथे जेवायला येणारे लोक असल्याचे प्रकाश किणी सांगतात. सगळ्या पदार्थांमध्ये ओल्या नारळाचा सढळ हस्ते वापर, हेही ‘आशा’चे एक खास वैशिष्ट्य आहे.
सहसा बटाट्याच्या काचर्‍या करताना त्यात लाल तिखट टाकलं जातं. आपण काचर्‍या करताना त्यात हळद आणि आले-मिरचीची पेस्ट घालून त्या करू या, असं रामराव किणी यांनी ठरवलं. जेवणाच्या ताटात हा पदार्थ वेगळ्या रंगाचा दिसावा, ही त्यांची त्यामागची कल्पना. ही हिट कल्पना आजही सुरू आहे.

मेसचे सदस्य नारायण मूर्ती,शरद पवार
आशाच्या मेसचे सदस्यांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, यशवंतराव गडाख, गणपतराव देशमुख, माजी मंत्री दिलीप सोपल, योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार, इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे. या सगळ्या मंडळींना इथले जेवण विशेष आवडत असे. आजही दिलीप सोपल काही कामाच्या निमित्ताने पुण्यात आले की आशा डायनिंग हॉलला जेवणासाठी येतात. नव्या पिढाrतले कलाकार सिद्धार्थ चांदेकर, स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, मुक्ता बर्वे ही मंडळी नेहमी इथे जेवणासाठी येत असतात.
१९८७ मध्ये मेस बंद प्रकाश किणी सांगतात, आम्ही १९८७ मध्ये मेस बंद करून नियमित जेवण देण्यास सुरुवात केली. याचा फायदा म्हणजे फॅमिलीवाले लोक इथे जेवणासाठी येऊ लागले. तेव्हा जेवणाची किंमत आठ रुपये होती. रविवारच्या जेवणात महाराष्ट्रीयन लग्नामध्ये जसे जेवण असते तसाच मसाले भात, अळूची भाजी, वरण-भात, केळ्याची कोशिंबीर असा मेनू असतो. त्या दिवशी रोज मिळणार्‍या चिंचगुळाच्या आमटीला सुटी असते. माझ्या वडिलांनी जेवणात वापरल्या जाणारे मसाले तयार करण्याचे एक तंत्र विकसित केले आहे. १८ प्रकारच्या गरम मसाल्याच्या वस्तूंची यादी आमच्याकडे आहे, त्याच्याआधारे आम्ही घरगुती पद्धतीने मसाले तयार करत असतो. गोडा मसाला देखील आम्ही घरीच तयार करतो, त्यामुळे आमच्या जेवणाला घरची चव असते.

कर्मचारी मंडळींसाठी १० हजार आशा डायनिंग हॉलबरोबर जोडल्या गेलेल्या ग्राहकांचे वेगळे नाते आहे. मुंबईमध्ये राहणार्‍या एका कुटुंबाचे आशा डायनिंगबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत. खास जेवण करण्यासाठी हे लोक मुंबईवरून इथे येतात. करोनाच्या काळात त्यापैकी एका सदस्यांचे निधन झाले. करोना संपल्यानंतर एके दिवशी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य भेटायला आले आणि त्यांनी प्रकाश किणी यांना सांगितले की, नुकत्याच निधन झालेल्या आमच्या कुटुंब सदस्याने तुमच्या कर्मचारीवर्गासाठी त्याच्या मृत्युपत्रात १० हजार रुपये लिहून ठेवले आहेत, ते पैसे आम्हाला त्यांना द्यायचे आहेत, तुमची काही हरकत नाही ना? त्यांनी ते पैसे आमच्या कामगारांना दिले. इथे नियमित येणारे एक जण करोनाच्या लॉकडाऊन लागण्याच्या आदल्या दिवशी इथे आले होते. ते जेवण करून निघून गेले परंतु त्यांचे २५ हजार रुपयांचे पाकीट ते इथेच विसरून गेले. त्यांचा संपर्क आमच्याकडे नव्हता. त्यामुळे आम्ही ते पाकीट सुरक्षित ठेवले. करोना संपल्यानंतर दोन वर्षांनी ते जेवणासाठी इथे आले, तेव्हा आम्ही त्यांना विचारले, त्यांना तुम्ही मागे जेव्हा इथे आला होतात तेव्हा तुमचे काही विसरले होते का? ते म्हणाले, तेव्हा माझे २५ हजार रुपये हरवले होते. आम्ही खात्री करून घेतली आणि दोन वर्ष सांभाळून ठेवलेले ते पाकीट त्यांना परत दिले. ते पाहून त्यांना धक्काच बसला, अशी आठवण प्रकाश यांनी सांगितली.

आज प्रकाश किणी, त्यांचे बंधू सुरेश किणी आणि पुढील पिढीतील अरुण किणी हा वारसा सांभाळत आहेत. त्यांच्यासाठी ग्राहक म्हणजे घरचा माणूस असतो. म्हणूनच इथे येणार्‍या प्रत्येकाला प्रेमाने वाढलं जातं, आग्रहाने जेवू घातलं जातं आणि समाधानाने निरोप दिला जातो. आधुनिक रेस्टॉरंट्सच्या झगमगाटात, आकर्षक इंटिरिअर आणि फ्युजन मेनूंच्या गर्दीत आशा डायनिंग हॉल वेगळा ठरतो. कारण इथे चवीसोबत आठवणी वाढल्या जातात, पदार्थांसोबत माणुसकी दिली जाते आणि ग्राहकांशी नातं जोडलं जातं. इथे जुन्या पुण्याची झलक दिसते. काही ठिकाणं केवळ व्यवसाय म्हणून चालतात, तर काही ठिकाणं काळाच्या प्रवाहात संस्कृतीचा भाग बनतात. आशा डायनिंग हॉल हा पुणेरी खाद्यसंस्कृतीचा असाच एक अविभाज्य भाग बनला आहे.

Previous Post

राशीभविष्य (२० ते २६ जून २०२६)

Next Post

गंध अष्टगंधाचा… नर्मदामाईच्या दातृत्वाचा…

Next Post
गंध अष्टगंधाचा… नर्मदामाईच्या दातृत्वाचा…

गंध अष्टगंधाचा... नर्मदामाईच्या दातृत्वाचा...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.