पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध भागात मिथेनॉल मिश्रित हातभट्टीची विषारी दारू प्यायल्याने जवळजवळ पंचवीस जणांचे बळी गेल्याची दुर्घटना घडल्यापासून आजपर्यंत माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या या धक्क्यातून अजून सावरलेला नाही. ही दारू पिणारे कोणी श्रीमंत नव्हते. दिवसभर कष्ट करणारे चार पैसे मिळवण्यासाठी राब राब राबणारे, थकून भागून आल्यावर श्रमपरिहारासाठी परवडेल अशा हातभट्टीच्या दारूची नशा करणारे गरीब कुटुंंबातील होते. एकीकडे पुणे शहरालगतच्या तुळापूर परिसरातील एका आलिशान फार्म हाऊसवर सुरू असलेल्या हाय प्रोफाईल `प्रोजेक्ट एक्स’ रेव्ह पार्टीत दहा लाख रुपयांचे उंची मद्य, हुक्का, गांजा आदी नशिल्या पदार्थांचे सेवन करून नशेसाठी तरुणाई देहभान विसरुन नाचत असते, वरळीच्या डोममध्ये अशीच नशिली मौजमजा करण्यासाठी रात्रभर बेभान होऊन नाचगाण्याचा हैदोस घालत असते त्याचवेळी हातभट्टीची दारू प्यायल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतात, यातील विसंगतीने पोक्यासारखे संवेदनाशील मन असणारे अनेकजण आत्मचिंतन करू लागतात. श्रीमंतांच्या पोरांचे काही वाटत नाही हो, पण घटकाभर नशेच्या आनंदासाठी हातभट्टीची विषारी दारू पिऊन जीव गमावणार्या माणसांची दया येते, असे पोक्या म्हणतो.
इथूनच त्याच्या विचाराचे चक्र सुरू होते. हातभट्टीच्या दारुचे अड्डे पोलिसांना माहीत नसतात का, साध्या हवालदारापासून वरिष्ठांपर्यंत एकाही अधिकार्याला त्यांची खबर नसते का, की वेळोवेळ नियमितपणे मिळणार्या हप्त्यांमुळे त्याकडे कानाडोळा केला जातो, असे प्रश्न फक्त पोक्यालाच नव्हे तर सर्वसामान्य माणसालाही पडत असतात. पोक्या जरी पीत नसला तरी त्याने चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी चाळीतल्या वरच्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून समोरच्या मैदानाच्या एका बाजूला असलेल्या पत्र्याच्या चाळीत लावल्या जाणार्या हातभट्टीचे सर्व सोपस्कार पाहिलेले असतात. कुजलेला गूळ, नवसागर यांच्या मिश्रणाने पत्र्याच्या मोठ्या चौकोनी डब्यातील पाण्यात ती दारू कशी उकळली जाते, थंड झाल्यावर ते डबे मातीत कसे पुरले जातात, दुसर्या दिवशी गिर्हाईकांना घरात बसवून हातभट्टीवाला मालक त्यांच्या पुढ्यात त्या दारुच्या बाटल्या आणि काचेचे ग्लास ठेवून त्यांची सरबराई कशी करत असतो, हे सुद्धा पोक्याला खिडकीतून दिसायचे. पोलिसांची धाड पडणार असेल तर त्याची खबर हातभट्टीवाल्याला दोन दिवस आधीच मिळायची. त्यामुळे रात्री दोन-तीन डबे मातीतून उकरुन दोन दिवसांची बेगमी तो घरात कॉटखाली करून ठेवायचा. तिसर्या दिवशी पोलीस आले की ते मातीत पुरलेले दारुचे चार-पाच पत्र्याचे मोठे डबे शिगा मारून उकरुन काढायचे आणि त्यातली दारू त्या मातीत ओतून निघून जायचे.
पोक्याचा वरळीला राहणारा टिंगूनाना नावाचा पोलीस हवालदार नातेवाईक होता. तो पोक्याच्या घरी आला की सात-आठ वर्षांच्या पोक्याला त्याचे बोट धरून त्याची स्वारी भागातल्या हातभट्टीवाल्याच्या अड्ड्यावर हप्तेवसुलीला निघायची. कोणी विचारल्यास माझा पुतण्या म्हणून तो पोक्याची ओळख करून द्यायचा. त्याची हप्तेवसुली झाली की धंदेवाले कौतुकाने पोक्याचा गालगुच्चा घेत त्याच्या हातात एक-दोन रुपयाच्या नोटा कोंबायचे. एकदा एक धंदेवाला म्हणाला, हवालदारसाहेब, आपण या छोट्याला सरबत म्हणून ग्लास थंडगार बीअर प्यायला देऊ या का? त्यात त्यांनी बर्फही टाकला आणि पोक्याला म्हणाले, पी रे बाळा, छान सरबत आहे. पोक्याने ग्लास तोंडाला लावला आणि कडू कडू म्हणून ओतूनही टाकला. पोक्याने भोकाड पसरताच त्या धंदेवाल्याने थंडगार कोकाकोलाची बॉटल प्रâीजमधून काढून पोक्याला दिली, तेव्हा कुठे पोक्याचा जीव शांत झाला.
बाजूच्या वाडीतल्या आंटीच्या हातभट्टीच्या धंद्यापासून स्वत:ची देशी दारुची दुकाने असुनसुद्धा दारुच्या थेंबाला स्पर्शही न करणार्या दानशूर जॉन डिकोस्टाने आर्थिक अडचणीत सापडलेल्या विभागातील गरीबांना केलेल्या मदतीची अनेक उदाहरणेही पोक्यापाशी आहेत. हातभट्टीची पिण्यापेक्षा देशी दारुच्या दुकानातील संत्री, मोसंबी, पायनापल यासारख्या विविध फळांच्या स्वादाची सरकारी दारु लोक का पीत नाहीत, हा प्रश्न पोक्याला नेहमीच पडत आला आहे. पोक्या मोठा झाल्यावर त्याचे काही पिणारे मित्र त्याला सांगायचे की पोक्या एकदा पिऊन तर बघ. चवही उत्तम असते आणि नशाही चांगली येते. पण पोक्याने आजपर्यंत कधीच ती चव घेतली नाही. हातभट्टीची विषारी दारू पिऊन लोक मरतात, तेव्हा पोक्याला प्रकर्षाने त्यांच्यासाठी देशी दारुचा पर्याय आठवतो. महाराष्ट्र सरकारने एकमेव उत्तम केलेली गोष्ट म्हणजे देशी दारुची दुकाने असे तो अभिमानाने सांगतो. एक तर त्यापासून सरकारला चांगले उत्पन्न मिळते आणि जर ती काही रुपयांनी महाग झाली तरी पिणारे लोक हात आखडता घेत नाहीत.
देशी दारुचे दुकान घालणार्या माणसाला त्याचा भांडवली खर्च वजा जाता दर महिन्याला किमान एक लाख रुपये उत्पन्न दुकानात नोकर ठेवूनही घरबसल्या मिळते. त्यामुळे सरकारने टीव्ही चॅनेल्ससकट सर्व प्रसारमाध्यमातून देशी दारुची जाहिरात करावी, आपण देशी दारुला देत असलल्या प्रचंड प्रतिसादामुळे हे लटपटणारे सरकार आपल्या पायावर अगदी स्थिर आणि भक्कमपणे उभे आहे, असे अगदी देशाच्या थोर नेत्यांच्या छायाचित्रांसह प्रसिद्ध करावे, असे त्याला वाटते. कारण संपूर्ण देशाला देशी आणि विदेशी दारुच्या विक्रीतून जे भरघोस उत्पन्न मिळते ते इतर मार्गाने मिळणार्या उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याची माहिती पोक्याकडे आहे आणि दारुचे भाव कितीही पटीने वाढले तरी त्यांच्या खपात घट होत नाही.
जनतेला नेहमीच कधी आयपीएलच्या, कधी निवडणुकीच्या तर कधी आणखी कसल्या नशेत गुंग ठेवून सत्तेला चिकटून राहण्याची आपली सोय अबाधित ठेवणे एवढेच सरकारचे आता उद्दिष्ट आहे. उद्या वेळ आली तर आपल्या `धन की बात’ या नव्या लोकप्रिय कार्यक्रमातूनही `पिओ और पीने दो’ हे घोषवाक्यही लोकप्रिय ठरू शकेल, असे टोक्या म्हणतो.

