
भारतीय जनता पक्षाचे दिल्ली ते गल्लीपर्यंतचे तमाम नेते, कार्यकर्ते अयोध्येच्या रामजन्मभूमी येथील ‘रामलल्ला’वरून काँग्रेस पक्षाला झोड झोड झोडताहेत. त्यामुळे आयत्या बिळावर नागोबा किंवा आयत्यावर कोयता या म्हणींची आठवण व्हावी अशा पद्धतीने वागणार्या भाजपच्या कार्यकर्त्यांना यासंदर्भात वस्तुस्थिती सांगणे अतिशय अगत्याचे झाले आहे. कारण अयोध्येच्या रामजन्मभूमी येथील रामलल्लाचे दर्शन मुळातच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुढाकाराने सुरू झाले आहे. कट्टर काँग्रेस विरोधक असूनही मी ठामपणे सांगतो की रामलल्लाच्या मंदिराचे कुलूप राजीव गांधी यांच्यामुळेच उघडले ही सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट बाब आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि अयोध्या येथील राम मंदिर यांचा ऐतिहासिक संबंध अत्यंत महत्त्वाचा आणि वादग्रस्त राहिलेला आहे. १९८० च्या दशकात त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या घडामोडींनी भारताच्या राजकारणाला एक नवीन दिशा दिली. या संदर्भातील मुख्य ऐतिहासिक टप्पे पुढीलप्रमाणे आहेत :
१. राम मंदिराचे कुलूप उघडणे (१ फेब्रुवारी १९८६) १९४९ मध्ये वास्तूच्या आत रामलल्लाची मूर्ती प्रकट झाल्यानंतर सरकारने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुख्य दरवाजाला कुलूप ठोकले होते. १९४९पासून वादग्रस्त वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार पैâजाबाद न्यायालयाच्या आदेशानुसार बंद (कुलूपबंद) होते. तेथे केवळ पुजार्यांनाच आत जाऊन पूजा करण्याची परवानगी होती. १ फेब्रुवारी १९८६ रोजी पैâजाबाद जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश के. एम. पांडे यांनी कुलूप उघडण्याचा आदेश दिला. आदेश आल्यानंतर अवघ्या ४० मिनिटांत प्रशासनाने कुलूप उघडले.
राजीव गांधींची भूमिका : राजकीय विश्लेषक आणि काँग्रेस नेत्यांच्या मते, हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि ‘शाहबानो प्रकरणा’नंतर निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी तत्कालीन राजीव गांधी सरकारने न्यायालयीन प्रक्रियेला पडद्यामागून संमती दिली होती. त्यांचे चुलत भाऊ आणि गृहराज्यमंत्री अरुण नेहरू तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वीर बहादूर सिंह यांनी यासाठी महत्त्वाची रणनीती आखली होती. कुलूप उघडताच सर्वसामान्य हिंदूंना रामलल्लाचे थेट दर्शन घेण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर राममंदिर प्रश्नावर लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली रथयात्रा निघाली. असंख्य शिवसैनिकांसह लाखो कारसेवक अयोध्येत पोहोचले. बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याने आंदोलन सुरू झाले.
रविवार, ६ डिसेंबर १९९२. नवी दिल्लीच्या आपल्या निवासस्थानी भारताचे पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव हे सकाळी सात वाजताच उठून प्रातर्विधी उरकून कामाला लागतात. हा त्यांचा नित्याचा दिनक्रम. त्यादिवशी रविवार असल्याने थोड्या उशिरा उठले असावेत. त्यांचे व्यक्तिगत वैद्यकीय अधिकारी डॉ. के. श्रीनाथ रेड्डी पंतप्रधानांच्या निवासस्थानी आले. त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी रक्त आणि लघवीचे नमुने घेतले. रक्तदाब तपासला आणि तेथून निघाले. घरी जाऊन डॉ. रेड्डी यांनी बातम्या ऐकल्यावर ते एकदम अस्वस्थ झाले. तत्काळ त्यांनी पंतप्रधानांचे घर गाठले. अचानक परतलेल्या डॉक्टरांना पाहून पंतप्रधान संतापले. काय झाले? परत का आलात? प्रश्नांची सरबत्ती केली. डॉ. रेड्डी यांनी राव यांना शांत केले. त्यांचा रक्तदाब वाढला होता. रागाने ते लालबुंद झाले होते. दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी बाबरी मशिदीच्या तीन घुमटांपैकी एक हजारोंच्या संख्येने आलेल्या रामभक्तांनी धराशायी केला होता. माखनलाल फोतेदार यांनी नरसिंहराव यांना फोन करून या रामभक्तांवर अश्रूधुर सोडण्याचा सल्ला दिला. ‘काय? मी असं करू शकतो?’ असा एकदम निरागस सवाल पंतप्रधानांनी यांनी फोतेदार यांना केला. बाबरीचा किमान एखादा घुमट आपण वाचवून आणि तो काचेच्या घरात ठेवून काँग्रेसने बाबरी वाचवण्यासाठी प्रयत्न केला, असे तरी दाखविता येईल, असे फोतेदार यांनी नरसिंहराव यांना काकुळतीच्या स्वरात सांगितले. फोतेदार यांच्या या दाव्याची संपूर्ण माहिती त्यांच्या ‘दि चिनार लीव्ज’ या आत्मचरित्रात आहे. पण ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केले आहे की, बाबरी मशीद पडली त्या संपूर्ण कालावधीत नरसिंहराव देवपूजा करीत होते. बाबरी धराशायी होईपर्यंत ते पूजाच करीत होते. बाबरी संपूर्ण पाडली गेली आहे, हे कळल्यानंतरच नरसिंहराव यांनी आपली पूजा संपविली. ही बाब कुलदीप नायर यांनी ज्येष्ठ समाजवादी नेते मधू लिमये यांच्या कानावर घातली.

अर्जुनसिंह या नरसिंहराव यांच्या सहकारी मंत्र्यांनी सुद्धा या बाबीचा उल्लेख आपल्या आत्मचरित्रात केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या मुद्यावर चर्चा झाली तेंव्हा सी. के. जाफर शरीफ संतापले आणि याची किंमत काँग्रेस पक्षाला मोजावी लागेल, असा इशाराही दिला होता. संपूर्ण बैठकीत नरसिंहराव हे शांतपणे बसले होते. माखनलाल फोतेदार हे या बैठकीत ढसाढसा रडल्याचेही सांगण्यात येते. नरसिंहराव यांना राममंदिर बांधायचे होते आणि त्यांनी रामालयाची स्थापना केल्याचे ही सांगण्यात येते. ही संपूर्ण नोंद गुजराती पत्रकार आणि अभिनेत्री जिग्ना त्रिवेदी (आता जिग्ना वैद्य त्रिवेदी) यांनी ‘गुजरात मित्र लाईव्ह’च्या एका खास वृत्तांतामध्ये नमूद केली आहे.
९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण, न्या. एस. अब्दुल नझीर या पाच न्यायमूर्तींनी एकमताने अयोध्या येथील रामजन्मभूमी संदर्भात महत्त्वपूर्ण निकाल दिला आणि पाच एकर जमीन मुस्लिम समाजाला मशीद उभारणीसाठी देण्याचा आदेश केंद्र सरकारला दिला. शेकडो वर्षे चाललेल्या वादाची ९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी पूर्णाहुती झाली. याचाच अर्थ असा की रामल्ला दर्शन आणि बाबरी मशीद पतन तसेच राममंदिर पुनर्निर्माण या संदर्भात ‘राजीवे रचिला पाया नरसिंहराव झालासे कळस’ हेच सत्य म्हणावे लागेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राममंदिर प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय प्रलंबित असल्यामुळे संसदेत ठराव मंजूर करण्यात यावा अशी भूमिका घेतली होती. तीच पुढे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही घेतली. मात्र तसे मोदी सरकारने केले नाही. अखेरीस ९ नोव्हेंबर २०१९ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत ती संपूर्ण जागा हिंदू पक्षाची असल्याचे जाहीर केले आणि तिथे मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीत घेऊ शकत नाही, हेच खरे आहे. ‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या देखरेखीखाली आधी भूमिपूजन आणि मग भव्य मंदिर उभारण्यात आले. २२ जानेवारी २०२४ रोजी मोदी यांच्या हस्ते नवनिर्मित मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या बालरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. उत्तरेत काही म्हणी आहेत, जसे ’मुँहमे राम, बगलमें छुरी, खाते पिते नियत बुरी’ ‘रामनाम जपना पराया माल अपना’ आता काय बोलणार?

एका बाजूला राम मंदिराच्या दानपेटीतील चोरी प्रकरणाने प्रभू श्रीरामाचा बाजार मांडून प्रखर रामभक्त, देशभक्त यांच्या भावनांशी खेळ खेळण्यात येत असताना काँग्रेसच्या, नेहरू गांधी परिवाराच्या नावाने बोंबाबोंब करणार्यांसमोर राजीव गांधी आणि नरसिंह राव यांचे योगदान, वस्तुस्थिती मांडून आरसा दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. उगाच साप साप म्हणून भुई थोपटू नका, सत्याला सामोरे जा, हेच सांगणे आहे.
ज्येष्ठ समाजवादी नेते, थोर संसदपटू बापूसाहेब काळदाते (प्रमोद महाजन यांचे वक्तृत्वातील गुरू) यांनी काही वर्षांपूर्वी सांगितलेली एक गोष्ट आठवते. ते म्हणत, ‘ग्रामीण भागात एडक्यांची टक्कर लावली जाते. टक्कर सुरू होण्यापूर्वी या एडक्यांना भरपूर दारू पाजण्यात येते. त्यांच्या शिंगांना नारळ बांधण्यात येतात. टक्कर सुरू होते, टक्कर ऐन रंगात येते आणि एकमेकांच्या डोक्याला डोके आपटतात. पण त्या एडक्यांच्या डोक्याला काहीही होत नाही. कारण फुटतो तो नारळ! आणि हा नारळ म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. जात्यांध आणि धर्मांधांच्या टक्करीत भरडला जातो तो सामान्य माणूस!’. बापूसाहेब काळदाते यांचे म्हणणे तंतोतंत पटणारे आहे. बरोबर ना?
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)
