
सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कस्तान यांनी ७ ऑगस्टला मक्का संयुक्त संरक्षण करार केला. यापुढे एकमेकांना संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रात एकमेकांना सहाय्य करण्याचे त्यांनी वचन दिलेले आहे. त्यांच्यापैकी कोणत्याही देशावर कुणीही आक्रमण केले तर हे तिन्ही देश एकत्र येऊन त्याचा मुकाबला करतील असे ठरले आहे. तसेच संरक्षण सामुग्रीची निर्मिती आणि एकमेकांना ती पुरविण्याची हमी या करारात दिली गेली आहे. हा करार भारतासाठी अत्यंत घातक आहे. यापुढे भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर सौदी अरेबिया आणि तुर्कस्तान हे देश पाकिस्तानला उघडउघड सैनिकी मदत करणार आहेत. अर्थात आपल्याविरुध्द तीन देश लढणार आहेत. भारतावर अशी परिस्थिती का ओढवली आहे याचा विचार होणेही आवश्यक आहे. बीबीसीपासून न्यूयॉर्क टाईम्सपर्यंत सर्व जागतिक वृत्तमाध्यमे याविषयी वारंवार सखोल चर्चा घडवून आणत आहेत. १९ ऑगस्टला खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराचे स्वागत केलेले आहे. परंतु भारतीय माध्यमे त्यावर गंभीर चर्चा करताना आढळून येत नाही. प्रसारमाध्यमे केवळ मोदी पुराणात आणि मोदी बचावात गर्क आहेत. हे घातक आहे. अशावेळी जनतेने या कराराची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.
गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पत उंचावत चालली आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय राजकारणात मुत्सद्देगिरीचा मोठ्या खुबीने वापर करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण कोठे आहोत याचा विचार व्हायला हवा. लंबकासारखी आपली परराष्ट्र नीती झाली आहे. कधी या टोकाला तर कधी त्या टोकाला अशी ती भरकटत चालली आहे. अपरिपक्व मोदीनीती त्यास कारणीभूत आहे. जागतिक मंचावर नेत्यांना मिठ्या मारल्या आणि विकासाच्या खोट्या बाता मारल्या की कोणी विश्वगुरू बनत नाही. जागतिक स्तरावर एकमेकांना पुरुन उरतील असे मुत्सद्दी असतात. आंतरराष्ट्रीय राजकारण त्यांनी कोळून प्यायलेले असते. कुणाला कसे जोखायचे आणि कुणाचा कसा बंदोबस्त करायचा यात ते पारंगत असतात.
मोदींची विदेशनीती जयशंकर चालवतात. ते त्याबाबतीत अगदीच कच्चे खेळाडू आहेत. ते भारतात एक प्रशासकीय अधिकारी होते. भारतातील प्रशासकीय अधिकारी म्हणजे आधुनिक राजेच होत. त्यांचा साधा कान दुखला तर सचिवापासून शिपायापर्यंत त्यांच्यासमोर हात जोडून उभे असतात. अशा मिजाशी मिरविणार्या प्रशासकीय अधिकार्यांंना आंतरराष्ट्रीय राजकारणाची काय जाणीव असणार? जयशंकर परराष्ट्र मंत्री झाल्यावर त्यांना पंख फुटले. सोबतीला मोदींच्या खास मर्जीतील अजित डोवाल होते. इस्रायलच्या मोसादच्या धर्तीवर भारताची रॉ त्यांनी राबवायला घेतली. पाश्चिमात्य देशांना त्यांनी हलक्यात घेतले.

कॅनडाने शीख नेता हरदिपसिंग गुज्जार यांच्या खुनाबाबत भारतीय गुप्तचर यंत्रणेला दोषी धरले, त्यावेळी यांनी सबुरीने घ्यायला हवे होते. त्याऐवजी माध्यमांना हाताशी धरुन कॅनडाला कानपिचक्या दिल्या. त्यांनतर अमेरिकन नागरिक गुरपतवंत पन्नुन यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप झाला. त्यातही ‘रॉ’ वर दोष लावण्यात आला. काहींना पकडले गेले. सारेच पितळ उघडे पडले. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. भारताने आंतरराष्ट्रीय राजकारणात मार खाल्ला. आंतरराष्ट्रीय राजकारणात दुसर्या देशाच्या कारभारात दखल द्यायची नसते. मोदींनी ती गंभीर चूक केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसर्या निवडणुकीमध्ये मोदी यांनी उघडपणे ‘माय प्रâेंड डोनाल्ड ट्रम्प’ असे संबोधून ट्रम्प यांना मते देण्याचे आवाहन केले. तेथेच मोदी फसले. त्या निवडणुकीत ट्रम्प यांचाच विजय होणार आहे याचा अंदाज मोदी यांनी कशाच्या आधारे बांधला? त्या निवडणुकीत जो बायडन निवडून आले. कारण नसताना आपले हसे झाले. त्याचा फायदा घेत बायडन यांनी अनेक वेळा मोदींना हिणवले. त्यांच्यासमोरच त्यांची थट्टा केली. अशा परिस्थितीत मोदींनी सावध राहायला हवे होते.
परंतु मोदी घाबरून गेले. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांनी ट्रम्प यांचेशी दुरावा ठेवला. ट्रम्प पुन्हा निवडून येणार नाहीत, अशी मोदींची भावना असावी. परंतु तिथेही मोदी फसले. ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले. त्यानंतर ट्रम्प यांनी मोदींची काय हालत केली हे दिसूनच येते. भारत, पाकिस्तान युद्धात मीच मध्यस्थी केली अशा फुशारक्या ट्रम्प यांंनी मारल्या. भारताने रशियाकडून तेल आयात केल्यास त्यांच्यावर निर्बंध टाकीन अशा धमक्या दिल्या. दुसरा कोणीही राष्ट्रप्रमुख असता तर त्यांनी ट्रम्प यांना सडेतोड उत्तर दिले असते. मोदी अपमान गिळून गप्प बसल्याचे दिसतात. थोडक्यात मोदींकडे मुत्सद्देगिरीचा अभाव आहे.
भारताची जगातील प्रतिमा खालावत चाललेली आहे. काल परवा बांग्लादेशानेही मोदींना हिणवले आहे. आमच्या राष्ट्राध्यक्षांशी भेट हवी असल्यास पहिल्यांदा शेख हसिना हयांना आमच्या हातात सोपवा, अशी थेट मागणी करीत त्यांचा दौरा रद्द केला आहे. मोदी रणनीतीचा हा मोठा पराभव आहे. शेख हसिना यांना संरक्षण देऊन आपण आंतरराष्ट्रीय राजकारणात बलवान आहोत हे मोदींना दाखवून द्यायचे होते. पण ते बलवान नाहीत.

सत्तेवर आल्यापासून अतिरेकी हिंदुत्ववादाला मोदींनी खतपाणी घातले. उघड उघडपणे मुस्लिमांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली. अनेक मुस्लिमांना या-ना त्या कारणाने जेलमध्ये डांबण्यात आले. प्रसारमाध्यमांद्वारे दंगलखोरांऐवजी दंगलग्रस्त मुस्लिमांनाच लक्ष करण्यात आले. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्यात आला. इतकेही करून मोदी थांबले नाहीत. त्यांनी बिल्कीस बानो प्रकरणातील जन्मठेप झालेल्या आरोपींची सुटका करण्यात आल्यावर जल्लोष करणार्यांवर कारवाई करण्याचे टाळले. मुस्लिमांच्या घरांवर बुलडोझर चालविणारे मोदी अतिरेकी हिंदुत्ववादांना सरंक्षण पुरवितात हा जगभर समज झाला आहे. ‘ब्लड इज थिकर दॅन वॉटर’ असे म्हणतात. मुस्लिमही त्यास अपवाद नाही. हळूहळू सर्व मुस्लिम देश भारताचे शत्रू बनू लागलेले आहेत. एक यूएई सोडला तर भारताला सध्या एकही मुस्लिम मित्र देश राहिला नाही. सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कस्तान एकत्र येण्यास अन्य कोणतीही कारणे का असेनात, परंतु मोदींनी देशात जो मुस्लिमद्वेष पसरविण्यास घेतला आहे त्याची परिणती म्हणून आता हे देश एकत्र होत आहेत, हे मानायला वाव आहे.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा मुत्सद्दीपणा उजवा ठरत असल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांच्याशी त्यांनी जुळून घेतलेले आहे. ट्रम्प यांच्याकडून त्यांना हजारो कोटी रुपयांची अत्याधुनिक शस्त्रसामुग्री मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यात सौदी अरेबिया आणि तुर्कस्तान यांना एकत्र आणून पाकिस्तानने बाजी मारलेली आहे. तसे पाहिले तर सौदी अरेबिया हा तुर्कस्तानचा कधीही मित्र नव्हता. उलट त्यांच्यामध्ये शत्रुत्व अधिक होते. तुर्की लोकांनी आपल्यावर राज्य केले होते, याचा सल अजूनही सौदी लोकांना आहे. अशा तुर्कस्तानला सौदीबरोबर एकत्र बसविणे म्हणजे मुत्सद्देगिरीची कमाल आहे. एकाच दगडात पाकिस्तानने अनेक पक्षी मारलेले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात आपले बळ वाढवले आहे.
तुर्कस्तानकडून पाकिस्तानला युद्धशस्त्राचे अत्याधुनिक प्रशिक्षण मिळणार आहे. एक गोष्ट विसरता येत नाही. तुर्कस्तानने अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यात गेल्या वर्षी झालेल्या युद्धात अझरबैजानची बाजू घेऊन अर्मेनियाला नमवले होते. अर्मेनियाला रशियाचा संपूर्ण पाठिंबा होता, तरीही तुर्कस्तानने ते शक्य करून दाखवले. सौदी अरेबियाने पाकितानबरोबर जाणे म्हणजे एखाद्या शेठने दुबळ्या मित्राला मदत करण्यासारखे आहे. यापुढे पाकिस्तानला प्रचंड आर्थिक सहाय्य पुरवून सौदी अरेबिया मजबूत विकसनशील देश बनवू शकतो. आपले सैन्यदल आणि अण्वस्त्र, शक्ती यांची भुरळ पाकिस्तानने निश्चितपणे सौदी अरेबियावर टाकलेली आहे. मुत्सद्देगिरी याला म्हणतात.
मोदींचे एकंदर परराष्ट्र धोरण आता उघड्यावर पडलेले आहे. यातून देशाला बाहेर यावे लागेल. मुस्लिम राष्ट्रे आपले मित्र देश कसे बनतील याकडे देशाने लक्ष पुरवायला हवे. मोदी राजवटीत ते शक्य नाही.

