काल एकाच दिवशी दोनदा डिटेन झालो…
दिल्लीत जाण्याचे सर्व मार्ग बंद केले, म्हणून महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलनाचा इशारा दिला… मुंबईतले सीजेपीचे सगळे कार्यकर्ते तयार झाले… आम्ही जागा ठरवली आणि तिकडे निघालो… ग्रँट रोड स्टेशनला तर मोठा पोलीस बंदोबस्त होता… तरीही वाट काढत आम्ही सगळे नाना चौकात पोहोचलो… तिथेही पोलिसांचा फौजफाटा होता… आणि बॅरिकेड्स लावले होते…
साम्या कोरडे, साहिल कोरडे, साहिल पार्सेकर, अर्जुन भाई आणि मी, सोबत आणखी १५-२० लोक एकत्र जमून, हातात पोस्टर घेऊन घोषणा देत चालू लागलो… तिथे आणखीही लोक जमले… मीडिया जमला… अचानक सिविल ड्रेसमधले पोलिस आले आणि आम्हाला खेचत ढकलत त्यांनी पोलिस व्हॅनमध्ये कोंबलं… आम्ही धडका मारल्या… कारण ही बेकायदा अटक होती… १०-१२ जणांना घेऊन व्हॅन चालू लागली… आमच्या घोषणा चालूच होत्या… दीड दोन किलोमीटरवर व्हॅन जरा ट्रॅफिकमध्ये असताना रस्त्यावरच्या एका मुलाने बाहेरून कडी काढली… आणि आम्ही तरुणांनी चालत्या व्हॅनमधून बाहेर उड्या टाकल्या… सिनिअर मंडळींना उतरता आलं नाही.

आम्हाला मिळालेली ही दुसरी संधी दवडायची नव्हती… म्हणून मग आम्ही चालत पुन्हा आंदोलनस्थळी निघालो… वाटेत दोनदा पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला… तरीही आम्ही वाट बदलत नाना चौकात पोहोचलो… आमच्या हातात ना पोस्टर्स होते ना कुठलं हत्यार… तरीही पोलीस आमच्यापर्यंत माग काढत पोहोचले… महिला पोलिसांनी साम्याला रस्त्यावरून खेचत ओढत नेलं… आम्ही तिच्यासाठी पोलिसांशी भांडत होतो… तर पोलीस आम्हाला दटावत होते… साम्याला एका वेगळ्या गाडीमध्ये भरून, ते कुठल्या पोलिस स्टेशनला घेऊन जातायत हे न सांगता घेऊन गेले… मग एक एक करत जबरदस्तीने आम्हाला पुन्हा नव्या व्हॅनमध्ये भरलं… यावेळी खबरदारी घेत दोन पोलिस सोबत बसवले… तेही बिचारे या सगळ्या प्रकाराला वैतागले होते… आणि वरच्या आदेशामुळे पोरांशी असं वागावं लागतंय, याचं त्यांना वाईट वाटत होतं…
आम्हाला एका पोलीस स्टेशनला नेलं… मी तिथे बसून एक व्यंगचित्र रेखाटलं… तिथे पोलिसांच्या भाषेत आम्हाला खरोखरचं ‘चायपाणी’ दिलं गेलं… आणि पोलिसांनी रात्री सोडून दिलं…

