
वैकुंठा जावया तपाचे सायास।
करणे जीवा नास न लगे काही ।।१ ।।
तया पुंडलिके केला उपकार।
फेडावया भार पृथ्वीचा ।।२ ।।
तुका म्हणे सोपी केली पायवाट।
पंढरी वैकुंठ भूमीवरी ।।३ ।।
वारकरी संप्रदायातील संतांनी पुराणकथा आणि लोककथा यांचा वापर समाजात भक्तितत्त्वाची रुजवणूक व्हावी यासाठी केला. त्यांनी जे तत्त्वज्ञान मांडलं त्याला अनुरूप कथाही अभंगातून संक्षेपाने मांडल्या. संतांची परंपरा तेराव्या शतकात उदयाला आली. त्यांनी भक्तीची नवी मांडणी केली. जातमुक्त आणि कर्मकांडमुक्त समाज घडवण्याचा त्यांचा संकल्प होता. मानवाच्या मनातील अहंकार आणि कामक्रोधादी विकार नष्ट करण्यावर त्यांचा भर होता. चित्तशुद्धी हाच त्यांच्या भक्तितत्वाचा पाया होता. संतांची ही विचारसरणी तत्कालीन समाजासाठी नवी होती. संतांपूर्वी जो वैदिक मार्ग प्रचलित होता, त्यात भक्तीला जागा नव्हती. त्यात केवळ यज्ञादी कर्मकांड, वर्णाश्रमाची बंधने, ब्रह्मज्ञानाचा पोकळ अभिमान आणि विधिनिषेधांची जंत्रीच होती. अशा समाजात संतांनी भक्तीचा नवा विचार मांडला. त्यासाठी त्यांनी पूर्वपरंपरेतील काही आधारही दाखवले. कबीरांचा दोहा पाहा.
क्या व्याध ने आचार किया था,
ध्रुव की उम्र थोडी।
क्या गजेंद्र ने वेद पढा था,
जात विदुर की कवडी ।।
या दोह्यात कबीरांनी पुराणकथेतील चार उदाहरणांतून भक्तीला जात, वय, ज्ञान आणि विधिनिषेधादी आचरण याची गरज नसल्याचं दाखवून दिलं आहे.
१) व्याध म्हणजे एक फासेपारधी शिवभक्तीने तरला असल्याची कथा आहे.
२) ध्रुव बाळ वयाने लहान असताही भक्तीच्या बळावर अढळपदी बसला.
३) गजेंद्राने म्हणजे हत्तीने वेद न वाचताही भक्तीने मोक्ष मिळवला.
४) विदुर दासीपुत्र असल्यानं कवडीमोल ठरवलेल्या जातीत जन्मूनही अधिकारी भक्त म्हणून विख्यात झाला.
संतांनी लोकमानस बदलण्यासाठी पुराणकथांप्रमाणेच लोककथांचाही वापर केला. त्यातील एक कथा पुंडलिकाची. विठ्ठल आणि पुंडलिक हा देवभक्तांच्या नात्याचा आदर्श संतांनी समाजासमोर ठेवला. पुंडलिकाची कथा सुरू होते तीच मुळात मायबापाच्या सेवेपासून. कथेचा पहिला विचारच आईबापाच्या सेवेचा आहे. ती करत असलेल्या पुंडलिकाला देव भेटण्यासाठी आला, त्याला देवाकडे जाण्याची जरुरी पडली नाही. जो मात्यापित्याची मनोभावे सेवा करतो, त्याला देवच भेटायला येतो हा विचार तुकोबारायांनी या कथेच्या आधारे मांडला आहे. तुकोबाराय म्हणतात,
मायबापे केवळ काशी।
तेणे न वजावे तीर्थासी ।।१ ।।
पुंडलिके काय केले।
परब्रह्म उभे ठेले ।।२ ।।
मायबाप हीच खरी काशी आहे. त्यांची सेवा हेच खरे तीर्थ आहे. पुंडलिकानी तेच करून दाखवलं आहे. त्याने मात्यापित्याच्या सेवेच्या आधारे परब्रह्माला विटेवर उभा केले. हाच विचार ज्ञानदेवांनीही मांडला आहे.
सकळ तीर्थांचिये धुरे।
जिये का मातापितरे।
तया सेवेसी शरीरे। लोण किजे ।।
खरंतर आपल्या समाजातील लोक जिवंतपणी मायबापाची सेवा करत नाहीत. ते मेल्यानंतर मात्र श्राद्धपिंडदान करण्यासाठी विविध तीर्थांच्या ठिकाणी जातात. गयावर्जन करतात. वारकरी संप्रदाय मात्र मायबाप जिवंत असताना त्यांनाच तीर्थरूप मानून त्यांची सेवा करायला हवी असं सांगतो. यासंदर्भात एकनाथ महाराजांचा अभंग प्रसिद्ध आहे.
जिता मायबापा न घालिती अन्न।
मेल्या प्रेतावर करिती पिंडदान ।।१ ।।
पहा पहा संसारीचा वैâसा आचारू।
जिता अबोला मा मेल्या उच्चारू ।।२ ।।
जिता मायबापा न करिती नमन ।
मेल्या मागे करिती मस्तक वपन ।।३ ।।
जिता मायबापा धड गोड नाही ।
श्राद्धी तळण मळण परवडी पाही ।।४ ।।
जिता मायबापा गाली प्रदान ।
मेल्या त्यांचेनी नावे देती गोदान ।।५ ।।
जिता मायबापा नेदी प्याया पाणी।
मेल्या पितरालागी बैसती तर्पणी ।।६ ।।
प्याया पाणी न घालिती सासरा जिता।
पिंडापाशी येती मग दंडवता ।।७ ।।
एका जनार्दनी कृपेचे तान्हे ।
विधी निषेध दोन्ही आतळो नेदी मने ।।८ ।।
जिवंतपणी मायबापाला धड अन्नपाणी, मानसन्मान न देता, सतत शिवीगाळ-अपमान करून त्यानंतर लोक श्राद्धकर्म करतात. त्यात वपन करतात. भटजीला गोदानादी दानधर्म करतात. भाताच्या पिंडाला नमस्कार करतात. पूजा घालतात. गोड आणि तळणी-भाजणीचे पदार्थ करतात. हे करण्याऐवजी जिवंतपणी मायबापाची सेवा केली तर ते देवालाही आवडतं हा आदर्श पुंडलिकाच्या कथेतून दिला आहे.
या कथेतला दुसरा आदर्श म्हणजे पंढरपूर हे क्षेत्र देवाचं नाही तर ते भक्ताचं आहे. इतर तीर्थक्षेत्रं देवाची असतात. त्या ठिकाणी त्या त्या देवाचे भक्त जात असतात. पंढरपुरात उलट आहे. इथे भक्ताकरिता देव आला आहे. वारकरी संप्रदायातील देव भक्तांच्या प्रेमाला भुलणारा आहे. भक्तांची आवडीने वाट पाहणारा आहे. ‘वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तातडी उतावीळ ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. देवच उतावीळ होऊन भक्तांची वाट पाहत असतो अशी वारकरी संतांची धारणा आहे. त्या धारणेला पुंडलिकाची कथा बळ देते. त्यामुळेच संतांनी वारंवार अभंगांतून पुंडलिकाचा महिमा सांगितला आहे.
पंढरपूर हा संतांचा युटोपिया होता. युटोपिया म्हणजे कल्पितादर्श़ थॉमस मूर या विचारवंताने ही संकल्पना मांडली होती. पंढरपुरात जात्याभिमान, वर्णाभिमान नाही. कर्मकांड नाही. सोवळं-ओवळं नाही. एका आदर्श समाजाचं कल्पनाचित्रच पंढरपूरच्या निमित्ताने संतांनी रेखाटलं होतं. या कल्पितादर्शाची सुरुवात पुंडलिकापासून होते. त्यामुळेच तुकोबाराय प्रस्तुत अभंगात पंढरपूरची महत्ता एक भूवैकुंठ म्हणजे जमिनीवरील वैकुंठ म्हणून लक्षात आणून देतात. तुकोबाराय म्हणतात की वैकुंठाला जाण्यासाठी तपाचे सायास करावे लागतात. स्वर्गाकरिता यज्ञ आणि वैकुंठाकरिता तप केलं जातं. तपसाधना शरीराला कष्ट देणारी आहे. संतांनी अशा साधना नाकारल्या आहेत. ज्यांना कठोर साधना जमत नाहीत अशा लोकांसाठी पुंडलिकांनी थोर उपकार केला. त्यांनी पंढरीच्या रूपाने भूमीवरच वैकुंठ आणलं. वैकुंठ शब्दाचा अर्थच दुःखमुक्ती आहे. वै म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. पंढरपूर हा संतांसाठी इहलोकातील सुखाचा युटोपिया आहे. साहजिकच संतांनी पंढरीकडे एक दुःखमुक्त नगर म्हणून पाहिलं आहे. या नगराची उभारणी पुंडलिकांनी केली म्हणून संतांनी आणि विशेषतः तुकोबारायांनी पुंडलिकांचा महिमा त्यांच्या अभंगातून वारंवार सांगितला आहे.
वैकुंठीचा देव आणिला भूतळा।
धन्य तो आगळा पुंडलिक ।।
तुकोबारायांचा आणखी एक अभंग वारकरी संप्रदायातील काही पारंपरिक फडकरी नगरप्रदक्षिणेच्या वेळी पुंडलिकाच्या मंदिरासमोर म्हणतात.
भला भला पुंडलिका।
मानलासी जनलोका ।।१ ।।
कोण्या काळें सुखा ।
ऐशा कोण पावत ।।२ ।।
नातुडे जो कवणे परी।
उभा केला विटेवरी ।।३ ।।
अवघा आणिला परिवार।
गोपीगोपाळांचा भार ।।४ ।।
तुका म्हणे धन्य झाले ।
भूमी वैकुंठ आणिले ।।५ ।।
पुंडलिकानेच या भूवैकुंठाच्या निमित्ताने भक्तीची पेठ वसवली. त्यामुळेच तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ।। पुंडलिकाचा महिमा सांगणारे आणखी काही अभंग पुढीलप्रमाणे
१)
धन्य पुंडलिका बहु बरे केले ।
निधान आणिले पंढरिये ।।१ ।।
न पवीजे केल्या तपांचिया रासी ।
ते जनलोकांसी दाखविले ।।२ ।।
सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव ।
शास्त्रांनी हा भाव निवडिला ।।३ ।।
विष्णुपद गया रामधाम काशी ।
अवघी पायापाशी विठोबाच्या ।।४ ।।
तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस ।
तात्काळ या नास अहंकाराचा ।।५ ।।
२)
उदार चक्रवर्ती। वैकुंठीचा भूपति। पुंडलिकाचिया प्रीती। विटेवरी राहिला ।।१ ।।
३)
पुंडलिक भक्तराज। तेणे साधियेले काज। वैकुंठीचे निज। परब्रह्म आणिले ।।१ ।।
तुकोबारायांसह सर्वच वारकरी संतांनी सेवेचा आणि भक्तीचा आदर्श म्हणून पुंडलिकाचं मोठेपण सांगितलं आहे. अर्थात वैकुंठप्राप्तीसाठी शरीराचा नाश करणार्या देहदंडणाच्या साधना करण्याला लोकांवर पुंडलिकांनी एका अर्थाने उपकारच केला. पंढरपुरात या प्रकारच्या साधना करण्याची जरुरी नाही. वैकुंठ म्हणजे दुःखमुक्ती असेल तर संतसंकल्पनेतील पंढरी ही दुःखमुक्तीचा जागता आदर्श आहे.
पंढरीस दुःख न मिळे ओखदा ।
प्रेमसुख सदा सर्वकाळ ।।
किंवा
सुखालागी करिसी तळमळ ।
तरी तू पंढरीसी जाय एकवेळ ।।१ ।।
मग तू अवघाची सुखरुप होशी ।
जन्मोजन्मीचे दुःख विसरसी ।।२ ।।
त्यामुळे पंढरीत औषधालाही दुःख मिळत नाही. वर्णाश्रमातील भेदभाव हे अनेकांच्या दुःखाचं कारण आहे पण पंढरीत वर्णाभिमान आणि वर्णविषमता नाही.
तुका म्हणे नाही वर्ण अभिमान ।
अवघेचि जीवन्मुक्त लोक ।।
दुःखाचं कारण म्हणजे दुष्ट दुर्जनांकडून होणारा त्रास. पण पंढरीत दुर्जनही सज्जन बनतो.
मूढमतिहिन दुष्ट दुराचारी ।
ते होती पंढरी दयारुप ।।
दुःखहरणाच्या बाबतीत वैकुंठ आणि पंढरपूर समानच आहे. किंबहुना वैकुंठापेक्षाही पंढरी श्रेष्ठ आहे अशी संतांची भावना आहे. वैकुंठाच्या सुखाला नाश आहे पण पंढरीतल्या सुखाला नाश नाही. ‘नको वैकुंठीचा वास । तया सुखा आहे नाश ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. त्याचबरोबर गोपाळकाल्याचा आनंद वैकुंठात नाही.
उपजोनिया पुढची येऊ ।
काला खाऊ दहीभात ।।१ ।।
वैकुंठी तो ऐसे नाही ।
कवळ काही काल्याचे ।।२ ।।
त्यामुळेच ‘अधिक अक्षराने एका । भूवैकुंठ म्हणे तुका ।।’ अशा वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ पंढरीची निर्मिती करणारे पुंडलिक वारकरी संप्रदायात एक आद्य भक्त म्हणून प्रतिष्ठित झाले आहेत. वारकरी संप्रदायाच्या गजराची सुरुवात याच पुंडलिकांच्या नावाने आहे. ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल- श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा वारकरी संप्रदायाचा गजर वर्षानुवर्षे महाराष्ट्रात घुमत आहे.

