
सार्वजनिक गणेशोत्सवाचं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत असणारं महत्त्व कुणाला नाकारता येणार नाही. या उत्सवाने अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते घडवले. अनेक कलाकार आणि वक्ते यांना पहिला मंच याच उत्सवाने मिळवून दिला. विचारांचं अभिसरण घडवलं. पण हे घडलं त्यावरचा ब्राह्मणी फास दूर झाल्यानंतर. त्यासाठीच्या लढाईची वैचारिक बाजू प्रबोधनकारांनी मांडली आणि हा उत्सव नव्याने घडला.
१९२८ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात प्रबोधनकार आणि रावबहाद्दूर सी.के. बोले या बहुजनवादी नेत्यांनी दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सवातल्या ब्राह्मणी जातीवादाविरुद्ध यशस्वी बंडखोरी केली. सनातन्यांना शरण यावंच लागलं. त्यामुळे गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष डॉ. मो.चि. जावळे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय प्रबोधनकार आणि त्यांच्या सहकार्यांना आवडला नाही. विशेष म्हणजे गणेशोत्सव बंद होण्याचा आळ प्रबोधनकारांवर आला. कारण या लढ्यात त्यांची भूमिका निर्णायक ठरली होती.
माझी जीवनगाथा`मध्ये प्रबोधनकार लिहितात, `कारणे काहीही असोत, पण दादरसारख्या उदयोन्मुख भागातील गणेशोत्सवासारखा एक महोत्सव बंद पडणे ही घटना मला किंवा कोणालाही फारशी पसंत पडली नाही. त्यातच इतर सगळे राहिले बाजूला आणि ठाकर्यांनी गणेशोत्सव बंद पाडला हा सगळीकडे गवगवा चालू झाला. असल्या आक्षेप विक्षेप नि आरोपांच्या राळफेकीचा माझ्यावर कधीच काही परिणाम होत नसतो. उलट, त्याशिवाय काही दिवस मोकळे गेले तर मात्र ओकेबोके वाटते. कारण, कोणत्याही आंदोलनातील माझ्या आचार-विचाराची भूमिका प्रथम पायाशुद्ध ठरवूनच त्यात मी उडी घेत असतो. अर्थात पश्चात्तापाची किंवा निराशेची नि माझी गाठभेटच होत नाही. आजवर अनेकांनी माझ्यावर काय थोडेथोडके बरे वाईट आणि घाणेरडेही आरोप केले? पण केव्हाही डगमगण्याचे मला काही कारणच नव्हते. ज्याची लंगोटी स्वच्छ, तो कुणाला भिणार नि कुणाची पर्वा करणार? ही बेडर नि बेपर्वा वृत्ती माझ्या स्वभावात भिनलेली नसती, तर नातेवाईकानी काय, जातवाल्यांनी काय किंवा आणखी कुणी शेंदाडाने काय, माझ्या टाळक्यावर टाकळे रुजवले असते.
ज्याची लंगोटी स्वच्छ, तो कुणाला भिणार नि कुणाची पर्वा करणार? हे प्रबोधनकारांचं निर्भयपणे जीवन जगण्यामागचं सूत्र यात आपल्याला यात सापडतंच, पण त्यापेक्षाही महत्त्वाची कळते, ती एखादी गोष्ट करताना त्यामागचा अत्यंत पायाभूत विचार करण्याची त्यांची सवय. एखाद्या गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांनी एखाद्या वर्षी चुकीचं वर्तन केलं, म्हणून तात्कालिक विरोध करण्यापुरतं प्रबोधनकारांनी या लढ्याला मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी एकूणच सार्वजनिक गणेशोत्सवालाच विरोध करण्यासाठी संशोधनपूर्ण वैचारिक भूमिका मांडली. त्या वर्षीचा उत्सव संपल्यानंतर लगेचच म्हणजे सप्टेंबर २३ सप्टेंबर १९२८च्या दादरहून प्रसिद्ध होणार्या नवयुग साप्ताहिकात प्रबोधनकारांनी ही भूमिका मांडली आहे. ऑक्टोबर १९२९ला प्रबोधन पुन्हा सुरू झाल्यानंतर पहिल्यात अंकात प्रबोधनकारांनी राष्ट्रीय उत्सवाची चिकित्सा हा लेख भर घालून पुर्नप्रकाशित केला.
तो पुन्हा प्रसिद्ध करण्यामागचं कारण सांगताना प्रबोधनकार लिहितात, उत्सवाकरिता उत्सव करणे निराळे आणि काही दूरदर्शी ध्येय साधण्यासाठी सामाजिक किंवा राष्ट्रीय उत्सव करणे निराळे. अलीकडे ह्या त्या लुंग्यासुंग्या गोष्टीच्या मागे ‘राष्ट्रीय’ उपाधीची ब्याद चिकटविण्याचा पोरकट खेळ पुणेरी भटांनी सुरू केलेला असून, गणपतीचा उत्सव ‘राष्ट्रीय’ आणि ‘सार्वजनिक’ दिमाखाने रूढ करण्याची बंडाळी सर्व महाराष्ट्रामध्ये चालविली आहे. या बंडाळीचे पर्यवसान कशात झाले, गणपती-उत्सव ‘राष्ट्रीय’ होणे कसे शक्य नाही आणि चिकित्सेच्या सर्व शंकाकुशंकांच्या तलवारी मार्यातून शीरसलामत यशवंत व लोकमान्य ठरलेला खरा राष्ट्रीय उत्सव कोणता, हे या लेखाच्या द्वारे महाराष्ट्रीय जनतेला दाखविण्याचा यत्न केला.
प्रबोधनकारांच्या मते हा लेख विचारक्रांती घडवणारा ठरला. या लेखात प्रबोधनकारांनी गणेशोत्सव सार्वजनिक करण्याच्या मुळावरच घाव घातला आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी केली, असं आपल्याला शाळेच्या पुस्तकांतून शिकवलं जातं. पण गणेशोत्सव सार्वजनिक करतानाचे `केसरी`चे अग्रलेख प्रसिद्ध आहेत. त्याची पार्श्वभूमी हिंदू मुस्लिम दंग्याची आहे. तेव्हा महाराष्ट्रभर सर्वत्र मोहर्रमच्या ताबुतांच्या मिरवणुकांत हिंदू मोठ्या संख्येने सामील होत. ते मोहर्रमचं सर्वधर्मसमतेचं वाहक असणारं स्वरूप तोडण्यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक करण्यात आलं. हा इतिहास प्रबोधनकारांनी नोंदवला आहे. शिवाय या विषयावरचे अत्यंत मूलगामी विचार आकर्षक शब्दांत मांडले आहेत. त्यामुळे या भागात या लेखाचा पूर्वार्ध मार्मिकच्या वाचकांसाठी जसाच्या तसा दिला आहे-
सार्वजनिक गणपती उत्सवाची उत्पत्ती!
सन १८९४ सालापूर्वी महाराष्ट्रात किंवा इतरत्र ‘सार्वजनिक’ गणपतीचे उत्सव मुळीच रूढ नव्हते. सन १८९३ साली हिंदू मुसलमानांचा पहिला दंगा काठेवाडात प्रभासपट्टण येथे झाला व त्याचा मोठा प्रतिध्वनी मुंबई, मालेगाव, अकोला, सोलापूर वगैरे ाfठकाणी उमटून, हिंदू मुसलमानांच्या तेढीचे बीजारोपण झाले. या वेळी मोहरमसारख्या मुसलमानी उत्सवात पुष्कळ हिंदू प्रामुख्याने भाग घेत असत. त्यांना यापासून निवृत्त करून, हिंदूजनांचा सवता जलसा करण्यासाठी व मुसलमानांपासून हरएक बाबतीत हिंदूंनी फटकून वागावे म्हणून, वैâ. बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची नवीन टूम काढली आणि आपल्या भटी हस्तकांच्या मदतीने व केसरी पत्राच्या वजनाने एकदम अमलातहि आणली. सुरुवातीला या उत्सवावर धार्मिक भावनेच्या अवडंबराचा पुष्कळ जाडजूड शेंदूर थापण्यात आला खरा. परंतु मुख्य उद्देश जो मुसलमानांचा व इंग्रजांचा द्वेष, त्याचे प्रदर्शन मेळ्यांच्या पदांतून आणि फार्सातून मोकळ्या मनाने व मुबलक होत असे. मुसलमानांचा किंवा इंग्रजांचा द्वेष करावा, की करू नये, हा मुद्दा येथे अभिप्रेत नाही. मात्र या उत्सवाची उत्पत्ति तीव्र असूया, मत्सर व द्वेष या तीन घाणेरड्या विकारांतून झालेली आहे, ही गोष्ट नाकबूल करण्यात अर्थ नाही. धर्मरक्षण, हिंदू-संघटन, राष्ट्रीयत्व-वर्धन वगैरे बाह्य सबबी नुसत्या नाटकी व तोंडपुज्या.
त्या काळी केसरीचा शब्द म्हणजे वेदवाक्य मानणार्या सुशिक्षित अशिक्षित नंदीबैलांचा भरणा महाराष्ट्रात फार. आणि बहुजनसमाज तर गाढ झोपी गेलेला. टिळकांच्या केसरीने गंगाजळ म्हणून गायकवाडवाड्याच्या मोरीतले पाणी जरी पाजले, तरी सर्व बिनतक्रार ‘पवित्रं जान्हवी तोयम’ म्हणून पीत असत. अर्थात मुसलमानांच्या हैदोस धुल्ल्याला गणपतीच्या मोर्यामोर्याची घवघवीत घसळामुसळी जोड मिळताच, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कल्पनेचा भटी मलेरिया गजकर्णाप्रमाणे हा हा म्हणता सार्या महाराष्ट्रभर पसरला. उत्सवाची उत्पत्तीच द्वेष मत्सराच्या खाणीची असल्यामुळे, त्यात लवकरच मुसलमान इंग्रजांच्या जोडीने, सुधारक लोक, शिकलेला किंवा शिकणारा स्त्रीवर्ग, ब्राह्मणेतर चळवळ्ये, कौन्सिलर, मवाळ पार्टी आणि भटी ऊर्फ टिळकी महात्म्याविरुद्ध असणारी प्रत्येक व्यक्ति आणि चळवळ यांच्या आईमाईचा मुक्तकंठ उद्धार उत्सवाच्या मेळ्यातून, खुद्द टिळकांच्या नाकासमोर होऊ लागला आणि उद्गार प्रविण कवींचा आणि मेळ्यांचा टिळकांच्या हस्ते पारितोषिकपूर्वक सत्कारहि होऊ लागला. अखेर हा भाद्रपदी शिमगा खुद्द पुण्यातच इतका अतिरेकाला जाऊन पोहोचला की गेले काही वर्षांपासून टिळकी धर्माच्या दण्डधारक मेळेवाल्यांवर व त्यांच्या काव्यकौमुदीवर पोलिसांचे पहारे बसणेच अगत्याचे झाले.
असूयेचा परीघ पुरा झाला
द्वेषासारख्या घाणेरड्या मनोवृत्तीतून बाहेर पडलेल्या या उत्सवाची वर्तुळ रेषा, सार्या महाराष्ट्रात बेकीची व जातिवैमनस्याची आग भडकावून, तीन तपानी अखेर आपल्या मूळ बिंदूवर येऊन कचकचीत फुटली. ज्या गायकवाडवाड्यांत वैâ. टिळकांनी या उत्सवाच्या घाणेरड्या भटी कल्पनेला जन्म दिला, त्याच वाड्यात त्याच टिळकांचा एक मुलगा आत्मघात करून मरतो व दुसरा येरवड्याच्या तुरुंगात बसतो, तेव्हांच टिळकांचा गणोबा प्राणप्रतिष्ठेची बोहणी स्वीकारतो! हे दृश्य चिंतनीय आहे. असूयेचा सुटलेला त्रिधारी भटी परशुरामी बाण बिनचूक आपल्या जन्मदात्या बापाच्या — वैâ. टिळकांच्या — कुळाच्या मुळावर येऊन हापटला. वर्तुळाचा परीघ पुरा झाला.
गणपतीचे भटी महात्म्य
कै. टिळकांच्या व त्यांच्या केसरीच्या एरंडोपि द्रुमायते वजनाने हा उत्सव महाराष्ट्रात कितीहि पैâलावला असला, तरी तो भटी कल्पनेची अवलाद आहे, हे ब्राह्मणेतर बहुजन समाजाने आता तरी दृष्टिआड करून चालणार नाही. या उत्सवाने किती धर्महित साधले, काय समाजसुधारणा केल्या, कसली संघटना साधली आणि काय मासल्याची राष्ट्रीय वृत्ती संवर्धन केली, हे महाराष्ट्रात गावोगाव अखंड धडाडणार्या द्वैताच्या वर्णनाने चांगलेच सिद्ध होत आहे. सार्वजनिक गणपती आपली आरती ‘सुखहर्ता दुःखकर्ता’ असल्या उलट्या निरांजनीनेच आजपर्यंत घेत आला, असेच दिसते. उत्सवाच्या प्राणप्रतिष्ठेच्या क्षणापासूनच हा ‘विघ्नहर्ता’ गणपती इतक्या वाढत्या प्रमाणात ‘विघ्नकर्ता’ होत गेला की अखेर या मंगलमूर्तीला आपल्या माहेरघरी, वैâ. टिळकांच्या वाड्यात, अमंगळ मूर्ती म्हणूनच दहा दिवसांचा सुतकी उत्सव पहावा लागला.
दोन दोन तीन तीन महिने रात्रभर जागरणे करून गणेशभक्तीच्या तालमीचा पिठा पाडला, काव्य शक्तीची मगजफाट ओढाताण केली, उत्सवाच्या दहा दिवसा रात्री सार्या गावभर आणि महाराष्ट्रभर तीन तीन वर्षांच्या बचडाबचडीना खाकोटीला मारून तंगडतोड आणि नरडेफोड केली, आणि या सगळ्या नवविधा एकनिष्ठ भक्तीचा गणरायाने तीन तपानंतर प्रसाद काय दिला? तर जन्माच्या मूळ उत्पादकाच्या मुलांच्या संसारांत नारळाच्या करवंट्या! पण गणोबाला तरी दोष देण्यात अर्थ कसला? त्या बिचार्याची मूळ बैठकच जेथे घाणेरड्या विकारांनी माखलेली, तेथे त्याने त्यापेक्षा निराळा प्रसाद आणखी तो काय द्यायचा? या टिळकाने गणपती चव्हाट्यावर मांडला व त्याचा हैदोसधुल्ला केला, याचा परिणाम ठीक होणार नाही हे त्या वेळच्या (सन १८९४-९६) कित्येक वृद्धांचे भाकीतच अखेर खरे ठरले.
गणपती कां निवडला?
सर्व लोकांना सारखा अभेदाने भाग घेता येईल, अशा सार्वजनिक उत्सवांची जरूरी असते व तसा प्रघातही सर्व राष्ट्रांत आहे. खुद्द महाराष्ट्रात व हिंदुस्थानातहि असे ‘सार्वजनिक’ उत्सव ठिकठिकाणी प्रांतपरत्वे अनेक होत आहेत. मग टिळकांना गणपती उत्सवच सार्वजनिक करण्याची अक्कल का सुचली? उत्तर अगदी सोपे आहे. जो तो आपापल्या पिंडाप्रमाणेच दैवताची निवड करीत असतो. कितीहि विद्वान झाले, तरी टिळक भटजीच! त्यांच्या भटी पिंडाला भोजनप्रिय, विशाळ लंबोदर, एकवीस-मोदकांचा नैवेद्य खाणार्या गणोबाशिवाय दुसरे कोणते दैवत प्रिय असणार? आणि एका तोंडाने राष्ट्रसेवेची मंत्रपुष्पांजली सुरू ठेवून, दुसर्या बाजूने वेदांचा मान राखण्यासाठी भटांना मंत्रपुष्पांजलीचे आटीव दूध व भटभोजने सर्रास रूढ केली.
तात्पर्य, भोजनप्रिय भटांच्या पोटाच्या पुण्याईला साजेशोभेसे हे गणपती दैवत आहे; आणि ज्या भटांच्या पोटात अवघ्या महाराष्ट्राची अफाट मर्हाठशाही मुरक्यासरशी गडप झाली, त्यांनी भोजनप्रिय विशाळ उदराचे गणपती दैवत आपल्या ‘सार्वजनिक’ गुंडगिरीसाठी शोधून काढले, यात त्यांच्या धोरणी भोजनप्रियतेचे कौतुक करावे, का रमणा-रसिकतेची पाठ थोपटावी, एवढाच काय का तो प्रश्न उरला तर उरेल. असल्या खादाड भटी कल्पनेच्या उदरी जन्मलेल्या या ‘सार्वजनिक’ उत्सवाला ब्राह्मणेतरांनी डोळे मिटून डोक्यावर घेऊन नाचणे म्हणजे भटांच्या खरकट्याच्या पाट्या वाहणारे आम्ही जन्मसिद्ध बैल आहोत, अशी बिनशर्त कबुली देण्यासारखे आहे. भटी महात्म्याच्या मोहिनीमुळे पूर्वी झाले ते झाले. परंतु सध्याच्या जागृतीच्या लखख प्रकाशात स्वाभिमानी ब्राह्मणेतर या ‘सार्वजनिक’ गणेशोत्सवापासून अलिप्त राहतील तितके बरे.

