डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय क्षितिजावर उदय होत असताना दलितांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं, असं ठाम आवाहन करणार्या निवडक विचारवंतांमध्ये प्रबोधनकार मुख्य होते. घटनाकार आणि प्रबोधनकारांची ही साथ संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापर्यंत कायम राहिली. त्याची सुरुवात दादरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आंदोलनात खांद्याला खांदा लावून लढताना झाली होती.
दादरमध्ये सार्वजनिक उत्सवाच्या नावाने असणारं ब्राह्मणांचं एकजातीय वर्चस्व मोडून काढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समाज समता संघ लढत होता. त्यात प्रबोधनकारांच्या स्वाध्यायाश्रमात तयार झालेल्या कार्यकर्त्यांची फळी आघाडीवर होती. १९२५च्या गणेशोत्सवात नव्याने आकार घेणार्या दादरमधल्या बहुजन तरुणांमधल्या जागृतीचं प्रबोधनकारांनी प्रबोधनमधून कौतुकही केलं होतं. पण १९२८च्या गणेशोत्सवात प्रत्यक्ष लढा सुरू झाला तेव्हा ते आर्थिक आणि शारीरिक अडचणींशी झुंजत होते. तरीही प्रबोधनकारांनी ऐन वेळेस त्यात सहभाग घेऊन गणेश चतुर्थीच्या दिवशीच सनातन्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडलं.
त्यानंतरची बोलणी बाबासाहेबांच्या उपस्थितीत व्हावीत, असा आग्रह प्रबोधनकारांनी धरला, असा उल्लेख दैनिक ज्ञानप्रकाशच्या बातमीतच आहे. त्यानंतर प्रत्यक्ष बोलणी होताना काय घडलं, याचे तपशील बातमीत नाहीत. त्यासाठी आपल्याला त्या चर्चांमध्ये सामील असणार्या प्रबोधनकारांचं ‘माझी जीवनगाथा’ आत्मचरित्र तपासावं लागतं. त्यानुसार प्रबोधनकारांच्या सांगण्यानुसार दोन तरुण बाबासाहेबांना बोलावण्यासाठी लगेचच रवाना झाले. त्यानंतर साधारणपणे अर्ध्या तासात बाबासाहेब आले. त्यांनी सी.के. बोले, प्रबोधनकार आणि इतर कार्यकर्त्यांशी परिस्थितीवर चर्चा केली. त्यानंतर पुढची बोलणी करण्यासाठी एका जावळे यांच्या नावावर सहमती झाले. गणेशोत्सव मंडळाच्या समितीचे अध्यक्षही जावळेच होते. ते डॉ. मो.चि. जावळे. ते वेगळे आणि हे वेगळे. या जावळेंविषयी प्रबोधनकार सांगतात, हे दादरचे कदीम घरवाले नागरिक होते. म्हणजे ते प्रतिष्ठित होते, इतकंच.
ही सगळी पाच सहा मंडळी जावळेंच्या घराजवळ अंगणात पोचताच प्रबोधनकारांनी जावळेंना हाक दिली, अहो जावळे, भ्रष्टाचार सांभाळा, महार डॉ. आंबेडकर तुमच्या घरात येत आहेत. चर्चेच्या आधीच अनपेक्षित आक्रमक होऊन चर्चेतल्या प्रतिस्पर्धींना दाबात ठेवण्यासाठी ही नामी युक्ती होती. अर्थात हे गणेशोत्सववाल्या जावळेंसाठी होतं. ज्यांच्या घरी चर्चा होती, त्या जावळेंनी मात्र याला हसून उत्तर दिलं, अहो ठाकरे, माझ्या घरी हा भेदाभेद मुळीच नाही. जावळे स्वतः अंगणात आले आणि त्यांनी बाबासाहेबांचा हात धरून त्यांना ओटीवर नेलं. गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी आणि सुधारणावादी आंदोलकांच्या नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा चिकित्सा झाली. त्यातून जो तोडगा निघाला तो प्रबोधनकारांच्या शब्दांत असा, आधी रिवाजाप्रमाणे ब्राह्मण पुजार्याने गणेशाची प्राणप्रतिष्ठापूर्वक शास्त्रोक्त पूजाअर्चा करावी. ती झाल्यावर कोणत्याही अस्पृशाने स्नान करून ओलेत्याने एक पुष्पगुच्छ स्वतः नेऊन त्या ब्राह्मण पुजार्याच्या हातात शिवून द्यावा नि त्याने तो बिनतक्रारी शिवून घेऊन गणपतीला वहावा!
या प्रक्रियेत प्रबोधनकारांचा पुढाकार स्पष्ट होतो. दादरमधल्या सनातनी नेत्यांना बहुजनांच्या अटीशर्तींसमोर झुकावं लागणं, हा समाज समता संघाचा मोठा विजय होता. त्यात प्रबोधनकारांचं योगदान महत्त्वाचं होतं. ज्ञानप्रकाशच्या बातमीत तोडगा नेमका काय निघाला, हे अधिक सविस्तरपणे देण्यात आलंय. ते असं – श्रीगणेशोत्सवांतील गणेशमूर्ती स्पृश्यांइतकीच अस्पृश्यांना दर्शनासाठी मोकळी आहे. येथील पूर्वरूढीप्रमाणे कोणीही स्पृश्य माणसाने प्रत्यक्ष जाऊन गणपतीस स्पर्श करून पूजा करू नये. स्पृश्य व अस्पृश्य यांना या उत्सवाचे बाबतीत समतेची परिस्थिती असावी. म्हणून उत्सव मंडळाने गणेशमूर्तीभोवती कठडा घालावा व त्या कठड्याचे आत कोणीही जाऊ नये व त्या कठड्याबाहेरूनच सर्वांनी दर्शन घ्यावे. गणेशमूर्तीची पूजा कार्यकारी मंडळाने नियोजित केलेल्या एकाच माणसाकडून व्हावी व ह्या माणसाने स्पृश्यास्पृश्य भेदभाव न मानता स्पृश्य व अस्पृश्य यांच्याकडून पूजा, नैवेद्य असे पदार्थ श्रीस अर्पण करण्यास येतील ते अर्पण करण्यास येणार्यासमोर अर्पण करावेत. अशी पूजा, नैवेद्य वगैरे साहित्यावर कसल्याही प्रकारचे तीर्थ अगर पाणी शिंपडण्यांत येऊ नये. या पूजा नैवेद्याचा मुळीच विटाळ मानू नये.
म्हणजेच गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात स्पृश्य अस्पृश्य असा कोणताच भेद असणार नाही. उलट तोडग्यातल्या शब्दांत समतेची परिस्थिती असेल. मंडळाने नेमलेला पुजारीच गणपतीची पूजा करेल. त्याला दर्शनाला येणार्या भाविकांमध्ये स्पृश्य किंवा अस्पृश्य असा कोणताही भेदभाव करता येणार नाही. हे सार्वजनिक गणेशोत्सवात मान्य होणं क्रांतिकारक होतं. प्रबोधनकारांनी लिहिलंय त्यानुसार या तोडग्याची अंमलबजावणीही लगेच झाली. मडकेबुवा या बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी आताच्या वीर कोतवाल उद्यानात जाऊन नळाखाली आंघोळ केली. लाल गुलाबाच्या फुलांचा गुच्छ त्यांच्या हाताने पुजार्याला देण्यात आला आणि त्याने तो गणपतीला वाहिला. टाळ्याचा जोरदार गजर झाला. समतेच्या लढाईत्ा सनातन्यांची हार झाली. तरीही बाबासाहेबांनी नम्रपणे गणेशोत्सव मंडळाचे आभार मानले. डॉ. जावळेंनीही भाषण करून वादावर तेवढ्यापुरता पडदा पाडला. हे साधारण संध्याकाळी ४ वाजता घडलं. पहाटेची प्राणप्रतिष्ठा दुपार टळून गेल्यावर झाली.
या ऐतिहासिक प्रसंगात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे मडकेबुवा होते तरी कोण? आज परळच्या मुख्य चौकाला त्यांचं नाव दिलेलं आहे. तिथे जवळच दामोदर हॉलच्या मागे असणार्या चाळीत ते राहायला होते. तिथेच बाबासाहेबांचं ऑफिस आणि काही काळ घरही होतं. त्यामुळे ते बाबासाहेबांच्या सहवासात आणि नंतर प्रभावात आले. मडकेबुवांचं नाव गणपत महादेव जाधव. ते मुळात वारकरी माळकरी भजनीबुवा होते आणि त्यांनी मडकी विकण्याचा व्यवसाय केला होता. त्यामुळे त्यांना मडकेबुवा असं नाव पडलं. ते कायम बॉडीगार्डसारखे बाबासाहेबांच्या सोबत राहात. मुंबईत बाबासाहेबांचा कार्यक्रम असला तर मडकेबुवा अध्यक्ष तरी असत किंवा स्वागताध्यक्ष तरी. पुढे ते बाबासाहेबांच्या म्युन्सिपल कामगार संघ आणि शेड्युल्ड क्लास ़फेडरेशनचे पदाधिकारीही झाले. कामगार संघटनांत उत्तम संघटक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. दादर गणेशोत्सवात फुलं वाहण्याचा मान त्यांना मिळाला, कारण तेव्हाच ते बाबासाहेबांच्या चळवळीतले निष्ठावान आणि प्रमुख कार्यकर्ते म्हणून मुंबईला परिचित होते. प्रबोधनकारही त्यांचं वर्णन अस्पृश्यांचा नामांकित कार्यकर्ता असं करतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धनंजय कीर लिखित चरित्रातही या प्रसंगाची दखल घेतलेली आहे. ती अशी- अस्पृश्य समाजाला नागरिक हक्क मिळवून देण्यासाठी आंबेडकर नेहमी जागरूक असत. संकटांस तोंड देऊनदेखील आपापल्या हक्कांसाठी कसे झगडावे याचे शिक्षण देण्याची एकही संधी वाया जाऊ देत नसत. अशीच एक संधी त्यांना १९२८च्या सप्टेंबर महिन्यातील गणेशोत्सवात लाभली. गणपतीची पूजाअर्चा अखिल हिंदूजनांस करता येते किंवा नाही, हा होता वादाचा प्रश्न. सनातनी नि सुधारक पक्षांमधील मतभेद अगदी एकेरीवर आले. शेवटी आंबेडकरांचे प्रयत्न नि धमक्या ह्यांचा इष्ट तो परिणाम झाला. सी.के. बोले, प्रबोधनकार ठाकरे आदी समाजसुधारक मंडळी आणि आंबेडकरांचा समता संघ हे सर्व त्या बाबतीत धैर्याने झगडले. सनातनी हटले. अखेर अस्पृश्य गणलेल्या हिंदूंनी मंडपामध्ये गणपतीच्या मूर्तीची पूजा करण्याचा अधिकार संपादन केला.
हे सारं घडल्यानंतर आंदोलक आपापल्या घरी निघून गेले. त्यांनी गणेशोत्सवाच्या कोणत्याही कार्यक्रमात अडथळा आणला नाही. प्रबोधनकार सांगतात तसं पुढे अनंत चतुर्दशीपर्यंत मंडपातले कार्यक्रम सुरळीत पार पडले खरे, पण या आंदोलनाच्या दणक्याने उत्सवाचा नूरच फिका पडला. दरसाल हाच प्रकार व्हायचा असेल तर या वार्षिक उत्सवाच्या फंदात पडण्यात तरी काय अर्थ? असा जोरदार विचार-प्रवाह जीर्णमतवादी ब्राह्मण मंडळीत चालू झाला. झालेल्या तडजोडीला प्रसंगाची निकड जाणून जरी त्यांनी तटस्थपणा पत्करला होता, तरी मनातून ते जळफळतच राहिले. गणपती बाटला म्हणून कित्येक मंत्रजागरवाल्या भिक्षुकांनी ऐन वेळी निमंत्रणाला नकार दिला. तेव्हा दुसरा कसला तरी कार्यक्रम ठेवून वेळ मारण्यात आली.
गणेशोत्सव मंडळाने यावर उपाय काढला असता. पण त्यात मंडळाचं आर्थिक गणित बिघडलं असतं तर काय? तोपर्यंत उत्सवाला सगळ्या जाती जमातींकडून वर्गणी मिळत होती. पण कुणी त्याला विरोध केला, तर उत्पन्नाचा डोलाराच कोसळला असता. त्यामुळे वैतागलेल्या डॉ. जावळे यांनी शेवटच्या दिवशी घोषणा केली की यंदाच्या वर्षी झालेल्या प्रकारामुळे यापुढे उत्सव सुरू ठेवणं अशक्य आहे. त्यांनी या ़फंदात न पडण्याचाही पुकारा केला. त्यामुळे दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव कायमचा बंद झाल्याचं थेट गणेशोत्सवाच्या मंडपात सांगण्यात आलं. प्रबोधनकार सांगतात, पुढची तीस वर्षं दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बंद होता. त्यानंतर पुढे दादरच्या समर्थ व्यायाम मंदिराच्या गणेशोत्सवाला सार्वजनिक विशेषण लावून तो पुन्हा सुरू करण्यात आला.
हा प्रबोधनकारांनी सांगितलेला इतिहास, पण धनंजय कीर यांच्या मते पुढच्या वर्षी म्हणजे १९२९च्या गणेशोत्सवात डॉ. जावळे यांनी पुन्हा उचल खाल्ली. त्यांनी त्यांच्या दृष्टीने अस्पृश्य असणार्यांना पूजेचा अधिकार देण्यास नकार दिला. आदल्या वर्षीचा तोडगा फक्त एका वर्षीसाठीच होता असा त्यांचा वकिली युक्तिवाद होता. त्यामुळे पुन्हा आंदोलन झालं. त्यात पुन्हा बाबासाहेब, बोले आणि प्रबोधनकार एकत्र होते. त्यांनी त्यात पुन्हा विजय मिळवला. मुळात या सगळ्या आंदोलनांचं डॉक्युमेंटेशन फारसं झालेलं नाही. त्यामुळे काही दशकांनंतर याचा इतिहास लिहिताना सनावळ्यांचे मतभेद स्वाभाविकपणे दिसतात.
प्रबोधनकारांनी तर गणेशोत्सवाचा हा राडा १९२६ साली झाल्याचं माझी जीवनगाथात लिहिलंय. ते वर्ष चुकीचं असण्याचीच शक्यता जास्त आहे. कारण एकतर तेव्हा ते पुण्यात होते, मुंबईत नाही. हा प्रसंग घडल्यानंतर जवळपास पन्नास वर्षांनी ते साप्ताहिक मार्मिकमधून आत्मचरित्र लिहित होते. त्यासाठी प्रबोधनच्या फायली हाच मुख्य आधार असल्याचं दिसतं. त्यात १९२५च्या दादर गणेशोत्सव मंडळातल्या पहिल्या वादावर प्रबोधनकारांनी लेख लिहिलेला आहे. त्याचा आधार घेत त्यांनी हे आंदोलन १९२६मध्ये घडलं असावं असा कयास आत्मचरित्र लिहिताना बांधला असावा. पण २२ सप्टेंबर १९२८च्या दैनिक ज्ञानप्रकाशच्या अंकात छापून आलेली बातमी, २३ सप्टेंबर १९२८मध्ये नवयुग साप्ताहिकात स्वतः प्रबोधनकारांनी लिहिलेला लेख, पुढच्या वर्षी बहिष्कृत भारतमध्ये प्रसिद्ध झालेलं आवाहन यातून हे आंदोलन १९२८च्याच गणेशोत्सवात झाल्याचं स्पष्ट आहे. पण धनंजय कीर लिहितात की हे आंदोलन १९२८ आणि १९२९ अशी दोन वर्षं सुरू होतं. त्याला मात्र इतर कोणताच आधार सापडत नाही. तसंही पुढच्या वर्षी दादरमध्ये प्रबोधनकारांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक नवरात्रौत्सवाची उत्साहात सुरुवात झाली.

