• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

निगमाच्या वनात वनमाळी नाही!

ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर अभंगबोध

marmik by marmik
June 8, 2026
in भाष्य, विशेष लेख
0
निगमाच्या वनात वनमाळी नाही!

मुकुंदराव पाटील

निगमाचे वन।
नको शोधू करू सीण।।१।।
या रे गौळियांचे घरी।
बांधले ते दावे वरा।।२।।
पीडलेती भ्रमे।
वाट न कळता वर्मे।।३।।
तुका म्हणे भार।
माया टाका अहंकार।।४।।

प्रस्तुत अभंगात तुकोबाराय वेदाचा मार्ग आणि भक्तीचा मार्ग यांच्यातला विरोधाभास सांगतात. ईश्वरापर्यंत जाण्यासाठी वेदाचा मार्ग आडरानाचा आहे. जंगलासारखा आहे. जंगलातून नीट रस्ता मिळत नाही. वेदालाच निगम असं म्हणतात. या निगमरूप जंगलाच्या मार्गाने जाऊन देवाला शोधण्याचा खटाटोप करू नका, देव मिळणार नाही फक्त शीण होईल, असं तुकोबाराय म्हणतात. त्याऐवजी जर प्रेमभक्तीच्या मार्गाने गेलात तर तुम्हाला ईश्वराचं प्रेम मिळतं.

तुकोबाराय इथे यशोदा मातेचं उदाहरण देतात. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातली एक लीळा म्हणजे दामोदर लीळा. बाळकृष्णाच्या खोडकरपणाला यशोदा माता कंटाळल्या होत्या. त्यांनी श्रीकृष्णाला एका मोठ्या उखळाला दोरीने बांधून टाकलं. श्रीकृष्णाने ताकदीने ते उखळ ओढलं. त्यामुळे दोन वृक्ष उन्मळून पडले अशी ही लीळा. दाम म्हणजे दोरी आणि उदर म्हणजे पोट. त्यातून हे नाव आले. तुकोबाराय म्हणतात, जो देव निगमाच्या अभ्यासाने समजत नाही तो देव गवळ्यांच्या घरी मात्र उखळाला दोरीने बांधला जातो. ‘या रे गौळियाचे घरी। बांधले ते दोरी वरी।।’ असं तुकोबाराय म्हणतात. इथे गवळी हा शब्द नंद-यशोदा यांच्या संदर्भात आला असला तरी तो प्रतीकात्मक आहे. वारकरी संप्रदायात गोवळी हा भक्तीचा आदर्श मानला गेलेला आहे. गो म्हणजे इंद्रिये आणि वळी म्हणजे नियंत्रण ठेवणारा. असाच आणखी एक शब्द म्हणजे गोपाळ. गोपाळ अथवा गोवळी ही एक जात नाही, ती वृत्ती आहे. संत जनाबाईंचा एक प्रसिद्ध अभंग आहे.

विठो माझा लेकुरवाळा।
संगे गोपाळांचा मेळा।।१।।

निवृत्ती हा खांद्यावरी।
सोपानाचा हात धरी।।२।।

पुढे चाले ज्ञानेश्वर।
मागे मुक्ताई सुंदर।।३।।

गोरा कुंभार मांडिवरी।
चोखा जीवा बरोबरी।।४।।

बंका कडियेवरी।
नामा करांगुळी धरी।।५।।

जनी म्हणे गोपाळा।
करी भक्तांचा सोहळा।।६।।

या अभंगात विठ्ठलाच्या सोबत गोपाळांचा मेळा आहे. त्यात त्यांनी निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली, सोपानकाका, मुक्ताई माऊली, गोरोबाकाका, चोखोबाराय, बंका महाराज आणि नामदेवराय अशा आठ संतांचा नामोल्लेख केला आहे. हे संत तीन जातींचे आहेत. ज्ञानदेवादी भावंडे बहिष्कृत, नामदेवराय शिंपी, गोरोबाकाका कुंभार आणि चोखोबाराय-बंका हे तत्कालीन अस्पृश्य जातीचे. त्या सर्वांना संतांना जनाबाई ‘गोपाळ’ म्हणतात. म्हणजेच गोपाळ हा शब्द जातीवाचक नसून वृत्तीवाचक आहे. गोपाळ म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण असणारा आणि त्यामुळेच निरागसतेने भगवंतावर प्रेम करणारा. भगवान श्रीकृष्णांनी केलेला गोपाळकाला म्हणजे विविध जातींतील गोपाळांचं सहभोजन होतं. सनातनी विचारांच्या वैदिकांसाठी ही गोष्ट अडचणीची होती. त्यामुळेच त्यांनी गोपाळकाल्यात फक्त एकच गोवळी जात होती असं सांगायला सुरुवात केली. त्याचं खंडन थोर वारकरी सत्पुरुष गणपती महाराजांनी केलं. त्यांचा हा अभंग महत्त्वाचा आहे.

कृष्णे काला केला तेव्हा गवळीच।
काल्यात एकच जात होती ।।१।।

एका एकजण बोलला सहज।
बांधूनि अंदाज मनामाजी।।२।।

त्याच्या प्रश्ना आम्ही दिले ते उत्तर।
मांडितो समोर तुमच्या ते ।।३।।

जो गो वळी जाणा तोच गोवळी।
सर्वही गोवळी मग जाणा।।४।।

गो नाम इंद्रिये होत सर्व गायी।
ओळखती सर्वही जन त्यांना।।५।।

एक जात मग गवळी मानव।
सहजच सर्व गण्या म्हणे।।६।।

गणपती महाराजांनी स्वतः पुढाकार घेऊन गावोगावी गोपाळकाल्याच्या माध्यमातून आंतरजातीय सहभोजनाचे प्रयोग केले. वेदाच्या निबिड जंगलात जो देव सापडत नाही तो गोवळ्यांच्या- भक्तांच्या घरी मात्र दोरीने उखळाला बांधला जातो. इथे उखळ भक्तीचं प्रतीक आहे तर दोरी प्रेमाचं प्रतीक आहे.

तुकोबाराय प्रस्तुत अभंगाच्या तिसर्‍या चरणात म्हणतात की भ्रमात पडलेल्या लोकांना हरिभक्तीचं वर्म नीट न कळल्यानं ते वाट चुकलेले आहेत; गवळ्यांच्या म्हणजेच संतांच्या प्रेमभक्तीच्या राजमार्गाने जाण्याऐवजी ते वेदाच्या घनदाट जंगलातून जात आहेत. वाट चुकल्याची त्यांना जाणीव नाही. उलट ते वेदाचा अधिकार केवळ आम्हालाच आहे अशी फुशारकी मारत वेदाच्या गोण्या वाहत आहेत, खरेतर ते त्यांच्या अहंकाराच्याच गोण्या वाहात आहेत. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, ‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। येरांनी वाहावा भार माथा।।’ तुकोबारायांनी वापरलेले वाटेचे रूपक पुढे सत्यशोधक विचारवंत मुकुंदराव पाटील यांनीही वापरले आहे. मुकुंदराव हे मुळात वारकरी कुटुंबातील. ते आजच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तरवडी गावात राहत होते. या गावाजवळच्या कुकाणे गावात अखंड हरिनाम सप्ताहात मुकुंदरावांनी प्रवचन केलं. तेच प्रवचन ‘विठोबाची शिकवण’ या पुस्तिकेच्या रूपाने प्रकाशित करण्यात आलं. या प्रवचनात ते म्हणतात- ‘साधुसंतांनी चोखाळलेला नामस्मरण मार्ग प्रचारात येण्यापूर्वी, सामान्य जनतेस परमार्थाकडे जाण्यास कसलाही रस्ता नव्हता. ज्याप्रमाणे एखाद्या निबिड जंगलात जंगली लोक मनास वाटेल तिकडे फिरू लागले म्हणजे, लहान लहान व वेड्यावाकड्या पाऊल वाटा पडतात; काही आडव्या तर काही उभ्या जातात, काही जवळ जवळ तर काही दूर दूर होतात, काही एकमेकींच्या उलट जातात. त्याप्रमाणे, प्राचीन काळी, अज्ञान बहुजन समाजात परमार्थाच्या अनेक वाटा वाकड्या तिकड्या पसरल्या होत्या! कोणी झाडास शेंदूर लावतो तर कोणी गोट्यास शेंदूर लावतो, कोणी सापास पूजितो, तर कोणी कुत्र्यास पूजितो, अशाप्रकारे त्या वाटांच्या फाट्यांनी सगळा समाज व्यापून टाकला होता. आता त्या काळी मोठाले धोपट मार्ग नव्हते का? असा कोणास संशय आला असेल, पण यात संशय घेण्याचे कारणच नाही. त्याकाळी धोपट मार्ग निःसंशय होते, मनु, शंकराचार्य वगैरे लहान मोठ्या इंजिनियरांनी आपापल्या दुर्बिणी लावून लहान मोठे सरळ मार्ग अनेक आखले होते, जेथे जेथे खाच खळगे आले तेथे तेथे वेदांच्या कमानी मारून छानदार पूल उभारण्यात आले; जेथे जेथे टेकड टेंगळे लागली, तेथे तेथे स्मृतीचे सुरंग लावून मनाजोगी सपाटी केली, रस्त्याच्या दोन्ही बाजूस व्रतवैकल्याची झाडे लावली; टप्प्याटप्प्यावर तीर्थांची कुंडे भरून ठेवली. अशा प्रकारे हा सुखाने परमार्थप्रवास करण्याचा धोपट रस्ता त्यावेळी होता; पण त्यावर चालत जाण्याचा अधिकार सामान्य जनतेस नव्हता? गंधाचे टिकले, भस्माचे पट्टे आणि जानव्याचे दोरे अशा खुणांचे परवाने ज्यांच्या अंगावर आहेत, असेच लोक त्या हमरस्त्यावरून चालत जात असत; सामान्य लोकास या शास्त्रोक्त मार्गाने चालण्याची शास्त्रोक्त मनाई होती; सामान्य लोकातील जे थोडेसे चौकस होते, ते या रस्त्यावर चालण्यासाठी धडपडू लागले; पण त्यांना रस्त्याच्या आजूबाजूच्या व्रतवैकल्याच्या झाडा झुडपाखालूनच चालावे लागत असे! पण या चौकस लोकात सगळेच काही गबाळे नव्हते; सगळेच काही वडलांची चाल कशी सोडावी असे रडगाणे गाणारे नव्हते ; त्यात काही विचारी होते, धोरणी होते. त्यांनी विचार केला की, या वेदोक्त मार्गाच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. सोवळेदार लोकांच्या अर्जविनवण्या करून रस्ता मागत बसण्यात शहाणपणा नाही आणि त्यांच्या सोवळे शास्त्राच्या कुंपणाने संकुचित झालेल्या मार्गावरून, अंगचोरपणा करीत चालण्यातही परमार्थ नाही. तेव्हा बहुजनसमाजासाठी परमार्थाचा सोपा आणि धोपट मार्ग असावा, असे त्या वेळच्या श्री नामदेव गोरा कुंभारादि संतांच्या मनात आले.’

मुकुंदरावांनी तुकोबारायांचे वाटेचे रूपक वापरून साधारणपणे १९२२ साली हे प्रवचन केलं होतं. आज त्याला जवळपास १०४ वर्षं होत आली आहेत.

एकीकडे वेदांची वाट नाकारणार्‍या तुकोबारायांनी एका ठिकाणी ‘वेदमार्गे मुनी गेले। त्याच मार्गे चाललो।।’ असं म्हटलेलं आहे. यात वरकरणी विसंगती वाटेल पण मुळातून उलगडा केला की आपोआप स्पष्टता येईल. वारकरी संतांनी वेदमार्ग नाकारला असला तरी वेदातला भक्तीचा भाग स्वीकारला होता. त्यामुळे भक्तीची स्पष्टता देण्यासाठी काहीवेळा ते वेदांचाही संदर्भ देत असत. विशेषत्वाने वैदिक पंडितांना वारकरी संप्रदायातील भक्तीसुखाचा लाभ देण्यासाठी त्यांनी वेदांचे संदर्भ वापरले. तुकोबाराय प्रस्तुत अभंगाच्या तिसर्‍या चरणात म्हणतात, वैदिक पंडितांना भवभ्रमाची पीडा झाली आहे. तिचे निवारण करण्यासाठी संतांनी एक दवा शोधली. त्याकाळची दवा काढा आणि वल्ली अशा दोन स्वरूपांत होती. ती दोन्ही रूपके संतांनी वापरली आहेत. वेदरूप निबिड अरण्यात अहंकार आणि भवभ्रमाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या पंडितांसाठी ज्ञानदेवांनी एक वल्ली शोधली. नामदेवराय त्यांचं वर्णन करतात. ‘ज्ञानराज माझी योग्यांची माऊली। जेणे निगमवल्ली प्रकट केली।।’ ज्ञानोबाराय हे योग्यांची माऊली झाले तर वेदज्ञांसाठी वैद्य झाले. त्यांनी निगमवल्ली ‘प्रकट’ केली. वल्ली देणारा वैद्य सहसा वल्लीविषयी गुप्तता राखतो. पण ज्ञानदेवांजवळ गुप्तता नाही. त्यामुळेच त्यांनी वेदवल्ली प्रकट केली. ही वल्ली अर्थातच भक्तीरसाची आहे. त्याला तुकोबाराय काढा म्हणतात. ‘ब्रह्मरस घेई काढा। जेणे पीडा वारेल।।१।।’ असं तुकोबाराय म्हणतात. मात्र, त्याचबरोबर एक पथ्यही पाळायला तुकोबाराय सांगतात, ते म्हणतात, विठ्ठलनाम सोडून वाचेने इतर काहीही सेवन करू नये. ‘न पढवे वेद नको शास्त्रबोध। नामाचे प्रबंध पाठ करा।।’ असं नामदेवरायही म्हणतात. हेच पथ्य आहे. नामाचे प्रबंध म्हणजे हरिपाठ. नाममहिमा आणि त्यामागची तात्विक भूमिका हरिपाठात विशद केलेली आहे म्हणून तो नामाचा प्रबंध. संतांच्या लेखी वेदांचा आशय भक्तीचा आणि नामस्मरणाचाच होता. त्यामुळेच तुकोबाराय ‘वेद अनंत बोलिला। अर्थ इतुकाची साधिला।।१।।निजनिष्ठे नाम गावे। विठोबासी शरण जावे।।२।। असं म्हणतात. वेदाने भरपूर सांगितलं असलं तरी त्यातील नामनिष्ठा आणि विठ्ठलभक्ती हाच आशय आहे. तो आशय म्हणजेच ज्ञानदेवांनी प्रकट केलेली ‘निगमवल्ली’ आणि तुकोबारायांनी सांगितलेला ‘ब्रह्मरसाचा काढा’ आहे. या काढ्याने भवभ्रमाचा आणि अहंकाराचा आजार सहजपणे निघून जाईल. ‘भवरोगाऐसे जाय। आणिक काय क्षुल्लके।।’ म्हणजे भवरोगापुढे कामक्रोधादी रोग तर क्षुल्लकच आहेत.

Previous Post

आंब्राई

Next Post

प्रबोधनकार आणि घटनाकार

Next Post
विक्रमाच्या साडेसातीचं फॅक्टचेक

प्रबोधनकार आणि घटनाकार

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.