
मुंबईच्या कामगारांमधील सुमारे १०६ बहाद्दर बांधवांनी प्राणांची आहुती दिली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर महत्प्रयासाने १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. मुंबई महाराष्ट्राला मिळाली, परंतु मुंबईत महाराष्ट्र दिसत नव्हता. मुंबई या महाराष्ट्राच्या राजधानीत अमराठी अधिकारी मोठ्या प्रमाणावर दिसून येत होते. अशा वेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आलेले बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर १३ ऑगस्ट १९६० रोजी ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ख्यातकीर्त झालेले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते या ‘मार्मिक’चे प्रकाशन केले. बाळासाहेबांनी ‘मार्मिक’मधून अमराठी लोकांची यादी जाहीर केली आणि त्या स्तंभाला ‘वाचा आणि थंड बसा’ हे चपखल आणि चीड आणणारे शीर्षक दिले होते.
बाळासाहेबांचे वडील आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी, थोर समाजसुधारक केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना विचारले की, अरे बाळ, तू केवळ ‘वाचा आणि थंड बसा’ लिहीत बसणार की पुढे आणखी काही करणार आहेस? मग दादांच्या सूचनेनुसार ‘शिवसेना’ ही मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठीची संघटना स्थापन केली. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे आमच्या एक वैदर्भीय सुकन्या सरिता विजय वाकोडे यांनी सुमारे सहा वर्षांपासून शिवसेनेवर पीएचडी करून डॉक्टरेट मिळविण्याचा प्रयत्न केला. सरिता म्हणजे पूर्वाश्रमीच्या सरला रामराव पाटील यांनी अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला शिवसेनेवरील एक भला मोठा अभ्यासपूर्ण प्रबंध सादर केला. ‘शिवसेनेच्या मानवतावादी कार्याचे ऐतिहासिक अध्ययन’ असे या प्रबंधाचे शीर्षक आहे. त्यांचा हा प्रबंध स्वीकारून विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. पदवी बहाल केली. २२ सप्टेंबर २०२५ रोजी सरिता वाकोडे यांनी विद्यापीठाला हा प्रबंध सादर केला आणि २६ मे २०२६ रोजी सरिता यांना समारंभपूर्वक डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.
२०२५च्या डिसेंबरमध्ये अकोले येथे सरिता यांच्या घरी भेट दिल्यानंतर कळले की त्या आणि त्यांच्या भगिनी या सख्ख्या बहिणी, सख्ख्या जावा आहेत, हे कळताच मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची आठवण झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी सौ. मीनाताई आणि श्रीकांत ठाकरे यांच्या पत्नी सौ. कुंदाताई यासुद्धा सख्ख्या बहिणी, सख्ख्या जावा आहेत, ही गोष्ट बोलून दाखविली. याच वेळी सरिता यांनी विद्यापीठाला सादर केलेल्या प्रचंड मोठ्या प्रबंधाची प्रत अवलोकन करायला मिळाली. ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांनी सरिता यांना सहकार्य केले असल्याने आम्ही तेथूनच संदीप यांच्याशी संपर्क साधला आणि बोललो. दोन वर्षांपासून सरिता यांनी मुंबईमध्ये दादर ते दहिसर अशा सर्वच ठिकाणी भेटी देत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य, शिवसेना नेते माजी मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, माजी केंद्रीय मंत्री, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, झुंजार माजी आमदार नीला देसाई, माजी आमदार आणि शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, माजी आमदार, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, मागाठाणे मित्र मंडळ, प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय, शिवसेनेच्या पदाधिकारी रेखा बोर्हाडे, रोहिणी चौगुले अशा अनेकांची भेट घेतली. संपूर्ण माहिती संकलित केली. माझे ‘पासष्टायन’, ‘गुरुजी’ ही पुस्तके सरिता वाकोडे यांना दिली. योगेंद्र ठाकूर यांचीही पुस्तके त्यांना उपलब्ध करून देण्यात आली. मित्रवर्य शिवसेना प्रवक्ते हर्षल प्रधान यांनीसुद्धा सहकार्य केले. या दोन-तीन वर्षांच्या प्रदीर्घ काळात प्रचंड मेहनत, कुटुंबाचा योग्य तो सांभाळ, आलेल्या संकटांना धीराने तोंड देत कंबर कसून लिखाण केले. वेळोवेळी ‘बाबा, मला ही माहिती पाहिजे’ असे हक्काने सांगून ती माहिती मिळविण्याचे (ते कसब सरिता यांच्या चांगलेच अंगी भिनलेले आहे) काम केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून ते शिवसेनेच्या मानवतावादी कार्यापर्यंतचा इतिहास, मराठी अस्मिता, सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक जतन आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांच्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’या विचारधारेचा सखोल अभ्यास करणारा‘शिवसेनेच्या मानवतावादी कार्याचे ऐतिहासिक अध्ययन: विशेष संदर्भ मुंबई विभाग (कालखंड इ. स. १९६० ते २०१०)’ हा सुमारे ४५० पानांचा अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन प्रबंध डॉ. सरिता वाकोडे यांनी सादर केला आहे. या विस्तृत संशोधनामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ, भाषावार प्रांतरचना, मराठी अस्मितेचा संघर्ष, शिवसेनेची स्थापना, संघटनात्मक विस्तार, सामाजिक कार्य, सांस्कृतिक चळवळी आणि महिला सक्षमीकरणाचा व्यापक ऐतिहासिक अभ्यास करण्यात आला आहे.या संशोधनात शिवसेनाप्रमुखांपासून शिवसैनिकांपर्यंत आणि शाखांपासून मातोश्रीपर्यंत शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. शिवसेनेची स्थापना, ‘मार्मिक’साप्ताहिकाची भूमिका, मराठी युवकांच्या प्रश्नांवरील आंदोलने, दसरा मेळावे, हिंदुत्वाची भूमिका, मराठी माणसासाठीचा संघर्ष आणि मानवतावादी कार्याचा तपशीलवार आढावा या प्रबंधात मांडण्यात आला आहे. 
‘मानवतावादी कार्य म्हणजे शिवसेना’या संकल्पनेअंतर्गत स्वच्छ मुंबई हरित मुंबई, शाखा म्हणजे प्रतिन्यायमंदिरे, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, रुग्णवाहिनी व शववाहिनी सेवा, झोपडपट्टी पुनर्वसन, एक रुपयात झुणका भाकर, मराठी युवकांना रोजगार, लोकाधिकार समिती महासंघ, कामगार सेना, सामाजिक व आपत्ती व्यवस्थापनातील योगदान आदी विषयांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. शिवसेनेच्या सांस्कृतिक कार्यामध्ये मराठी भाषेचे रक्षण, मराठी लोककला संवर्धन, गणेशोत्सव, दहीहंडी, शिवजयंती, मराठी चित्रपटांना प्रोत्साहन, सांस्कृतिक मंच व नाट्यमंदिरे, कवी, शाहीर, कलाकार यांना पाठबळ या विषयांचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. महिला आघाडीच्या कार्यामध्ये रणरागिणीची संकल्पना, महिलांचे सक्षमीकरण, आरोग्य शिबिरे, ममता दिन, पाककला, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा, हळदीकुंकू, मंगळागौर, मातोश्री महिला प्रतिष्ठान, महिलांसाठी शाखांचे माहेरघर म्हणून कार्य यांचा अभ्यास संशोधनामध्ये करण्यात आला आहे.
एका महिलेने शिवसेनेच्या विचारसरणी, समाजकारण, मानवतावादी कार्य आणि मराठी अस्मितेवर एवढ्या व्यापक स्वरूपात पीएच.डी. संशोधन पूर्ण करणे ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी निश्चितच स्वाभिमानाची आणि गर्वाची बाब मानली जात आहे. शिवसेना पक्षाचे उपनेते आणि आमदार नितीन देशमुख यांनी डॉ. सरिता वाकोडे यांचे अभिनंदन करताना सांगितले — आपल्या जिल्ह्यातील महिला जिल्हा संघटिका म्हणून त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. अशा रणरागिणी शिवसैनिकेचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे.
‘सामना’मधील जुने सहकारी अनंत गुरव तसेच अमरावती येथील डॉ. मनीष देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे अग्रणी थोर समाजसुधारक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर डॉक्टरेट मिळवली आहे, तर माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांनी शिवसेनेवर प्रबंध लिहिला आणि डॉक्टरेट प्राप्त केली. ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक विद्यापीठातून दैनिक ‘सामना’ या राजकीय पक्षाच्या मुखपत्रावर सुमारे चारशे पानांचा प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळवली. आता सरिता वाकोडे यांनी मिळवून शिवसेनेच्या राजमुकुटात सोनेरी शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)

