• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नामसंकीर्तनाची सुलभता

ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर अभंगबोध

Marmik Team by Marmik Team
October 10, 2026
in भाष्य, विशेष लेख
0
नामयाचा तुका!

युक्ताहार न लगे आणिक साधने।
अल्प नारायणे दाखविले॥१॥
कलियुगामाजी करावे कीर्तन।
तेणे नारायण देईल भेटी॥२॥
न लगे लौकिक सांडावा वेव्हार।
घ्यावे वनांतर भस्म दंड॥३॥
तुका म्हणे आणिक उपाव।
दिसती ते वाव नामेविण॥४॥

वारकरी संप्रदाय संसारिकांचा संप्रदाय आहे. संसारात राहून देवाचं प्रेम मिळवता येतं. संसार त्यागून फक्त मनाची चंचलता वाढत जाते. कामक्रोधादि विकार बळावतात. त्यामुळे वारकरी संतानी संसारात राहून परमेश्वराची भक्ती करण्याची शिकवण दिली. संसार हा मानवी जीवाचा नैसर्गिक स्वभाव आहे. आता संसारात राहूनच भक्ती करायची तर तिचं स्वरूपही तसंच असणार. त्यामुळेच वारकरी संतांनी प्रापंचिकाच्या आवाक्यात नसलेल्या कठीण साधनांचं माहात्म्य आणि अवडंबर नाकारलं. त्यातला फोलपणा लोकांच्या नजरेस आणून दिला. त्या साधना केवळ कठीण आहेत म्हणून नाकारल्या असंही नाही. त्या साधना मानवी जीवाला सुखाचा अनुभव देणाऱ्या नाहीत म्हणून संतांनी त्यांचा अव्हेर केला.

प्रस्तुत अभंगातून तुकोबाराय नामस्मरणाचं माहात्म्य सांगतात. त्यानिमित्ताने त्यांनी नामस्मरणाची साधना सोपी असून तीच परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव देऊ शकते याची स्पष्टता दिलेली आहे. तुकोबाराय पहिल्या चरणात म्हणतात की नामधारकाला अर्थात वारकऱ्याला युक्ताहारादी साधनांची गरज नाही असं स्पष्ट करतात. युक्ताहार म्हणजे योग्य आहार. हा युक्ताहार ज्याच्या त्याच्या श्रद्धा-धारणेप्रमाणे वेगवेगळा असतो. योग्यांसाठी युक्ताहार म्हणजे परिमित आहार. परिमित आहार म्हणजे माफक अर्थात कमी प्रमाणातला आहार. वैदिक परंपरेतील उच्चवर्णीयांसाठीही युक्ताहाराचे काही नियम आहेत. ते नियम फारच किचकट आहेत. मनुस्मृतीसारख्या ग्रंथांमधून त्याचं विवरण आलेलं आहे. त्यातला सर्वज्ञात नियम म्हणजे कांदा लसूण न खाणं. मनुस्मृतीत द्विजांनी म्हणजेच उच्चवर्णीयांनी कांदा-लसूण खाऊ नये अशा आशयाचे काही श्लोक आहेत.
लशुनं गृजन्नं चैव पलाण्डुं कवकानिच।
अभक्ष्याणि द्विजातीनाममेध्यप्रभवानि च॥
अर्थ- द्विजाने लसूण, कांदा, आळिंबी आणि अस्वच्छ जमिनीवर उगवलेला तांदुळजासारख्या रानभाजा खाऊ नयेत.
कांदा लसूण न खाण्याची बरीच अजब कारणं सांगितली जातात. कांदा लसूण खाण्यानं कामवासना प्रबळ होते असा दावा केला जातो. वास्तविक पाहता आहाराचा आणि वासनेचा त्या अर्थाने काही संबंध नसतो. कांदा लसूण खाण्याने काम प्रबळ होत असेल तर मग बोकड निव्वळ झाडपाला खात असूनही त्याला तीव्र कामवासना आहेच. याचाच अर्थ आहाराचा आणि वृत्तीचा काहीही संबंध नाही. कबीर म्हणतात,
घासपात जो खात है, उसको सतावे काम।
हलवा पुडी जो खात है, उसकी जाने राम॥
झाडपाला खाणाऱ्या जनावरांनाही कामवासना सतावत असेल तर मग शिरापुरी खाणाऱ्यालाही ती वासना सतावणारच. कांदा लसूण न खाण्याचं आणखी एक अजब तर्कट मांडलं जातं. त्यांच्या म्हणण्यानुसार लसूण हा म्लेंछकंद आहे. त्याला उग्र वास आहे. गायत्री मंत्र जपताना अंगावर देवता वास करत असतात. लसूण खाल्ला तर अंगाचा उग्र वास येतो आणि त्यामुळे देवता अंगावर राहत नाहीत. त्यामुळे उच्चवर्णीयांनी लसूण खाऊ नये असा दावा करणारे लोक आहेत. पुराणातील एक कथाही यासंदर्भात सांगितली जाते. समुद्रमंथनाच्या वेळी युद्ध झालं. या युद्धात राहू-केतू मरण पावले. त्यांच्या मृत शरीरातून जे रक्त पडलं त्या रक्ताच्या थेंबातून कांदा-लसूण निर्माण झाले अशी ही मजेदार कथा आहे.

वास्तवात कांदा-लसूण खाल्ल्याने कोणताही विकार बळावण्याच्या काही शक्यता नाहीत. उलट कांदा-लसूण न खाल्ल्याने आपण कांदा-लसूण खाणाऱ्यांपेक्षा वेगळे आणि विशेष आहोत, या भावनेने अहंकार वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. कांदा-लसणात औषधी गुणधर्म आहेत. कांदा शरीराला थंडावा देतो. त्यामुळे त्याची शरीराला गरज आहे. आयुर्वेदातही कांदा-लसूण शरीरासाठी गरजेचे आहेत असं म्हटलेलं आहे.

कांदा-लसणासोबतच आणखी एक भाजी निषिद्ध मानली जाते, ती म्हणजे वांग्याची भाजी. वांगी न खाण्याचीही काही धार्मिक कारणं सांगितली जातात. वांग्याबरोबरच काहीजण मसूर डाळही खात नाहीत. मसूर डाळीच्याही अशाच पौराणिक कथा आहेत. एका कथेनुसार हैहय वंशाचा राजा सहस्त्रबाहु अर्जुन जमदग्नीच्या आश्रमात गेला. त्याने त्यांच्या कामधेनू गायीला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गाय जखमी झाली आणि तिचं रक्त जमिनीवर सांडलं. जिथे रक्त सांडलं तिथं मसूर डाळ उगवून आली, अशी कथा प्रचलित आहे. त्यामुळे काही लोक या डाळीला मांसाहारासम मानतात. त्याचबरोबर यासंदर्भात आणखीही एक कथा आहे. अर्थात अशा कथा नंतरच्या काळात प्रचलित केल्या गेल्या असणार हे उघड आहे. काहीजण हयातभर कांदा, लसूण, मसूर, वांगी आणि असं बरंच काही खात नाहीत. काहीजण यापैकी काही पदार्थ फक्त चातुर्मासात खात नाहीत. काहीजण हे पदार्थ फक्त श्रावण महिन्यात खात नाहीत.
वारकरी संप्रदायातील संतांनी मात्र आहारावर असा कोणताही निर्बंध लादला नाही. त्यांनी आहाराचे असे कोणतेही वर्णविशिष्ट किंवा कालविशिष्ट नियम सांगितले नाहीत. वारकरी परंपरा अहिंसेचा मूल्यविचार मानणारी परंपरा आहे. स्वाभाविकच वारकरी संप्रदाय शाकाहारी आहे. पूर्वी यज्ञात मोठ्या प्रमाणात पशुहिंसा होत होती. अगदी श्राद्धपिंडदानातही पशुहिंसा व्हायची. पुढच्या काळात श्रमण परंपरांनी अहिंसेचा मूल्यविचार स्वीकारला. जैन, लिंगायत, महानुभाव आणि वारकरी अशा परंपरा शाकाहाराचाच पुरस्कार करणाऱ्या परंपरा आहेत. अर्थात या परंपरांमधील आहाराचे नियम वेगवेगळे आहेत. जैनधर्मीय कांदा लसूण निषिद्ध मानतात. पर्युषण पर्वात तर कांदा लसणाबरोबरच इतरही अनेक भाज्या आणि डाळी खाल्ल्या जात नाहीत. योगी, वैदिक ब्राह्मण, जैन आणि काही वैष्णव परंपरेत युक्ताहाराचे हे बारीक सारीक नियम आहेत. वारकरी संप्रदायाने मात्र युक्ताहाराचे असे कोणतेही नियम बनवले नाहीत. नामदेवरायांनी एक गवळण लिहिली आहे. त्या गवळणीत ‘तूप लावूनी भाकर करी। वांगे भाजूनी भरीत करी। वरी कांद्याची कोशिंबरी। मला जेवू घाल॥’ असं श्रीकृष्ण यशोदेला म्हणत असल्याचं सांगितलं आहे. यातून कांदा आणि वांगं खाण्याला वारकऱ्यांचा विरोध नाही हे स्पष्ट होतं.
युक्ताहार जसा विविध परंपरा, जातवर्ण आणि साधनेनुसार बदलतो त्याचप्रमाणे तो आश्रमानुसारही बदलतो. वैदिक वर्णाश्रम धर्मात ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे चार आश्रम आहेत. यातील चारही आश्रमांचा अधिकार ब्राह्मणांना, तीन आश्रमांचा अधिकार क्षत्रियांना, दोन आश्रमांचा अधिकार वैश्यांना आणि केवळ गृहस्थाश्रम या एकाच आश्रमाचा अधिकार शूद्रातिशूद्रांना आहे. साहजिकच गृहस्थाश्रम हा सर्वात कनिष्ठ आश्रम मानला गेलेला होता. वारकरी संप्रदायातील संतांनी यात उलटापालट केली. त्यांनी इतर सर्व आश्रमांहून गृहस्थाश्रम श्रेष्ठ असल्याची मांडणी केली. केवळ गृहस्थाश्रमानेच वैराग्याचे परमपद प्राप्त होते असा सिद्धांत तुकोबारायांनी मांडला. ‘तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ। परमपद बळ वैराग्याचे॥‘ असं तुकोबाराय म्हणतात. या गृहस्थाश्रमाचा अधिकार सर्वांना आहे. या आश्रमात युक्ताहाराचं कोणतंही बंधन नाही. त्यानंतर गृहस्थाश्रमाच्या पुढच्या आश्रमात म्हणजेच वानप्रस्थाश्रमात मात्र युक्ताहाराचं पालन कठोरपणे करावं लागतं. साधारणपणे वयाच्या ५०व्या वर्षी वानप्रस्थाश्रमाची दीक्षा घेता येते. अर्थात त्याचा अधिकार फक्त ब्राह्मण आणि क्षत्रियांना आहे. वैश्य आणि शूद्रातिशूद्रांना नाही. वानप्रस्थाश्रमात घरदार सोडून, सर्वसंगपरित्याग करुन जंगलात राहावं लागतं. या काळात फक्त कंदमुळं आणि फळांवर उदरनिर्वाह करावा लागतो. त्यामुळेच तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगाच्या तिसऱ्या चरणात युक्ताहारादी अनेक बंधने असणारा वानप्रस्थाश्रमही नाकारला आहे. वानप्रस्थाश्रमाची दीक्षा देताना एक दंड दिला जातो. तो बांबूचा असावा असा धर्मशास्त्राचा नियम आहे. ब्रह्मचर्याश्रमात दीक्षेसाठी दिला जाणारा दंड हा वर्णनिहाय वेगवेगळा असतो. उदा. ब्राह्मणासाठी पळस तर क्षत्रियासाठी वडाचा दंड दिला जातो. वानप्रस्थाश्रमात दोन्ही वर्णातील व्यक्तींना एकाच वृक्षाचा दंड दिला जातो. वारकरी संप्रदाय गृहस्थाश्रमाचा पुरस्कर्ता असल्यानं तो वानप्रस्थाश्रमाची गरजच नाकारतो. त्यामुळेच तुकोबाराय प्रस्तुत अभंगात म्हणतात ‘न लगे लौकिक सांडावा वेव्हार। घ्यावे वनांतर भस्म दंड॥’ अखंडपणे गृहस्थाश्रमात राहून फक्त नामसंकीर्तन करत राहिलात तर वानप्रस्थाश्रमाची जरुरी नाही. ‘न लगती सायास जावे वनांतरा । सुखे येतो घरा नारायण॥’ असं तुकोबाराय आणखी एका अभंगात सांगतात. वानप्रस्थाश्रमात अनेक प्रकारचे सायास करावे लागतात. गृहस्थाश्रमात फक्त नामसंकीर्तनाने देवाचं प्रेम अनुभवता येतं. त्यामुळेच ‘कलियुगामाजी करावे कीर्तन। तेणे नारायण देईल भेटी॥’ असं प्रस्तुत अभंगाच्या धृपदात तुकोबाराय म्हणतात.
वारकरी संप्रदायातील संतांनी गृहस्थाश्रमाचं माहात्म्य तात्त्विक स्तरावर मांडलं. गृहस्थाश्रमातच राहून फक्त नामसंकीर्तनाच्या साधनेने आपण वैराग्याचे परमपद प्राप्त करू शकतो असा सर्वांना विश्वास दिला. साहजिकच यातून संतांनी इतर तीन आश्रमात असणारी युक्ताहारादी बंधने, देहदंडणाच्या कठोर साधना आणि या आश्रमांमधला अधिकारपरत्वे वर्णनिहाय भेदभाव याला फाटा दिला. संतांनी ज्याप्रमाणे नामसंकीर्तनाच्या द्वारा इतर आश्रमांहून गृहस्थाश्रमाचा महिमा सांगितला, त्याचप्रमाणे गृहस्थाश्रमातील इतर पारंपरिक कर्मकांडही त्यांनी नाकारलं. गृहस्थाश्रमात व्यक्तीने यज्ञयाग, श्राद्धतर्पण वगैरे कर्मकांड करणं अभिप्रेत आहे. संतांनी एका बाजूला गृहस्थाश्रमाचा महिमा सांगितला, पण त्याचवेळी गृहस्थाश्रमातील पारंपरिक वैदिक कर्मकांड मात्र नाकारलं. गृहस्थाश्रमात इतर कोणत्याही कर्मकांडाऐवजी फक्त नामसंकीर्तन हे श्रेष्ठ आणि उद्धाराचं एकमात्र साधन असल्याचं तुकोबाराय प्रस्तुत अभंगात सांगतात. त्यामुळेच ते या अभंगाच्या अखेरच्या चरणात म्हणतात की एका नामसंकीर्तनाशिवाय इतर सर्व साधना व्यर्थ आहेत.

Previous Post

इस्रायलच्या राष्ट्रवादाला वाढता विरोध

Next Post

काटकर पोहे

Next Post
काटकर पोहे

काटकर पोहे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.