
दुसर्या महायुद्धानंतर पॅलेस्टेनियन प्रदेश हा ब्रिटनच्या अखत्यारीत होता. हिटलरने लाखो ज्यूंचे शिरकाण केले होते. लाखो ज्यू लोक निर्वासित झाले होते. या ज्यूंना वसवण्याचा फार मोठा पेच दोस्त राष्ट्रांसमोर होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रमन, ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल, रशियाचे अध्यक्ष जोजेफ स्टॅलिन यांनी त्या कामी पुढाकार घेतला होता.
ज्यू लोकांचा पॅलेस्टेनियन भूमीत येण्याचा ओघ त्या अगोदर ५० वर्षे चालू झालेला होता. जगभरातील ज्यूंनी एकत्र येऊन झिओनिस्ट या संघटनेची बांधणी केलेली होती. ‘परमेश्वराने हा भूभाग आपल्याला बहाल केल्यामुळे या भूभागावर आपलाच अधिकार आहे, तो आपल्याला मिळालाच पाहिजे’ अशी या झिओनिस्टांची मागणी होती. हा भूप्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात असल्यामुळे तिथे एक-एक करून वस्ती करणे ज्यूंना शक्य झाले. परंतु तिथे इस्रायल या नव्या स्वतंत्र ज्यू राष्ट्राची निर्मिती होणे जवळपास असंभवनीय होते. हा भूप्रदेश जवळपास ९० टक्के पॅलेस्टेनियन लोकांनी व्यापलेला होता. युरोपातून निर्वासित झालेल्या ज्यूंना कुठे वसवायचे, हा प्रश्न दोस्त राष्ट्रांपुढे निर्माण झाला होता.
आमची सोय पॅलेस्टेनियन भूप्रदेशातच करावी असा आग्रह ज्यूंनी धरला. तोपर्यंत जगभरच्या जनभावना या निर्वासितांच्या हलाखीकडे वळलेल्या होत्या. त्यामुळे ब्रिटनवर आपोआप एक दबाव तयार झाला. तोपर्यंत अमेरिकेतील ज्यू लॉबी देखील ताकदवान झालेली होती. ब्रिटिश संसदेमधील काही प्रभावी राजकीय नेत्यांमुळे आणि या ज्यू लॉबीमुळे ब्रिटन सरकारने पॅलेस्टेनियन भूमीतील एक विशिष्ट भाग वेगळा करण्याची योजना आखली. या योजनेअंतर्गत १९४८ साली इस्रायल राष्ट्राची निर्मिती करण्यात आली. तिथून प्रखर झिऑनिस्ट राष्ट्रवादाची सुरुवात झाली. ७५ वर्षांनंतर या राष्ट्रवादाला खतपाणी घातल्याबद्दल आपल्याला पश्चात्ताप करावा लागेल असे त्यावेळी ब्रिटनच्या ध्यानीमनीही नसावे.
इस्रायलच्या या आक्रमक राष्ट्रवादाचा त्रास शेजारी राष्ट्रांसह संपूर्ण खंडाला आणि बऱ्याच अंशी सगळ्या जगाला सहन करावा लागत आहे. इस्रायली राष्ट्र अस्तित्वात आले त्यावेळी इस्रायलचे क्षेत्रफळ २१,००० चौरस किलोमीटर होते. आज इस्रायलच्या पायाखाली जेवढा भूप्रदेश आहे, त्याचे क्षेत्रफळ २७७०० चौरस किलोमीटर इतके आहे. तरीही इस्रायलची राक्षसी भूक भागत नाही. कोणताही आक्रमक राष्ट्रवाद पुढे जाऊन कसे अक्राळविक्राळ स्वरूप धारण करतो, त्याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
इस्रायलपासून चालू झालेला हा झायोनिस्टांचा राष्ट्रवाद आता अमेरिकेपर्यंत पोहोचलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची रिपब्लिकन पार्टी उघड-उघडपणे ज्यू राष्ट्रवादाला खतपाणी घालत आहेत. त्यांच्या दबावापुढे झुकून खुद्द अमेरिका हेच आता एक हल्लेखोर राष्ट्र बनलेले आहे.
आधुनिक युगात जर्मनीचा नाझी नेता अॅडॉल्फ हिटलर याने राष्ट्रवादाचा पाया रचलेला होता. फॅसिस्ट नेता मुसोलिनी ह्याच्यासोबत त्याने युरोपभर धुमाकूळ घातला होता. त्याची प्रचंड किंमत मानवी जीविताच्या रूपात युरोपला चुकवावी लागली. म्हणूनच आता युरोपमधूनच ज्यूंच्या राक्षसी राष्ट्रवादाला वाढता विरोध होत आहे. आजच्या घडीला ब्रिटनसमवेत फ्रान्स, डेन्मार्क, आइसलँड, पोलंड, पोर्तुगाल, स्वीडन, नॉर्वे, आयर्लंड, स्पेन आणि कॅनडा या आक्रमक राष्ट्रवादाला विरोध करण्यास सज्ज झालेले आहेत.
ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री एड मिलिबँड यांनी ८ सप्टेंबरला ब्रिटिश संसदेमध्ये भूकंप घडवला. त्यांनी इस्रायली वसाहतवाद्यांचा थेट ‘अतिरेकी’ असा उल्लेख करून तिथून उत्पादित होणार्या सर्व उत्पादनांवर ब्रिटनमध्ये आयातबंदी लावल्याचे घोषित केले. मिलिबँड यांनी पुढे जाऊन हाही आरोप केला की वेस्ट बँक प्रदेशातील इस्रायली वसाहतवाद्यांनी वंशसंहार चालू केला असून इस्रायली सरकार त्याकडे मुद्दामहून काणाडोळा करीत आहे. पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांनी ताबडतोब एड मिलिबँड यांना पाठिंबा दिला. इस्रायल आणि पॅलेस्टाईन अशी दोन राष्ट्रे व्हावीत, ही संयुक्त राष्ट्रांची मागणी आहे. या मागणीला इस्रायल खो घालत आहे, असा आरोप बर्नहॅम यांनी केला. इस्रायलच्या वाढत्या राष्ट्रवादाच्या विरोधात ब्रिटनने उचललेले ते एक क्रांतिकारक पाऊल आहे. ज्या इस्रायल राष्ट्राची निर्मिती ब्रिटनने केली त्याचाच राष्ट्रवाद रोखण्यासाठी ब्रिटनने हे तगडे पाऊल उचलले आहे.
१९४९मध्ये इस्रायली लोकांनी पॅलेस्टेनियन लोकांची गळचेपी चालू केली. पॅलेस्टेनियन लोकांच्या ताब्यातील महत्त्वाची ठिकाणे बळकावण्यासाठी राष्ट्रवादाने भारलेल्या इस्रायली टोळ्यांनी हल्ले चालू केले. शेजारच्या इजिप्त, लेबेनॉन, जोर्डन आणि सिरियाच्या सरकारांना ते पहावले नाही. या अरब राष्ट्रांनी इस्रायलविरुद्ध युद्ध चालू केले. नऊ महिने चाललेले हे युद्ध चिमुकल्या इस्रायलने जिंकले. ब्रिटनने आणि अमेरिकेने इस्रायलला साथ दिली नसती तर इस्रायल या युद्धात कधीच यशस्वी झाला नसता. या जिंकलेल्या युद्धात इस्रायलने पूर्व जेरुसलेम, नेगेव्ह प्रांत, बिरशेबा प्रांत आणि गालिली प्रांत जिंकला. जिंकलेला भूप्रदेश त्यांनी ताब्यात ठेवला. तो सोडण्यास नकार दिला. ऊग्र राष्ट्रवादाची ही प्रथम निशाणी असते. तिची नोंद घेण्यास ब्रिटन कमी पडले.
१९६७ला पुन्हा युद्ध झाले. या लढाईत इस्रायलने बाजी मारली. जिंकलेला सिनाई प्रांत, गाझा प्रांत, गोलन हाइट्स प्रांत आणि वेस्ट बँक प्रांत सोडण्यास इस्रायलने नकार दिला. तिथे वसाहती उभारण्यास घेतल्या. त्यास प्रतिकार म्हणून नंतर पॅलेस्टाईन लिबरेशन फ्रंट ही सशस्त्र सेना उभी राहिली. त्यांनी इस्रायलमध्ये रक्तपात घडवला. पुढील वीस वर्षे तणातणीत गेली. अखेरीस ते प्रदेश सोडण्यास इस्रायलचे सरकार तयार झाले. शांततेचे पर्व निर्माण होईल असे वाटले. परंतु १९९२ साली इस्रायलचे पंतप्रधान आणि थोर मानवतावादी नेते यित्झाक राबीन यांची हत्या इस्रायलच्या राष्ट्रवाद्यांनी घडवून आणली. पुन्हा एकदा इस्रायलमध्ये राष्ट्रवादाला उसळी आली. इस्रायलचे सध्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू तेव्हापासून या राष्ट्रवादाचे नेतृत्व करीत आहेत.
इस्रायली बनावटीचा हा राष्ट्रवाद अन्य राष्ट्रांमध्ये देखील पोहोचला आहे. सध्या इटली, हंगेरी, स्वीडन, फिनलंड, क्रोएशिया, चेक रिपब्लिक, ऑस्ट्रिया, नेदरलँड्स, भारत, इंडोनेशिया, जपान, पाकिस्तान, अर्जेंटिना, चिली इत्यादी देशांत अशा बहुसंख्याकवादी राष्ट्रवादाने थैमान घातलेले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ही मागणीही अशाच एकारलेल्या राष्ट्रवादाचीच एक निशाणी आहे. लोकशाही मूल्य मानणार्या देशांना यांची जाणीव झाली आहे. फ्रान्स, कॅनडा, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड, पोलंड, पोर्तुगाल, स्वीडन, नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन या देशांनी त्याविरोधात उभा राहण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे. या देशांनी इस्रायली वसाहतवाद्यांची निर्भत्सना केली आहे. ते देखील वसाहतवाद्यांवर निर्बंध लावण्याच्या विचारात आहेत. त्या दृष्टीने राष्ट्रीय धोरणे आखण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रवाद म्हणजे निव्वळ स्वार्थ आणि अखेरीस विनाश या निर्णयाप्रत ही राष्ट्रे येऊन पोहोचलेली आहेत.
भारतासारख्या देशातही या तथाकथित प्रखर राष्ट्रवादाचा उपयोग आम जनतेला झालेला नाही. काही ठराविक लोकांना आणि घटकांना त्याचा लाभ होतो. भारतामध्ये जेन झीने चालवलेली आंदोलने अशा खोट्या राष्ट्रवादाला विरोध करणारे प्रमुख उदाहरण आहे. सध्या जगामध्ये ए.आय.चे मोठे भय पसरलेले आहे. राष्ट्रवादी प्रवृत्ती ए.आय.चा वापर करून संपूर्ण मनुष्य जातीलाच विनाशाप्रत नेतील, असा धोका उत्पन्न झालेला आहे. अशा ऊग्र आणि सर्वविनाशी राष्ट्रवादाचा पराभव करणे ही काळाची गरज आहे.

